चुडालाख्यान सार - पद १५१ ते २००

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


यास्तव जाणुनिया जग, काय अहंकार, तूं असे कोण ॥
टाकी जगा, अहंता, तीन तुझे देह, मोक्ष मग जाण ॥१५१॥
यापरि गुरुशिष्याचा चाले संवाद वर्षपर्यंत ॥
कळलें परोक्ष भूपा जग मिथ्या आणि ब्रह्म एक सत ॥१५२॥
जड चेतनांत भरलें ब्रह्म, म्हणे भूप निश्चयें कळलें ॥
रूप अहंकाराचें कळलें, कमिअधिक काय परि झालें ? ॥१५३॥
कळुनी काय उपेगी, सुखदु:खातीत शुद्ध आनंद ॥
त्यांत मला लोटावें, जेणें होईल सौख्य निर्द्वंद्व ॥१५४॥
कुंभक म्हणें नृपाला स्वरुपाचें शब्दज्ञान तुज झालें ॥
व्यवहारांतिल साक्षी कळला, व्यतिरेक स्पष्ट नच ठसलें ॥१५५॥
सर्व उपाधी विरहित लय-साक्षी, तो तुला नसे कळला ॥
यास्तव वदसी ऐसें, देतों मी निर्विकल्पता तुजला ॥१५६॥
लय अभ्यास तयासी सांगे, वृत्तीस स्थैर्य मग आलें ॥
अभ्यासें रायाचें पूर्णपणें निर्विकल्प मन झालें ॥१५७॥
ऐसी त्यास समाधी लागे पाहोनि गाढ, राणीनें ॥
नृप काया रक्षाया काढिलि रेखा सभोंति मंत्रानें ॥१५८॥
पुनरपि नगरीं आली, राज्य करी वर्ष एक, न्यायानें ॥
वर्षानंतर भेटे रायासी देखिला तसाच तिनें ॥१५९॥
स्पर्शुनि करें तयासी हालविलें, होइना परी जागा ॥
निजधाम पावले का ? शंकेसी राहिली अशी जागा ॥१६०॥
जरि राजेश्वर गेले आपण तरि काय देह राखून ॥
ऐसा विचार शिवला, पुनरपि पाही विचार ती करून ॥१६१॥
अति सूक्ष्म रूप धरुनी शिरली ती भूप सूक्ष्मशरिरांत ॥
बालाग्र सहस्रांशें प्राण दिसे सूक्ष्म राणिसी तेथ ॥१६२॥
आनंदुनी मनीं मग, कुंभक बाहेर येउनी गाई ॥
बहु रागरंग, तेणें प्राणस्फुलिंगास ज्योत ती येई ॥१६३॥
सावध झाला राजा बहु नेटें उघडिले तयें डोळे ॥
सन्मुख कुंभक दिसतां वंदायासी प्रयत्न बहु केले ॥१६४॥
हलवेनाच तयातें काष्ठापरि ताठ जाहलें शरीर ॥
स्पर्शुनि कुम्भक हातें चाल वदे तोंच नमविले शीर ॥१६५॥
बापा तुझा मनोरथ झाला ना पूर्ण सांग तरि आतां ॥
होउं कसा उतराई ? भूप म्हणे “धन्य मी ! गुरु ताता” ॥१६६॥
सुखमग्न पूर्ण असतां, मज ऐसें काय म्हणुनि जागविलें ॥
भरल्या ताटावरुनी दुकळयासी ओढिलें तसें झालें ॥१६७॥
चिरकाल सौख्य सोडुनि, क्षणभंगुर सौख्य कोणि भोगावें ॥
उत्थान पुन्हा मजशी नच व्हावें, मागणेंच हें द्यावें ॥१६८॥
मिथ्या सांडुनि राया सत्यासी पावलास, तरि बोले ॥
कुंभक वदे नव्यानें निश्चल आत्म्यास काय त्वां केलें ॥१६९॥
नूतन निश्चल आत्मा ! चंचल पूर्वीं खराच कीं होता ॥
निश्चल जरि तो, फिरुनी निश्चल करणें कसें तया ताता ॥१७०॥
तूं तो निश्चल आत्मा, निश्चलपण तें त्वदंतरीं यावें ॥
म्हणशी तरी, अहंता चंचल मूलांत, हें कसें व्हावें ॥१७१॥
जीं जीं तत्वें झालीं, याच अहंतेतुनी तुझ्यावरतीं ॥
मिथ्या चंचल सगळें, त्याची तुजला कशास रें भीती ॥१७२॥
दोरी निश्चित कळली, मिथ्या सर्पास मारितो कोण ॥
मिथ्या तशी अहंता, मारावें कां तियेस निपटून ॥१७३॥
आपण आत्मा आदी,अ अंतीं, मध्यांत निश्चयें एक ॥
केवळ असंग आहों व्यापारीं, हेंच ज्ञान मोक्षसुख ॥१७४॥
कर्मानें मोक्ष जरी, मग व्हावें कासयास तें ज्ञान ॥
ज्ञानावांचुनि नाहीं मोक्ष, असें स्पष्टची श्रृतीवचन ॥१७५॥
जावी प्रथम अहंता, मग व्हावें ब्रह्म हें क्रियारूप ॥
कृत्रिम ब्रह्म असे तें कसलें रे मोक्ष कीं असे पाप ॥१७६॥
जरि मानिसी स्वताला मीच अहंकार, रूप तें माझें ॥
पावसि कशी समाधी, आत्मत्वीं कोणतें नसे ओंझें ॥१७७॥
उत्थान समाधीही नाहीं आत्म्यांत, तो असे नुसता ॥
यापरि जाणावें तूं अपणासी, मोक्ष तोचि रे ताता ॥१७८॥
मिथ्या सकल, असें मी आत्माची सत्य, ज्ञान व्यतिरेक; ॥
कांहींच नसे मिथ्या, आहे तें मीच, अन्वयो देख ॥१७९॥
आत्मज्ञानासाठीं, व्यतिरेकीं ज्ञान पाहिजे प्रथम ॥
आत्मज्ञानानंतर अन्वय, जग हेंच कीं परब्रह्मा ॥१८०॥
जग जाहलेचि नाहीं, मग मिथ्या सत्य भेद हा कुठला ॥
नाना भूषण वेषें सोनें, जगदीश जगमिषें नटला ॥१८१॥
एक विचारावाचुनि आत्मप्राप्तीस साधना नलगे ॥
द्दढ निश्चय, “मी आत्मा” जाणुनि नि:शंक त्यापरी वागे ॥१८२॥
स्मरणीं वा विस्मरणीं, वृत्ती अथवा निवृत्ति कांहि असो ॥
परिपूर्ण सर्व कालीं आत्मा, मग सर्व हें दिसो न दिसो ॥१८३॥
राजा वदे उगिच मी नेणोनी कष्टलों, फिटे शंका ॥
परिपूर्ण बोध ठसला, राज्यपदीं बसविले गुरो रंका ॥१८४॥
कुंभक म्हणे नृपाला झालें अपरोक्ष ज्ञान स्वरुपाचें ॥
द्दढबोध परी नाहीं, पूर्ण समाधान त्याविणें कैचें ॥१८५॥
आतां म्हणशी झालें पूर्ण समाधान जों न व्यवहार; ॥
उत्थान पुन्हां होइल व्यवहारीं तुजसि जाण साचार ॥१८६॥
उत्थान-समाधीचें लक्षण याकारणें तुला कथितो ॥
ऐके सावधचित्तें, बळकट खुंटयास हलवुनी करितों ॥१८७॥
सांडोनि कल्पना उगि बसतां-निभ्रांत ती समाधी न ॥
घुंघट घेउनि झांकी डोळे-निभ्रांत ती समाधी न ॥१८८॥
वायूस ब्रह्मरंध्रीं कोंडी-निभ्रांत ती समाधी न ॥
मौन धरी, मुद्रादिक करितां-निभ्रांत ती समाधी न ॥१८९॥
जड काष्ठापरि निश्चल पडतां-निभ्रांत ती समाघी न ॥
ऐके सहज समाधी तीच असे, पूर्ण जें समाधान ॥१९०॥
आधीं, अंतीं, मध्यें आपण, हा निश्वयो समाधी ती ॥
जागर, स्वप्न, सुषुप्ती एकपरी; निश्चयो समाधी ती ॥१९१॥
व्यापारी अढळ, मला संग नसे, निश्चयो समाधी ती ॥
सम पाप पुण्य ज्यासी, पूर्ण समाधान जें, समाधी ती ॥१९२॥
काहिं करो वा न करो, भोग मिळो ना मिळो नसे खंती ॥
त्रिपुटी उद्भव नाहीं, पूर्ण समाधान जें, समाधी ती ॥१९३॥
भलत्याच अवस्थेसी आपण नि:संग, ही समाधी ती ॥
राहो अथवा जावो देह, समाधान जें समाधी ती ॥१९४॥
हें अल्पसें, समाधी-पूर्ण समाधान-लक्षणा कथिलें ॥
आतां उत्थानाचें लक्षण, तुज पाहिजे नृपा कळलें ॥१९५॥
मी तो असंग, परि मज नसणें व्यापार, हेंचि उत्थान ॥
मिथ्या सकल तरीही न दिसो द्दष्टीस हेचि उत्थान ॥१९६॥
हा स्वर्ग, हा नरक, हें पुण्य, गमे पाप, हेंचि उत्थान ॥
जरि उच्च नीच मानी भेदाते, जाण तेंचि उत्थान ॥१९७॥
आत्मा पूर्ण अकर्ता, परि टाळी कर्म, हेंचि उत्थान ॥
आत्मा सुखरूप, परी सुखदु:खाचें नको मला भान ॥१९८॥
सहज समाधी असुनी, लावावी वाटल्यास उत्थान ॥
मी निर्विकल्प व्हावें वृत्ति मुरवेनि, हेंचि उत्थान ॥१९९॥
यापरि उत्थानानें भंगसमाधी, बुडे समाधान ॥
संदेहावांचुनिया ‘मी आत्मा’ ही समाधिची खूण ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP