केवळ अप्रकृतांच्या एकधर्मान्वयाचें उदाहरण :---
“त्या सुंदरीचें बाल्य संपत चाललें असतां, व तिच्या गालावरचा फिक्केपणा वाढत चालला असतां, पूर्णिमेचा चंद्र, रायाआवळी व सोनें यांच्यांत काळेपणा दिसू लागला (हीं पराभवामुलें काळीं ठिक्कर पडलीं).”
ह्या ठिकाणीं गुण (रूपी) धर्माशींच अन्वय आहे. कारण आविर्भाव ह्या क्रियेचा साक्षात् अन्वय धर्मीशीं (चंद्र, लवली वगैरे अप्रकृतधर्मींशीं) होत नाहीं. [कारण ती षष्ठयन्त असल्यानें त्यांना कारकें म्हणतां येत नाहीं.] ह्या रायाआवळी, सोनें व पांढरें कमळ हीं फिक्कीं पडतात, कमी दर्जाचीं होतात.) असा फरक केला तर मात्र, क्रियारूपी धर्माशीं धर्मींचा अन्वय होईल. पण ‘धवलीभवत्यनुदिनं लवली कनकं कलानिधिश्चायम्’ (दिवसेदिवस राजआवळीं, सोनें व चंद्र हीं पांढरीं फटफटीत पडत चाललीं आहेत.) असा श्लोकार्ध केला तर, त्यांत धावल्यरूपी गुणानें विशिष्ट क्रिया हा एकधर्म होईल.
“इंद्रासारखा तूं, सगळ्या पृथ्वीमंडळावर राज्य करीत असतां, अरण्यांत शत्रूंच्या स्त्रियांचे डोळे व दिवस ‘वर्षतात’ (म्ह० अनुक्रमें अश्रुंचा वर्षाव करीत आह्ते, व वर्षासारखे दीर्घ वाटत आहेत.)”
ह्या ठिकाणीं डोळे व दिवस यांना साधारण असे गुण अथवा क्रिया नसल्यामुळें केवळ (वर्षन्ति हा) शब्दच धर्म झालेला आहे. अथवा असें म्हणा कीं, श्लेषमूलक अभेदाध्यवसानानें ‘वर्षन्ति’ याचे दोन्ही अर्थ एकरूप होऊन त्यांचा धर्म बनला आहे.
आतां अलंकार - सर्वस्वकारानें व त्याना अनुसरणार्या कुवलयानन्दकारानें, “गुण अथवा क्रियारूपी एकधर्माची अन्वय, गुण व क्रिया यांच्यांशींच (धर्मींचा) संबंध आल्यानें, होतो.” (म्ह गुण व क्रिया हेच धर्म तुल्ययोगिता अलंकारांत धर्मीशीं अन्वय पावतात, दुसरे धर्म चालणार नाहींत) असें जें म्हटलें आहे तें वरवर दिसायला गोड आहे (वस्तुत: खरें नाहीं.).
“हे राजा ! तूं समग्र पृथ्वीमंडलावर राज्य करीत असतां शत्रू व मित्र यांचे समूह थोडें सुद्धां निश्चिंत राहत नाहींत.”
ह्या ठिकाणीं अभावरूपी धर्माचा (निश्चिंततेचा अभाव ह्याचा) अन्वय झालेला आहे. (मग त्यांनीं म्ह० अलंकारसर्वस्वकारादिकांनीं गुण व क्रिया यांनाच फक्त येथें धर्म मानले आहे, हेंकितपत योग्य आहे ?) अथवा (त्यांच्या म्हणण्याचें समर्थनच करायचें झाल्यास) गुण व क्रिया यांचा अर्थ ‘कोणताही धर्म’ असा घ्यावा. तसा घेतल्यास, ‘एकस्त्वं दानशीलोऽसि प्रत्यर्थिषु तथार्थिषु’ (तूं एकटा शत्रु व याचक यांच्या बाबतींत दानशील [दान १ म्ह० खंडन करणें, कापणें हा ज्याचा स्वभाव आहे हा अर्थ शत्रूच्या बाबतींत व २ दान देणारा हा याचकाकदे अर्थ] आहेस.) ह्या ठिकाणीं
दानशीलरूप एकधर्माचा अन्वय असल्यामुळें, (जरी दानशील शब्दाच्या पोटांत दोन अर्थ असले तरी, दानशीलता हा शब्दरूप एकधर्म मानल्यानें) तुल्ययोगितेचें लक्षण येथेंही लागू पडतें. या अलंकारांत, कशातरी रीतीने, अनेक धर्मींशी एका धर्माचा (मग तो एक धर्म कोणत्याही स्वरूपाचा असो) अन्वय होणें, याच चमत्काराची अपेक्षा आहे. (कुणीकडून तरी अनेकाशीं एकाचा अन्वय होणें, याच चमत्काराची अपेक्षा आहे. (कुणीकडून तरी अनेकांशीं एकाचा अन्वय, एवढें जुळलें कीं, या अलंकाराचा चमत्कार झाला असें म्हणायला हरकत नाहीं.)
वरील विवेचनावरून, “हित व अहित (मित्र व शत्रु) याच्या ठिकाणीं एकाच (सारख्याच) प्रकारचें वर्तन ठेवणें हा तुल्ययोगितेचा (दुसरा) प्रकार. उदा० :--- मित्र व शत्रु या दोघांनाही तूं पराभूति (१. अतिशय मोठी समृद्धि - परा + भूति हा अर्थ मित्राकडे व २. पराभव हा अर्थ शत्रूकदे घ्यावा) देतोस.” असें लक्षण व उदाहरण देऊन, दुसर्या प्रकारची तुल्ययोगिता जी कुलवल्यानन्दकारांनीं सांगितली आहे. तिचें खंडन झालें; कारण ही दुसरी तुल्ययोगिता सुद्धां ‘वर्ण्यानामितरेषां वा धर्मैक्यं तुल्ययोगिता’ (प्रकृत अथवा अप्रकृत यांचा एक धर्म असणें ही तुल्ययोगिता) हें, तुल्ययोगितेचें जें प्रथम लक्षण सांगितलें आहे, त्यांत बसतें. (त्या पहिल्या तुल्ययोगितेंत ह्या दुसर्या प्रकारच्या तुल्ययोगितेचा अंतर्भाव होऊं शकतो.) एकच वर्णांचा क्रम ज्यांत आहे (म्ह० पराभूति हा वर्णांचा क्रम दोन्हीही म० शत्रु - मित्रांच्या बाबतींत एकच आहे) अशा ‘पराभूति’ शब्दानें सांगितलेला जो अर्थ (समृद्धि व पराभव हे अर्थ) त्यांचें दान करण्याला विषय होणें (मित्र व शत्रु हे विषय होतात.) ह्या एकधर्मरूपी धर्माचें ऐक्य; अथवा पूर्वी (वर्षन्ति या उदाहरणांत) दाखविलेल्या पद्धतीप्रमाणें दोन अर्थरूपी धर्मांचें श्लेषमूलक ऐक्य ‘हिताहिते’ या श्लोकांत झालेलें आहे.