शिवाय, उपमान व उपमेय ह्यांचा तिरस्कार हा, (उपमेहून) निराळाच एक अलंकार मानायचें कारण होत असेल तर, प्रसिद्ध उपमानोपमेयाचा पुरस्कारही एखाद्या निराळ्या अलंकाराचें कारण होऊ लागेल उदा) :---
“हे शिकार्या ! विश्वास ठेवणार्या प्राण्यांचे प्राण, निर्दय असा मी, एकटाच हरण करतों, असें मानून तूं आपल्या मनांत हळहळू नकोस. कारण राजांच्या राजवाडयांत, तसेंच पवित्र क्षेत्रांत, आंतल्या गांठीचे, आणि साधूंचे शत्रू असे तुझ्या तोडीचे दुष्ट लोक काय कमी आहेत ?”
ह्या ठिकाणीं (पमानाला० साद्दश्य दाखविण्यानें त्या उपमानाचा तिरस्कार होतो, असें नाहीं; तिरस्कार हें त्या साद्दश्यदर्शनाचें फळ नाहीं, कारण उपमान गर्विष्ठ झालें आहे, असें कांहीं येथें सांगायचें नाहीं, फक्त ‘हळहळ न वाटणें’ हेंच साद्दश्य दाखविण्याचें फळ आहे. अशा रीतीनें निराळें फळ असलें, कीं अलंकार निराळा होतो असें म्हणणार्या तुम्हांला, ह्या प्रकाराला निराळा अलंकार म्हणावा लागेल; किंवा हा प्रतीपाचा सहावा प्रकार तरी, मानावा लागेल. शिवाय तुम्ही मानलेले प्रतीपाचें हे पांच प्रकार एकमेकाहून निराळे असल्यानें निरनिराळे, अलंकार होऊ लागतील; एका प्रतीप अलंकाराचे हे पोटप्रकार होणार नाहींत. कारण ह्या सर्व प्रकारांना सामान्य असें प्रतीपाचें एक लक्षण येथें दिसत नाहीं. “ह्यांपैकीं कोणत्याही एका प्रकाराला प्रतीप अलंकार म्हणावें,” असें लक्षण मानल्यास, त्यांत हजारों दोष उत्पन्न होतील; म्हणून असें लक्षणच होऊ शकत नाहीं, असें आम्ही अनेक वेळ सांगितलें आहे. उपमेचें लक्षण मार या सगळ्या (प्रतीपप्रकारांना) सामान्य आहे. आता प्रतीपाचा चवथा प्रकार ज्यांच्या मतीं आक्षेप नाहीं. त्यांनीं ह्याला खुशाल प्रतीप अलंकार मानावा, प्रतीपाच्या पांचव्या प्रकाराची वाट काय कावायची, हें आम्ही वर सांगितलेंच आहे.
येथें रसगंगाधरांतील प्रतीप प्रकरण संपलें.