ह्या संबंधांत, विमर्शिनीकारांनीं म्हटलें आहे कीं :---
“ विषाला विष म्हणत नाहींत; पण, ब्राम्हाणाच्या धनाला विष म्हणतात.”
ह्या वाक्यात, प्रथम विषाचा (विष) म्हणून निषेध केला आहे व नंतर ब्राम्हाणाचें धन ह्या विषयावर त्या विषाचा आरोप केला आहे. म्हणून हें दृढारोपरूपकच; अपहनुति नव्हे.”
आतां प्राचीन लोकांच्या मतांची उपेक्षा करून, तुम्ही असें म्हणाल कीं, अलंकाररत्नाप्रमाणें मीसुद्धां ह्या प्रकाराची अपहनुति अलंकारामध्यें गणना केली आहे. तर मग, अपहनुति व रूपक ह्या दोहोंत ही उपमेय व उपमान यांचे आहार्यताद्रुप्य निश्चितपणें मानणें हा प्रकार समान असल्यामुळें अपहनुति हा रूपकाचाच एक प्रकार आहे असें म्हणा कीं; आणि प्रचीनांच्या तोंडाकडे आदबीनें पाहणें, सोडून द्या,
शिवाय, तुम्ही चित्रमीमांसेंमध्यें केलेलें अपह्नुतीचें लक्षण तुमच्या ह्या पर्यस्तापह्नुतीला लागू पडत नसल्यानें, त्या लक्षणांतील अव्याप्तीचा दोष कायमच राहणार, शिवाय जर “हा चंद्र नव्हे तर मग चंद्र कोण ? तर प्रेयसीचें मुख हाच खरां चंद्र.” ह्या वाक्यांत, पर्यस्तापहुति आहे असें म्हणत असाल तर, ह्या तुमच्या पर्यस्तापहुतींत, तुम्ही चित्रमीमांसेंत केलेलें :---
“बिंबप्रतिबिंबभावांनीं युक्त नसलेला व वाक्यांत स्पष्टपणें सांगितलेला असा ज्या वेळीं विषय असेल, व त्या विषयाशीं विषयी तद्रूप होत असेल तर, त्या ठिकाणीं रूपक आहे असें समजावें,”
जें हे रुपकाचें लक्षण त्याची अतिव्यप्ति, वज्रलेपाप्रमाणें, पक्की होणार, कारण, (तुमच्या लक्षणाप्रमाणें पाहतां) येथें विषयीचा अपह्नव असला तरी, विषयाचा अपह्नव झालेला नाहीं.