अंक पहिला - भाग ४ था

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’


मैत्रै० : हें बघ , त्या गोष्टीचा आतां खेद मानूं नकोस. तुझे द्रव्य काहीं चोरांनी चोरिलें नाही कीं राजानें लुट्लें नाहीं ; आपल्याच इष्टमित्रांना देता देता क्षीण झाले आहे ; म्हणून देवांनी अमृतकला पितां पितां अवशिष्ट राहिलेल्या प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे , तुझ्या वैभवाचा क्षय तुला अधिकच शोभतो.
चारु० : मित्रा, -
पद -- ( चाल -- लाल झाली कोपाने. )
वैभव माझें नष्ठचि झालें , खेद नसे त्याचा मजला ॥
दैवबळानें मिळतें अथवा पावतसे तें विलयाला ॥धृ॥
परि कथितों तुज हृदयीं माझ्या दु:खाचें जें बीज सलें ॥
निर्धन ऐसा झालों जाणुनि मित्रांनी मज सोडियलें ॥
मद जाउनि गजगंडस्थळ तें शुष्कचि होतां बहुकालें ॥
भृगतती त्या सोडुनि जैसें सेवितात कीं अन्याला ॥१॥
मैत्रै० : अरे, ते मित्र म्हणजे गोमाशा ; त्यांच्याबद्द्ल तुला इतकें वाईट तें कां वाटतें ?
चारु० : ( सुस्कारा टाकून ) मित्रा, काय रे ही निर्धनता ! इच्यापासून काय काय अनर्थ घड्तात पहा --
पद -- ( चाल -- अर्धतनु वारुळीं बुडाली. )
निर्धनतेंनें लज्जा निपजे मनुजाच्या अंतरी, लज्जा तत्तेजातें हरी ॥
होतां तेजोहीन तयाला कोणी नच आवरी, लोकीं मानहानि बहुपरी ॥ जीवित निष्फळ वाटे तेणे मनिं शोकातें करीं , शोके जाय बुध्दि ती दुरी ॥ बुध्दिरहित नर नाश पावतो सर्वा कारण परी, तयाची निर्धनता बा खरी ॥ चाल ॥ निर्धनतेच्या ठायी चिंता वसे ॥ परवैरा कारण इजसम दुसरें नसे ॥ इजमुळें मित्रगण निंदापर होतसे ॥ चाल ॥ सेवया वन बुध्दि निपजवी भार्या छाळिते घरीं ; तापद वन्हिच हा म्हणुं तरी ॥१॥
_ असो , दैव आपलें ! मित्रा, मी गृहदेवतांना बलि दिला . आतां हा मातृदेवतांचा बलि तूं चव्हाटयावर नेऊन ठेव.
मैत्रै० : मी ठेवायचा नाहीं .
चारु० : कां बरें ?
मैत्रै० : कां बरें म्हणजे , आराधना केली आणि कांहीं केलें , तरी देवता कांही प्रसन्न होत नाहीत; मग त्यांना बलि तरी कां द्या ?
चारु० : मित्रा, असें म्हणूं नकोस. हा गृहस्थांचा नित्यविधि आहे. हा केलाच पाहिजे. याच्या योगाने देवता प्रसन्न होऊन प्रसाद करतीलच ; तर जा आणि मातृदेवतांना बलि देऊन ये.
मैत्रै० : मी जायचा नाहीं , तूं दुसर्‍या कोणाला पाठीव. कारण , मी गरीब ब्राह्मण , मला नाही काळ अनुकूल. आरशांतल्या प्रतिबिंबात जसे उजव्याचे डावें आणि डाव्याचे उजवे होतें, तसे जें जें म्हणून मी करायला जातों तें सारें उलटें होते. इतके असून तूं सांगतोस म्हणून गेलों असतों ; पण ही संध्याकाळची वेळ ; रस्त्यातून वेश्या , विट , चेट , तशीच राजाच्या प्रीतींतली दुसरी मनुष्यें इकडून तिकडे हिंड्त आहेत; तेव्हां न जाणो, बेडूक खायला उत्सुक झालेल्या काळसर्पापुढे जसा अकस्मात उंदीर पडावा, तसा मी त्यांच्यापुढे पड्लों तर फुकट मरेन कीं नाहीं बरें ? मग तूं इथे एकटा बसून काय करशील ?
चारु० : ( दु:खानें ) बरोबर आहे. मी निर्धन पडलों म्हणून तूं असें म्हणतोस; तुझ्याकडे तरी काय दोष ?_
साकी
ब्राह्मणहत्या मद्यप्राशन चौर्यहि तैसें तिसरें ॥
गुरुभार्येशी गमन कुसंगति ऐशीं पापें बा रे ॥
निर्धनता वाटे ॥ सहावें पातक हें मोठें ॥१॥
_ ( सुस्कारा टाकून ) मित्रा दारिद्रया ! _
दिंडी
सौख्य मानुनि बहु वससि मम शरीरीं ॥ कींव मित्रा परि येत तुझी भारी ॥
पुढें कालानें मरण मला येतां ॥ कुठें जाशिल तूं हीच मनी चिंता ॥१॥
मैत्रै० : ( वाईट वाटून ) तुला इतकें वाईट वाटत असेल तर जातों बापडा , पण एकटा नाही जायचा . रदनिकेच्या हातांत दिवा देऊन तिला बरोबर घेईन आणि मग जाईन .
चारु० : बरें तर , ती कोठें आत असेल तिला घेऊन जा; तोपर्यत माझा जप उरला आहे तो मी संपवतो.
मैत्रै० : आतां रदनिकां कोठें सांपडेल बरें? ( पडद्याकडे कान देऊन ) अं : , असेल काही रस्त्यातला दंगा. आपण आपल्या कामाला जावे. ( जातो. ) ( पुढे वसंतसेना व तिच्या पाठीस लागलेले विट , चेट व शकार असे येतात. )
विट : वसंतसेने उभी रहा. _
दिंडी
नृत्ययोग्यचि मृदु चरण असुनि त्यांसी ॥ धांवण्याचे कष्ट कां व्यर्थ देसी ॥ हरिणी जैसी., लागतां व्याध मागें ॥ आम्हां पाहुनि तूं पळसि तेवि कां गे ॥१॥
चेट : अग ए , वसंतसेने, उभी रहा.
लावणी
नग पळून जाऊं तूं नारी ॥ जरा थांब फीर माघारी ॥धृ॥
त्यो मोर , तूं मोरीन ॥ कां जातीस त्येला टाकून ॥१॥
मागं लागून माजा धनी ॥ आला धांवत कुत्र्यावानी ॥२॥
शकार : अगे वसंतसेने, उभी रहा. अगे अशी धावू नकोस - अशी पळू नकोस. अगे , माझ्यावर जर सुप्रसन्न झालीस तर मरायची नाहीस . हें बघ ,मासांचे तुकडे जसे निखार्‍यावर पडले म्हणजे जळतात तसे हें माझे हृदय काम संतापाने जळत आहे. तर तूं माझ्यावर सुप्रसन्न हो गे. अगे हें बघ , तुला पाहून माझा अनंग , माझा काम , माझा स्मर ,माझा मन्मथ , हे सारे एकदम वाढले कीं ग रात्री सुस्कारे सोडीत शय्येवर पड्तों , पण स्वप्नांतसुध्दां बघ झोप येत नाही. म्हणून रावणाला जशी कुंती वश झाली , तशी तूं माझ्यावर सुप्रसन्न हो गे.वसंतसेने , तूं कशी सुरेख मदनाची छ्डी आहेस, चोर आहेस . मासे खाणारीण आहेस, शृगारासारखी पेटी आहेस, सुंदर नाचणारीण आहेस, सुवसना आहेस आणि तुझे नाक कसें चपटें आहे ! तर तूं माझ्यावर सुप्रसन्न हो कीं ग ! मित्रा  विटा , मीं हिला इतकी चांगली चांगली म्हणून नावाजली तरी ही माझ्यावर सुप्रसन्न कां रे होत नाहीं ?

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP