प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ही प्रतिवस्तूपमा वैधर्म्यानें (म्ह० एका वाक्यांत सांगितलेल्या धर्माच्या जोडीला त्या धर्माच्या विरुद्ध अशा धर्माच्या अभावानें युक्त असा दुसरा धर्म सांगण्याच्या पद्धतीनें) हि संभवतो.
उदा० :--- “उच्च वंशात उत्पन्न झालेला ( २ कळकापसून तयार केलेला हा अर्थ वीणादण्डाला लागू,) गुणशाली ( २ तारांनिं युक्त हा अर्थ वीण्याच्या दांडीकडे) असा पुरुष संगतीच्या माहात्म्यानें (विशिष्ट प्रकारच्या लोकांची संगती लाभली तरच) पूजिला जातो. (उदा०) तुंबडया वाचून (भोंपळ्यावांचून) ची वीण्याची दांडी मोठेपणा पावत नाहीं.”
अथवा (वैधर्म्याचें) हें दुसरें उदाहरण :---
वडील मंडळींच्या, कठोर अक्षरांनीं (शब्दांनीं) भरलेल्या वाणींनीं तिरस्कृत (अपमानित) असे लोकच मोठेपणा पावतात; सहाणेवर ज्यांना घासून काढलें नाहीं अशीं रत्ने, राजांच्या डोक्यावर राहू (मिरवू) शकत नाहीत.”
या वैधर्म्याने होणार्या प्रतिवस्तूपमेंत, दिलेल्या शाब्द (श्लोकांत शब्दांत दिलेल्या) द्दष्टांतानें (उदा० :--- तुंबीफलरहित वीणेची दांही मोठेपणा पावत नाही इ०) त्या द्दष्टांतांत असलेल्या सामान्यपणानें विशिष्ट अशी व्यतिरेकव्याप्ति (सहचार) आक्षिप्त केली जाते. नंतर त्या सामान्य व्यतिरेकव्याप्तीच्या जोरवर, ‘जेथें जेथें संगविशेष असतो, तेथें तेथें पूजा होते’ ही सामान्य अन्वयव्याप्ति समजली जाते; व नंतर तिच्या द्वारां प्रकृत अशी विशेष अन्वयव्याप्ति (म्ह० संगविशेष असतो, तेथें विशिष्ट पुरुष पूजिला जातो, ही) सिद्ध होते. वैधर्म्यानें होणार्या प्रतिवस्तूपमेत बहुतेक अशी स्थिति असते. (म्ह० बहुतेक वैधर्म्याच्या उदाहरणांत हाच प्रकार द्दष्टीस पडतो.) अशाच रीतीनें, अन्वयानें होणार्या प्रतिवस्तूपमेंतही, विशिष्ट व्याप्तियुक्त प्रकृत वाक्यार्थ असल्यास (म्ह० एखादी व्याप्ति सिद्ध करणारे एखाचें विशिष्ट उदाहरण ज्यांत आलें आहे असा प्रकृत वाव्यार्थ असल्यास) त्याला जुळणारा अन्वय द्दष्टांत अप्रकृत वाक्यांत येतो; व मग त्या द्दष्टांताच्या जोरावर सामान्यव्याप्ति सिद्ध होते; व त्या सामान्य व्याप्तिद्वारां (श्लोकांतील पूर्वार्धांत आलेल्या) विशिष्ट व्याप्तीच्या उदाहरणाची सिद्धि होते. पण, (प्रतिवस्तूपमेच्या श्लोकांत) पूर्वार्धांत, विशिष्ट व्याप्तीचें उदाहरण नसून केवळ एक सामान्य अर्थ प्रकृत असेल, तर तेथें अप्रकृत वाक्यार्थानें केवळ औपम्य (श्लोकांतील उत्तरार्धांत) सूचित होते, व्याप्ति सूचित (अथवा सिद्ध) होत नाहीं; करण अशा ठिकाणीं व्याप्तीच्या सिद्धीचें कांहीं प्रयोजनच नसतें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP