चौचरणी वोव्या - पांगुळ मी देवा
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
पांगुळ मी देवा मज कोण्ही नाहीं । कृपादृष्टी पाही रामराया ॥१॥
रामराया तूं चि नाथ अनाथाचा । मायेबाप साचा तूं चि माझा ॥२॥
तूं चि माझा स्वामी गणगोत सर्व । तुजविणें ठाव नाहीं आम्हां ॥३॥
आम्हां नाहीं कोण्ही प्रपंचीं पाहातां । येई दिनानाथा माहियेरा ॥४॥
माहियेर माझें सितापती देव । तेथें अंतर्भाव निरंतर ॥५॥
निरंतर देव सर्वाचे अंतरीं । सर्व चराचरीं नांदतसे ॥६॥
नांदतसे सर्व भूमंडळभरी । भरि ये उभरी तुझी देवा ॥७॥
तुझी देवा सत्ता सर्व भूमंडळीं । आकाशीं पाताळीं तूं चि देवा ॥८॥
तूं चि देवा गुरु तूं चि देवा शिष्य । ज्ञानाचा प्रकाश तूं चि देवा ॥९॥
तूं चि देवा वल्ली तूं चि देवा रस । स्वाद हा विशेष नाना फळीं ॥१०॥
नाना फळीं मूळीं जळीं स्थळीं पाहा । पाहोनिया राहा रामरूपी ॥११॥
रामरूप मजमाजि हें भरलें । भरोनी उरलें सदोदीत ॥१२॥
सदोदीत राम खंडेना अखंड । थोतांड हें बंद मावळलें ॥१३॥
मावळलें दृश्य न दिसे अदृश्य । नाहीं भासाभास पूर्ण ब्रह्म ॥१४॥
पूर्ण ब्रह्म घनदाट हें संचलें । गुरुचेनि बोले महावाक्येम ॥१५॥
महावाक्यअर्थ१ आपण चि ब्रह्म । तेथें मायाभ्रम मावळले ॥१६॥
मावळले अहं सोहं गुणतीत । शुद्ध सदोसदीत आपण ची ॥१७॥
आपण चि जाला कल्याण स्वरूप । तेथें पुण्यपाप आडळेना ॥१८॥
आडळेना ऐसें केलें गुरुरायें । धन्य त्याचे पाये फळा आले ॥१९॥
फळा आलें ऐसें पांगुळ बोलिलें । समाधान जालें अनूभवें ॥२०॥
अनुभव कैसा पांगुळाचा पाहा । पाहोनिया राहा निजरूपी ॥२१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP