प्रसंग चवथा - अशिष्‍य लक्षणें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



मग सद्‌गुरु द्रवती अमृत वचनें । सांगतों सद्‌सद्‌शिष्‍यांची लक्षणें । तीं स्‍वयें पारखोनियां विज्ञानें । सगुण अंगिकारावें ॥५१॥
आतां ऐके विषयलंपट परद्वारी । जो साधुसंतांची निंदा करी । हरिकथेमाजी निजे अघोरी । तो शिष्‍य न करावा ॥५२॥
ज्‍यासी चौघी असती धांगडी । दोहोंसी बाष्‍कळ बडबडी । चित्त नेदीत एक क्षण घडी । हरिनामालागीं ॥५३॥
चौघी धांगडी वोळखा अंगसंगें। त्‍या दोहींसी आवरावें अनुरागें । घसरतील साही जणींची अंगें । स्‍वप्न अवस्‍थेंत ॥५४॥
चोर चुंबक चाहाड मोठा । विश्र्वास नाहीं स्‍वभाव खोटा । नांदणुकेच्या करी बारा वाटा । तो शिष्‍य त्‍यजी बापा ॥५५॥
जो भावभक्ति करूं नेणें कांहीं । अखंड मन लावी भोगाचे ठायीं । तयासी हित गुज बोलतां पाही । घाता प्रवर्तेल ॥५६॥
जो तीर्थव्रतें कांहीच न करी उन्मत्त देवतांपुढे मारी बकरी । पापी आप पा कांहींच न विचारी । त्‍याचा शिंतोडा न घ्‍यावा ॥५७॥
जो शीघ्रकोपी असेल पाखांडी । चंचळ चित्तें अविद्या धुंडी । धर्म मोडून अधर्म मांडी । तो शिष्‍य त्‍यजावा ॥५८॥
जो असेल नित्‍य अहंकारें डुल्‍लत । आणिक गर्वें गुमानें फुंदत । ऐकेचि ना इतरांची मात । तोहि दृष्‍टिस नको ॥५९॥
जो असेल रांडेचा लाडका । पारोशा तोंडें डोईस बोडका । अखंड उग्र जैसा एडका । मस्‍त डुल्‍लत असे ॥६०॥
रांडेचा लाडका कल्‍पने आधीन । पारोशा तोंडें नेणें नामस्‍मरण । सद्‌गुरुकृपेविण बोडकेपण । भांड निगुरी म्‍हणती ॥६१॥
एडक्‍याची टीका सांगतों कोंडें । जे मदनें केले भ्रमिष्‍ट वेडे । ऐशीच टीका पुढपुढती वाढे । करावी श्रोतेजनी ॥६२॥
ऐसा स्‍वयें वक्ता तो व्हावा श्रोता । श्रोत्‍यासी काय हो न्यूनता । चर्चावया विवेकें वर्णिता । ग्रंथाचें भेदीं ॥६३॥
दलक्षणी प्रमाणता आवडी । एक एक चरणीं स्‍वयें घ्‍यावी गोडी । तोडोनियां द्वैतपणाची बेडी । गोदानीर व्हावें ॥६४॥
अनुसंधान दुणावलेंपणें । वेंचिली अशिष्‍याचीं अवलक्षणें । पारखीचें महिमान चतुरपणें । वोळखावें संतीं ॥६५॥
मारेकरी दरोडेकरी उणा । विश्र्वासघाती मुरगाळी माना । कपटी विष घालोनि चारी चुना । त्‍यासी विश्र्वासों नको ॥६६॥
जो महा ठक्‍ अभद्र वेवादी । उमगित असे अधर्माच्या कैदी । आपली आपण न घे शुद्धि । तो शिष्‍य करूं नको ॥६७॥
लोलुत्‍व मोहिक गर्विष्‍ठ मायिक । घरीं द्रव्य असोनि मागे भिक । भलत्‍याचा मानभंग करी दांभिक । त्‍याचा अंगिकार करूं नको ॥६८॥
जो गुरूचे विषयीं कातरनष्‍ट । वरदळें बोलतसे सुस्‍पष्‍ट । स्‍मशानवैराग्‍यें करी पाठ । परी धैर्यचि नाहीं ॥६९॥
पवित्रीं वेंचल्‍याचा करी लेखा । हानी नागविल्‍याचा न करी धोका । कृपणत्‍वें मैंद मरे भुका । तो दृष्‍टीस न पडावा ॥७०॥
मन मकरी महा हिंसक व्यसनीं । संस्‍कार वाचा बोले ब्रह्मवाणी । नित्‍य अवलोकी पराव्या कामिनी । त्‍यासी बोलोच नये ॥७१॥
जो प्रतिदिनीं करी सुरापान । तोंडी शिवी वाहे लटिकी आण । घडतें मोडी करी अपमान । त्‍याकडें पाहों नये ॥७२॥
पायां पडोनि म्‍हणविती भोळे । जैसें श्र्वान देखोनि तरस लोळे । पत लावूनि श्र्वान घेऊनि पळे । डोंगरी भक्षावया ॥७३॥
मैंदीं घेतली मानभावाचीं सोंगें । भले म्‍हणविती आवरणाच्या रंगें । अंतरीं घात करितील लागवेगें । सिंत्रावयालागी ॥७४॥
मेण्या सर्प निमालासा दिसे । पिलांसी आहार नेऊनि घाली विश्र्वासे । घारीसहित पिलीं भक्षिली कैसें । ऐसें वोळखे तूं बापा ॥७५॥
सांगतो तुज कोल्‍ह्‍याचा विश्र्वास । किरव्याचें विवरीं घालितो पुच्छ । किरवा पुच्छ धरितां वोढून करी नाश । कोल्‍हा ठकपणें ॥७६॥
जिभ काढोनियां घोरपडीनें । पडली असे भाविकपणें । मुंग्‍या लागतांचि करी भक्षण । पत लावूनियां ॥७७॥
ऐसे विश्र्वासघातकी अपार । त्‍यांचा कांही धरूं नये इतबार । आत्‍मज्ञानें वोळखे बा जाहीर । सद्‌गुरु म्‍हणती ॥७८॥
पैल पाथरवटें झोडिला पाषाण । मुसेसी उतरलिया गहन । धीरें पावलासे देवपण । तैसे शिष्‍य करावे ॥७९॥
सद्‌गुरूची शब्‍द टांकी साहील । तो सत्‍य स्‍वयें सद्‌गुरु होईल  पदरीं भांडवल पाहिजे सखोल । पूर्व संचिताचें ॥८०॥
अबद्ध मंत्र तंत्र साधन विधि । तुज पुसतील चेटकाच्या बुद्धि । जारण मारण वशीकरण विधि । ते श्ष्‍यि नको ॥८१॥
मोहन स्‍तंभन उच्चाटण । अणिमा अष्‍टमा सिद्धीचें व्याकरण । लघिमा प्रकारीं एक विध्वंसन । ते शिष्‍य न करावे ॥८२॥
महिमा प्राप्ती प्रकाशे सिद्धि । इशिता वसिता सर्व कामें शोधी । हीं नामें ऐकोनि विश्र्वासें सिद्धि । ते शिष्‍य दोषी जाणावे ॥८३॥
ह्या अष्‍टमा सिद्धि साधल्‍याउपरी । जें चिंतिल्‍या पावे अंबरीं । परी निज पद राहे दूरी । अंतीं अघोर भोगिती ॥८४॥
सांगेन रिद्धि सिद्धि साधलयाचें फळ । दैवतें भूतें भेटतील सकळ। चळलिया सुकृत होईल अमंगळ । रवरव भोगी निमाल्‍या ॥८५॥
धारबंद आणि बंधप्रघात । पुसती अनेक कपटांची मात । त्‍यांच्या आखूस देऊं नको चित्त । सद्‌गुरु बोलती स्‍वयें ॥८६॥
लांब दांत्‍या आंखूड होंट्या कैरा । बहु हांसे ढवाळी दासीचा सोयरा । हातीं दांड बाण लावी तुरा । तो चाट नको पां शिष्‍य ॥८७॥
आळशी निष्‍ठुर चालतां ठाके । ज्ञान बोलतां अभिमानें तरके । असत्‍य बोली भांड करी दणके । तो शिष्‍य तूं न करी ॥८८॥
लांब नळ्या निपोटी टापरा । निद्रा लाल डोळे नाकें अफरा । त्र्याहत्तर खोडीचा असे गुहिरा । तो पुरता दोषी जाण ॥८९॥
सुशब्‍द बोलतां रोख रोखें भांड । नसतें उमगूनि बोले पाखांड । कुकर्मी वेष्‍टला मूढ लंड । तो शिष्‍यत्‍वें नसावा ॥९०॥
ऐशींच या चांडाळांचीं नांवें सांगता । कांटाळा वाटेल श्रोत्‍यास ऐकतां । सद्‌गुरु म्‍हणे सद्‌शिष्‍याच्या मता । सांगा आरंभिलें ॥९१॥
सद्‌गुरु म्‍हणे शेख महंमद कुमरा । तुवां जगीं प्रबोध करावा बरा । या उन्मत्तांच्या अंगिकारा । पातेजों नको कांहीं ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP