सहस्त्र नामे - श्लोक ८६ ते ९०
श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.
गुणाढय: गहन: गस्थ: गद्य-पद्य-सुधा-अर्णव: ।
गद्य-गानप्रिय: गर्ज: तीत-गीर्वाण-पूर्वज: ॥८६॥
४५६) गुणाढय---आढय म्हणजे युक्त, संपन्न. गुणांनी संपन्न असणारा.
४५७) गहन---गूढ. ज्याच्या यथार्थरूपांपर्यंत पोहोचणे कठीणतम.
४५८) गस्थ---‘ग’ काररूप बीजाक्षरात स्थित. नाभिस्थानी कुंडलाकार गुंडाळी मारून बसलेली कुंडलिनी मेरूपृष्ठातून चढू लागते तेव्हा तिचा आकार गकारच असतो. त्या कुंडलीतून जागृत होणारा.
४५९) गद्यपद्यसुधार्णव---गद्य व पद्य या साहित्यप्रकारांचा सागर.
४६०) गद्यगानप्रिय---पठनयोग्य ते गद्य. ते गाऊन पठण करणे या सामगानाची आवड असणारा.
४६१) गर्ज---मेघगर्जनास्वरूप किंवा समुद्रगर्जनास्वरूप.
४६२) गीतगीर्वाणपूर्वज---गीत आणि गीर्वाण म्हणजे देव यांचा पूर्वज. नादामुळे गीत आदी शब्द प्रकट झाले व नादाच्या अर्थाने देवता. म्हणून नाद आणि नादार्थस्वरूप होण्याच्या कारणामुळे गीत आणि देवतांचा (गीर्वाण) पूर्वज असलेला.
गुह्याचार-रत: गुह्य: गुह्यागम-निरूपित: ।
गुहाशय: गुहाब्धिस्थ: गुरुगम्य: गुरो: गुरु: ॥८७॥
४६३) गुह्याचाररत---चैतन्यरूप आत्मा. ह्रदयरूपी गुहेत राहणारा तो गुह्य. अंतर्मुख होऊन या गुह्य आत्मतत्त्व चिंतनात रमून जाणारा.
४६४) गुह्या---एकान्ती जाणला जाऊ शकणारा. अतिगुह्य असे गहनतत्त्वरूप.
४६५) गुह्यागमनिरूपित---तन्त्रांनी ज्याचे रहस्य कथन केले आहे असा. गुह्य आगमतंत्राने निरूपित असा.
४६६) गुहाशय---हृदय गुहेत शयन करणारा. ह्रदयस्थ परमात्मा.
४६७) गुहब्धिस्थ---अगाध, अव्याकृत, गूढ अशा ह्रदयातील आकाशास ‘गुहाब्धि’ म्हणतात. तेथे राहणारा.
४६८) गुरुगम्य---गुरुपदेशाने कळणारा.
४६९) गुरोर्गुरू---ब्रहम्यालाही वेद शिकविणारा. शिवसूत्रात गुरुरूप म्हणून वर्णिलेला.
घण्टा-घर्घरिका-माली घटकुम्भ: घटोदर: ।
चण्ड-चण्डेश्वरसुहत् चण्डीश: चण्डविक्रम: ॥८८॥
४७०) घण्टाघर्घरिकामाली---घंटा, किंकिणी यांच्या माळांनी बालरूपात क्रीड करणारा.
४७१) घटकुम्भ---घटाप्रमाणे मस्तकावरील विशाल गंडस्थळे असणारा.
४७२) घटोदर---घटाप्रमाणे विशाल उदर असणारा.
४७३) चण्ड---महापराक्रमी. भयंकर.
४७४) चण्डेश्वरसुहृत्---शिवसखा
४७५) चण्डीश---चण्डीनाथ शिव किंवा पार्वतीचा लाडका
४७६) चण्डविक्रम---अत्यंत रागीट अशा चण्डेश्वर. चण्डेश्वरसखा, चण्डीश प्रभृति चण्डगणांना परास्त करून ताब्यात ठेवणारा. ज्याचा पराक्रम चंड म्हणजे प्रचंड आहे असा.
चराचरपति: चिन्तामणि-चर्वण-लालस: ।
छन्त: छन्दोवपु: छन्दोदुर्लक्ष्य: छन्दविग्रह: ॥८९॥
४७७) चराचरपति---स्थावर आणि जंगम जगताचा स्वामी.
४७८) चिन्तामणिचर्वणलालस---इच्छिलेले सर्व सहजपणे देणारा - एवढे की चिन्तामणी. कामधेनू. कल्पद्रुम यांनाही तितके देता येत नाही. त्यांचा गर्व (चर्वण) हरण करणारा.
४७९) छन्द---गायत्री वगैरे छन्दरूप म्हणजे वेदरूप.
४८०) छ्न्दोवपु---छन्दोमय शरीर (वपु:) धारण करणारा.
४८१) छन्दोदुर्लक्ष्य---वेदांनाही ज्याचा अर्थ पूर्वत: आकलन होत नाही असा.
४८२) छन्दविग्रह---स्वेच्छेनुसार किंवा भक्तांच्या इच्छेप्रमाणे नाना शरीरे धारण करणारा.
जगद्-योनि: जगत्साक्षी जगदीश: जगन्मय: ।
जप: जपपर: जप्य: जिह्वासिंहासनप्रभु: ॥९०॥
४८३) जगद्योनि---जगताचे कारणस्वरूप. विश्वनिर्मितिस्थान.
४८४) जगत्साक्षी---जगताचा साक्षी, द्रष्टा.
४८५) जगदीश---जगताचा स्वामी. रक्षक, पालक.
४८६) जगन्मय---जगत्स्वरूपात, नानारूपात नटलेला.
४८७) जप---जपस्वरूप. नामस्मरणरूप.
४८८) जपपर---जपकर्ता. जप करण्यात तत्पर.
४८९) जप्य---ज्याचा जप. ज्याचे नामस्मरण करावे असा.
४९०) जिह्वासिंहासनप्रभु---नामस्मरण करणार्याच्या जिभेवर नेहमी विराजमान असणारा.
N/A
References : N/A
Last Updated : July 20, 2014
TOP