प्रसंग सोळावा - मुक्तबद्ध
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
जैसा दिसे पतंगाचा रंग । धुतांच होय पहा वोरंग । तैसें मुक्तबद्धाचें सोंग । जगीं मिरविती ॥१२॥
अनामिकांच्या हुताशनें । सैंपाक वैश्र्वदेव केला ब्राह्मणें । परी तो शुच अशुच नाहीं हिनपणें । तैसे ते नित्यमुक्त ॥१३॥
वोळखा दर्पणीच्या भाळा । लावितां लागे चंदनाचा टिळा । तरी नित्यमुक्ता अमंगळा । बाधों शकती ॥१४॥
बद्धीं मुक्त मुक्तीं बद्धता बाधु । सांगितली चर्चा नित्यमुक्ताचा भेदु । कार्यकारणाविण जन करी बाधु । तो सांगतों परियेसा ॥१५॥
शाहाणें चतुर गुणी भले । योगी दिगांबर म्हणविती चांगले । मुनि सोफी कळंदर नाम पावले । रक्षा लावूनियां ॥१६॥
यावेगळे राजश्री डंबधारी । कुशळ म्हणविती परोपरी । जनांत वेडे म्हणवूं नेदी मिरवी थोरी । अविचार करूनियां ॥१७॥
हें सांगावया काय कारण । सूक्ष्म जिवांनीं कोंदलें भुवन । त्याचें कार्याविण करिती दहन । तमाखुचे आवडी ॥१८॥
एक नगर बुडविल्याची हिंसा । एके एके चिलमीनेंच घडे ऐसा । सांगेन तो भावें परियेसा । समस्त हो तुम्ही ॥१९॥
जेव्हां झुरका वोढिती आवडी । तेव्हां मुरकंडोनि पडती लक्ष कोडी । मागुता जेव्हां धूर उच्छ्वासें सोडी । तेव्हां अनंत प्रळय ॥२०॥
तैसे धार्यावाटा अणु उडती । त्याहून कोंदले असंख्याती । अणुच्या लक्ष वांट्यानें सूक्ष्म असती । ढिसाळें कोंदली ॥२१॥
लखलखाट वोळखा जनीं विजनीं । हे ज्यास श्रुत तो ब्रह्मज्ञानी । येर उदंड कथितां कथनीं । मेले मरतील ॥२२॥
विप्र महा आचारें तळमळी । म्हणे सकळांहूनि उंच माझी कुळी । मुखांत घाली गुडगुडीची नळी । हीना इतरांची ॥२३॥
यावेगळे घडती अनेक अनाचार । येरून येरांच्या मुखावरी उच्छिष्ट धूर । सोडिती परी नेणती विचार । बुद्धीचे ॥२४॥
श्र्वासें वोढूनि धूर-कुंभक । उच्छ्वासें सोडिती बाहेर फुंक । सिंके अंतरीं जाय नेणत । उच्छिष्टाचा पैं ॥२५॥
विप्र शुद्ध मलवंश अनेक याती । एके गुरगुडीसी स्पर्श करिती । आम्हांस द्या म्हणोन नारी मागती । एका भ्रताराच्या असतां ॥२६॥
एके नळीस बहुतां भ्रताराचें चुंबन । गरती त्यास लाविती वदन । परद्वार घडलें ते नेणती खुण । नारिजन्मां येऊनियां ॥२७॥
सुंदर मनुष्यासारिखें वदन । त्यांत धूम्र घालणें कवण कारण । परमात्म्याचें उच्चारण । अभागी न करिती ॥२८॥
कोरड्याच चघळितां अस्थी । श्र्वाना न होयचि तृप्ति। तैसे जन विषयांचे संगती । तमाखु वोढित असे ॥२९॥
उदरांत कळमळून येते घेरी । दुर्गंध उठे मुखाभितरी । नेत्र मंद होती अविचारी । कंदर्प नासोनियां ॥३०॥
कोण्या विषयीं लाभिक नाहीं । द्रव्य वेंचूनि झकले पाहीं । मानापाना झकोन कांहीं आदर न पाहती ॥३१॥
हें बोलिलों परमार्थवचन । हित होईल तें आचरा आचरण । शेख महंमद करसंपुट जोडोन । श्रोत्यांस विनवीत ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP