राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे - कलम ४० ते ४५

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


ग्रामपंचायतींचे संघटन .

४० . राज्य हे , ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतीलस असे अधिकार व प्राधिकार बहाल करील .

कामाचा , शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क .

४१ . राज्य हे , आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा , शिक्षणाचा हक्क आणि बेकारी , वार्धक्य , आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाटयाला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करुन देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील .

कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद .

४२ . राज्य हे , कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतिविषयक सहाय्यासाठी तरतूद करील .

कामगारांना निर्वाह वेतन , इत्यादी .

४३ . राज्य , यथायोग्य विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करुन अथवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी , औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम , निर्वाह , वेतन , समुचित जीवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करुन देण्यासाठी आणि , विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील .

[ उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग .

४३ क . राज्य , कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम , आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनांमध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी , यथायोग्य विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना करील . ]

नागरिकांकरता एकरुप नागरी संहिता .

४४ . नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरुप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील .

[ सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद .

४५ . राज्य , सर्व बालकांसाठी , त्यांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत , प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्याकरिता प्रयत्न करील . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP