“एकाच्या गुणदोषांनीं दुसर्यांत (त्यांच्यासारखे) गुणदोष उत्पन्न होणें हा उल्लास.”
ते उत्पन्न होणें ‘गुणानें गुण, किंवा दोष इत्यादि चार प्रकारांनी उत्पन्न होणें - म्हणजे तो पहिल्याचा गुण किंवा दोष त्या दुसर्यांत उतरला आहे, अशी समजूत होणें (म्ह० तोच गुण किंवा दोष दुसर्यांत असला पाहिजे असें नाहीं.) क्रमाने उदाहरणे :---
“जो (वारा) फुलांचा दुर्मिळ सुवास सतत आपल्याबरोबर नेतो (व त्यामुळें) विरहरूपी शस्त्रानें ज्यांचीं अन्त:करणें घायाळ झालीं आहेत अशांचे प्राण एका क्षणांत घेतो, तो वारा सुद्धां, लीलेनें हेलावणार्या तुझ्या लाटांच्या संपर्कानें, अहाहा, (पवित्र होत्साता) त्रैलोक्याला एकदम पवित्र करतो.”
या ठिकाणीं लाटांच्या अत्यंत पवित्रपणामुळें वार्यांत (त्रैलोक्याला) पावन करण्याचा एक दुसरा गुण आल्याचें वर्णिलें आहे.”
“ज्यांनीं परममरणीय अशी तुझी मूर्ति न्याहाळली नाहीं, अशा ह्या विशाल डोळ्यांचा या जगांत उपयोग तरी काय ? (आणि) हे माउली, मनुष्याच्या ज्या कानामध्यें तुझ्या लाटांच, लीलेनें (नाचत असतां) होणारा खळखळ आवाज शिरला नाहीं. त्या कानांनाही तें मोठें लांछन आहे. (त्यांचा धिक्कार आहे).
ह्या ठिकाणीं श्रीभागीरथीच्या रमणीयत ह्या गुणामुळें, तिचें रूप व तिचा आवाज यांना पराङमुख होणारे जे डोळे व कान त्यांच्यांत (क्रमानें) निष्फलता व धिक्कार हे दोष (उत्पन्न झालेले) वर्णिले आहेत.
अथवा हें उदाहरण :---
“विंध्यपर्वताभोवतालची जीं अरण्यें हिंसेनें पूर्ण अशा क्रूर राक्षसांनी सतत अपवित्र केलीं होतीं, तीं रामाच्या पायांच्या संपर्कानें मुनिपत्नी (अहल्ये) प्रमाणें धन्य झालीं”
ह्या श्लोकाच्या पूर्वार्धांत दोषानें दोष (उत्पन्न झालेला) व उत्तरार्धांत गुणानें गुण (उत्पन्न झालेला) वर्णिला आहे. एवढाच (पूर्वीच्या उदाहरणाहून) फरक.
“स्वत:चें घर, नगर, देश, खंड, आणि सगळी पृथ्वी (हीं सर्व) श्रीहरीच्या भक्तांनीं भूषविली आहे; व (श्रीहरीच्या) अभक्तांनीं (त्याला विमुख असणारांनीं) दूषित केली आहे.”
या ठिकाणीं उत्तरोत्तर वाढत वाढत, पृथ्वीपर्यंतच्या सर्व भूमींत भक्तांच्या गुणानें (भूषणरूपी) गुण उत्पन्न केला आहे, म्हणून (गुणानें गुण व दोषानें दोढ या प्रकाराचा) उल्लास.
अथवा हें (उदाहरण)
“चांडाळांच्या टोळक्यांनीं अत्यंत संशयानें गोंढळून जाऊन टाळलेल्या पापांच्या समूहाचें मी खरोखर एक घर आहे; अशा मला आनंदानें उद्धरण्याचा चंग बांधणारी जी तूं, त्या तुझी प्रशंसा करायला मानवरूपी पशू कसा समर्थ होईल ?”
ह्या ठिकाणीं वक्त्याचें (म्ह० कवीचे) ठिकाणीं असणार्या पापरूपी दोषानें उत्पन्न झालेला, त्याचा उद्धार करणार्या श्रीगंगेचा प्रशंसनीयता हा गुण (वर्णिला आहे.)
अथवा “कुत्र्याची वागण्याची जी रीत तिचा व्यासंग; हमखास खोटें बालणें, खोटया तर्काचा अभ्यास; सतत दुसर्याशीं दुष्टपणानें वागण्याचें मनन - अशा प्रकारचें माझे हे गुण (म्ह० अवगुण) सारखें ऐकूनही, तुझ्यावांचून दुसरें कोण बरें माझें तोंड क्षणभर तरी पाहतां ?”
ह्या ठिकाणींही वरील श्लोकाप्रमाणें वक्त्याच्या दोषामुळें गंगेत उत्पन्न झालेल्या श्लाघ्यत्व या गुणाचें वर्णन आहे. फरक इतकाच कीं, पूर्वींच्या श्लोकांत हें वर्णन वाच्य आहे, तर ह्या श्लोकांतलें हें वर्णन व्यंग्य आहे. ‘ह्या अलंकाराचें काव्यलिंगानें काम भागतें तेव्हा हा निराळा अलंकाराच्या पदवीला पोचत नाहीं,’ असें कांहींचें म्हणणें. ‘ह्यांतील अर्थ नित्याच्या व्यवहारातला असल्यानें, ह्याला अलंकार म्हणतां येत नाहीं’ असेंही दुसरे कांहीं म्हणतात.
येथें रसगंगाधरांतील उल्लास प्रकरण संपलें.