संयोगादिरूप योग्यता दोन प्रकारची :--- (१) स्तुतींत शेवट होणारी व (२) निंदेंत शेवट होणारी. पैकीं पहिलीचें उदाहरण :---
“मी अनाथ तर तूं प्रेमानें आर्द्र; मला दुसरी गति नाहीं, तर तूं पुण्यकारक गति देणारी; मी पतित तर तूं विश्वाचा उद्धार करणारी; मी रोगांनीं पछाडलेला तर तूं (रामबाण औषधें देण्यांत) हातखंडा असा वैद्य: मी तहानेनें व्याकुळ झालेला तर तूं अमृतानें तुडुंब भरलेला तलाव; मी अत्यंत लहान बालक तर तूं आई; म्हणून असा मी, अशा तुझ्याजवळ आज आलों आहें. आतां तुला जे योग्य वाटेल तें कर.”
या ठिकाणीं अनाथपणा वगैरेनीं युक्त असा कवि, व प्रेमपूर्वत्व वगैरे गुणांनीं युक्त अशी गगा, या दोहोंच्या संबंधाचा योग्यपणा प्रतीत होतो व त्याचा शेवट भागीरथीच्या स्तुतींत होतो.
निंदापर्यवसायी समालंकाराचें उदाहरण :---
“माकडांच्या सभेंत, झाडांच्या ही मऊ बैठक; चिंव चिंव करणें हें सुंदर भाषण; व दातांनीं चावणें व नखांनीं ओरबाडणें हा स्वागताचा प्रकार असावा, हें योग्यच आहे.”
ह्या ठिकाणीं अप्रस्तुत पदार्थाविषयींची (म्ह० माकडांविषयींची) जी निंदा ती, त्यानें आक्षिप्त अशा प्रस्तुत (वाह्यात) माणसांच्या निंदेंत शेवटा पावतें.
अशा रीतीनें विषमालंकार जसा तीन प्रकारच्या सांगितला, तसा त्याच्या उलट. तीन प्रकारच्या समालंकार पण, विस्तारानें सांगितला.
==
आतां, “(१) विरुद्ध स्वरूपाचें कार्य, (२) अनर्थाची उत्पत्ति व (३) न जुळणार्या दोन पदार्थांचा एकत्र संयोग, म्हणजे विषम.” असें विषमालंकाराचें लक्षण सांगून, “याच्या विरुद्ध सम अलंकार” असें समालंकाराचें लक्षण करून अलंकारसार्वस्वकारांनीं पुढें म्हटलें आहे कीं, “-‘तदविपर्यय:’ (म्हणजे याचे उलट) या शब्दांतील तत् पदानें येथें विषमालंकारांतील ‘परस्पराला अयोग्य अशा दोन वस्तूंचा संयोग’ हा जो शेवटचा भेद तोच घेतला आहे; कारण, वरील विषमालंकारांतील शेवटच्या प्रकाराविरुद्ध असणारा प्रकारच समालंकारांत घेण्यांत चमत्कार आहे. पहिले दोन भेद समालंकारांत घेण्यांत चमत्कार नाहीं. कारण, त्या विषमालंकाराच्या भेदाच्या विरुद्ध (१) कारणपासून अनुरूप कार्याची उत्पत्ति व (२) इष्ट वस्तूची प्राप्ति हे दोन प्रकार वस्तुत: सिद्धच असल्याकारणानें, त्यांत चमत्कार कांहींच नाहीं; म्हणून अनुरूपसंयोगरूपी, एकच (तिसर्या विषमाच्या विरुद्धा) प्रकाराला समालंकार मानावा, विषमालंकाराप्रमाणें, हा तीन प्रकारचा मानूं नये. ” वरील अलंकारसर्वस्वकारांच्या म्हणण्याचें विमर्शिनीकारांनीं विवेचन केलें आहे तें असे :---
“कारणापासून अनुरूप कार्याची उत्पत्ति, ही गोष्ट लोकप्रसिद्ध आहे; ती काव्यांत सांगण्यानें चमत्कार उत्पन्न होत नाहीं.” वरील अलंकारसर्वस्वकारांचें व त्यावरील विमर्शिनीकारांचें विवेचन हीं दोन्हींही चुकीचीं आहेत. वस्तुत: अयोग्य असणार्या कार्यकारणांच्या धर्मांचें श्लेष वगैरेंनीं ऐक्य संपादन करून, त्या द्वारा, त्या कार्यकारणांत अनुरूपता असल्याचें वर्णन करणें, यांतही चमत्कार आहे. त्याचप्रमाणें, अनिष्ट गोष्ट असूनही श्लेषादि उपायांनीं तिला इष्टच ठरविणें व तिच्यामुळें इष्ट प्राप्ति झाली, असें वर्णन करणें, या प्रकारांतही चमत्कार आहे. असें आम्ही नुकतेंच वर दाखविले आहे. म्हणून समालंकारही तीन प्रकारचा (मानणेंच योग्य आहे).
येथें रसगंगाधरांतील समालंकार हें प्रकरण समाप्त झालें.