संत कर्ममेळांचे अभंग - अभंग ११ ते १५
संत कर्ममेळा हे संत चोखामेला यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.
११) उचित अनुचित आमुचे भागासी । आलें ह्रषीकेशी वाटतसे ॥१॥
तुम्हांसी विसर पडियेलासे माझा । हें तंव केशीराजा कळलें मज ॥२॥
नागवें उघडें वागविलें खांदीं । म्हणोनी उपाधी सांडियेली ॥३॥
कर्ममेळा म्हणे नाम हें चांगलें । गोडा गोडावलें गोडपणें ॥४॥
१२) कशासाठीं पोसियेलें । हें तूं सांग बा विठ्ठलें ॥१॥
मज कोण आहे गणगोत । न दिसे बरी तुझी नीत ॥२॥
मोकलित दातारा । काय येते तुझे पदरा ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा । वोखटपण येईल तुला ॥४॥
१३) चोख्यासाठी देवें बहु नवल केलें । तयाचें खादलें भात दहीं ॥१॥
म्हणोनी ब्राम्हाणें बांधविला चोखा । सोडविलें देखा तुम्ही त्यासी ॥२॥
तयाचिया मागें आमुचा सांभाळ । कैसा तूं दयाळ करितोसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीरायातें । आतां आहे आमुतें कोण सांगा ॥४॥
१४) जरी तुम्हां उबग आलासे दीनांचा । अभिमान कोणाचा कोणाकडे ॥१॥
तारुं जाणें उदक आपण वाढविलें । हें तुम्हां न कळे कैसें देवा ॥२॥
यापरि पोसणा तुमचे उच्छिष्टाचा । भार तयाचा तुम्हां झाला ॥३॥
कर्ममेळा म्हणे जोडोनी ठेविलें । तेंचि वहिलें मज देईं ॥४॥
१५) जें जें दिसें व्यापलें तें तें फलकट । वाउगा बोभाट करोनी काई ॥१॥
विश्वीं विश्वंभर संतांचें वचन । तेंचि प्रमाण मानूं आतां ॥२॥
नामाची आवडी परमार्थ रोकडा । नासे भव पीडा संसाराची ॥३॥
कर्ममेळा म्हणे सुलभ सोपारें । साच हेंचि खरें वर्म एक ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP