मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १६६ ते १७०

पंचीकरण - अभंग १६६ ते १७०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१६६॥
लोखंडाचें सोनें परिसाचें गुणें ।
साधूचेनि होणें बद्ध सिद्ध ॥१॥
बद्ध सिद्ध होती देखतां देखतां ।
होय सार्थकता तात्काळची ॥२॥
तात्काळचि झाला वाला तो वाल्मीक ।
दास पुण्यश्र्लोक रामनामीं ॥३॥
॥१६७॥
पावन असतां पतित झालासी ।
सोय चुकलासी पावनाची ॥१॥
पावनाची सोय धरितां अंतरीं ।
स्वरूप विवरी समाधान ॥२॥
समाधान झालें केलें पावनानें ।
आत्मनिवंदनें दास म्हणे ॥३॥
॥१६८॥
आत्मनिवेदन नववें भजन ।
येणें संतजन समाधानी ॥१॥
समाधानी संत आत्मनिवेदनें ।
ज्ञान मीतूंपण सांडवलें ॥२॥
सांडवलें सर्व मायिक संगासीं ।
रामीं रामदासीं नि संगता ॥३॥
नि:संगता झाली विव्वेकानें केली ।
मुक्तीहि लाधली सायुज्यता ॥४॥
॥१६९॥
आतांचि हे मुक्ति देहीं पावे जना ॥
तरी कां सज्जना शरण जावें ॥१॥
शरण जातां भावें सज्जनचि व्हावें ।
शीघ्र उद्धराचें  निरूपणें ॥२॥
निरूपणें निजवस्तु ते सांपडे ।
गुज ठायीं पडे अकस्मात ॥३॥
अकस्मात ठान न दिसे आपुला ।
निरंजनीं झाला निंरजन ॥४॥
निरंजन झाला ये जनीं असोनी ।
जन्मनी गिन्मनीं नाढळती ॥५॥
नाढळती तेथे कांहीं देहभाव ।
तत्त्वज्ञान वाव देहबुद्धि ॥६॥
देहबुद्धि गेली देखतां देखतां ।
मी कोण हे आतां सांपडेना ॥७॥
सांपडेना शुद्धि मीपणें पाहतां ।
तें मीपण जातां वस्तुरूप ॥८॥
वस्तुरूप बोधें अरूप होईजे ।
विवेकाची काजे विचारणा ॥९॥
विचारणा झाली रामीं रामदासीं ।
आतां या जन्मासी ठाव नाहीं ॥१०॥
ठाव नाहीं ऐसें  राघवाचें देणें ।
थोराहूनि होणें थोर स्वये ॥११॥
॥१७०॥
माझें थोरपण देव वाखाणिती ।
ऐसी हे प्रचीति सिद्ध आतां ॥१॥
सिद्ध आतां बोध देखत ।
होय सार्थकता शीघ्रकाळें ॥२॥
शीघ्रकाळें काळ सर्व संहारिला ।
अनुभव आला रोकडाची ॥३॥
रोकडाचि आतां तुम्ही तरी पाहा ।
विवेकानें आहा काय नेणों ॥४॥
नेणों महिमान विवेकीं जनाचें ।
होय सज्जनाचें मूळस्थान ॥५॥
मूळ-स्थान मूळ होइजे केवळ ।
कोण रे चांडाळ मिथ्या बोले ॥६॥
मिथ्या बोलवेना पाहा विवंचना ।
सिद्ध अनुमाना कैसी येते ॥७॥
कैसी येते आत्मप्रचीति आपण ।
मी तूं ऐसें कोण सांग बापा ॥८॥
सांग बापा मनीं बरें विचारूनी ।
तत्त्वाची झाडणी करूनियां ॥९॥
करूनियां पंचीकरणविवरण ।
पुढें मीतूंपण कोठें आहे ॥१०॥
आहे तैसें आहे प्रत्यक्ष जाणावें ।
कोणासी म्हणावें काय आतां ॥११॥
काय आतां होतें बहु बोलेनियां ।
घेतलेसे जाया सर्व कांहीं ॥१२॥
सर्व कांहीं ऐसें दृश्य जाइजेणें ।
माझें मीच जाणे कोणा सांगों ॥१३॥
कोणा सांगों आतां हें कोण घेईल ।
वायाची जाईल अभिमानें ॥१४॥
अभिमानें सत्य राम कोणता हें ।
सिद्धचि न राहे आत्मरूप ॥१५॥
आत्मरूप स्वयें आपण नव्हिजे ।
तरी वांया कीजे रामदास ॥१६॥
कदाकाळीं राम दासा उपेक्षीना ।
राम उपासनना ऐसी आहे ॥१७॥
ऐसी आहे सार राघोबाची भक्ति ।
भक्तीची विभक्ति जेथें नाहीं ॥१८॥
जेथें नाहीं कांहीं वाउगें मायिक ।
रामउपासक दास म्हणे ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP