मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान| सगुणध्यान नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान भूपाळी नद्यांची भूपाळी रामाची ध्यान सगुणध्यान निर्णुंण ध्यान नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान - सगुणध्यान समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ सगुणध्यान Translation - भाषांतर ॥श्रीराम समर्थ ॥ ॥ आतां वंदीन कुलदैवता । लीलविग्रही भगवंता । जो संकटी सांभाळिता । आहे निजदासा ॥१॥एकवचनीं एकबाण । एकपत्नी अभंग ठाण । अजिंक्य राक्षसां निर्वाण । कर्ता समर्थ एकू ॥२॥धार्मिक पुण्यपरायण । शांत लावण्य-सुलक्षण । जेणें त्र्यंबक परम कठीण । भग्र केलें ॥३॥जो लावण्याचा जनक । जो सौंदर्याचा नायक । जो मातंडकुळदीपक । चातुर्यनिधि ॥४॥ऐसा राम राजीवनयन । साधुजनांचें भूषण । त्या प्रभूचें ध्यान । वर्णीन हळू हळू ॥५॥टवटवीत रसाळ । निमासुरवदन वेल्हाळ । लावण्य साजिरे केवळ । आनंदाचे ओतिलें ॥६॥सुरेख भ्रूलता वेंकट । सरळ सतेज नासा-पुट । नीट नेपाळले लल्लाट । तेथे त्रिवळी ॥७॥केशर ऊर्ध्वपुंड लल्लाटीं । वरी कस्तूरी दुबोटी । सुरंग अक्षता त्रिपुटी । शोभायमान ॥८॥रत्नजडित मनोहरें । कुंडलें मकराकारें । श्रवण कोमल भारे । लंबित झाले ॥९॥सुरंग लावण्य विचित्र । कोमल तीक्षण पद्मपत्र । तैसे आकर्ण विशाळ नेत्र । अर्धोन्मीलेत ॥१०॥अनर्ध्य रत्नें शुद्ध हेमी । रत्नखचित फांकती रशमी । मघवा जैसा वर्षता व्योमीं । प्रगटे विद्युल्लता ॥११॥तैसेंच करिटीं तेजाळ । पीत रक्त फांकती कीळ । विलेपनसाहित्यें भाळ । प्रकाशलें ॥१२॥अभ्यंग केला चंपक. तैलें । कुरळीं गुंफिलीं फुलें तेणे परिमळे लोधलें । मानस मधुकराचें ॥१३॥तया कुसुमाचेनि वेधे । रुंजी करिताती षट्पदें । अंतराळीं झुंकारशब्दें । प्रीतीनें पांगुळती ॥१४॥दिव्यांबाराचा चेपून पट्टा । मस्तकी वेष्टिला लपेटा । वरी नक्षत्रांऐसा गोमटा । घोंस मुक्ताफळांचा ॥१५॥नाना सुभनांचिया माळा । मुगुटा वेष्टित घातला पाळा । विविध परिमळ आगळा । नेतसे नेतसे सुवायो ॥१६॥सर्वकाळ आनंदवदन । मंदहास्यें झमकती दशन । कृपाट्टष्टीं अवलोकन । करी निजदासा ॥१७॥प्रवाळवल्ली परम कठीण । सुरंगचि परि पाषाण । कोमल अधर दृष्टांतहीन । बोलेंचि नये ॥१८॥कोटि मदन मयंक । उपमे नये श्रीमुख । पूर्णत्वाचे पूर्ण बीक । लावण्यशोभा ॥१९॥चुबुकसाजिरी हनुवटी । मुक्तामाळा डोलती कंठीं । मुरडींव दोंर्दड बाहुवटीं । रत्नकिळा फांकती ॥२०॥शोभे विशाळ वक्षस्थळ । उदरीं त्रिवळी सरळ । तेथें नाभी जन्ममूळ । चतुराननाचें ॥२१॥रत्नखचित पदक गळां । शोभती पुष्पांचिया माळा । कटिप्रदेशीं मेखळा । जघन सिंहाकृति ॥२२॥पीतांबरू मालगुंठी । कास काशिली गोमटी । क्षुद्रघंटांची दाटी । गजती झणत्कारें ॥२३॥नाना सुगंधपरिमळ । सर्वांगीं उटी पातळ । रुळे वैजयंती माल । आपादपंर्यत ॥२४॥करपल्लवी रत्नभूषणें । आजानबाहू वीरकंकणें । कीर्तिमुखे सुलक्षणें । केयूरें दंडीं ॥२५॥आपादपर्यंत पीतांबरू । न कळे जानुजंघांचा विचारू । चरणीं ब्रीदाचा तोडरू । दैत्यपुतळे रुळती ॥२६॥गुल्फ वर्तुळ घांटींव निळी । मुरडींव वांकी खळाळी । अंदुलिंग रत्नें झळाळी । प्रभा तयांची ॥२७॥पातळ पाउलें कोमळें । पदपल्लवीं दशांगुळें । नख तेंचि उजळलें । ब्रह्मांड नेणों ॥२८॥कीं उगवल्या चंद्ररेखा । तैसी शोभा दिसे नखा । सुरंग वर्तुळ टांचा । अरुणोदयासारिखा ॥२९॥तळवे सुरंग सतेज । ऊर्ध्वरेखा आणि ध्वज । वज्र अंकूश तेज:पुंज । पद्म झळाळी ॥३०॥ज्ञानमुद्रा सव्य हातीं । पाऊल मांडीवरी एक क्षिती । तेथें पावली उत्तम गती । अहित्या शिळा ॥३१॥ऐशी सर्वांगीं सुंदर । सांवळी मूर्ती मनोहर । राजवेष अति सुकुमार । शोभे सिंहासनीं ॥३२॥परिमळद्रव्य उधळलें । तेणें श्रीमुख रजवटलें । सतेज कीरटीचें जाळें । करी चित्त तेज मंद ॥३३॥सकळ वनितांचें मंडण । परम लावण्य सुलक्षण । जे कां अवनीगर्भरत्न । विश्वमाता ॥३४॥ते जानकी जनकतन्या । वामांगीं शोभे मूळमाया । दक्षिणे निकट सुबाह्यां । उभा लक्ष्मणू ॥३५॥भरत शुत्र घ्रलावण्यखाणी । तैसाचि शोभे गदापाणी । हास्यमुखें सुरळीत वाणी । बोलती परस्परें ॥३६॥पित्यापरीस अधिक गती । जयावरी रघुनाथाची प्रीती । पुढें सन्मुख मारुती । उभा कर जोडुनी ॥३७॥भगवद्दासांचें मंडण । कपिकुळाचें भूषण । सकळ वानरांचे प्राण । रक्षिले जेणें ॥३८॥परम प्रतापें आगळा । दिसे जैसा पर्वत निळा । सिंधू उडोनि अवलीळा । जानकी शोधिली ॥३९॥स्वयंभ सुवर्णकासोटी । उभा उदित जगजेठी । आदरें सन्मुख दृष्टि । रघुनाथपदांबुजीं ॥४०॥रत्नजडित मनोहर । दिव्य सिंहासन सुंदर । वरी आरूढला पवित्र । राजा अयोध्येचा ॥४१॥मेघडंबरें छत्रें चामरें । देव ढिढळती अपारें । एक करीं शेसपात्रें । संनिध उभे ॥४२॥एक सुगंध चर्चिती । एके विंझणे जाणविती । उदकपात्रें एका हस्तीं । एक तांबूलधारी ॥४३॥खचित पादुका एका करीं । एक सुरंग वेत्रधारी । उभे राहिले उभय हारीं । आज्ञा इच्छिती ॥४४॥ऐसे अपार सेवकजन । आपुलाले कामीं सावधान । धूर्त तार्किक गुणसंपन्न । कार्यकर्ते ॥४५॥खचित मंडप विशाळ । नील गोमेद पाच प्रवाळ । नाना रत्नें पुंजाळ । फांकती राजांगणीं ॥४६॥चांदवे बांधले विशेष । मुक्ताफळांचे घोंस । जैसें तारागणीं आकाश । लगडलें दिसे ॥४७॥सुवर्णपोटरें स्वयंभ । उभारिलें मंडपस्तंभ । रचना पहातां सुलभ । अमरावतीची ॥४८॥महाविस्तीर्ण मंडप । खणोखणीं रत्नदीप । किरणेम फांकती अमूप । बालसूर्याऐशीं ॥४९॥तया मंडपाभीतरीं । दिव्य सिंहासनावरी । बैसला शोभे कैवारी । सुखरांचा ॥५०॥वेष्टित ऋषींचा पाळा । वेदाध्ययनघोष आगळा । संतसज्जनांचा मेळा । ठायीं ठायीं ॥५१॥गण गंधर्व विद्याधर । सनकादिक नारद तुंबर । भक्त मिळाले अपार । जयजयकारीं गर्जती ॥५२॥ब्रह्मचारी विरक्त तापसी । ज्ञाते दिगंबर संन्यासी । सिद्ध योगेश्वर साधनाशीं । बैसले ठायीं ॥५३॥बैसले पंडित पुराणिक । बैसले कवीश्वर अनेक । बैसले प्रेमळ सात्विक । साधुजन ॥५४॥बैसलीं ब्रह्मवृंदें निर्मळें । रनानसंध्या आचारशीळें । धोत्रें पवित्रें सोज्ज्वळें । लंबायमान ॥५५॥योगवते टिळे माळा । नाभीपर्यंत रुळती गळां । भाविक सात्विक सात्विक लीळा । परम धार्मिक ॥५६॥नाना उपकरणे देवतार्चनें । चंबू गडवे दर्भासनें । नाममुद्रा गोपीचंदनें । साहित्यशोभा ॥५७॥एक देवतार्चनें करिती । घंटा घणघाणा वाजविती । पुढें मांडून । ध्यानमूर्ती । ध्यानस्थ झाले ॥५८॥एकीं अंतरीं गरुडध्वजा । सांग मांडिली मानसपूजा । एक लविती सहजा । अनुसंधान ॥५९॥एका मुखीं नामोच्चार । प्रदक्षिणा नमस्कार । नित्य नेम निरंतर । करिती एक ॥६०॥एक एकांतासी गेले । तेथें ध्यानस्थ बैसले । एक योगाभ्यासी भले । अभ्यास करिती ॥६१॥मुद्रा साधिती आसनें । एक मंत्र आवर्तनें । एक स्तोत्रें स्तुतिस्तवनें । अध्ययनें करिती ॥६२॥एकीं त्यागिलें अन्न । एक करिती पय:पान । एक ते पर्णें सेवून । राहिले योगी ॥६३॥पुरश्चरणी एक तपी । महासाधनें साक्षेपी । एक ते लावण्यरूपीं । योगाभ्यासें ॥६४॥एक निरूपणा बैसले । ब्रह्मज्ञानी महा भले । श्रोते वक्ते आनंदले । आत्मबोधें ॥६५॥अद्वैतनिरूपणें डुल्लती । उपनिषदें वेदश्रुती । पदें फोडूनि वाखाणिती । महानुभाव ॥६६॥एक ऐकती पुराणें । सगुणमूर्तीचीं विंदाणें । एक गाती अभिन्नपणें । गुण सर्वोत्तमाचे ॥६७॥वेदशास्त्रें संपन्न । बैसले करिती व्याख्यान । श्रवण कारणां श्रोतेजन । संतुष्ट होती ॥६८॥एक साधु ब्रह्मनिष्ठ । सर्वसाक्षित्वे वरिष्ठ । एक ते मानसीं तुष्ट । संदेह नाहीं ॥६९॥अन्वय आणि व्यतिरेक । एक देहीं जाहले मुक्ता । एक मानितीं अयुक्त । सर्व चर्चा ॥७०॥एक तत्त्वविशोधन । करी महा विचक्षण । चतुष्टय देह विलक्षण । म्हणती आत्मा ॥७१॥एक पिंडज्ञानबळेम । शोधिनी अष्टदळ कमळें । एक ध्वनीचेनि मेळें । मिळोनि जाती ॥७२॥एक दृश्यातें म्हणती देव । एकीं देवचि केला वाव । एक म्हणती भाव । भगवंतीं असावा ॥७३॥एक म्हणती मिथ्या माया । एक म्हणती पाहिजे क्रिया । एक म्हणती भक्ति केलिया । पाविजे देव ॥७४॥एक म्हणती कर्म करावें । एक म्हणती वैराग्य धरावें । एक म्हणती नाम ध्यावें । सर्वकाळ ॥७५॥जे जे जेथें विश्वासले । ते ते तेथेंचि राहिले । अनुभव वेगळाले । सिद्धांत एक ॥७६॥ऐसे अपार साधुजन । केलें अष्टविधा भजन । आत्मारामीं सावधान । भक्ति नवविध पावले ॥७७॥नवमी आत्मनिवेदन । सायुज्यमुक्तीचें साधन । एके स्थळीं समाधान । पावती सर्व ॥७८॥असो ऐसा समुदाय । महामंडपी बैसले सर्व । सिंहासनीं देवराव । शोभत असे ॥७९॥सुधापानें संतृप्त जाले । तैसे सर्व मिळाळे । तंव ते हरिदास आले । सर्वोत्तमाचे ॥८०॥देवापुढें साबडे भक्ता । गाती नाचती लज्जारहित । देहभाव विसरोनि चित्त । सर्वोत्तमीं मिळाले ॥८१॥कुशळ गायक किन्नर । नृत्य करिती अपार । नेणें वेढिलें राजद्वार । पुढें रीघ न फावे ॥८२॥टाळघोळ मृदंग । ब्रह्मविणे वाजती उपांग । हरिदास मिळाले रंग । तुंबळ लागले ॥८३॥गर्जती मृदंग काहळें । आनंदें गाती उसाळें । क्षणोक्षणीं धूसर उसळे । रक्त श्वेत सुगंध ॥८४॥साहित्य मृदंग टाळी । सर्वत्र वाजविती करताळी । क्षणोक्षणां नामकल्लोळी । गर्जती सर्व ॥८५॥रुळती सकळांचियां गळां । जाईजुईचंपकमाळा । नाना सुगंधपरिमळा । कर्दम जहाला ॥८६॥पताळा गरुडटके अपार । तेणे आच्छादिलें अंबर । मेघडंबरें मनोहर । थडकती ठायीं ठायीं ॥८७॥पूर्ण चंद्राकार छत्रें । त्राहाटलीं चित्रविचित्रें । गरगरां फीरती अपारें । नाना वर्णें ॥८८॥भाही निशाणें तळपती । दाढा विक्राल झळकती । डौल पाहतां थरकती । रोमांच अंगीं ॥८९॥बहु दाटती सूर्यपानें । फटफट वाजती निशाणें । वाद्यें गर्जती त्राणें । दीर्घस्वरें ॥९०॥टाळ मृदंग शंख भेरी । वाद्यें वाजती अंबरीं । नान वाद्यांची भरोवरी । गर्जती डंके ॥९१॥ध्वज फडकती प्रचंद । वाद्यें वाजती उदंड । तेणें घोषें ब्रह्मांड । संपूर्ण झालें ॥९२॥नाना रत्नांची फांकली प्रभा । तेणें डवरली सकळ सभा । लावण्यें लाजली शोभा । देखोनि ते काळीं ॥९३॥झाली अत्यंत दाटणी । तेणें होतसे मंडपघसणी । उभे वारिती वेत्रपाणी । सभा घनवटली ॥९४॥सर्वही टकमकां पाहती । पडली देहाची भ्रांती । सकळिकांच्या मनोवृत्ती । वेधल्या रामचंद्रीं ॥९५॥वदती वक्ते अनुभवाचे । मस्तक डोलती श्रोत्यांचे । तल्लीन सादर सर्वांगाचे । श्रोतें केले ॥९६॥दिव्य सिंहासनीं रामचंद्र । परम प्रतापी नरेंद्र । सन्मुख उभा भीम कपींद्र । वज्रदेही ॥९७॥देवास आरती आरंभिली । सकळ सभा गडबडली । असंभाव्य वाद्यें लागलीं । मर्यादेवेगळीं ॥९८॥रत्नदीप हेमताटीं । नीरांजनें लक्ष कोटी । थाटें चालली दाटी । असंभाव्य झाली ॥९९॥दीप लागले अपार । बंबाळ जळती कर्पूर । स्थळोस्थळीं मनोहर । रंगमाळा शोभती ॥१००॥चंद्रज्योतीचे उमाळे । तेणें दिशाचक्र ढवळे । पूर्ण चंद्र तये वेळे । राहाटले जैसे ॥१॥धूसर उडवले अपार । तेणें ढवळलें अंबर । मुखें तेजवटलीं थोर । उत्साह झाला ॥२॥सकळ वाद्यें एक वेळा । नामघोष गजर आगळा । आच्छादिलें भूमंडळा । धूसरें तेणें ॥३॥रत्नकिळा भूमंडळीं । मुक्तें झळकती अंतराळीं । सप्तरंग सभामंडळीं । उमटते झाले ॥४॥रामाचेनि स्वामीपणें । मीब्रह्मांड मानीं ठेंगणें । त्रैलोक्यहि वाटे उणेम । महिमा वर्णितां ॥५॥राम सर्वांगसुदंर । राम करुणेचा सागर । दीन अनाथांचा उद्धार । श्रीराम कर्ता ॥६॥राम जीवींचा जिव्हाळा । राम मनींचा कोवळा । राम जाणे अंतरकळा । निजदासांची ॥७॥राम पुण्यपरायण । राम त्रैलोक्याचा प्राण । रामें दास बिभीषण । चिरंजीव केली ॥८॥राक्षस केले देशधडी । देव सोडिले तेहतीस कोडी । राज्यीं स्थापिले आवडीं । शरणागत ॥९॥राम सुरवरां कोवसा । राम मंडण सूर्यवंशा । रामजप भवानीशा । सप्रचीति रामनामें ॥१०॥नामें तरले पाषाण । नामें पतित पावन । नामें मुक्त विश्वजन । शिवाजे उपदेशें ॥११॥शुकमिषें रामवाणी । म्हणतां पावन कुंटिणी । अंतकाळीं सकळ प्राणी । रामनामें उद्धरती ॥१२॥हो कां ज्ञाते विरक्त भक्त । हो कां साधु जीवन्मुक्त । हो कां भाविक साबडे भक्त । नामेंविण वृक्षा ॥१३॥सकळांमध्यें थोर । तो नाम जपे शंकर । तेथें मानव किंकर । बापुडे किती ॥१४॥नामें होय चित्तशुद्धि । नामें तुटे देहबुद्धि । नामें होय कार्यसिद्धि । निजध्यासें ॥१५॥नामें स्वहित फावे । नामें निश्चयो दृढावे । नामस्मरणें शांघ्र पावे । देवाधिदेव ॥१६॥ऐसें हें रामनाम । परमगुह्य विश्रामधाम । मंथूनि काढिलें वर्म । शतकोटींचें ॥१७॥सावध ऐका श्रोतेजन । परम गुह्य महागहन । नाममात्रें होत दहन । पापराशी ॥१८॥यदर्थीं जो संशय धरी । तो महापापी दुराचारी । त्यासी प्राप्त यमपुरी । विकल्पें होय ॥११९॥इति सगुणध्यान समाप्त ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीराम समर्थ ॥११९॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP