“नित्य सुखाच्या लाभाचे मंगल प्रसवणार्या अशा भागीरथीच्या तीरावरील निवास, थोडया दिवसांपुरताच ज्यांतील विलास टिकतो, अशा स्वर्तवसालाही अत्यंत ठेंगणा करतो.”
ह्या ठिकाणीं केवळ साद्दश्याचेच वाचक इत्वादि शब्द, आणि साद्दश्यविशिष्टा पदार्थाचे वाचक सद्दश वगैरे शब्द नसल्यानें, श्रौती व आर्थी उपमा येथें होत नाहीं; तर त्या दोन्ही प्रकारांहून निराळी अशी ‘ठेगणा करते’ या शब्दानीं झालेली आक्षिप्त उपमा आहे. याच श्लोकांत ‘नि:सङ्गैरभिलाषिता’ (आसक्तिरहित पुरुषांनाहीं जिच्याविशयीं अभिलाष
होतो.) असा पहिला चरण केला, व ‘संपातदुरत्नचिन्तयाक्रुलितम्’ (स्वर्गांतून खालीं पडण्याच्या, अनंत चिंतेनें ग्रस्त) असा दुसरा चरण केला तर, दोन हेतूंपैकीम एकदां एक (उपमानाचा अपकर्ष) नसणें, व एकदां एक (उपमेयाचा उत्कर्ष) नसणें, अशा (अनुक्रमानें) एकतरानुपादानांचीं (दोहोंपैकीं एक न सांगणें, यांचीं) हीं दोन उदाहरणें होतील. येथेंही उपमा आक्षिप्ता. ‘सर्वानर्वाचीनान्निर्वास्य मनोरथाननन्ययुषाम’ (सर्व ऐहिक मनोरथ सोडून भागीरर्थावांचून दुसर्या कोणाचाही आश्रय न करणार्या लोकांचा) असा पूर्वार्ध केला तर, हें उभयांचेंही कथन नसल्याचें उदाहरण (उभयानुपादान) होईल.
“क्रूर प्राण्यांनीं भरलेला (क्रूर ह्रदयानें युक्त), दोषाकर म्ह० चंद्र, त्याला जन्म देणारा (पक्षीं, दोषांच्या समूहाला उत्पन्न करणारा) जसा समुद्र असतो, तसा हे राजा ! तूं नाहींस; कारण तूं स्थिर बुद्धीचा व निर्मल (मनाचा) आहेस.”
यांतील उपमा श्रौती आहे. यांत श्लेष तर उघडच आहे.
“उग्र सूर्याच्या मंडळाप्रमाणें ज्याची आज्ञा उग्र आहे, अशा हे राजा ! दुष्ट ह्रदयाचा नसणारा तूं, (क्रूर प्राण्यांनीं युक्त अशा) समुद्रासारखा आहेस, (लोक) कसे म्हणतात ?” (यांत उपमानाचा अपकर्ष सांगितलेला नाहीं.) ‘कथं वार्धिरिवासि त्वं यत: स विषभागयम्’ (तूं समुद्रासारखा कसा ? तो तर ‘हालाहल’ विष धारण करणारा आहे.) असा फरक केला तर, उपमेयाच उत्कर्ष नसल्याचें हे उदाहरण होईल.
“तूं इंद्रासारखा आहेस असें कवि म्हणोत; त्यांचें तोंड आम्ही कसें बंद करणार ? पण (खरें म्हणजे) हजारों लोकांकडून सेविला जाणरा तूं त्रिदशांचा स्वामी (देवांचा स्वामी) जो इंद्र त्याच्यासारखा कसा असशील.” (त्रिदश म्ह० देव, व तीस ही संख्या, असा श्लेष)
ह्या ठिकाणीं आर्थीं उपमा आहे. मुळाती त्रिदशाधिप हा शब्द असा झाला - त्रिर्दश म्ह० तिनदा आहेत दश. म्ह०, दहा ज्यांत, ते त्रिदश (बहुव्रीहि समास). त्रिदशा: म्हा० तीस. त्यांचा अधिप म्ह० स्वामीतो तिसांचा स्वामी (त्रिदशाधिप शब्दाचा तिसांचा स्वामी हा अर्थ घेऊन हा विग्रह केला आहे.). ह्या ठिकाणीं त्रिदश (तीस) हा. “संख्यया व्ययासन्नादूराधिकसंख्या: संख्येये (पाणिनि० २।२।२५) ह्या सूत्राप्रमाणें बहुब्रीही समास होऊन, ‘बहुव्रीहौ संख्येते’ (पा० ५।४।७३) ह्या सूत्राप्रमाणें (त्रिर्दशन् शब्दाला डच प्रत्यय लावून) त्रिदश शब्द सिद्ध केल्यावार त्याचा, अधिप शब्दाशीं षष्ठीतत्पुरुष समास होतो. बहुव्रीहि समासांत त्या सुच् प्रत्ययाचें कांहीं कामच उरत नसल्यानें, त्याचा प्रयोग होत नाहीं. (व म्हणूनच त्रिर्दशा: असें समस्तरूप होत नाहीं). अथवा त्रिदशा म्ह० त्रयो वा दश वा (तीन किंवा दहा हा अर्थ) असाही बहुव्रीहि समास, ‘संख्ययाव्यया०’ या सूत्राप्रमाणें होऊ शकेल. ह्याच श्लोकांत, ‘भवान्सदा रक्षितगोत्रपक्ष: समानकक्ष: कथमस्य युक्त; व इंद्र तसा नाहीं म्हणजे तो गोत्रांचे म्ह० पर्वतांचे पंख रक्षित नाहीं, कापून टाकतो, मग तूं इंद्रासारखा कसा ?) असें केलें तर, हें उपमानाचा अपकर्ष नसल्याचें उदाहरण होईल; व ‘कथं निरस्ताखिलगोत्रपक्ष: समानकक्षस्तव युज्यते स:’ (ज्यानें सर्व पर्वतांचें पंख कापून टाकलें त्याच्याशीं तू समान कसा ?) असें केलें तर हें, उपमेयाच्या उत्कर्षाचें कथन नसल्याचें उदाहरण होईल. (हेंच एकतरानुपादन).
(ह्या ठिकाणीं) हे ध्यानांत ठेवावें कीं, (व्यतिरेकांतील) अनुपादानाचें तीन प्रकार (म्ह० उपमेयोत्कर्ष न सांगणें, उपमानाचा अपकर्ष न सांगणें, व दोन्हींही न सांगणें हें) होणें सश्लेष व्यतिरेकांत कठिण आहे; कारण वैधर्म्य म्ह० निराळेपणाच जर वाक्यांत सांगितला नसेल तर, श्लेष कोणाच्या आधारावर होणार ?
आतां, “ज्या ठिकाणीं द्विज (१ब्रम्हाण, २ पक्षी) सुरालय (१ गुत्ता, २ देवळ) मातरिश्वा (१ वारा, २ आईच्या पोटांत गर्भरूपानें असणारा) इत्यादि शब्दांनीं उपमेय व उपमान दोन्हींही सांगितलीं असतील, त्या ठिकाणीं स्वत: उपमान व उपमेयवाचक शब्दच श्लेषाला आणतात आणि तो श्लेष मग (त्या दोहोंत म्ह० ब्राम्हाण व पक्षी इत्यादि जोडयांत, निराळेपणा दाखवून) व्यतिरेक अलंकाराला उभा करतो. अशा स्थलीं (श्लेष कोणाच्या आधारावर होणार ? ही शंका येणार नसल्यानें,) अनुपादानाचे तीन प्रकार होतात, असें सांगणें सोपें आहे.” असेंही म्हणतां येत नाहीं; कारण अशा ठिकाणीं मग वैधर्म्य (हें जें व्यतिरेकाचें स्वरूप तेंही) उपमेयोपमानवाचक शब्दांनींच (म्ह० वरील श्लिष्ट शब्दांनींच) सांगितलें जाणें शक्य आहे. (मग अनुपादान हा व्यतिरेकाचा प्रकार राहिला कुठें ? कारण दोन्हीही हेतूंचें अनुपादान ह्या प्रकारंत सुद्धां वैधर्म्य हें सांगितलें गेलेंच आहे, (श्लेषामुळें). अशारीतीनें व्यतिरेकाचे चोवीस प्रकार आहेत, ही प्राचीनांची उक्ति, अनेक उदाहरणें ज्यांच्या परिचयाचीं आहेत अशा विद्वान् लोकांना, कष्टानें जुळवून दाखवितां येईल. पण (खरें सांगायचें म्हणजे) उपमेचे सर्वच पोटभेद येथें (व्यतिरेकांत) संभवत असल्यानें, व्यतिरेकाचे चोवीसच भेद, अशी गणना करण्य़ांत अर्थ नाहीं.