( गीतिवृत्त )
जय जय देवतरंगिणि ! विष्णुपदि ! त्रिपथगे ! सुरर्षिनुते !
देवि ! भगीरथनंदिनि ! शिवदयिते ! भीष्मजननि ! जह्नुसुते ! ॥१॥
जगदीश्वरि ! निर्जननदि ! माते ! तव दर्शनें घडे मुक्ति.
स्नानफ़ळ न मीं जाणें. बुध कथिति सुरर्षिची असी उक्ति. ॥२॥
‘ गंगा म्हणतां, प्राणी पावे अतिमात्र हर्ष, न वदे ‘ हा ’ !
स्पर्शे सुरकरमुक्तस्वस्तरुवरकुसुमवर्ष नव देहा.॥३॥
तो स्वर्गीं चिर, ज्याचें तव पुण्यजळांत अस्थिरज नांदे.
दुसरें सुकृत नदीश्वरि॒ ! नाकीं सुखवास अस्थिर जनां दे. ॥४॥
तूं उतरिलीस जेणें, त्या यश अत्यंत शुद्ध रायाचें;
जगदुद्धरा केलें मिष पूर्वजमात्र उद्धरायाचें. ॥५॥
गंगे ! गुरु म्हणति जना, ‘ कार्य करुनि, जवळ सुतट तें उरकीं.
कामाद्यरिचें, तव जळपानें, तत्काळ उतटतें उर कीं. ॥६॥
अत्यद्भुत तव महिमा; देवि ! भिजविलें तुझ्या जळें चूर्ण,
त्या वेशातांबूलें अत्यासक्ता विमान ये तूर्ण. ॥७॥
केवळ अधन्य जन जो, तोहि, तुतें भजुनि, धन्यता पावे.
न भजुनि, अमृतपितेही, मग भगवति ! कां न अन्य तापावे ? ॥८॥
नाम तुझें मोहातें, कळितें नळनाम, तेंवि कांपवितें.
गंगे ! अघनगभेदा ज्ञाता पसरील तोंड कां पवितें ? ॥९॥
वरुनि तुंतें, पावे ज्या कीर्तीतें मानवेंद्र शांतनु, ती
अन्यासि नसे गंगे ! करिति तयाची समस्त शांत नुती. ॥१०॥
पुत्र तुझा देवव्रत गंगे ! सत्यप्रतिज्ञ, अतितेजा,
बहुतचि शौर्यें ज्ञानें मानवले सर्व लोकपति ते ज्या. ॥११॥
भाग्यें सांपडलें, तुझिया न त्यजिति संत रोधा त्या.
म्हणति ‘ जरि अंतरेल स्वजनादि, समग्र अंतरो, धात्या ! ’ ॥१२॥
कौपीन धरुनि, भिक्षा भक्षुनि, तीरीं तुझ्या बरें वसणें.
बसणें भद्रासनिंचें न भलें, कीं देवि ! न चुकती मसणें. ॥१३॥
त्वत्तीरमृत्तिकेनें जेणें तिळमात्र रेखिला टिकला,
तो स्वर्गीं ज्ञात्याहीं शक्रसम सभाग्य देखिला टिकला. ॥१४॥
अंतीं अतिपापिमुखीं पडतां त्वत्तोय, तन्नरक चुकला.
गंगे ! यमदूत म्हणति, ‘ रे ! होयिल नाश, पाश हा उकला ’. ॥१५॥
गंगे ! धूसी समला, माय जसी, करुनियां दया, धूती.
प्रसवलि सुपुत्र, बहुधा भजली तुज भक्तिनें कयाधू ती. ॥१६॥
जीवांसीं जेंवि तुझें, मातेचें स्थिर सदा नसे, नातेण.
तूं जें साधुनि देसी, पद शक्राचीहि दे न सेना तें. ॥१७॥
निववी तव प्रवाहचि, गंगे ! नासून ताप तीन; रते
ज्यांचें मन तव तीरीं, नच, मुख वासून, तापती नर ते. ॥१८॥
पुरुषार्थांची शुद्धा गंगे ! तूं सद्रसा धुनी, राजी;
तुज पंचप्राणाहीं, पावुनि बहु भद्र, साधु नीराजी. ॥१९॥
त्वत्तीरीं, निरुपम यश परिसुनि, देवुनि धुमा, पतिति वसती.
इतरांची काय कथा ? करितो सेवन उमापति तव सती ! ॥२०॥
देवी ! न्हाती, ध्याती, गाती, वाहती तुला सुमाल्या या.
नित्य स्नान, करितसे त्वत्पुण्यजळीं यशा उमा ल्याया. ॥२१॥
राज्ञीस जसी दासी, दूरूनि करयुग तुला सुधा जोडी.
गोडी तुझ्याचि सुरसीं निपटचि, अन्यत्र सन्मतें थोडी. ॥२२॥
भाग्यें लागे गोडी ज्याला, तो विषय दिव्यही सोडी,
जोडी तुलाचि, मोडी श्रीमनहि, स्नेह सिद्धिचा तोडी. ॥२३॥
हरिभक्तिनें करावें, कीं जें हरभक्तिनें स्वदासाचें,
तेंचि श्रेय करिसि तूं, गंगे ! अत्यादरें सद साचें. ॥२४॥
ज्या योगसांख्यसिद्धी, त्यांहुनि जी समधिका दिढीनें, ती
तूं गंगे ! कैलासा, वैकुंठातें, सुखें शिढी नेती. ॥२५॥
म्हणसी, ‘ कुळघ्न, निर्दय, जो वंचक, तोहि मीन, बक, रहो,
योग्य कराया मुदित, द्वादश आदित्य, रुद्र अकरा, हो. ’ ॥२६॥
सुर करुनि, स्वर्गीं तूं स्थापिसि तो, जो गिळी परा सुसर.
श्रितहित करिसि; सुधेचें होवूं देयिल कसें परासु सर ? ॥२७॥
काकादि पापपक्षी स्पर्शति तुज पक्षमारुतें अवरें,
त्यांतें, तव प्रसादें, स्वर्गीं वीजिति वराप्सरा चवरें. ॥२८॥
‘ मिळतां कौशेय, वलय, मुक्ता, मृगनाभि, जतु, वधूस्नानीं
गंगे ! तज्जीव, तरुहि, तरति सुखें, ’ वर्णिती असें ज्ञानी. ॥२९॥
श्रीहरिहरकीर्ति जसी, तारिसि तूं सकळ जंतु सुरसरिते !
प्रेमरहित जे जन, ते दुसरा भरला असोनि सुरस, रिते. ॥३०॥
श्रीशपदांबुजबाले ! श्रीशंकरमौलिमालतीमाले !
आले शरण तुला जे, काळाचें बळ न त्यांपुढें चाले. ॥३१॥
प्रकटलिस हरिहरांची, वाराया सकळजंतुताप, दया,
तूं तरिच म्हणसि, ‘ जन हो ! देत्यें, न गणुनि समंतुता, पद, या. ’ ॥३२॥
श्रीकृष्णमूर्ति यमुना, गंगे ! श्रीशंभुमूर्ति तूं धवळा;
ब्रह्मसुखाच्या देतां, द्रवुनि तुम्ही माय - मावसी, कवळा. ॥३३॥
यमुनासंगमहर्षें क्रीडसि, कथिती कवि प्रयागीं तें.
ज्ञानमयी प्रत्यक्षा तूं, म्हणति मृषा न विप्र यागीं तें. ॥३४॥
वाटे अश्वासि, तसें लोळावें कविजना तुज्या पुलिनीं.
क्रीडावें मुक्तीनीं, माहेरीं जेंवि लाडक्या मुलिनीं. ॥३५॥
वाळूंत तुझ्या लोळे जो, सिद्धि तयाचिया पदरजांत.
ध्यातो पळहि तुतें, तो नांदे लोकीं, वसे न दर ज्यांत. ॥३६॥
त्रिजगद्भूषे ! माते ! गंगे ! अतिवत्सळे ! सदाधारे !
म्हणसी, ‘ माझें क्षीर प्राशुनियां, जीव हो ! सदा धा रे ! ’ ॥३७॥
जे त्वद्गुण प्रतीपक्षितिपतिपतिच्या सुने ! न वेदा ते
गणवति, अतुलौदार्ये ! त्वां लाजविले जुने, नवे, दाते. ॥३८॥
जैसी तुझी निरुपमा, कोणाचीही असी कथा नाहीं.
तृप्ति त्वन्नामाहीं बहु बाळांला, तसी न थानाहीं. ॥३९॥
गमनें, नमनें, स्ववनें पवनें, स्तवनेंहि न व्यथा राहे.
ऐसे अत्यद्भुत जे त्वद्गुण, विश्वासि भव्य थारा हे. ॥४०॥
भगवति ! देवि ! तव यशें यश सर्वांचेंहि सर्व लोपविलें.
अत्युत्कर्षें गंगे ! त्वां बहु लोकेशचित कोपविलें. ॥४१॥
‘ गंगा गंगा ’ ऐसें म्हणतांचि, अशेष पाप खंडावें.
त्या दंडपाणिनें मग कोणाला, काय म्हणुनि, दंडावें ? ॥४२॥
यज्ञ करावे ज्यांहीं, द्यावा त्यालाचि शतमखें स्वर्ग.
तूं मज्जनकरित्यांतें देसी गंगे ! सुखें चतुर्वर्ग. ॥४३॥
मज्जन तव प्रवाहीं करितां, होतात हरिहर प्राणी.
‘ गंगे ! काय करिसि हें ? ’ कोणासहि न वदवे असी वाणी. ॥४४॥
तुज लोकप आर्जविती, कीं तूं तेजेअं निजाधिका, राहो -
आहे प्रसाद हा स्थिर, कोपें न च्युति निजाधिकारा हो. ॥४५॥
जो तुज भजतो गंगे !, आर्जविति तयाहि सर्व लोकेश.
न दुखों देती नाकीं, नाकींचा होय भक्त तो केश. ॥४६॥
तूं स्वपतिमस्तकीं हें दुर्गादेवी सुखें सदा साहे.
वाहे स्वयेंहि माथां, यास्तवचि हरार्ध जाहली आहे. ॥४७॥
गंगे ! उद्धरिसि जस्सें, हरिहरहि असें न तारिती, कीट.
वीट स्वशिशुवचाचा न धरीं, माते ! म्हणों नको धीट. ॥४८॥
सेवा घेती गंगे ! पाहति अधिकार, बहु तया कसिती,
असितीक्ष्णव्रत धरविति, भरविति मग अमृत, परि दया कसि ती ? ॥४९॥
गंगे लोकपतिकथा काय ? हरिहरहि सदा तुझ्या भक्ता -
बहु मानिति; किं बहुना ? बहु वानिति तन्नमस्क्रियासक्ता. ॥५०॥
देवि ! दयावति ! दवडिसि दासांची दु:खदुर्दशा दूर.
पापातें पळवितसे परमपवित्रे ! तुझा पय:पूर. ॥५१॥
तुज परिपाल्यचि गंगे ! पापी, कीं जो महातपा, न्हातो.
शिशुचा काय खरजुला स्पर्शुनि आणी न हात पान्हा तो ? ॥५२॥
गंगे ! तुजसम तूंचि, त्रिजगीं, दुसरी असी नदी नाहीं.
सति ! सार्वभौमपदवी पावावी जातिनें न दीनाहीं. ॥५३॥
गोदावरी, पयोष्णी, कावेरी, नर्मदा नदी, धन्या
तैसीच तुंगभद्रा, कृष्णा, भीमा, सुकीर्ति ज्या अन्या; ॥५४॥
या तव विभूति सर्वा गंगे ! ज्या हिमनगादिगिरिजन्या;
भगवति ! तूं मातासी, त्या त्या तटिनी तुझ्या जशा कन्या. ॥५५॥
मंदाकिनी नभीं, नरलोकीं भागीरथी, स्वयें अससी.
गंगे ! भुजंगलोकीं, भोगवती नाम धरुनि, तूं वससी. ॥५६॥
पूर्णत्व दिलें त्वां जें, आठवितो सर्वदाहि अर्णव तें.
औदार्य तुझें अतुल श्रीगंगे ! कविस काय वर्णवतें ? ॥५७॥
हरिहरयशसें गाजे त्वद्यशचि सदैव सज्जनानीकीं.
दुर्लभ मखयोगाहीं तें तुझिया सुलभ मज्जनानीं कीं. ॥५८॥
मंत्रस्त्रान ब्रह्मचि, नच वर्णिल कवि भला बुचकळीला.
सति ! लाविलें धराया त्वत्तेजानें अलाबुच कळीला. ॥५९॥
सर्वत्र फ़ांकली तव किर्ति; इला भीत कळि तसा वाटे,
पडला चमूप्रवाहीं गंगे ! सहसा जसा ससा वाटे. ॥६०॥
लागे त्वद्भक्तांतें नित्य कराया ‘ नमो ! नमो ! ’ कलिला.
गंगे ! इहीं अकिंचित्कर किंकर हें गमोन मोकलिला. ॥६१॥
माते ! गंगे ! बुडतो जो तुझिया परमपूत तोयांत,
हा भवजलधि सुदुस्तर जरि, तरि न बुडे कदापि तो यांत. ॥६२॥
ज्या त्याहि वर्णिलाचि श्रीदेवि ! तव प्रभाव संतानें.
त्वज्जललवें प्रकटिली जेंवि, तसी न प्रभा वसंतानें. ॥६३॥
सुकवि म्हणति, ‘ हरिहरता देसी तूं भलतशाहि देहरता. ’
त्वयि तनुवितरणसमये गंगे ! हरिता नकोचि, दे हरता. ॥६४॥
वाहेन शिरीं तुज मीं गंगे ! शंभुत्व म्हणुनि ओपावें;
श्रितकल्पलते ! समयीं तूं मज दीनासि म्हणुनि ‘ ओ ’, पावें. ॥६५॥
हरिचरणीं तूं वससी, यास्तव देवूं नकोचि हरितेतें.
गंगे ! भक्त्यनुचित जें, गुरुपदहि न वरिति भक्तिकरिते तें. ॥६६॥
जरि चातकखगहर्षद वर्ष दयावति ! उदार, परि उभतें.
शुभ तेंचि करिसि गंगे ! प्रेम तुझें कामधेनुचें दुभतें. ॥६७॥
सोडी, विटुनि न पाहे मग, जरि बहु तळमळोनि, नर मेला.
हरिसमशीले ! गंगे ! च्यवला जन भजुनि कोण न रमेला ? ॥६८॥
विष्णुपदि ! श्रितसदये ! गंगे ! तूं विश्वमान्यकुलशीला;
श्रीला न लागला तव गुण, चरणीं वसुनि, जेंवि तुलसीला. ॥६९॥
त्वद्भजन जया घटतें, जनवृंद ‘ जितं जिंत ’ म्हणुनि, नटतें,
झटतें, तटतें, फ़टतें, हटतें अरिषट्क करुनियां हट तें. ॥७०॥
गमति प्रभुच्या, तुझिया दयितवयस्यासमा, जटा कविला.
तरिच, तिहीं तुजकरवीं कथुनि न सज्जनसमाज टाकविला. ॥७१॥
बहु जेंवि जयंताचा श्रीगंगे ! देवि ! तात सुर साजे
स्वर्गीं, तसेचि साजति कीटहि, तव सेवितात सुरसा जे. ॥७२॥
चिंतामणि, कल्पतरु, स्पर्शामणि, सुरभि इहीं न कोपावें.
गंगे ! तूंचि उदारा हें सत्य; स्तुति म्हणों नको, पावें ? ॥७३॥
होतो बहु मान्य सदा गंगे ! त्वद्भक्तजन कविवरातें.
पाहों शके जयाच्या ज्ञानीं न जयंतजनक विवरातें. ॥७४॥
जें स्नान तुझें देतें, अवभृथ देती न शत मखांचे तें.
वैगुण्यफ़ळ च्युतितें चुकवूं दे जेंवि न तम खांचेतें. ॥७५॥
वारी हिमाद्रिचा, तव संबंधें सर्व ताप, परिसर तो
भोग, तव जना गरुडा पाहुनि, अत्युग्र साप, परि, सरतो. ॥७६॥
भक्तासि करिसि हरिहर, तूंहि म्हणसि, सिद्धि मग न कां ‘ जी जी ’ ?
त्वत्कीर्तिसुधा टाकुनि, इतरा सेवील कवण कांजी जी ? ॥७७॥
गंगे ! पाहुनि, वाहुनि नेतां त्वदमृतपरा सुर विमानीं
म्हणति सुरी बाळास ‘ न हा सुरसरिदुदपरासु, रवि मानीं. ’ ॥७८॥
गंगे ! तीरीं नीरीं मरती, त्यांचे विमान ते थाट,
वाट स्वर्गा न फ़ुटे, ऐसे दिनरात्रि चालती दाट. ॥७९॥
हाचि महोत्सव नित्य स्वर्गीं गंगे ! असाचि वाढावा;
भवपंकांतुनि काढिसि जीवौघ जसा, तसाचि काढावा. ॥८०॥
हरिचरणोत्पन्ना तूं सत्य, तरिच विश्व तारिसी गंगे !
तरचि तुझा चालतसे व्रतराज सदा , कदा न हा भंगे. ॥८१॥
तरिच तुला अतिसदये ! भगवान् शंकर शिरीं सदा वाहे.
तरिच भगीरथ विनवी भेदाया अघगिरीस दावा हे. ॥८२॥
गणपति तव पुत्र खरा; तत्स्मरणें कां न विघ्न हरपावे ?
तरिच प्रसन्नचित्तें त्वद्भक्ता भक्तनिघ्म हर पावे. ॥८३॥
स्वामी त्वत्पुत्र तरिच झाला त्राणार्थ अमरसेनानी.
वरिला न तारकाच्या, जय तरिच करूनि समर, सेनानीं. ॥८४॥
तूं चितिच देवि ! गंगे ! तरिच हरिहरादि देव वीतीस.
ध्यात्या जीवांकरवीं ब्रह्मसुखोद्गार देववीतीस. ॥८५॥
गंगे ! शव तव सलिलीं भलतेंसेंही अनाथ जें पडलें,
सडलें, त्वद्धन्यत्व, न वसतां सिंहासनीं, जनीं घडलें. ॥८६॥
हरिहरदूत, विमानें सिद्ध करुनि, तव तटीं सदा बसती
न्याया, परासु होतां, पुरुष असाधु, स्त्रियाहि ज्या असती. ॥८७॥
काशी पुरींत मुख्या, सर्वांच्या घेतसे सदा नति जी.
कीं तूं नदींत गंगे ! साधूंच्या हर्ष दे सदा न तिजी.॥८८॥
गंगे ! तरिच परिचयाकरितां भेटावयासि आलीस;
झालीस स्पष्ट सखी; सोडिसि न क्षणभरीहि आलीस. ॥८९॥
गंगे ! सत्कवि गाती अत्यद्भुत यश तुम्हांचि दोघींचें.
काशीच्या वासीचें मुक्तिफ़ळ, तुझ्याहि तेंचि ओघींचें. ॥९०॥
आवडती श्रीकाशी, तैसीच महेश्वरासि तूं गंगे !
नित्यहि सेवी देवि ! प्रभु, तत्प्रेमा कधीं न तो भंगे.॥९१॥
गंगे ! सत्प्रियसंगे ! तुज - सुजन व्यन्न विपटही न विटे;
म्हणतो त्वत्तटरज, ‘ बहु गे ! तूं हैमीहि निपट हीन विटे ! ’ ॥९२॥
संसारीं कामकथा, इतरांची निजहि काय दे विरहा ?
तो धन्य जंतु, तूं ज्या स्वतटीं म्हणसील काय देवि ! ‘ रहा. ’ ॥९३॥
न उपासावें, गंगे ! देवि ! तुला अंतरोनि, पायसदा.
तुकडा शिळाहि खावा; जवळ करावे तुझेचि पाय सदा. ॥९४॥
‘ तुज लक्षूं, भक्षूं जळ, ओला कीं वाळलाचि हो पाला, ’
गंगे ! त्वद्भक्त म्हणति, भीती जठराग्निच्या न कोपाला. ॥९५॥
अमृतचि तव अमृत, म्हणे असें ज्यासि शक्र, पाणी तें.
गंगे ! मागति हेंचि ज्ञाते प्रार्थूनि चक्रपाणीतें. ॥९६॥
तूं प्रकटलीस गंगे ! कीं लय कळिकाळकार्यभारा हो,
न उरो कामाद्यरिभा, वृद्धिमती स्वभजकार्यभा राहो. ॥९७॥
आल्या जीवांचें तूं करिसी तत्काळ भव्य जें कार्य.
तुजला म्हणति हरिहरप्रतिनिधि ऐसें अशेषहे आर्य. ॥९८॥
श्रीहरिहरांसि योग्य श्रीगंगे ! तूंचि कारभारीण.
तव दृष्टि जाड्य फ़ेडी, जशि चिंतारत्नहारभा रीण. ॥९९॥
जाती जी ज्या देशीं, त्वत्तीर्थजळें भरूनि कावड, ती
तूंचि श्रीगंगे ! कीं तुज बहु बळहीन दीन आवडती. ॥१००॥
स्नानोदकपानोदकपात्रांचें ठेविलें बुधें नाम.
गंगे ! ‘ गंगाळ ’ सहज म्हणतां ‘ गंगाजळी, ’ पुरे काम. ॥१०१॥
कोणाहि मिषें येतां वर्ण महापुण्यनिधि मुखाला हे,
श्रीगंगे ! ताप सरे, सर्व प्राणी तरे, सुखा लाहे. ॥१०२॥
हरिहरनामीं जैसें सामर्थ्य असे, तसेंचि तव नामीं.
नंदन वर्णुत, म्हणतों, ‘ त्वत्तीरींच्या सदा हित वना ’ मीं. ॥१०३॥
पुत्रमिषें ‘ नारायण ’ म्हणतां तरला भवीं अजामिळ तो.
गंगे ! तैसाचि तुझ्या नामें तरतो, तुला, अजा, मिळतो. ॥१०४॥
गंगे ! स्मरतो तुज जो जन, शुचिकर्माचि होय विळभरि तो.
कळिमोह तुझ्या भक्तीं लवतो, इतरीं मिशांसि पिळ भरितो. ॥१०५॥
गंगे ! मानवला निजरेतिहुनि तुझ्याचि शर्व रीतीतें.
गौरी स्तवित्ये, स्तविना कां शारदपूर्णशर्वरी तीतें ? ॥१०६॥
न क्षम लक्ष महाकवि तव सद्गुणवर्णना महाभागे !
स्तवनीं जडहि न घेतां त्वदमृतमयवर्णनाम, हा भागे. ॥१०७॥
ध्रुव विष्णुस्तवन करी, गंगे ! गल्लासि लागतां कंबु
तेंवि तव स्तव, जड हा, या सुजनें पाजिलें तुझें अंबु. ॥१०८॥
श्रीरामसुतमयूरें गंगास्तुति साष्टशत अशा आर्या
श्रीहरिहरचरणार्पित केल्या, सुखवावया जना आर्या. ॥१०९॥