स्फुट कविता - सांप्रदायिक प्रार्थना

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( श्रीसदगुरु विष्णुदासांच्या मठांत आरती व भजनानंतर खालील श्लोक म्हणून प्रार्थना करण्याचा सांप्रदाय आहे )
पतीत म्हणुनी अलों, पतितपावना शंकरा ।
कृतार्थ मजला करा, सकळ गूण रत्नाकरा ।
ललाट पट फीरवा, पडळ मायेचें आवरा ।
नमामि उनकेश्वराख्य गिरिजावरा ईश्वरा ॥१॥
उदंड गमलीं तुझी, क्षितिहुनी क्षमा आगळी ।
म्हणूनि अवलंबुनी, पडलों जन्मदेच्या गळीं ।
कसाहि खळ मी असो, परि नको उपेक्षूं मला ।
जगज्जननि रेणुके ! सकळ लाज माझी तुला ॥२॥
तुलाचि तुजसारखें, जननि नांव हें शोभलें ।
समान जगिं पाहसी, जड मुढादि ज्ञानी भले ।
उदंड मज सारखे, पतित तारिले कौतुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥३॥
अंबे ! तुलाचि म्हणतात दिनाचि आई ।
सांभाळ वेदश्रुतिच्या, वचनास बाई ।
नाहीं मि दीनजननी, अशि मात्र वाणी ।
काढूनियां करुं नको, करुणेसि वाणी ॥४॥
नाहीं दया अलि बया, तुज सारखीला ।
येईल काय सखये, दुसर्‍या सखीला ।
द्वारीं तुझ्याचि मरणें, निर्धार केला ।
जाणार नाहिं तुज सोडुनि द्वारकेला ॥५॥
तारो या भवसागरांत अथवा, मारो पडो आपदा ।
अन्याला परि जाइना शरण मी, सोडूनि त्यांच्या पदा ।
सिंहाद्रीवरि जी अखंड जगदोद्धारावया राहिली ।
श्रीदत्तात्रय तो गुरु परम ती, श्रीरेणुका माउली ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP