न्यासविचार:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


‘देवी भूत्वा यजेद्देवं नादेवो देवमर्चयेत्‌ । न्यासेन तु भवेत्सोऽपि
स्वयमेव जनार्दन: ।’ इति । तथा तंत्रान्तरे - ‘ततो मूलस्य
ऋष्यादिन्यासं कुर्याद्यथाविधि  मूलविद्यामविन्यस्य स्वांगे साधकपुंगव: ॥
न फलं प्राप्नुयात्सम्यक्‌ कृतस्यापि तु कर्मण: । ऋष्यादिराद्यस्तत्र
स्याद्‌बीजादिस्तु द्वितीयक: ॥ करन्यासस्तृतीय: स्यादंगन्यासश्चतुर्थक: ।
एवं चतुर्विधो न्यास: सर्वमंत्रेषु वै भवेत्‌ ॥’
न्यासहेतुराह तत्रैव - ‘करस्तु न्यासयोगेन मंत्रात्मत्वाद्विशुद्धयति ।
तत: पूजाजपादौ तु विनियुक्त: फलप्रद: ॥ अंगन्यासमृते विन्घभूतैर्भूयोऽभिभूयते ।
तस्मादंगन्यासयोगाद्रक्षणं सर्वतो भवेत्‌ ॥’ इति ॥

अर्थ :---  देव होऊन देवाचें पूजन करावें. आपले ठिकाणीं देवत्व नसतां देवपूजन
करूं नये. न्यासाचे योगानें  देवत्व प्राप्त होतें. देव होऊन देवाचें पूजन करावें
याचा अर्थ - स्वत: अत्यंत शुद्ध पवित्र मनानें व देहानें एकाग्रचित्त होऊन
देवताराधन करावें. न्यासानें शरीरशुद्धि व कर्माधिकारता प्राप्त होते. हाच अर्थ
तंत्रग्रंयांत स्पष्टकेला आहे. तो असा : मूलमंत्राचा - ज्या मंत्राचें, सूक्ताचें अनुष्ठान
करावयाचें असेल त्याचा - साधकानें ऋष्यादिन्यास अवश्य करावा. अन्यथा कृतकर्माला
वैगुण्य येतें. ऋष्यादिन्यास, बीजादिन्यास, करन्यास व अंगन्यास याप्रमाणें
चतुर्विधन्यास कोणत्याही कर्मारंभीं आचरावा. करन्यासानें कर - हस्त - हा
जपपूजादिसमयीं कर्मार्ह होतो. अंगन्यास केला नसेल तर अनुष्ठानांत विन्घ व भूतादिकांपासून
उपद्रव होतो. अंगन्यासानें सर्वत: रक्षण होतें. तात्पर्य : शरीरशुद्धि,
कर्माधिकारता, व मंत्रविशुद्धि हें न्यासाचें प्रयोजन आहे. नेहमींच्या संध्येमध्येंही
जपापूर्वीं व नंतर गायत्रीमंत्रन्यास करावा लागतो त्याचा हेतु हाच.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP