श्रीदत्तात्रेयाचीं पदे - संग्रह ७
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.
६१. सर्वकाळ डोळां दिसो तुझी मूर्ति ॥ योगीयाच्या पती दत्तराया ॥धृ.॥
सांवळें गोंडस रूप सुकुमार ॥ दाऊनी समोर प्रेम देई ॥१॥
निर्गुण वैभव ब्रह्मादिकां नकळे ॥ मी तरी दुबळें बाळ तुझें ॥२॥
आवडीनें पायां घालीन मीठी ॥ तेथूनीयां नुठी कांही केल्या ॥३॥
न मागे आणीक नाहीं दुजी आस ॥ दत्तापायीं वास देईं सदा ॥४॥(पंतमहाराज)
६२. दिगंबर मूर्ति उभी कृष्णातीरीं ॥ यतिरूपधारी होऊनियां ॥धृ.॥
दंडकमंड्लू शोभताती करीं ॥ साजे अंगावरी भस्मऊटी ॥१॥
दिव्य चरणकमळीं पादुका शोभती ॥ वेदसवें असती श्वानरूपें ॥२॥
गळा अक्षमाळ भगवें अंबर ॥ वृक्ष औदुंबर कामधेनू ॥३॥
आवडिचें ध्यान हाचि ब्रह्यानंद ॥ दत्त बाळा भेद नाहीं कांही ॥४॥(पंतमहाराज)
६३. दत्त दिगंबर अत्रिनंदना ॥ त्रिभुवन संचारीं ॥ भक्तवत्सला भक्ति देउनी ॥ भजनीं प्रेम भरी ॥धृ.॥
मंदमति मी परि भजनाची ॥ ह्रदयीं आस भारी ॥ बुद्धिचालका अंतर्यामी ॥ वदवी तुझी थोरी ॥१॥
चरणपल्लवीं ठेवि दयाळा वास करी अंतरीं ॥ निजानंदवैभव दाउनी ॥ चुकवी भवफेरी ॥२॥
दीन हीन पामर श्वान मी ॥ लोळतों तव द्वारीं ॥ निशिदिनीं दत्तनाम भुंकतों । प्रेम देईं नरहरी ॥३॥(पंतमहाराज)
६४. भजनप्रेम देईं बालावधूता ॥धृ.॥
जान समाधि कल्पित सर्व ॥ न लगे योगचिंता ॥१॥
जीवनन्मुक्ति विदेह स्थिति ॥ जीवस्वप्नवार्ता ॥२॥
चरणसुखामृत पाजुनी नित्य ॥ घेईं पदरीं दत्ता ॥३॥(पंतमहाराज)
६५. दत्तावधूता किती तूं श्रमसी । भक्तांसाठी निशिदिनीं झुरसी ॥धृ.॥
धांवा न करितां धांवुनि येसी । वर न मागतां अभय देसी ॥१॥
आपुला म्हणवून पदीं ठेविसी ॥ योगक्षेमाची चिंता वाहसी ॥२॥
भक्त म्हणतां मुक्त करिसी । दत्ता बुडविलें निज प्रेमरसीं ॥३॥(पंतमहाराज)
६६. क्षणोक्षणीं विसरतों तुला । परी राखिसी निशिदिनीं मजला ॥धृ॥
सेवा स्मरण कांही न करितां । योगक्षेम वाह्तोसी भला ॥१॥
अभय देउनी सुखवीसी सतत । मूढ दास निश्चिंत केला ॥२॥
बालावधूत दत्त प्रभू तूं । प्रेमानंद विश्वीं दाविला ॥३॥(पंतमहाराज)
६७. धरियेले गे माय श्रीगुरुचे पाय । मीपण जेथें समूळ गेलें तूं पण कैचें काय ॥धृ.॥
कार्यकारण भाव हेही झाला वाव । त्रिपद महावाक्य याचा करितां अनुभव ॥१॥
शबलद्वय गेलें शुद्धपण आलें । असिपद तेंही येथें समूळ मिथ्या झालें ॥२॥
सर्वात्मक एक सद्गुरुमाय देख ॥ माणिक म्हणे गुरुशिष्य याचा नसे थाक ॥३॥
६८. धांव सखे गुरु दत्त माऊली ॥धृ.॥
हंबरोनि तुज पाडस बाहे । येउनि पाजवी पान्हा गाऊली ॥१॥
विविध तापें तापतसे उन्हाळा । येऊनी धरि तूं कृपेची साउली ॥२॥
माणिक म्हणे प्रभू येई तूं लवकरी । लागलेंसे मन तुझिया पाउलीं ॥३॥
६९. द्त्तासी गाईन दत्तासी पाहिन । वाहिलें हें मन रे दत्तापायीं ॥धृ.॥
दत्त स्वयंरूप दत्त माय बाप । माझे त्रिविध ताप रे दत्त वारी ॥१॥
दत्त ज्ञानज्योती दत्त गुरुमूर्ति । दत्त हरी भ्रांती रे माणिकाची ॥२॥
७०. दत्ता ब्रह्मचारी रे बह्मचारी । त्रिभुवनांत तुझी फेरी ॥दत्ता०॥
शेंषाचलीं आसन । माहुरगडांत निद्रास्थान ॥१॥
काशीत स्नान करी । चंदन लावी पंढरपुरी ॥२॥
कोल्हापुरीं फिरे झोळी । भोजन करीत पुरि पांचाळी ॥३॥
तुळजापुरीं धुई हस्त । मेरूशिखरीं समाधिस्त ॥४॥
माणिक सद्गुरुनाथा ॥ जगद्व्यापक अत्रीसुता ॥५॥(माणिकप्रभू)
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2013
TOP