या लोकांच्या मतीं आक्षेपाचें हें उदाहरण द्यावें :---
‘अमृताच्या वृष्टीला चोहोंकडे उडवून लावणारी (म्हणजे फिक्की पाडणारी) तुझ्या वाणीची रीत, सज्जनांनीं श्रेष्ठ अभिनंदन करण्याला योग्य अशी तुझी अलौकिक आकृति व करुणारसानें थबथबणारी अशी तुझी लोकोत्तर कृति जाण्यास कोणाचेंही मन प्रवृत्त होत नाहीं. (या सर्वांचें वर्णन करणें अशक्य आहे, हा यांतील गूढ अर्थ.) ह्या ठिकाणीं पुढें होणार्या मनाच्या वृत्तीचा निषेध हा वर्णनीय (म्हणजे प्रकृत) नायकाचें अनिर्वचनीयत्व सूचित करतो.
‘श्वासांचें ज्ञान फक्त अनुमानानेंच करून घेता येण्यासारखें आहे; अंग गार पडलें आहे; (तिची) द्दष्टि निश्चल झाली आहे; हे भाग्यशाली पुरुषा ! बस झाली आतां ही तिची गोष्ट. आतां दुसरी कांहीं गोष्ट तूं सांग.’
या आक्षेपाच्या बाबतींत अलंकारसर्वस्वकार इत्यांदिकांचें म्हणणें असें :---
‘प्रस्तुत अर्थाचा निषेध (तो योग्य ठरत नसल्यानें) टिकू शकत नाहीं; त्यामुळें तो केवळ आभासरूपच ठरतो. अशा निषेधानें कांहीं एका विशिष्ट अर्थाचा विधि सूचित होतो, हा आक्षेपाचा पहिला प्रकार, व अप्रस्तुत अर्थाचा आभासरूप असलेला जेथें विधि निषेधांतच पर्यवसित होतो, तो दुसर्या प्रकारचा आक्षेप. पैकीं, प्रस्तुत अर्थाच्या आभासरूपी निषेधाचा आक्षेप प्रथम दोन प्रकारचा (१) एक उक्तविषय, व (२) दुसरा वक्ष्यमाण विषय. पैकीं उक्तविषय हा कुठें केवळ वस्तूचा निषेध करण्यानें होणारा, व कुठें वस्तुकथनाचा निषेध करून होणारा असा दोन प्रकारचा. वक्ष्यमाणविषय आक्षेप मात्र, वस्तुकथनाचा निषेध हें ज्यांचें स्वरूप आहे असा असून, त्या प्रकारांत सामान्य धर्मानें विशिष्ट असा पदार्थ प्रतियोगी असतो. हा निषेध शब्दांनीं सांगितला असला तरी, विशिष्ट स्वरूपाचा जो इष्ट अर्थ त्याचा निषेध शब्दांनीं सांगितला असला तरी, विशिष्ट स्वरूपाचा जो इष्ट अर्थ त्याचा निषेध या स्वरूपानेंच तो राहतो; व तो, निषेध केल्या जाणार्या वस्तूंतील कांहीं तरी एखादा विशेष दाखवतो. हा वक्ष्यमाणविषय निषेध पुन्हां दोन प्रकारचा. पैकीं पहिला (१) सामान्याचा आश्रय करणारा जो कोणतातरी विशेष तो सांगितल्यानें होणारा; व दुसरा (२) सामान्याचा आश्रय करणार्या विशेषाला न सांगितल्यामुळें होणारा. पैकीं वस्तूचे कोणतेतरी विशेष सांगितले गेले असल्यास, त्याचा निषेध करण्यांत कांहींच अर्थ नसतो. म्हणून असा, प्रवृत्त न होणारा निषेध, शेवटीं, पुढें सांगितलेल्या जाणार्या इष्ट विषयाचा निषेध या रूपांतच परिणत होतो. न सांगितलेल्या विशेषांच्या ठिकाणीं प्रवृत्त झालेल्या निषेध तर इष्टविषयक होतोच होतो. वरील चारी प्रकारच्या आक्षेपांत (१) इष्ट अर्थ (२) त्याचा निषेध (३) त्या निषेधाचें खोटेपण व (४) त्या इष्ट अर्थांतील विशेषाचे प्रतिपादन अशा चार पदार्थांचा उपयोग होतो. त्यामुळें ह्या ठिकाणीं (म्हणजे आक्षेपांत) निषेधाचा विधिही निसतो, किंवा विहित अर्थाचा निषेधही नसतो; पण खोटया निषेधाने विधीचा आक्षेप होत असल्यानें, आक्षेपाचा योगार्थ, ‘बाहेरून कांहींतरी खेचून घेणें’ हा घेऊन येथें आक्षेप अलंकार होतो, असें समजावें. असा हा आक्षेप, वर सांगितलेल्या प्रकारांनीं चार प्रकारचा होतो. याशिवाय खोटयाच विधीनें निषेधाचा आक्षेप केला असतां, दुसराच एक आक्षेपाचा प्रकार निर्माण होतो. या प्रकारांतही (१) अनिष्ट अर्थ (२) त्याचा विधि (३) त्याचें खोटेंपण (४) व (इष्ट) अर्थांत असलेला विशेष सांगणें हें चार पदार्थ उपयोगी पडतात.