आतां, ‘मुखं चंद्र : ।’ या रूफकामध्यें, मुखत्वाशीं चंद्र समानाधिकरण असल्यानें, चंद्राच्या ताद्रूप्याचा मुखावर आरोप होतो; व त्यामुळें, त्या वाक्यांत मुखाच्या निषेधाची जरूर भासत नाहीं.’
असें म्हणत असाल तर, ‘त्वदालेख्ये०’ इत्यादि प्रस्तुत श्लोकांतही सामान्य पुरुषत्वाशीं समानाधिकरण अशा विष्णूच्या तादात्म्याच्या आरोप असलेलें, ‘हा राजा विष्णूच आहे’ अशा प्रकारचें येथें रूपकच होणें शक्य आहे, अपहनुति होणें शक्य नाहीं. शिवाय तुम्ही म्हटले आहे कीं, ‘हा विष्णु नव्हे, तर मदन आहे ह्या वाक्यांत अपहनुति आहे.’ इत्यादि. त्यावर आमचें म्हणणें असें कीं,चक्र व गरूड यांच्या आकृति पुसून टाकल्यानें होणारा ‘हा विष्णु नाहीं’ असा निषेध, व फुलांचें धनुष्य व ध्वजावरचा मगर ह्या दोहोंच्याही आकृतींच्या योगानें होणारा ‘हा मदन आहे.’ असा उपमानाचा आरोप, हे दोन्हीही व्यंग होऊ शकतील हें कबूल, “प्रकृताच्या निषेधानंतर त्यावर जी अप्रकृताची कल्पना तिला अपहनुति म्हणावें, हें जें तुम्ही अपहुनतीचें लक्षण केलें आहे. तें ह्या श्लोकांतील वाक्यार्थाला. मुळींच लागूं पडत नाहीं. कारण कीं, ह्या श्लोकांत, ज्याचा निषेध केला आहे तो भगवान् विष्णु, वर्णनाचा मुख्य विषय नाहीं; आणि म्हणूनच, तो अप्रस्तुत आहे व त्यामुळें ह्या ठिकाणीं श्री विष्णूचा निषेध केला तरी तो. प्रकृताचा निषेध होणार नाहीं. (श्लोकांत,) पूर्वी (विष्णूचा) आरोप केला गेला आहे एवढयानेंच केवळ, त्या आरोपित केलेल्या पदार्थाला (विष्णूला) प्रकृत म्हणतां येणार नाहीं. (ज्याच्यावर आरोप करावयाचा, म्हणजे) आरोपाचा विषय, हाच प्रकृत शब्दाचा अर्थ, ही गोष्ट ‘निषिद्धय विषयं साम्यात् ।’ (साम्याच्या जोरावर विषयाचें फल सांगताना तुम्हीच स्पष्ट केली आहे. शिवाय, काव्यप्रकाशकारांनींही ‘प्रकृताचा निषेध करून अप्रकृताची स्थापना ज्या ठिकाणीं केली जाते ती अपहनुति,’ ह्या सूत्राचें विवेचन करीत असतां, ‘उपमेयाला असत्य करून’ असे शब्द वापरले आहेत. यावरून प्रकृत शब्दाचा उपमेय हाच अर्थ त्यांनीं घेतला आहे हें स्पष्ट होतें. “(दंडी वगैरे) प्राचीन आलंकारिकांच्या मतानें सिद्ध असलेल्या अपहनुतीलाच व्यंग्य म्हणून ह्या ठिकाणीं आम्ही सांगत आहो,” असें तुम्ही म्हणत असाल तर, तें तुमचें म्हणणें लव्हाळ्याच्या काडीचा अथवा काशाच्या काडीचा बुडणार्यानें आधार घेण्यासारखें आहे. कारण, ‘प्रकृताच्या निषेधाच्या योगानें’ इत्यादि शब्दांत अपहनुतीचें लक्षण करून, तुम्ही स्वत:च प्राचीनांनीं मानलेल्या अपहनुतीची हकालपट्टी केली आहे.
तर मग वर आलेल्या श्लोकांत कोणता अलंकार व्यंग्य आहे, असें विचारीत असाल तर सांगतों :---
ह्या श्लोकांत, अपहनुतीहून निराळ्या प्रकारचा चमत्कार आहे असें म्हणत असाल तर, ह्याला (अपहनुतीहून) निराळा अलंकार (म्ह० रूपक) म्हणा. आणि निराळा चमत्कार होत नाहीं असें म्हणत असाल तर, ह्याला अपहनुतीच म्हणा. पण अपहनुति म्हणायचीच असेल तर. ‘प्रसंगानें प्राप्त झालेल्या कोणत्याही एका वस्तूचा निषेध करून त्याच ठिकाणीं दुसर्या कोणत्यातरी वस्तूचा आरोप केला जाणें, ह्याला अपहनुति म्हणावें” असें अपहनुतीचें (निराळें) लक्षण तरी करा. म्हणजे, एकंदरीत काय कीं, तुमचें हें सगळे लिहिणें सह्रदयांच्या ह्रदयाला मुळींच पटण्यासारखें नाहीं.
ह्या ठिकाणीं रसगंगाधरांतील अपहनुति प्रकरण समाप्त झालें.