या ठिकाणीं, उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हीं दोन्हींही शब्दांनीं सांगितलीं आहेत. येथील उपमा (साद्दश्य) श्रौती आहे. याच श्लोकांत ‘कथमिनुदुरिवाननं तवेदं, द्युतिभेदं न दधाति यत्कदापि’ (तुझें तोंड चंद्रसारखे कसें ? तोंड तर कांतींत फरक कधींच दाखवीत नाहीं.) असा फरक केला तर, दोहोंपैकीं एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) सांगितला नसल्याचें हें उदाहरण; आणि ‘द्युतिभेदं खलु यो दधाति नित्यम्’ (जो चंद्र कांतींत नित्य फरक दाखवितो) असें केलें तर, दोहोंपैकीं एक (म्हणजे उपमेयाचा उत्कर्ष) सांगितला नसल्यानें हें उदाहरण होईल, व श्रौतीच उपमा कायम राहील. ‘कथमिन्दुरिवाननं मृगाक्ष्या भवितुं युक्तमिदं विदन्तु सन्त:’ (चंद्राप्रमाणें ह्या मृगनयनेचें तोंड असणें कसें काय योग्य आहे याचा शहाण्यांनींच विचार करावा.) असा फरक केला तर, व्यतिरेकाचे दोनही हेतु न सांगितल्याचें हे उदाहरण होईल; व श्रौती उपमा मात्र यांत कायमच राहील. वरील दोन हेतूंपैकीं जो सांगितला नसेल, त्याची आक्षेपानेमं प्रतीति होते; पण अजिबात कुणाचीही प्रतीति होत नाहीं, असें मात्र केव्हांच होत नाहीं; कारण उपमेयोत्कर्ष व उपमानापकर्ष हें व्यतिरेकाचें स्वरूपच आहे. (त्यामुळें जेथें व्यतिरेक होतो, तेथें हे दोन्हीही हेतु प्रतीत होणाराच); व वैधर्म्याचें ज्ञान हें ह्या हेतूंचें कारण असल्यानें, त्याच्य (वैधर्म्याच्या) ज्ञानावांचून त्या दोन हेतूंचेंही ज्ञान होणार नाहीं. (तेव्हा वैधर्म्यरुप व्यतिरेक प्रतीत झाला कीं, व्यतिरेकाच्या हेतूंचेंही ज्ञान होणारच, असें समजावें)
“नायिकेचे डोळे खंजन पक्ष्यांच्या अंगाच्या ठेवणीचें भाग्य भले धारण करोत; (डोळे खंजन पक्ष्याच्या आकाराचे भले असोत;) पण या सुनयनेचें सुंदर तोंड क्षणिकशोभायुक्त कमळासारखें आहे, असें कसें (म्हणता येईल) ?”
या ठिकाणीं, उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हीं दोन्हींही सांगितली आहेत. येथील उपमा आर्थीं आहे. ह्याच श्लोकांत, ‘वदन तु कथं समानशोभं सुद्दशो भंगुरसंपदाम्बुजेन,’ (या सुंदरीच्या तोंडाला., क्षणिक शोभेच्या कमळाशीं समान शोभा असलेलें, असें कसें म्हणता येईल ?) असा एकदा फरक केला, आणि ‘शाश्वतसंपदम्बुजेन’ (सतत टिकणार्या शोभेनें युक्त असें तोंड कमळासारखें कसें ?) आस पुन्हां फरक केला तर, अनुक्रमें, दोन हेतूंपैकीं एकदा एक (म्हणजे उपमानाचा अपकर्ष) च सांगणें, व नंतर एकच (म्हणजें उपमेयाचा उत्कर्ष) सांगणें यांचीं हीं उदाहरणें होतील. ह्यांतील ही उपमा आर्थीच. ‘सद्दशं कथमाननं मृगाक्ष्या भविता हन्त निशाधिनायकेन’ (चंद्रासारखें ह्या मृगनयनेचें तोंड कसें होईल ?) असा फरक केल्यास, दोघांचेंही कथन नसल्याचें हें उदाहरण होईल. (वरील सर्व फरक दुसर्या अर्धांत केले व पूर्वार्ध कायम ठेवला तर,) यांतील पूर्वार्धांत निदर्शनाच आहे. (असो.)