अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अथवा याचेंच दुसरें उदहारण :---
“हे कोकिळा ! ह्या रानांत हे शुष्क दिवस घालवीत तूं तोंपर्यंत रहा कीं जोंपर्यंत, ज्याच्यावर भुंग्यांचें थवे जमा झाले आहेत, असा एखादा अवर्णनीय आम्रवृक्ष विकसित झाला नाहीं. (असा आम्रवृक्ष विकसित होईपर्यंत तूं येथें दिवस घालव.)”
ह्या ठिकाणीं, (वरील दोन उदाहरणांत) वृक्ष आणि पक्षी यांना उद्देशून बोलणें जुळत नसल्यानें, सूचित जो प्रस्तुतार्थ त्याच्या अंशाशीं वरील अर्थाचें तादात्म्य करणें जरूरीचें आहे.
(आतां)” हे भ्रमरा, तूं मलिन असतांही तुझ्या ठिकाणीं लाल रंगानें पूर्ण; (तूं दुष्ट ह्रदयाचा असतांहीं, तुझ्या ठिकाणीं संपूर्ण प्रेमयुक्त, हा दुसरा अर्थ) तूं मोठयानें गुङ गुङ करीत असतांही जिचें तोंड विकासित झाले आहे; (तूं भलतीच बडबड करीत असतांही जिचें मुख प्रसन्न आहे, हा दुसरा अर्थ) तूं चंचल असतांही जी मधानें भरलेली आहे; (तूं अविवेकी असतांही जी तुझ्याविषयीं प्रेमानें पूर्ण आहे, हा दुसारा अर्थ) अशा कमलिनीला तूं कसा बरे टाकतोस ?”
ह्या ठिकाणीं, (हिचा) त्याग करणें उचित नव्हें, ह्याचें कारण म्हणून कमलिनीचीं स्तुतिरूप विशेषणें श्लोकांत आलेलीं आहेत. पण तीं विशेषनें कारण म्हणून संभवत नाहींत. कारण, भुंग्याच्या ठिकाणीं मलिनपणा म्हणजे कालेपणा वगैरे असणें हा दोषही नव्हे; व कमलिनीचें लाल असणें वगैरे गुणही नव्हे, कीं ज्याच्या योगानें कमलिनीची स्तुति व्हावी. म्हणूनच ह्या ठिकाणीं, वाच्यार्थाचें प्रतीयमान (सूचित) अर्थाशीं तादात्म्य, विशेष्य व विशेषण या दोन्हीही अंशांत (बाबतींत), करणें जरूरीचें आहे. पूर्वींच्या (तावत् कोकि० या, व त्याच्या वरच्या) श्लोकांत तें तादात्म्य थोडयाशा अंशानें आहे; पण “मलिनेपि०” या श्लोकांत, तें तादात्म्य संपूर्णपणें आहे, एवढाच फरक. कुठें कुठें गम्य अर्थही कांहीं अशानें वाच्यार्थाशीं स्वत:च्या तादात्म्याची अपेक्षा राखतो व उलट वाच्यार्थही कांहीं अंशानें सूचित अर्थाशी तादात्म्याची अपेक्षा राखतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP