[नाटक मंडळीच्या घरासमोरील रस्ता. तात्या व रघुनाथ.]
तात्या: हे मधुकर म्हणायचे, ते त्या मुलीचे भाऊ आणि ते वसंतराव म्हणायचे, त्यांच्याशीं तिचें लग्न व्हायचें आहे ! मुलगी आहे नक्षत्रासारखी आणि तिच्या बापानें तर बालाभाऊला वचन दिलें आहे; तो “नाहीं” म्हणेल तेव्हां पुढची गोष्ट ! आणि तो तर असा वेडापीर ! म्हणून ही सारी खटपट करायची. नाहीं तर फुकट पोर बुडते बघ !
रघु पण तात्या, हें मालकांना पसंत पडेल का ? नाहीं तर म्हणतील तुला कोणी ही पंचाईत सांगितली होती म्हणून !
तात्याः अरे वेडाच आहेस ! ते कशाला नको म्हणतात ! यांत कांहीं वाईट का आहे ? उलट परोपकार ! आतां सोंग घेतल्यावर त्यांच्याशीं कसें काय बोलायचें हें सारें तुला सांगेन मग !
रघु पण असें कसें बोलायचें बुवा भलतेंच !
तात्याः अरे लेका, रोज सोंगें नाहीं का घेत तुम्ही ? त्यांतलेंच हें एक सोंग. बरें ! जा तर आतां ! तो पाहा बाळाभाऊच येत आहे ! तर सोंगाची तयारी करून ठेव जा.
[तो जातो व बाळाभाऊ येतो. तात्याला न पाहतां बाळाभाऊ विचार करतो.]
बाळा: जगायचें कीं मरायचें ? हा एवढाच प्रश्न आहे ! जगणें-मरणें हीं दोन्ही सारखींच ! अखेर तिनें मला केराप्रमाणें झाडून लोटून दिला ना ? प्रियेनें माझा धिक्कार केल्यानंतर हें काळें तोंड कुठें दाखवूं ? कांचनगडच्या मोहनेंतल्या हंबीररावाप्रमाणें माझी दुर्दशा झाली आहे ! अरेरे, सुंदर वस्तूंची लयलूट कां बरें असूं नये ? नाहीं तर दुसर्या एखाद्या-काय हा पाणी विचार ! हा अधम बाळाभाऊ आतां दुसर्या स्त्रीवर प्रेंम करणार ! धिक्, धिक्, काय करूं रे ? मला कोणी प्रतिस्पर्धीही नाहीं ! याही बाबतींत मी पुरा दुर्दैवी आहें ! परमेश्वरा, सूह घेण्याचें समाधानसुद्धां तूं मला देत नाहींस ! \
तात्याः बाळाभाऊ !
बाळा: (दचक्न, पण गंभीर आवाजानें) कोणी हाक मारिली मला ? बोला, तुम्ही वेणू आहांत का ? (पाहून) कोण तात्या, माझा प्रिय मित्र मित्र तात्या ! (त्याच्या गळ्याला मिळी मारतो. !) मित्रा, प्रियमित्रा तात्या, इतका वेळ कुठें रे होतास ? माझ्या कपिंजला ! या बाळाभाऊला-तुझ्या मित्र पुंडरीकाला विरहावस्थेंत टाकून तूं कुठें रे गेला होतास ? तात्या, प्राणमित्र तात्या ! अरे !
कोण जगीं या तुजविण दुसरा मज विश्वासाचा ॥
मित्र जिवाचा कोण तुझ्याविण आश्रय शोधूं अन्य कुणाचा ॥
घालुनि पोटीं अपराधातें कोण करिल मज बोध हिताचा ॥
तात्याः बाळाभाऊ, काय हें ! धीर धर ! धीर धरा गुरू, हें काय ?
बाळाः तात्या, आतां कशाचा गुरू, तात्या, तुमचा तो आनंदी, रंगेल बाळाभाऊ आतां कुठें आहे ? आतां मी गुरू नाहीं. कोणी नाहीं ! आतां धीर धरणार कशाच्या जीवावर ? शून्यचि भासे हें जग सारें नच उत्साह कसा तो ॥(वगैरे)
तात्याः या बोलण्यांत काय अर्थ आहे ? उठा ! हें शोभतें का तुम्हांला ?
बाळाः न शोभेना ! मला आतां त्याच्याशीं काय करायचें आहे ? मी आतां कोठेंतरी जाऊन आत्मघात करणार !
तात्याः काय आत्मघात ? महत्पाप, महत्पाप. महत्पाप !
बाळा: भगवान् नारदमुने-नाहीं. नाहीं प्रियमित्रा तात्या, आत्महत्या करूं नको तर काय करूं ? ठेवूनि प्राण करूं मी काय ! ऐसा हतभागी ॥
तात्याः पण काय झालें काय तें सांगा आधीं. माझ्यासारख्या मित्राजवळ सुद्धां सांगायचें नाहीं मग कुणाजवळ सांगणार ?
बाळाः ऐक तर मग ! मुधकर कालपरवां मला बोलविष्यासाठीं आला हें माहींत आहे ना ?
तात्याः हो, त्याच्या बहिणीला पाहण्यासाठीं तुम्हांला बोलावलें होतें ना त्यानें ?
बाळाः हो. पण मी तिला भेटतों तो निराळाच प्रकार ! मी तिचें पाणिग्रहण करतांच ती संतापली, तिनें माझा धिक्कार केला, मला दुरुत्तरें दुरुत्तरें बोलली, माझ्या पवित्र पेमाला पायाखालीं तुडविलें !
तात्याः म्हणजे लाथ मारली कीं काय तुम्हांला ?
बाळाः नाहीं. माझा फार अपमान केला तिनें. अखेर मी मूर्छित पडलों हें पाहून ती राक्षसी बिनदिक्कत मनानें निघून गेली.
तात्याः अरेरे ! काय क्रूरपणा हा ! आणि तुम्ही ?
बाळाः मी तिथेंच मूर्च्छित पडून राहिलों ! त्या वेळीं मला तिथें वारा घालून सावध कोण करणार ? पुष्कळ वेळ वाट पाहिली कीं कोणी येऊन माझ्या हताश मनाचें समाधान करील म्हणून ! पण त्या भयाण वेळीं आणि भयाण अरण्यांत
तात्याः अरण्यांत ?
बाळाः म्हणजे त्यांच्या त्या बागेंत कोण येणार ? मित्रा, तूं सुद्धां त्या वेळीं तिथें नव्हतास !
तात्याः पण अखेरीस उठलां कीं नाहीं ?
बाळाः अर्थात्: नाहीं तर इथें कसा आलों असतों ? उठलों खरा, पण तो कसा ? त्यांच्या माळ्यानें येऊन मला हांकलून दिलें बरें ! तेव्हांपासून एक तासभर असा भटकत फिरतों आहें !
(तात्या डोळे पुसतात व रडतात.)
बाळा: पण तात्या, हें काय ? अरे बोलतां बोलतां-द्दष्टि भरे जलभारें । का रे अनिवारे । सुहृदा रे ॥ वद कारण मजला सारें ॥
तात्याः हरहर ! इतका वेळ माझें लक्षच गेलें नाहीं ! काय दशा झाली आहे ही तुमची ! पंजर झाला अस्थींचा या सुरग्य देहाचा ॥
बाळा: (स्वगत) तर काय, मी रोडसुद्धां झालों आहें ! विरहावस्थेचीं सारीं वर्णनें अक्षरश: खरीं आहेत तर मग ! (प्रकट) काय म्हणतां मी रोड झालों आहे?
तात्याः रोड ! अहो तुमच्या अंगांतून तुमचा सदरा कसा गळून पडला नाहीं याचेंच मला नवल वाटतें ! कोदंड दोन तीन दिवसांत रोड झाला, शूरसेनाची “ काय ही दशा ” व्यायला एक दिवस लागला आणि पुंडरिकाचा वाळून कोळ व्हायला आठ प्रहर लागले: पण या सृष्टचमत्कारांवर तुमची ताण आहे ! तुम्हीं एका तासांतच वाळून कोळ झालां ! फिक्के तर इतके पडलां आहां कीं हे सारे नायक फिक्के पडतील तुमच्या दारुण विरहावस्थेपुढें. पण गुरु, तुमची टोपी कुठें आहे?
बाळाः मल माझ्या देहाचीही पर्वा नाहीं. मग टोपीची काय कथा ? आतां मला टोपी काय करायची आहे ?
तात्याः खरेंच ! ती ठेवायची तरी कुठें ? डोकें असेल तर ना ठिकाणावर ? (स्वगत) डोकें मुळींच नाहीं, मग त्याचें ठिकाण कसें मिळणार ?
बाळाः (स्वगत) टोपी मुद्दाम टाकून दिली तिचें सार्थक झालें ! विरहावस्थेंत नायक नेहमीं बोडकाच असावयाचा ! (प्रकट) तात्या, झालेल्या दुदैंवी प्रकरणांत त्या माळयानें मल हांकलून दिलें याचें मल अफार वाईट वाटतें ! गुप्तमंजूघांत विलासाला नंदिनीचा बाप मेघनाथ स्वतः हांकलून देतो; अर्जुनाला हांकलणारा बलराम सुभद्रेचा वडिल भाऊ तरी होता ! पण माझ्या वांटयाला तो भिकारडा माळी, वेणूच्या घरचा गडी यावा ना !
तात्याः मला वाटतें तिनेंव तुमचा अपमान करण्यासाठीं त्याला मुद्दाम पाठविलें असावें !
बाळाः असें तुम्हांलाही वाटतं ना ? मलाही थोडासा असा संशय येतोच !
तात्याः संशय नकोच ! एरवीं त्याची काय छाती होती तुम्हांला धक्के देण्याची !
बाळाः खरें आहे तुमचें म्हणणें ? (एकदम आवेशानें) आतां असें करणार.
तात्याः कसें ?
बाळा: अंगिकार करुनि हिचा गर्व खंडितों ॥
अबलेचा पाड काय सहज जिंकितों ॥
श्रेष्ठ नरावीण यास काय भूषण ॥
कुशब्द बोलुनि मलाच लावि दूषण ॥
तिच्या बापानें तर आमच्या लग्नाबद्दल वचन दिलेलें आहे ना ?
तात्याः (स्वगत) अरेच्या ! हें भलतेंच होऊं पाहत आहे. (प्र.) नाहीं गुरू, या रीतीनें जाण्यांत मजा नाहीं, माझ्या मतें अशा उन्मत्त स्त्रीचा सूड दुसर्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करून घ्यावा ! मानिनी स्त्रियांना यासारखें दुसरें मरण नाहीं !
बाळाः छे छे ! दुसर्या स्त्रीवर प्रेम कधी कोणीं केलें आहे का ? अनुरक्त पुरुषाला त्याच्या प्रणयिनीखेरीज गत्यंतरच नाहीं !
तात्याः तें कां ? सत्यविजयांत नाहीं का सत्यविजयानें पहिली स्त्री टाकून दुसरी केली ती ! वाः गुरु, विसरूं नक असे !
बाळाः हो हो ठीक आहे; पण हें जमणर कसें ? अशी दुसरी स्त्री कोण मिळणार ? वेणूसारखी योग्य ?
तात्याः भय्या, हा तात्या बोलतो आहे म्हटलें ! अर्धवट गोष्टी नाहींत आपल्याजवळ ! तुमच्या योग्य अशी एक सुंदर तरुणी पाहून सुद्धां ठेविली आहे ! उगीच नाहीं ! अगदीं त्या वेणूपेक्षां सरस !
बाळाः कोण, कोण हो ती ?
तात्याः आपला रघुनाथ आहे ना ? त्याची हुबेहूब प्रतिभा ! रूपानें, गुणानें, वयानें, उंचीनें अगदीं तशी !
बाळाः खरें ? का थाप आहे झालें !
तात्याः थाप ? दिली आहे का थाप कधीं तुम्हांला ? शिवाय तुमच्यासारखाच नाटकाचा नाद आहे तिला ! सारीं नाटकें पाठ !
बाळाः काय म्हणतां ? सारें खरें हें ?
तात्याः अक्षरशः खरें ! आणि म्हणूनच तर ती एका संकटांत आहे.
बाळा: काय संकटांतसुद्धां आहे ! मग तीच खरी नायिका !
तात्याः संकटांत आहेत तर ! तिच्या बापानें एका मनुष्याशीं तिचें लग्न ठरविलें; पण तिचें त्याच्यावर प्रेम नाहीं ! म्हणून ही लग्नाला कबूल नाहीं । येवढयासाठीं तिच्या बापानें तिला एका खोलींत कोंडून ठेविली आहे ! कोणाला तिकडे जाऊं देत नाहीं, कोणाशीं तिला बोलूं देत नाही !
बाळाः अरेरे, कोण भयंकर हाल हे !
तात्याः आणखी सांगितलें तर तुम्हांला खोटें वाटेल, तिचें तुमच्यावर थोडेंसें प्रेमाही आहे !
बाळाः हँट् ! थाप आहे सारी !
तात्याः आतां काय सांगावें तुम्हांला ? माझा तिचा स्नेह आहे ! तुम्हांला माझ्याबरोबर बरेच वेळां फिरतांना पाहून तिनें तुमची सर्व हकीकत मला विचारली ! पण तिकडे जाणें मोठें कठिण आहे ! मार्गांत शत्रू फार ! एक उपाय आहे फक्त !
बाळाः बोला, कोणता तो. मला संकटाची मुळींच पर्वा नाहीं. हा मम तदर्थ त्यजीन प्राण ॥(वगैरे)
तात्याः वच्या घरीं जायचें तें रात्रीं वेषांतर करून, एक पेटार्यांत बसून जावें लागेल ! म्हणजे पेटारा तिच्या खोलींत पोंचविष्याची मी व्यवस्था करीन ! आहे कबूल ?
बाळा: कबूल ! कबूल ! पेटारा मात्र बुरुडी करा म्हणजे झाले !
तात्याः हो, म्हणजे वारा खेळता राहील म्हणतां !
बाळाः हो, म्हणजे वारा खेळता राहील म्हणतां !
बाळाः शिवाय शिवाजीमहाराजांचें अल्प अनुकरण केल्यासारखें होईल त्यांत. छत्रपति दिल्लीहून पळाले ते बुरुडी पेटार्यांतूनच !
तात्याः उत्तम ! करूं तर मग सारी व्यवस्था ?
बाळाः अगदीं खुशाल ! पण तिचें नांव नाहीं सांगितलेंत तुम्ही !
तात्याः सरोजिनी !
बाळाः वाहवा ! नांवांत सुद्धां प्रणय आहे ! सरोजिनी !
तात्याः सरोजिनी !
बाळाः वाहवा ! नांवांत सुद्धां प्रणय आहे ! सरोजिनी !
तात्याः जातों तर मग मी ! दोनचार दिवसांत तुम्ही मला भेटा !
बाळाः बरें !
( तात्या जातो.)
बाळाः आतांच ती रात्र असती तर किती बरें झालें असतें ! प्रत्येक क्षण मला युगासारख वाटत आहे ! प्रिया संकटांत, माझ्यावर तिचें प्रेम, मी रात्रीं तिला चोरून भेटणार ! मी वेशांतर करणार ! अहाहा, नाटकांत यापेक्षां काय जास्त असतें ! नांव तरी किती गोड ? सरोजिनी ! काव्यमय, प्रेममय, सरोजिनी, नाहीं तर हीं गांवदळ नांवें; यमी, बगडी, गोदी, वेणू ! शी: ! त्या वेणूचें तर नांव सुद्धां नको ! आतां एक सरोजिनी आणि बाळाभाऊ ! बाळाभाऊ हें नांव जरासें बावळटच आहे, हरक्त नाहीं ! आपण तर नांव सुद्धां बदलणार ! निक्रांत हेंच नांव सांगणार ! झालें माझ्या भाग्याला तर पार नाहीं ! हे छत्रपति शिवाजीराजा, मी आज तुझ्यासारखा बुरुडी पेटार्यांत बसून जाणार, तर या कार्योंव यश दे ! बोल शिवाजीमहाराजकी जय !
(उडी मारून निघून जातो. पडदा पडतो.)