हे झालें अलंकारसर्वस्वकारांचें म्हणणें. त्याच्या मतीं होणार्या आक्षेपाचीं खालील प्रमाणें उदाहरणें द्यावीं :---
‘आम्ही कांहीं कवि नाहीं; तेव्हां हे राजा ! तुझी खोटया शब्दांनीं स्तुति आम्ही कधींही करणार नाहीं. (तेव्हां ऐक० रणांगणांच्या अग्रभागीं, तुला पाहिलें असतां दुपारचा सूर्य दिवसा पाहिलेल्या घुबडासारखा (निस्तेज,) दिसू लागतो.’
‘माझें रक्षण कर असें म्हणणें म्हणजे, तो विधि होतो. (म्हणजे एखाद्या मनुष्याला अमुक कर म्हणून बजावून सांगणें हा विधि.) पण विधि हा आज्ञा पाळणार्या पुरुषापा उद्देशूनच सांगितला जातो; (विधेयविषय:) तो स्वतंत्र अशा तुमच्याविषयीं कसा सांगतां येईल ? बरे, माझी उपेक्षा करू नका, मी दीन आहे.’ असें तुमच्यासारख्या विवेकी पुरुषाच्या पुढें सांगणें शोभत नाहीं. (कारण तुम्हाला सगळें समजतें) अशा रीतीनें हे राजा ! तूं समोर असतांना, अमुकरीतीनें बोलण्यांत अमुक दोष आहे, अशा विचारानें गोंधळून गेल्यामुळें, काय बोलावें हें न सुचल्यामुळें ज्यांची मति कुंठित झाली आहे, असें आम्ही कांहींही बोलू शकत नाहीं.”
“हे दुष्ट पुरुषा ! तुझें चरित्र विद्वानांच्या पुढें मी स्पष्ट करून सांगणार आहे. पण जाऊ दे; हे पाण्या, दुष्टांची गोष्ट सुद्धां बोलणें नको.”
“श्वासाचें मात्र अनुमानच करतां येण्यासारखें आहे, (श्वास अनुमानानचें जाणाता येण्यासारखा मंद झाला आहे,) अंग गार पडलें आहे. द्दष्टि निश्चळ झाली आहे; अथवा हे निर्दया ! तिच्याविषयीं कशाला विचारतोस ? राहू दे कीं; जळो तिची गोष्ट.”
या श्लोकांपैकीं पहिल्या (‘न वयं कवय:०’) ह्या श्लोकांतील कवीच्या उक्तींत कवित्वाचा निषेध केला आहे; पण तो निषेध (स्वत: कवीनेंच करणें योग्य नसल्यामुळें) बाधित होतो; व आम्ही खोटे बोलणार नाहीं अशा, मिथ्यावादिच्या निषेधरूपांत, त्या निषेधाचें पर्यवसान होऊन, उत्तरार्धांत सांगितलेल्या अर्थाच्या सत्यत्वरूप विशेष (म्हणजे आम्ही हें जें सांगितलें आहे ते अक्षरश: खरें आहे असा विशेष) सूचित केला जातो. त्याचप्रमाणें, दुसर्या (‘मां पाहीति’ इ०) श्लोकांतही माझें रक्षण करा व मला दन द्या असें सांगणें हा इष्टार्थ असल्यानें, त्याचा निषेध अर्थातच बाधित होऊन त्याचें पर्यवसान वरील दोन अर्थ इष्ट आहेत असें म्हणण्यांत होतें; व शेवटीं माझें रक्षण करणें व मला दान देणें हें अवश्य कर्तव्य आहे असें या निषेधानें सूचित होतें. तिसर्या (‘रे खल तव’ इ०) श्लोकांत दुष्ट पुरुषाचें सामान्यरूपानें कथन करुन, त्याद्वारा, प्रस्तुत असलेला दुष्टपणाचा वृत्तांत, जो पुढें सांगितली जाणार आहे, त्याचा निषेध केला असल्यानें त्या निषेधानें ‘पुढें सांगितली जाणारी हकीकत मनांत आली असतांही दु:ख देते,’ असें सूचित केलें आहे. चौथ्या (‘श्वासोऽनुमान०’ इ० ) श्लोकांत नायिकेच्या संबंधींची वार्ता, तिचा मंद श्वास कृशता इत्यादि, थोडयाशा अंशानें सांगून तिचा केलेला निषेध, पुढें सांगितली जाणारी जी तिच्या मरणाची वार्ता त्या विषयींचा (हा निषेध) होऊन, त्यानें ‘तोंडांतून बाहेर काढण्यासारखीही ही वार्ता नाहीं, असें सूचित होतें. वरील सर्व उदाहरणांत केलेला निषेध टिकत नसल्यानें, हा विधानाचा निषेधही नाहीं अथवा निषेधाचा विधीही नाहीं.