प्रवेश पहिला
[भिंतीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात.]
बाळा: काल मधुकरानें वेणूला पाहायला येण्यासाठीं मला बोलाविलें: पण अशा राजरोस रीतीनें येण्यांत काय अर्थ ? कुठल्याही कादंबरींत, नाटकांत नायकनायिकेला त्यांच्या भावांचें किंवा बापाचें साह्य किंवा संमति मिळाली आहे का ? असें साह्य मिळतें तर कित्येक कादंबर्यांचा पहिल्या प्रकरणांतच शेवट झाला असता आणि बहुतेक नाटकें नाटकांतल्या पांच अंकांऐवजीं उजळणींतल्या पांच अंकांतच आटोपलीं असतीं ! प्रेमाची खरी लज्जत चोरटेपणांतच आहे; पण या अरसिकांना त्याची काय किंमत ? तिच्या-नाहीं, माझ्या प्रियेच्या बापाची, भावाची निदान आईची जरी आमच्या विवाहाला आडकाठी असती तर आमच्या या प्रीतिविवाहाला नाटकाचें किती सुरेख स्वरूप आलें असतें. तरी माझ्याकडून मी किती सावधगिरी ठेविली आहे. मोहनतारेंतल्या मोहनाप्रमाणें, पियेची बागेंत चोरून भेट घेण्यासाठीं या भिंताडावरून उडी मारून मी आंत आलों. किती त्रास पडला मला. माझा ढोपर फूटून पाय अगदीं जायबंदी झाला. मोहनचा कांहीं ढोपर फुटला नाहीं. नाटकांतले नायक भाग्यवान् खरे ! उडया मारतांना त्यांचे ढोपर फुटत नाहींत. कित्येक जखमा लागल्या तरी त्यांना दुःख होत नाहीं. जेवणाखाण्याची त्यांना ददात नाहीं ! नाहीं तर हल्लींचें नीरस जीवित ! लोखणी करतांना चाकूनें हात कापला तरी असह्म वेदना होतात. उडी मारतांना ढोपरं फुटतात. पण नाहीं, असें भिऊन उपयोग नाहीं. प्रेमांत संकटें तर यायचींच. (पाहून) अरे, पण माझ्या येण्याचें सार्थक झालेंसें वाटतें. कारण
ही सुरसुंदरी जणुं खालीं । उतरोनी भूवीर आली ॥
ती ही गगनिंची रंमा उर्वशिकीं ।
पण, ही सुंदरी केर टाकण्याकरितां येत आहे, त्या अर्थीं ही ती नसावी. कुठल्याही नाटकांत, काव्यांत, कादंवरींत, नायिका केर वगैरे टाकितांना द्दष्टीस पडली नाहीं. ही तिची एखादी मोलकरीण, चुकलों, मोलकरणींना काव्यांत जागाच नाही-तिची एखादी दासी किंवा निदान सखी असावी ! (निरखून पाहून) पण, छे, माझी शंका निराधार आहे ! हीच ती माझी प्रिया. कारण
सुवर्ण केतकी परि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा ॥
सडपातळ हा नाजुक बांधा खचित त्याच मृदुदेहाचा ॥ वगैरे
अरेरे, कोण भयंकर हाल हे ! कोणत्याही सुंदर स्त्रीवर असा दुर्धर प्रसंग आला नसेल. ही सुंदरी केर टाकणार ! परमेश्वरा, हें पाहण्यापेक्षां मी अंध का नाहीं झालों? हें काय पहायाचें नशिबीं आलें ! प्रभु विचित्र किती तव चरित्र तर्क न कोणाचा चाले ॥ कोमल शकुंतलेला झाडांना पाणी घालायला लावणार्या त्या थेरडया कण्वापेक्षां हिचा थेरडा फारच अविचारी असला पाहिजे. करूं का सूड घ्यायची प्रतिज्ञा ? लाडके, सुकुमार वेणू, टाक, टाक तो केर खालीं; पण हें काय ? या केराकडेच माझी नजर इतकी कां बरें लागत आहे ? हं, मोहनतारेंत तारेच्या हातांतल्या घागरीप्रमाणें आपणही फुंकलों गेलों असतों तर फार बरें झालें असतें असें मोहनला वाटलें तसेंच मलाही वाटत असलें पाहिजे. अहाहा, मी जर असा केर होऊन झाडलों गेलों असतों तर आणखी काय पाहिजे होतें ? बा केरा, धन्य आहेस तूं, हा केर ज्या उकिरडयावर पडेल तो उकिरडा धन्य, त्याच्यावर लोळणारा गाढव सुद्धां धन्य धन्य ! त्रिवार धन्य ! त्या केरांतला कागदाचा फाटका तुकडा मला प्रणयपत्रिकेसारखा वाटतो; त्यांतली धूळ हीच अंगारा. (तिच्याकडे पाहात राहतो.)
वेणू: (स्वगत) जरा कुणाचें पाऊल वाजलें कीं कोणीं मला पहायला येत आहे असें मला वाटतें. वहिनीनें मला इतका धीर दिला खरा, पण तिचें बापडीचें तरी काय चालणार ? असो, नशीब आपलें, जें व्हायचें असेल तें होईल. आतां देवासाठीं चार कळ्या ती काढून ठेवाव्या.
(राग-पिलु. ताल-त्रिवट.)
वेणू: कलिका करिती केलि का गणिति न नाशास कां ? ॥धृ०॥
आत्मार्पण करुनी ईशा मजही सूचवीति कां ? ॥१॥
(फुलें काढूं लागते.)
बाळाः (स्वगत) आतां पुढें कसें व्हावें ? अशांत हिच्यावर एखादें संकट येईल तर काय बहार होणार आहे; पण संकट तरी कोणतें येणार ? सौभद्राप्रमाणें घटोत्कचासारखे राक्षस या कलियुगांत नसल्यामुळें तशीं संकटें येण्याचे मार्गच बंद झाले आहेत. निदान वीरतनयंतल्या शालिनीप्रमाणें एखादा वाघ येईल म्हणावें तर त्याचाही कांहीं संभव नाहीं. या घराजवळच्या बागांतून अरण्यांतल्या सिंहवाघांबद्दलची भूक कुत्र्यामांजरांवरच भागविली पाहिजे. हां ! निदान शाकुंतलासारखा एखादा भ्रमर मात्र या बागेंत असेल कुठें तरी; पण त्याला या आतांच्या पोरी भितात तरी कुठें ? त्याच्या गुंजारवानें आतांशा कोणी गुंगतही नाहीं. प्रेमाच्या बाजारांतल्या सार्याच पदार्थांचा भाव उतरल्यासारखा दिसतो. प्रणयीजनांच्या या गैरसोई परमेश्वर कधीं दूर करील तो सुदिन ! (पाहून) आहा, ती एक माशी तिच्या तोंडापुढें येत आहे. माशी का असेना ? बुदत्याला काडीचा आधार. व्हावेंच आतां पुढें (पुढें होऊन माशी हाकलतो. वेणृ दचकते.) सुंदरी, भिऊं नकोस. काय ही तुझी स्थिति ? सुंदरि,
घेउनि पंकजपत्राचा पंखा घालूं का शीत वारा ॥ वगैरे
वेणूः आहे काय हा गोंधळ ? आणि तुम्ही इथें आलां कसे ?
बाळाः कसा आलों हें भगवान् कामदेवाला ठाऊक !
वेणूः म्हणजे ?
बाळाः त्या पडक्या भिंताडावरून. येतांना माझ्यावर काय काय संकटें आलीं याची तुला कल्पनाही नसेल. काय सांगूं सूंदरी, माझा सदारा फाटला, धोतराला आखूट भरला, हा पहा माझा ढोपरही पुटला आहे; पण त्याचें काय आहे. प्रणयीजनांनीं संकटें हीं सोसलींच पाहियेत !
वेणूः इतके सायास घ्यायचें कारण ?
बाळा: कारण ? कारण तूंच. तुझ्याखेरीज दुसरें कोण ?
वेणू: काय मी ? मीं काय केलें यांत ?
बाळा: काय केलेंस ? तूंच पहा बरें, सुंदरी !
हें काय बरें त्वां केलें ॥ मऋणालसममुक्तालतिकेतें । दावुनि जैसें हंस वरातें । तैसें मम मानसजन्म्यातें ॥
बहु दूर विलोभुनि नेलें ॥१॥
वेणू: मोठाच चमत्कार म्हणायचा ! बरें, तुम्हांला यायचेंच होतें तर इतर रस्ते का थोडे पडले होते ? घरांत यायचें होतें नीट !
बाळाः घरांत ! छेः प्रणयीजनांची पहिली भेट अरण्यांत निदान एखाद्या बागेंत तरी पडावी असा सिद्धांतच आहे ! अर्जुन सुमद्रेला भेटला तो अरण्यांत ! मोहनाने पारेला पाहिलें तेंही बागेंत ! दुष्यंत-शकुंतलेची भेट पहा. अरण्यांतच ! कामसेन रसिकेला भेटला बागेंतच ! एवढी जहांवाज त्राटिका; पण प्रतापरावाला बागेंतच भेटली ! फार कशाला, मतिविकार अगदीं आजकालचें नाटक ना? त्यांत सुद्धां चकोर-चंद्रिकेची भेट तुळशीवृंदावनांत होते !
वेणूः अस्सें; पण अशा रीतीनें येतांना तुम्हीं सारासार विचार पहायाचा होता थोडा ? लोक काय म्हणतील तुम्हांला
बाळा: सुंदरी, प्रेमवेडयाला लोकांची भीति कधीं असते का ? सारासार विचार पहावयाला किंवा लोकांची बोलणीं ऐकायला मला अवकाश नाहीं. कारण
प्रणय तरंगांसचें । विवश वाहतों जवें । जलवें पाहवे गतिमुळें न ऐकवे ॥
योगबलें जणुं यति । ब्राह्मउपाधींप्रती । प्रणयीजन निवरती । खेद मुळिं न त्यां शिवे ॥१॥
वेणूः इतकें प्रेम आहे तुमचें माझ्यावर ? मला नव्हतें हें माहीत !
बाळा: इतकेंच काय ! यापेक्षांही जास्त ! वेणू, सुंदरीं
तुजविण वृथा गमे संसार । संसार सौख्य कुठचें ॥ध्वनि॥
वेणूः बरें, पण इतके दिवस हा तुमच्या प्रेमाचा उमाळा असाच राहिला आणि आजच त्याला असा पूर कशाअनें आला ?
बाळा: इतके दिवसांची गोष्ट निराळी ! आतां तरुणपणाची गोष्ट निराळी ! बाळपणींचा काळ निघून गेला तो ! त्या वेळीं “ जें ब्रह्म काय तें मायबाप ही जोडी ॥ खेळांत काय गोडी ॥” पण आतां ते खेळ नकोत, त्या आटयापाटया नकोत. ते बैदूल नकोत, ती लंगडी घालणें नको असें झालें झालें आहे ! आणि तें कां म्हणशील तर-आलि कालिं या मज तरुण दशा ॥ निःशंकपणें रमणें गेले प्रणयकेलि मज सुचती ऐशा ॥ धात्रीपूर्वीं निधि वाटे तो सांप्रत गणती तरुणी प्रयशा.
वेणूः बरीच मनोरंजक आहे तुमची कहाणी ! बरें, झालेंना तुमचें पहाणें ? जातें मी आतां.
बाळा. (तिला अडवून) वाः हें काय । चाललीस कुंठ अशा तूं ? तुला जाऊं देणार नाहीं. नुसता तुला पहावयास मी आलो हा तुजा संशय खोटा आहे. सुंदरी. भूमिजल तेज नम...! पाणि तुझा सखे ॥ (तिचा हात धरतो. ती रागानें दूर जाऊन उभी राहते.)
वेणू: हं; खबरदार ! अंगाला हात लावाल तर !
बाळा: (स्वगत,) विस्मयाने) मला वाटलें होतें कीं माझे श्रम जाणून ही आतां मला आलिंगन देऊन सुभद्रेप्रमाणें ॥ बहुत छळियलें ॥ पद म्हणणार ! पण ही तर संतापून दूर उभी राहिली ! नाटकांतल्या मुख्य मुख्य खुब्या हिला ठाऊक नाहींत असें दिसतें ! आमच्याकडे स्त्रीशिक्षण नाहीं त्याचें त्याचे हे दुष्पारिणाम ! आतां हिचें समाधान केलें पाहिजे. (प्रकट) सुंदरी, अशी रागावूं नकोस ! अशा वेळीं रागावणें म्हणजे अगदीं अरसिकपणा आहे १ एकसुद्धां नाटक पाहिलें नाहींस वाटतें तूं ? तरीच. म्हणून म्हणतों-नच सुंदरि करुं कोपा । मजवरि करि अनुकंपा ॥ (वगैरे) काय, अजून तुला माझी दया येत नाहीं ?
वेणूः (स्वगत) काय म्हणावें आतां या मूर्खपणाला ? (प्र.) तुमच्याकडे पाहील त्याला तुमची दया येणारच म्हणा
बाळाः (आनंदानें) झालें तर मग; कर टाकि सखे ग या कंठीं ॥ फिरविन हनुवटी । शिणविन तनुकटी ॥ (वगैरे)
वेणूः (स्वगत) या स्वारीला वेतानेंच जायला लाविलें पाहिजें. (प्र.) हें पहा. तुमच्या आवडत्या नाटकांतलाच मी तुम्हांला एक प्रभ विचारतें ! आतांच तुम्हीं म्हटलें ना कीं मीं एकही नाटक पाहिलें नाहीं म्हणून तें पुष्कळसें खरें आहे आणि तुम्ही तर असे रसिक ! मग तुमची शारदा म्हणते त्याप्रमाणें रेशमाच्या शेल्याला सुताच्या दशीप्रमाणें मी तुम्हांला शोभलें तर पाहिजे ना ? तेव्हां हा नाद तुम्ही सोडून द्या ! तुमच्यासारखी एखादी रसिक मुलगी पाहून तिच्याशीं लग्न करा !
बाळा: ठीक विचारलेंस ! असेंच शालिनीनें शूरसेनाला विचारिलें तेव्हांचें त्याचेंच उत्तर तुला देतों ! वेडे.
अशि ही सगुणखनि देइ त्यजोनी । जगिं या दिसोनी न येईल कुणी । शरश्वंद्र अतिनिर्मल जैसा शोभवि तारागार ॥ विमल देहीं शुद्ध आत्मा तेविं करित सुविहार ॥ निरखोनी, विदेही मुनिही मतिहीन होई ॥१॥
असा मूर्ख-अंध-वेडा; पुढे शालिनीचें वाक्य आहे ! दुसरी रसिक मुलगी आतां पाहणें म्हणजे प्रेमाला हरताळ लावण्यासारखेंच आहे ! पुष्कळदां नायिकेपेक्षां दासींचीं सोंगें सुरेख दिसतात; परंतु कोणत्याही नाटकांतला नायक तिकडे ढुंकून पाहायचा नाहीं आणि प्रियेचे दोष त्याला गुणासारखेव वाटतात. कारण अनिवार मनुज करि अंतरीं ज्या वस्तुवरी प्रीति (वौरे) म्हणून म्हणतों. लाडके, आतां अंत पाहूं नकोस ! ये अशी, बैस मजसरशी ! नाहीं कुणीं दूसरें ॥ कां शंका धरिशी बिंबाधरे ॥
वेणूः (स्व०) छे: हें वाढतच चाललें ! आतां आटपतें घेतलेंच पाहिजे. (प्र.) मी मघापासून पाहतें आहें; लाज नाहीं वाटत तुम्हांला असें भलभलतें बोलायला ! जनलज्जा, मनलज्जा कांहीं वाटूं द्या थोडी !
बाळाः सुंदरी, कां रागावतेस आतां उगाच ? रागावण्याचा काळ गेला.
जें जें तूं बोलसी तें मजला का श्रुत नसे ॥
परि त्याचें काय आतां मज भरलें स्मरपिसें ॥
म्हणून आतां मी तुझें मुळींच ऐकणार नाहीं ! माडिवरि चल ग गडे जाऊं झडकरी ! नाहीं तर हा अस्सा मी सोडीत नाहीं !
वेणूः चला, व्हा दूर ! शरम नाहीं वाटत तुम्हांला ! एवढें वय वाढलें त्याची कांहींच का लज नाहीं ?
बाळाः आतां मलाही राग आवरत नाहीं ! फार वेळ तुझें बोलणें ऐकून घेतलें मी ! तुझ्या बापानेंच मला इथें बोलाविलें आहे ! पाहूं बरें आतां काय करतेस ती-वेणू-अजवरि हेका । धरूनि अनेका ॥(वगैरे.) (तिचें चुंबन घ्यावयास जातो.)
वेणू: (घाबरून) धांवा हो धांवा ! दादा, अहो अण्णा !
बाळा: बोलाव, कोणालाही बोलाव ! मी सुद्धां आतां कीचकासारखा बेफाम झालों आहें ! येऊं देत, तुझे दादा येऊं देत; अण्णा येऊं देत; भीम येऊं देत; अर्जुन येऊं देत !
कोण येतो तो पाहतों मजसि माराया ।
प्राण त्याचा प्रथम घेतों कोप शमवाया
युवतिकुंकुमतिलक पुसुनी पुसुनि नंतर या ।(तिचें कुंकू पुसतो)
शुद्धबीजांकुर नर हा सिद्ध झाला या ॥
(एकदम थबकून) अरेरे, काय अविचार करीत होतों मी ? कोणत्याही नायकानें अजून असा अत्याचार केला नाहीं ! प्रणयिनीनें धिक्कार केला तर फार झालें तर मूर्छित पडायचें ! नायिकेला त्रास प्रतिनायकानें द्यायचा ! जा वेणू, जा. नाटकाच्या नियमाबरहुकूम मला आतां मूर्छितच पडलें पाहिजे. (ती जाते) हाय ॥ गेली प्रिया गेलि गेली प्रिया गेलि गेली ॥ हर हर ! शेवटची साकी सुद्धां मला उंच सुरांत म्हणवत नाहीं.
पाषाणापरि मस्तक झालें स्पष्ट दिसे ना कांहीं ॥
भ्रम पडलासे वाटे मतिला अंगहि हालत नाहीं ॥
जिव्हा जड पडली प्रिये ये ॥ (मूर्छित पडतो)
[पडदा पडतो.]