सभापर्व - राजसूय यज्ञ

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


लिहिलें हळूहळू यां गोड ' सभापर्व ' ह्नणुनियां दुसरें, ।
याच्या श्रवणें रसिकां तुष्टि जशी तशि सुधेचिया न सरें ॥

धर्माचा राजसूय यज्ञ.

मग जिष्णुं उत्तरेला, जिंकाया भीम वासवाशेला,
सहदेव दक्षिणेला, वरुणदिशेलाहि नकुल तो गेला ॥१॥
हरिति रिपूंचे मदगदे, पद न, दयासिंधु ते सुजनमहित, ।
झाले केवळ न दरद, बदरदहि न गांजिला प्रणंत अहित ॥२॥
करुनि चतुर्दिग्विजय द्रविणाचे अमित राशि जोडूनी, ।
ते स्वपुराला आले, विजित नृपांचेंहि मन न मोडूनी ॥३॥
तैसेंच आणिलें बहु वित युधिष्ठिरपुरास दासजितें ।
अजितें, अजि ! तें त्या तत्प्रेम असा कौतुकी सदा सजितें ॥४॥
धर्मपरें धर्मपरा धन दिधल्या काय दोष ? कर दे, हें ।
किति ? दासदास्याहि करी श्रीश श्रीचित्ततोषकर देहें ॥५॥
धर्म प्रभु, न पर प्रभु, जेणें केला प्रसिद्ध तो करदें, ।
मोठ्या मोठ्यांलाही बुडतां व्यसनाब्धिमाजि जो करदं ॥६॥
धर्म ह्नणे, ' देवा ! तुज दीक्षा साजेल, मन न, यज्ञाची ।
हो सम्राट् सर्वेशा ! दृष्टि निवो सर्वसवनेयज्ञाची ' ॥७॥
कृष्ण ह्नणे, ' राया ! तूं उचित अनुद्वत न उद्धत क्रतुला ।
योग्य न दुग्धस्थानी योजावा प्रियहि शुद्ध तक्र तुला ॥८॥
देवा ! सेवाचि भली दे मज, दुसरी न घेववे दीक्षा ।
सुखकीर्तिहेतु आह्मां तव नवसवभूमिदेववेदीक्षा ॥९॥
करिन ब्राह्मणपादप्रक्षालन, सांवडीन मी उष्टी ।
सर्वहि करीन, देही फल हेंचि, न अन्य या वृथापृष्टीं ॥१०॥
कृतकृत्य यांत आह्मी, हो तूं सम्राट् प्रभो ! अगाधबला ! ।
हो त्वद्यशें त्रिलोकी राया ! कुरुसत्तमा ! अगा ! धवला ' ॥११॥
धर्मे सवोत्सवोत्सुक नृप आणविले स्वदूत धाडूनी ।
विप्र क्षत्निय वैश्यहि सच्छूद्रहि भूवरील झाडूनी ॥१२॥
भीष्म सकलत्नसुत धृतराष्ट्र कृप द्रोण विदुर पुरवासी ।
धर्मे आणविले, मृग जाणों प्रेषूनि नकुळसुरवासी ॥१३॥
रामादि सर्व यादव शिशुपालादिक नृपाळ बहु आले ।
अर्पुनि उपार्यनें बहु धर्मकृतें आदरें बहुत धीले ॥१४॥
अध्वर्यु याज्ञवल्क्य, ब्रह्मा श्रीव्यास, पैल मुनि होतां ।
सुमुनि सुसामानामा सामग यज्ञांत जाहला होता ॥१५॥
जेथ सभासद नारद, फार दया ज्ञान ज्यांत वास करी ।
जेथें विप्रपदाब्जप्रक्षालन तीर्थपाद देव करी ॥१६॥
तेथें साहित्यासि श्रीभीष्म द्रोण विदुर बहु जपती ।
न विसंबिति क्षण जसे गुणवदर्पत्याशि वृद्ध मनुजपंती ॥१७॥
यजमानहि गुरुदेवद्विजभक्त अजातशत्रु, तज्जाया ।
मूर्तिमती श्रद्धासी आले गुण ज्या सुधेंत मज्जाया ॥१८॥
वाढी स्वामायसी, की मूर्तिमती सुरभि गायसी ते तें ।
जें जो इच्छी, तीतें गाय भुवन, जेंवि गाय सीतेतें ॥१९॥
यन्नामें सफल सकल सव, सगुण ब्रह्म ज्यांत रावे तें ।
त्या क्रतुच्या वर्णावें कीर्तिसुधेते, न अन्य रावेंतें ॥२०॥
इतुक्याचि राजसूयक्रतुच्या या वर्णनें रसिक हर्षो; ।
काय डरडरां ढेंकर देवुनि चातक ह्नणेल बहु वर्षो ? ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP