“ संपूर्णपणें उपमेचा निषेध हाच असम नांवाचा अलंकार. ”
हा अंलकार अनन्वयालंकारांत व्यंग्य रूपानें राहत असता तरी, त्या अनन्वयाच्या चमत्काराला अनुकूल होऊन राहत असल्यानें, तेथें त्याला निराळा अलंकार म्हणता येत नाहीं. रूपक, दीपक वगैरे अलंकारांत ज्या-प्रमाणें उपमा व्यंग्य रूपानें असूनही, तिचा स्वतंत्र ( निराळा ) अलंकार म्हणून, ज्याप्रमाणें व्यवहार होत नाही त्याप्रमाणें, असम अलंकाराच्या बाबतींत ही समजावें . परंतु तोच ( व्यंग्य ) असमालंकार वाच्य झाल्यास, तो स्वतंत्रपणानें चमत्कार उपन्न करू शकतो, आणि म्हणूनच तो निराळ्या अलंकाराचे नांव धारण करू शकतो.
असमालंकाराचें हें उदाहरण :-
“ हे राजा शहाबदीन, गुणसमूहाच्या बाबतींत, तुझ्या तोडीचा, या पंचमहाभूतांनीं उत्पन्न केलेल्या विशाल सृष्टींत, एकही नाहीं, यांत आम्ही काय मोठेंसें सांगितलें ? पण विधात्यानें, सृष्टि उत्पन्न करण्याच्या कारण्यांनीं ( साधनांनीं ) जरी नवी सृष्टि उत्पन्न केली तरीसुद्धां, तिच्यांत, तुझ्याशीं ज्याची लेशमात्र तुलना करतां येईल असा मनुष्य सांपडणारच नाहीं. ”
अथवा असमालंकाराचें हें दुसरें उदाहरण-
“ हे राजा ! मानवांनीम, देवांनीं आणि दैत्यांनीं भरलेल्या या त्रिभुवनांतसुद्धां, जो तुझ्याशीं तुलना पावू शकेल, असा आजपर्यंत कोणी झाला नाहीं, आज कोणी नाहीं, व पुढेंही कोणी होणार नाहीं.”
ह्या श्लोकांत असम हा राजाच्या स्तुतीचा अत्कर्ष करणारा ( म्हणजेच उपस्कारक ) असल्यानें, तो अलंकार झाला आहे. संपूर्णपणें उपमानाचा निषेध हा असमालंकाराचा विषय असतो; आणि क्कचित् उपमानाचा निषेध ( म्ह० सर्वस्थलीं व सर्वकालीं नाहीं, ) हा उपमानलुप्ता उपमेचा विषय असतो. संपूर्णपणें उपमानाचा निषेध केल्यास, सादृश्य उभेंच राहू शकणार नाहीं. आणि त्यामुळें, असमालंकारांत सादृश्याचा लेशही नसतो.
आतां,
“ ‘ हे भ्रमरा, काटयांनीं भरलेलीं केवडयाचीं बनें धुंडाळण्यांत तूम मरशील, पण तुला मालतीच्या फुलासारखें ( एकही फूल, कुठेंही ) मिळणार नाहीं. ’ या ठिकाणीं, उपमानलुप्ता उपमा आहे, असें म्हणतां येणार नाहीं; कारण त्या उपमेचा विषय, संभावित असलेल्या उपमानाचा वाक्यांत ( शब्दानें ) निर्देश न करणें हा असतो; म्हणून या श्लोकां, असमालंकार आहे. ” असें अलंकाररत्नाकर या ग्रंथात म्हटलें आहे. पण तें चुकीचें आहे. ‘ हे भ्रमरा, तूं कितीही भटकलास, तरी तुला मालतीच्या फुलासारखें कांहींही मिळणार नाहीं ’, या म्हणण्याचा अर्थ असा होतो कीं,
‘ मालतीच्या फुलासारखें एखादें फूल असल्यास अस् दे कुठेंतरी; पण तें, तुला मात्र मिळण्यास कठीण आहे. ’ आणि असा अर्थ होतो म्हणून , या श्लोकांत उपमानलुप्ता उपमा होणेंच योग्य आहे. असमालंकार मानणें योग्य नाहीं. नाहींतर, ( म्हणजे येथें असमालंकार असतां तर ) मालतीच्या फुला-सारखें फूल कुठें अस्तित्वांतच नाहीं, असें कवीनें म्हटलें असतें; तुला तें कुठेंच मिळणार नाहीं, असें म्हटलें नसतें.
आतां कुणी म्हणेल कीं, “ असमालंकाराच्या ध्वनीनेंच ( अनन्वयांत होणार्या ) चमत्काराची उपपत्ति ( वाट ) लावतां येत असल्यानें, निराळा अनन्वय अलंकार कशाला? ” हें त्यांचें म्हणणें ( वरवर पाहतां ) बरोबर आहे; पण दीपक वगैरे अलंकारांतील चमत्काराची उपपत्ति ज्याप्रमाणें त्यांत व्यंग्य रूपानें असलेल्या उपमेनें लावता येत असूनही, त्या दीपक वगैरे अलंकारांना उपमेहून निराळे अलंकार मानतात, त्याप्रमाणें या बाबतींतही समजावें. यावर कुणी म्हणतील कीं, ‘ दीपक वगैरे अलंकारांत उपंमा व्यंग्य असली तरी, ती प्रधान व्यंग्य नसून गुणीभूत भंग्य आहे; पण प्रस्तुत ठिकाणीं ( म्ह० अनन्वयालंकारांत, ) स्वत:चें स्वत:शीं असलेलें जें सादृश्य त्याचा अत्यंत निषेध होत असल्यानें, त्या अनन्वयांत राहणारा असमालंकार प्रधान व्यंग्य आहे; आणि म्हणूनच दीपक वगैरेंतील उपमा आणि अनन्वयांतील असमालंकार यांत फरक आहे. ” यावर उत्तर हें
कीं, दीपक, समासोक्ति वगैरे अलंकारांत गुणीभूत व्यंग्य असूनसुद्धां ज्या-प्रमाणें त्यांचा अलंकारपणा कमी होत नाहीं, त्याप्रमाणें अनन्वयालंकारांत रहाणारा असमालंकार, प्रधानव्यंग्य असूनही त्याला अलंकार म्हणण्यांत विरुद्ध असें कांहींच नाहीं. शिवाय, स्वत:चें स्वत:शींच सादृश्य असणें, हें जें अनन्वयालंकाराचें बाह्य स्वरूप तें अनन्वयांत वाच्यच असल्यानें, त्या अनन्वयाला वाच्य अलंकार हें नांव देणें योग्यच होईल. ‘ दीपक वगैरे अलंकाराच्या काव्यांत, गुणीभूतव्यंग्य असल्यामुळें, तें काव्य गुणीभूतव्यंग्य होत असेल तर असो; पण अलंकारकाव्यांमध्यें प्रधानध्वनि कुठेंही आढळत नाहीं, असें म्हणत असाल तर त्यावर उत्तर हें कीं, पर्यायोक्त, सादृश्य-मूलक अप्रस्तुतप्रशंसा वगैरे अलंकारकाव्यांत ध्वनि स्पष्टपणें दिसतो.