अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण ६
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अथवा याचेंच हे दुसरें उदाहरण :---
“कोणी एकानें एका माकडाच्या गळ्यांत हार घातला. तो हार तें माकड चाटू लागलें, हुंगू लागलें व त्याच्या चोळामोळा करून वर तोंड करून पाहूं लागलें.”
ह्या ठिकाणीं माकडाचा वाच्य वृत्तांत अप्रस्तुत असून, तो, अडाणी मनुष्याला सुंदर वस्तू दिली कीं त्याचा नाश व्हायचा हें ठरलेलेंच आहे हें सामान्यरुपी प्रस्तुत, सूचित करतो.
अशा रीतीनें हें अपस्तुतप्रशंसेचे पांच प्रकार पाचीनांच्या मताला अनुसरून सांगितले.
खरें म्हणजे, यांतील पहिल्या प्रकारच्या अप्रस्तुतप्रशंसेचे पुन्हां नानाप्रकार संभवतात. उदा० :--- ‘ज्या ठिकाणीं अत्यंत अप्रस्तुत असलेला वाच्यार्थ प्रस्तुताचें सूचन करतो तो प्रकार वर सांगितलाच आहे. पण ज्या विशिष्ट ठिकाणीं दोन्हींही (म्ह० वाच्य व गम्य असलेले दोन्हीही) वृत्तांत प्रस्तुत असतात, तोही एक अप्रस्तुतप्रशंसेचाच आणखी प्रकार होतो. उदाहरणार्थ :----
जलक्रीडेचें प्रकरण आहे, व त्यांत भुंगें, कमललता इत्यादि समोरे आहेत आणि स्वत:च्या नायिकेवर प्रेम न करणारा नायक जवळच उभा आहे; अशा स्थितींत त्या नायिकेची एखादी सखी त्या दोघांनाही उद्देशून बोलत आहे. (म्हणजे भुंगे व कमलिनी ह्या जोडीला; आणि नायक व नायिका हा जोडीला उद्देशून बोलत आहे) अशा स्थितींत, ‘मलिनेपि रागपूर्णां० ।’ इत्यादि मागें उदाहरण म्हणून दिलेल्या श्लोकांत वरील प्रकार आढळतो.
आतां “येथें अप्रस्तुतप्रशंसा कशी बरे ? कारण येथें वाच्यार्थ पण प्रस्तुत असल्यानें हा श्लोक अप्रस्तुतप्रशंसेच्या लक्षणांत मुळींच बसत नाहीं.” असें कुणी म्हणतील. त्याला उत्तर हें कीं, या ठिकाणीं अप्रस्तुत या शब्दानें, ‘मुख्य तात्पर्याला विषय होणारा जो अर्थ त्याहून निराळा अर्थ’ असा अर्थ घ्यावा. असा अप्रस्तुत अर्थ, कुठें संपूर्ण अप्रस्तुत असेल, तर कुठें प्रस्तुत असेल; कसेंही असलें तरी बिघडत नाहीं, तुम्ही म्हणाला कीं, “असें मानल्यास, यच्चयावत् ध्वनींना अप्रस्तुतप्रशंसा अलंकार म्हणण्याचा प्रसंग येईल. ” पण तसें नाहीं; तसा प्रसंग य़ेऊ नये म्हणूनच ‘साद्दश्य वगैरे पांच प्रकारांपैकीं एक प्रकार जेथें असेल त्याला अप्रस्तुतप्रशंसा अलंकार म्हणावें” असें विशेषण या अलंकाराच्या लक्षणांत आम्ही वर दिलें आहे, ही गोष्ट ध्यानांत ठेवावी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP