पण प्राचीन साहित्यशास्त्रकार असमालंकार हा निराळा अलंकारच नाहीं असें म्हणतात.
या असमालंकाराच्या ध्वनीचें उदाहरण हें -
“ हे राजा, तुला कुणाची तरी उपमा देण्याच्या बाबतींत, माझें तोंड बंद झाले असतां, ‘ हा कवि माझें वर्णन करत नाहीं, ’ म्हणून तूं रागावूं नकोस; कारण कीं, हें चराचर जग निर्माण करणार्या ब्रह्मदेवाच्या मनांत, तुझ्या जोडीचा दुसरा मनुष्य, मुळीं सुद्धा आलेला नाहीं. ”
या श्लोकांत, आतांपर्यंत जो पुरुष तुझ्या बरोबरीचा म्हणून ब्रह्मदेवाच्या मनांत सुद्धां आला नाहीं, तो पुढें पण त्याच्या मनांत येईल, याविषयीं प्रमाण नाहीं; म्हणून ‘ असा तुझ्या बरोबरीचा पुरुष, या जगांत अजिबातच नाहीं. ’ असा अर्थ या श्लोकांत सूचित झाला आहे. अशा रीतीनें येथें, हा असमालंकार व्यञ्जनाव्यापारानें सूचित होत असला तरी, श्लोकांतील प्रधान अर्थ जी राजस्तुति, तिचा उत्कर्ष करणारा असल्यानें, अलंकारच आहे.
खालील ठिकाणीं हा असमालंकार प्रधानतया व्यंग्य आहे. ( म्हणून, त्याला अंलकार म्हणतां येत नाहीं )
“ चांगलें व वाईट यांच्यांतला विवेक करण्यांत कुशल अशा कवींनीं, या सगळ्या जगाचें अवलोकन करून, हे सुंदरी, तुझ्यासारखी स्त्री, गगनलतेच्या यादींतच नोंदून ठेवली आहे. ( म्हणजे गगनलता ज्या-प्रमाणें अस्तित्वांत नसतें, त्याप्रमाणें, तुझ्यासारखी दुसरी स्त्री अस्तित्वांतच नाहीं. ) ”
हा असमालंकार कुठें कुठें उपमानाच्या निषेधांतून निर्माण होतो, तर कुठें कुठें साक्षात् उपमानिषेधांतून उत्पन्न होतो. यांतील पहिल्या प्रकारच्या असमालंकाराचें उदाहरण वर दिलेंच आहे; दुसर्या प्रकारच्या असमा-लंकाराचें उदाहरण हें-
“ पाताळ असुरांनीं, स्वर्ग देवांनीं व ही पृथ्वी मनुष्यांनीं भरलेली आहे; तथापि, रघुवंशांतील वीर ( पुरुष ) रामचंद्राची तुलना, ( अजून ) या जगांत, जागेवाचूनच राहिली आहे.
अशाच रीतीनें, या असमालंकाराचें पूर्ण लुप्त वगैरे जे जे प्रकार शक्य असतील, ते ते शोधून काढावे.
येथें, रसगंगाधरातील असमालंकार प्रकरण समाप्त झालें.