‘सदगुणी मनुष्य अत्यंत संकटांत सापडलेला असला तरीसुद्धा उपकारच करतो. मूर्च्छित अथवा मृत झालेला पारा सर्व रोगांचें हरण करतो.’
ह्या ठिकाणीं विपत्तींत सापडलेल्या सदगुणी पुरुषानें केलेला उपकार हा सामान्य अर्थ प्रकृत असून त्याचा, मूर्च्छित अथवा मृत पारा रोगाचें हरण करतो हा विशेषार्थ उदाहरण होऊन, समर्थक झाला आहे. पार्याचा वृत्तान्त प्रस्तुत मानल्यास, व पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची अदलाबदल केल्यस, हाच श्लोक विशेषाचें सामान्यानें समर्थन होणें या प्रकारचें उदाहरण होईल.
‘एकटया रामानें अनेक राक्षसांचा युद्धांत संहार केला. कोणाचेंही साहाय्य नसता महात्मे अपूर्व शौर्य दाखवितात.’
ह्या ठिकाणीं विशेषाचें, सामान्य समर्थक आहे. या श्लोकांतील पूर्वार्ध व उत्तरार्ध यांची अदलाबदल केल्यास, सामान्य अर्थाचा विशेष अर्थ समर्थक झाल्याचें, हें उदाहरण होईल. आतां ‘असहाया०’ इत्यादि उत्तरार्धाला काढून टाकून, त्याच्या ऐवजीं, ‘नूनं सहायसंपत्तिमपेक्षन्ते बलोज्झिता: ।’ (दुबळे लोक खूप सहायाची अपेक्षा करतात) असा उत्तरार्ध केल्यास, व वरीलप्रमाणेंच श्लोकार्धांची उलटापालट केल्यास, (म्ह० हा नवा उत्तरार्ध प्रथम व मूलचा पूर्वार्ध नंतर, असें केल्यास,) म्ह० हाच श्लोक विशेष अर्थ वैधर्म्यानें सामान्याचा समर्थक होणें, ह्याचें उदाहरण होईल. आणि पुन्हां ह्याचीच अर्धी उलटापालट केल्यास, (म्ह० मूळचा पूर्वीर्ध काढून टाकून हा नवा उत्तरार्ध त्याच्या जागीं ठेवल्यास व मूळ श्लोकांतील उत्तरार्ध कायम ठेवल्यास, दुबळ्या लोकांविषयींचें विधान प्रकृत झाल्यानें, सामान्य अर्थ, वैधर्म्यानें, विशेषाचा समर्थक होणें, ह्या प्रकाराचें हें उदाहरण होईल.