चुडालाख्यान सार - पद ३०१ ते ३३५

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


ज्ञान्याचा मुगुटमणी शिव तोहि मोहिनीस पाहून ॥
भुलला, द्रवलें त्याचें वीर्य, गती यापरी असे गहन ॥३०१॥
ज्ञानी अज्ञानी सम दोघें, प्रारब्धप्राप्त प्रांतांत ॥
कर्तेपणास घेई अज्ञानी, ज्ञानि तो परि न घेत ॥३०२॥
जरि तूं आग्रह धरिशी, क्रियमाणाचा धनीच होशिल रे ॥
मावळले ज्ञान तुझें, निश्चित समजे अशा अहंकारें ॥३०३॥
होणार तें घडेलचि, राहिल कर्तृत्वबुद्धि ती मात्र ॥
यास्तव आग्रह टाकी; निंदेला ना तरीच तूं पात्र ॥३०४॥
तुजला आणिक सांगो, बाधक नाहींच ईश्वरी द्वैत ॥
परि जीवकल्पनेची सृष्ठी, बंधास कारणीभूत ॥३०५॥
स्त्री एकरूप, तिजला पुत्र म्हणे माय, बाप मम दुहिता ॥
भर्ता तिलाच म्हणतो पत्नी; भगिनी तिला म्हणे भ्राता ॥३०६॥
यापरि गुरुशिष्यांचेम जीवाचें भावणें, नसें सत्य ॥
या जीव कल्पनेचा नाश करि, तूंच आत्मया नित्य ॥३०७॥
यापरि ऐकुनि वचना, भूप म्हणे मज प्रमाण आज्ञा जी ॥
विषयाची चाड मला नाहीं, लग्नास लावणें आजी ॥३०८॥
मग काय वेळ तेथें, सामुग्री कल्पितां तिथें हजर ॥
शुभ मंगल मग झालें, लग्नाचा सोहळा अती थोर ॥३०९॥
रजनी मग येताची, नाना श्रृंगार मदनिका ल्याली ॥
चेष्टविले रायासी, विकृति त्याच्या मनास नच झाली ॥३१०॥
षण्मास लोटले, परि राजा न करी कधीं सुरत-संग ॥
द्वैतीं भाव गुरूचा, अद्वैती मीच एक नि:संग ॥३११॥
कुंभक पाही राजा अविकारी पूर्ण, बेत मग त्याच्या ॥
आला मनीं, “रतावें पर-पुरुषासी समोर रायाच्या” ॥३१२॥
एकें दिनी वदे त्या कुंभक, संध्येस मी पुढें जातों ॥
ये मागुनी नदीवर, ऐसे बोलुओनि निघून गेला तो ॥३१३॥
निर्माण पुरुष केला तेथें, होवोनि मदनिका अपण ॥
येतो मागुन राया पाहुनि, रतिबोग घेइ संपूर्ण ॥३१४॥
द्दष्टाद्दष्ट घडे तैं उभयांची, भूप नाहि गडबडला ॥
दावी संकोच परी ती, पाहुनि भूप हळुच तिज वदला ॥३१५॥
मी पाहिलेंचि नाहीं, समजुनि ऐसें चला तुम्ही स्वामी ॥
पूर्ण करावी इच्छा गुरुरावो, म्हणुनि परतला धामीं ॥३१६॥
सोंग विसर्जुन आला कुंभक गुंफेस मदनिकारूपें ॥
रायापुढें उभी ती म्लानमुखें, थरथरा उगी कांपे ॥३१७॥
राजा म्हणे कशाला स्वामी इतुक्या त्वरें तुम्ही आला ॥
संकोचला मनीं कां मज पाहुनि सुखविवर्जिता झाला ॥३१८॥
मायपित्यासामोरें बालक, त्या काय माय संकोचे ॥
क्रोडा करी सुखें ती, त्यापरि माझें तुम्हास भय कैचें ॥३१९॥
तेव्हां स्फुंदुनि अधिकच, बोले ती मदनिका अहो नाथ ॥
तुमच्या चरणीं अर्पुनि देह, दिला परनरास मी पतित ॥३२०॥
व्यभिचार असा घडला, मी पापी दुष्ट, दंड  मज करणें ॥
न घडे व्यभिचार पुन्हां, ऐशी शिक्षामला तुम्हीं देणें ॥३२१॥
राजा वदे नका हो बोल असे ऐकवूं तुम्ही मजला ॥
मीच असे अपराघी गुरुमायें, तूं क्षमा करी बाळा ॥३२२॥
देहाची स्फूर्ति कुठें, स्वामी तुमच्यांत द्वैत तें कोठें ॥
स्त्री-पुरुष भाव नाहीं, केवळ आत्माच शुद्ध मज वाटे ॥३२३॥
गुरुबुद्धिवीण अपणा पाहिन दुसरे, फुटो तरी नयन ॥
गुरुभजनाविण जिव्हां हाले तरि, जाइनाच कां झडून ॥३२४॥
होवो शतचूर्ण, जरी मस्तक नमले गुरूपदावीण ॥
गुरुहत्याच घडो मज, स्फूर्ति दुजी ये जरी गुरूवीण ॥३२५॥
झाली पूर्ण परिक्षा, आतां नच पाहणे बहू अंत ॥
प्रगटे तेथ चुडाला, राजा पाहोनि होय शंकीत ॥३२६॥
मी जागरीं असे कीं स्वप्नीं पाहे, प्रिया सती माझी ॥
कीं गुरुरायें धरिलें रूप असें, धैर्य पाहण्या आजी ॥३२७॥
मग ती सती चुडाला वदली रायास, ही नसे भूल ॥
मी धर्मपत्नि तुमची, स्वप्नांतिल हा नसे प्रभो खेळ ॥३२८॥
मीच मदनिका कुंभक होउनि, निजबोधही तुम्हां केला ॥
योगाभ्यास कसा, कां केला, वृत्तांत सर्व मग कथिला ॥३२९॥
परिसुनि वचन स्त्रीचें, राजा आनंदला मनीं फार ॥
धन्य सती तूं मजला उद्धरिलें, वानुं काय उपकार ॥३३०॥
अर्धांगी मी तुमची, तुमच्याविण पूर्णता मला कैसी ॥
उपकार आपणावरि अपला कैसा, वदे सती ऐसी ॥३३१॥
मी काय तुम्हा दिधलें नूतन, पहिलेच पूर्ण नि:संग ॥
अज्ञान फेडिलें हो ज्ञानानें, देखिलें तधी स्वांग ॥३३२॥
नाथा चलणें वेगीं आतां नगरास, राज्य चलविणें ॥
भोगुनि प्रारब्ध सरे, म्हणतां हें, भूप तो बरेंच म्हणे ॥३३३॥
नगरा परतुनि आले, न्यायें बहु काल राज्य चालविलें ॥
आनंदभरें राजा राणी एकत्र क्रीडते झाले ॥३३४॥
अंतर उदास, बाहिर भोगोनी सर्व भोग परिपूर्ण ॥
मग पावले उभयता, देह विसर्जून ब्रह्म निर्वाण ॥३३५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP