वेगळं व्हायचंय‌ मला - अंक पहिला

जुन्या जमान्यातील एक अतिशय गाजलेले नाटक .


स्थळ -- अण्णा आगरकरांचें घर , बाहेरून घरांत शिरण्याचा दरवाजा समोर दिसतो , उजव्या बाजूला जो रस्ता आहे , किंवा दरवाजा आहे तो घरांत जाण्याचा असावा ! तसाच डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूलाहि समोर , आणखी एक वडिलांच्या खोलींत म्हणजे उजव्वा हाताला अगदीं डोळ्यांसमोर एक सरस्वतीची तसबीर आहे , लोकमान्य टिळकांचा फोटो आहे , सुलभाच्या खोलींत एक टेबल -- खुर्ची , टेबल -- लँप ,-- हा बहुतेक लग्नांत मिळालेला अहेर असावा , वाडिलांच्या खोलींत एक लांकडी खाट आहे , मुलांच्या खोलींत सोफसेट आहे , सुलभा उजव्या दरवाजांतून ‘ माझ्या माहेरची वाट नाहीं आडकळणाची ’ ही ओवी गुणगुणत आंत येते ! अण्णा सरस्वतीचें स्तोत्र म्हणत आंत येता ! सरस्वतीला हार घालून नीरांजन कुठें आहे तें सूनबाईला विचारण्यासाठीं मध्यावर येतात आणि ती त्यांना तबक आणून देते ! कौतुकानें हंसत तबक घेऊन सरस्वतीपुढें येता ! ]

अण्णा : सूनबाई , किती बाजले गं ?

सुलभा : नाहीं आले अजून ,

अण्णा : अग , नाहीं आले अजून काय ? मीं तुला किती वाजले तें विचारलं .

सुलभा : अग बाई ! मीं ऐकलं ---

अण्णा : चांगलं ऐकलंस ! बरोबर ! नवर्‍याची वाट बघत असशील ! सासर्‍याचे शब्द कुठून ऐकूं येणार तुला ?

सुलभा : तसं नव्हे मामंजी .

अण्णा : तसं नव्हे कसं ? तसंच आहे ; आणि तसं नसलं तर तसं असलं पाहिजे , अग , हेंच वय आहे , आम्ही का आतां कुणाची वाट बघायची ? बघायची ती मुलाची . म्हातारपणाची काठी ना आमची ती . अं ? अजून आला नाही का माधव ?

सुलभा : नाहीं .

अण्णा : कुठं गेलाय ‌ ?

सुलभा : कुणाशीं तरी एंगेज‌मेंट होती त्यांची आज , पण एव्हांना यायला हवे होते .

अण्णा : अन ‌ मला सांग ‘ वाट बघत नव्हतें ’ म्हणून , अग बाऽई तुझी एंगेज‌मेंट !

सुलभा : माझी नव्हे त्यांची ,

अण्णा : शोभतेस , नव्या लेखकाची बायको शोभतेस . एंगेज‌मेंट काय , अपॉइंटमेंट काय , काय काय खुळं आहेत एक एक !

सुलभा : त्यांनींच सांगितलंय ‌ मला .

अण्णा : असे शब्द वापरायला ? म्हणजे काय तें ! हो ! त्याची ती ही , डिग्निटी वाढत असेल . तुला दोष नाहीं हं देत मी , काळच बदललाय् ‌ सगळा , माझ्या तरुणपणीं तूं माझ्या बायकोला भेटायला हवी होतीस , मी कुठें गेलोंय ‌ हा प्रश्न तूं तिला विचारायला हवा होतास , ( सुलभा हंसते ) का ? हंसतेस ? अग , तें शक्य नाहीं हें मलाहि माहीत आहे , पण कल्पना करायची , जुने असलों म्हणून काय झालं , लेखकच ना आम्ही ? काय सांगितलं असतंन ‌ तिनं , सांग बघूं ...

सुलभा : गेलेत बाहेर !

अण्णा : छे , छे ! हें अगदीं अलीकडलं झालं , ही बेपर्वाई झाली . ही हल्लींच्या मुलीत आहे , पूर्वीच्या बायकांत नव्हती , मी एकदां लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाला गेलों होतों -- चोरून !

सूलभा : चोरून ?

अण्णा ! हो , चोरून , " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे " ही त्या लोकमान्य पुरुषाची सिंहगर्जना सामान्यांनीं चोरून ऐकण्याचा काळ होता . त्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ होता , हें लक्षांत ठेव , तर मी सभेला गेल्याचं हिला माहीत होतं . तिला विचारलं कुणीं तरी ,

सुलभा : मग काय सांगितलं सासूबाईंनीं ?

अण्णा : कपाळींच्या कुंकवाचा मळवट लहान वाटेला एवढे मोठे डोळे करून , आजूबाजूला कोणी ऐकत नाहीं असं बघून , आणि नवर्‍याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यारखा गंभीर आवाज करून सांगितलंग ‌ तिनं ---

सुलभा : काय ?

अण्णा : ‘ लोकमान्यांच्या सभेला गेलेत आणि कोणाला ठाऊक आतां परत येतात कीं नाहीं तें , ’ अशा अर्थाचा एक मोठा सुस्कार सोदलान ‌, ही गोष्ट जेव्हां घरीं निघाली तेव्हां त्याच्याहि वर ताण एक गोष्ट माझ्या वडिलांनीं मला सांगितली , बायकांनीं नवर्‍याची मर्यादा किती पाळायची याचं प्रतीक तें , त्या काळांतलं , शिवाय लोकमान्यांच्या घरांतलं .

सुलभा : टिळकांच्या घरांतलं ?

अण्णा : हो . त्यांच्या भेटीला एक गोरा साहेब आला होता , ते नव्हते घरीं , त्या साहेबानं सत्यभामाबाईंना -- त्यांच्या पत्नींना -- विचारलं ," लोकमान्य आहेत का " त्या म्हणाल्या , " कोपर्‍यांत काठी दिसत नाहीं ," साहेबाला कांहीं कळलं नाहीं , पुन्हा तोच प्रश्न तोच प्रश्न आल्यावर त्या म्हणाल्या , " खुंटीवर पगडीहि दिसत नाहीं , " तरीहि साहेबाला कळलं नाहींच ! पुन्हा जेव्हां तोच प्रश्न आला तेव्हा मात्र त्या म्हणाल्या , " दारांत जोडेहि दिसत नाहींत ." हें जोडयाचं उत्तर त्या साहेबाला कळलं आणि गेला तो , ( सुलभा हंसते , आणि अण्णा डोळ्याला उपरणें लावतात . ) या जुन्या आठवणी मोठया वाईट ! उरांत तर सांठविलेल्या ससतात , पण आठवल्या म्हणजे ऊर भरून येतो . नव्या सुनेच्या नाकांतल्या नथी साररूया असतात त्या आठवणी ,

सुलभा : नथीसारख्या आठवणी ?

अण्णा : अंग , नथीचा सोस तर असतो दांडगा , पण संवय नसल्यानं नथ घालायची म्हणजे डोळ्यांत उभं राहतं पाणी , नाक तर दुखल्याशिवाय राहात नाही , आणि नथ तर घातल्याशिवाय राहवत नाहीं , तशाच या आठवणी , आठवल्याशिवाय राहात नाहींत , आणि आठवल्या कीं डोळे लागतात लदक सोडायला आठवणींवर , बरं , तें जाऊं दे तुझ्या नवर्‍याचं काय सांगत होतीस तूं ? कोणीची एंगेजमेंट होती त्याला ?

सुलभा : कुठल्या तरी पिक्चरची गोष्ट लिहिताहेत ते . विभक्त कुटुंबावरचं कथानक आहे म्हणे .

अण्णा : म्हणजे जें त्याला मनापासून हवं आहे तें ? हं , असो ! अजून मंदा , सुरेश दोघंघि आलेलीं दिसत नाहींत कॉलेजांतनं ,

सुलभा : भाऊजींनीं छत्री तरी नेलीय ‌. वन्संनीं तीहि नाहीं नेलेली . मला भीति वाटतेय ‌.

अण्णा : कां ग ?

सुलभा : एकदम पाऊस यायचा , आभाळ आलंय ‌ भरून ,

अण्णा : हां ! होईल मोकळं ! लग्नाला आलेली मुलगी म्हणजे भरून आलेल्या आभाळासारखीच असते ; बापाच्या डोक्यावर , अग , खरंच , तुझ्या वडिलांना पत्र लिहिलं होतं , मीं परवां , त्या आपटयांच्या स्थळाविषयीं , कांहीं उत्तर कसंअ आलं नाहीं ?

सुलभा : आमच्या नाशिकचे आपटे ? तें स्थळ चांगलं नाहीं मामंजी ,

अण्णा : कां ग ?

सुलभा : मला नेलं होतं तिथं दाखवायला , पण मुलगा चांगला नाहीं ,

अण्णा : कां ? तुला नापसंत केलं म्हणून ?

सुलभा : नाहीं , वडिलांशीं भांडून वेगळा झालाय ‌, पटत नाहींत वडिलांचीं मतं म्हणे , तिथं नका देऊं वन्संना ,

अण्णा : अगं पण , वडिलांचीं मतं न पटणार्‍या मुलांचं , आपल्या बायकांशीं चांगलं पटतं ,

सुलभा : नाहीं मामंजी . जन्मदात्यालाच जो सांभाळूं शकत नाहीं , तो जन्माचा जोडीदार काय सांभाळणार ?

अण्णा : विचार चांगले आहेत तुझे . असे राहिले तर चांगले आहेत , पण व्यवहारांत नाहीं बसत असं पुष्कळदां , तरूणपणीं वाटत असतं माणसाला , वेगळं राहण्यांत सुख आहे म्हणून , तुझ्या नवर्‍याच्य डोक्यांत शिरलंय ‌ हें खूळ हल्ली , म्हणून मुद्दाम सांगतों तुला . त्याचे डोळे उघडण्याचं सामर्थ्य माझ्यांत कांहीं नाहीं ! बरं , माधवच्या म्हणण्याप्रमाणं वांटणी करून द्यायची झाली तरी मला एकटयाला कांही करतां येणार नाही : रघुनाथाला -- माझ्या धाकटया भाबाला -- विचारायला हवं मला , येतोय ‌ तो इथं , तार आलीय ‌ त्याची , कर्नलच्या हुद्दयावर आहे तो सैन्यांत ! माझं आहे तसंच त्याचंहि घर आहे हें , लांब राह्यला असला तरी वेगळा नाही झालेला तो , अत्यंत चीछ आहे त्याला या वांटणी प्रकरणाची , त्याच्या अपरोक्ष मी यांतला कांहीं प्रकार केला तर रागवेल तो , अतिशय कडक स्वभाव आहे त्याचा . अरे , गडगडायला लागलं काय एकदम ! अरे , वारा सुरू झाला ! पाऊस येणार आहे की जाणार आहे ? छे , छे , छे ! अजून कशीं आलीं नाहींत हीं पोरं !

सुलभा : अगबाई , मागल्या बागेंत बन्संचीं पातळं घतलींय्त वाळत ; मी आणतें काढून .

अण्णा : नको . वेळ चांगली नाहीं . मी आणतों . दोन काकडया लागल्यात वेलीला , त्याहि काढायच्यात ; नाहीं तर माकडांची धन व्हायची ! काय म्हणा , आमच्या सुरेशच्या तावडींतनं सुटल्या असल्या तर बघायच्या ,

सुलभा : मी आणतेंना मामंजी .

अण्णा : नको म्हणून सांगितलं ना ! वेळ चांगली नाहीं , तापलेली असते जमीन ; गारवा शोधायला जनावरं निघतात बाहेर , ( अण्णा ‘ अस्तिक अस्तिक काळभैरव ’ असें म्हणत आंत जातात . आणि मागें दरवाजांत एक तरूण उभा दिसतो . सुलभा मागें वळून त्याला --)

सुलभा : ( बघते आणि दचकून विचारते -- ) अगबाई ! तुम्ही कोण ?

विनायक : मी विनायक विघ्ने . इथून दोन घरं टाकलीं कीं तिसरं लागतं तें माझंच पांच -- सात घरं आहेत माझीं गांवांत , माधवला माहीत आहे . घरीं कुणी नसतंच माझ्या , पहिली बायको मेली , दुसरी शोधतोंय ‌. घरच्यासारखं आहे माझं घर . तुम्हांलाहि असायला हरकत नाहीं , येत जा ना . इथलीं माणसं घरचींच समजतो मी .

सुलभा : संध्या घरांत कोणी नाहींयू .

विनायक : तुम्ही आहांत ना ?

सुलभा : ( हांक मारते ) मामंजी !

विनायक : म्हणजे ते आहेत घरांत . सुचवायची पद्धत चांगली आहे . लेखकाच्या घरांतली पद्धत आहे . ठीक आहे , ते बाहेर गेल्यावर येईन .

सुलभा : म्हणजे ?

विनायक : म्हणजे त्यांना आबडत नाहीं ना मीं घरांत आलेलं . माधवचं अन ‌ त्यांचं वाकडं आहे म्हणे , तोच सांगत असतो नेहमीं , त्याच्याकडं काम आहे माझं .

सुलभा : मग ते आल्यावर या .

विनायक : तेच आलेत का बघायला आलों होतो . तुम्ही दिसलांत बरं वाटलं . म्हणजे पाहिलं नव्हतंना तुम्हांला पूर्वीं , त्याचं लग्न झाल्यापासून या घरांत आलोंच नाहीं मी . तुम्हांला माहीत नाहीं . तुमचे पति आणि मी दोन नाहीं कांहीं . अगदीं जिवाचे दोस्त आहोंत . त्याचं सुख तेच माझं मुख , असं समजून चालतो मी .

सुलभा : कळलं मला , या आतां .

विनायक : आतां येत नाहीं , आतां जातों . मग येईन , आठवण ठेवा ,

सुलभा : मला नाहीं जरूर वाटत .

विनायक : माझी नव्हे , माझ्या निरोपाची , आणि मंदा आली नाहीं वाटतं अजून ?

सुलभा : कांहीं शिष्टाचार आहेत का नाहींत तुम्हांला ? कोण मंदा तुमची ? एकेरी नांवानं विचारतां ? बायको तुमची ती ?

विनायक : व्हावी ! तोच प्रयत्न आहे माझा , माधवचं माझं बोलणं झालंय ‌ .

सुलभा : पायपुसण्यानं हातरुमाल होण्याची इच्छा धरूं नये . कांही मॉनर्स आहेत का नाहींत तुम्हांला ? जा बधूं इथून !-- मामंजी ! मामंजी !

विनायक : जातों . गारव्याकरितां जनावरं बाहेर पडतात या वेळेला , डसूं नये एखादं म्हातार्‍याला . येतों . ( ‘ अस्तिक अस्तिक काळभैरव ’ म्हणत जातो . )

सुलभा : चांडाळ ! नीच ! हलकत !

विनायक : ( परत येऊन ) मला बोलावलंत ?

सुलभा : मामंजी !

विनायक : आँ , हां , त्यांना बोलावलंत . मला वाटलं मलाच . ( टेबलावरचा ऑश ट्रे त्याला मारण्यासाठीं सुलभा उचलते . आणि तो निघून जातो , तो गेल्यावर सुलभा तोच ऑश ट्रे खिडकींतून रिकामा करते . आणि बाहेरून एका मुलीचा ई ऽ ऽ असा चीत्कार ऐकूं येतो , आणि मंदा प्रवेश करते , एका हातांत पुस्तकं , अंगावर राख सांडलेली . पुस्तकें अण्णांच्या डेस्कवर ठेवते , आणि तरातरा वहिनींकडे येत म्हणते -- )

मंदा : वहिनी , दादाला सिगारेट‌स सोडायला सांग .

सुलभा : कां हो ?

मंदा : थट्टेनं नाहीं सांगत , अगदीं डोक्यांत राख घालून सांगते .

सुलभा : अगबाई ! तुमच्या डोक्यावर का पडली ! माझं लक्षच नव्हतं .

मंदा : कसं असेल ? तूं बघत असशील आपल्या नवर्‍याची वाट .

सुलभा : आतां कशाला त्यांची वाट बघायची ? लग्न होऊन चांगले दोन महिने झाले आहेत . आतां वाट मी नाहीं बघायची . आतां वाट बघायची तुम्हीं , तो रमेश केव्हां येतो , आपलं आडनांव केव्हां बदलतं , या वहिनीच्या जाचांतून सुटून आपण केव्हां एकदां सौ . होते , ती वाट , तुम्हीं बघायची , काय म्हणतात रमेश ?

मंदा : कोण रमेश ? मला नाहीं हं ठाऊक !

सुलभा : असंच असतं . ठाऊक नाहीं म्हणूक सांगावं लागतं .

मंदा : कांहीं तरीच . तुलाच कुणीं सांगितलं ?

सुलभा : आम्हांला सांगितलं एका पत्रानं .

मंदा : कुठलं पत्र ? मला नाहीं हं कुणाचं पत्र -- बित्र आलेलं .

सुलभा : तुम्हांला कुठं ? तुमच्या त्या संस्कृतच्या पुस्तकाला आलंय ‌ .

मंदा : ( धाबरून ) तूं कां घेतलंस माझं पुस्तक ? अण्णांनी बघितलं ?

सुलभा : कसा सांपडला चोर !

मंदा : ( तिच्या गळ्यांत पडून ) ए बहिनी , खरं सांग , समजलं अण्णांना ?

सुलभा : हो , मींच दाखविलं तें पत्र त्यांना , हे चाळे काय चांगले आहेत काय ? असे चिडलेत तुमच्यावर , ( असें म्हणत माधवच्या भागांत म्हणजे पडदा ओलांडून समोरून बघणाराच्या उजव्या हाताला असलेल्या एका खुर्चीवर बसते ; तिच्या मागोमाग मंदा येते . )

मंदा : वहिनी , माझी कांहीं चूक नाहीं , ते मला भेतले , गँदरिंगच्या वेळेला . आमची ओळख झाली .

सुलभा : तें मला कांहीं सांगूं नका , मामंजीना सांगा आल्यावर ,

मदा : मेलं आमचं नशिबच धड नाहीं , लग्नहि जुळत नाहीं कुठं , म्हणजे सुटेन एकदांची ! मला थोडंसं विष दे आणून !

सुलभा : कुठं मिळतं तें सांगा म्हणजे आणून देतें ,

मंदा : मला नाहीं माहीत . मग जीव घे माझा ,

सुलभा : तो आहे कुठं तुमच्याजवळ ? तो तर तुम्हीं त्या रमेशला देऊन टाकलांत .

मंदा : कशाला उगीच त्यांचं नांव घेतेस ?

सुलभा : तो आहे कुठं तुमच्याजवळ ? तो तर तुम्हीं त्या रमेशला देऊन टाकलांत .

मंदा : कशाला उगीच त्यांचं नांव घेतेस ?

सुलभा : तुम्हांला उघड घेतां येणार नाहीं म्हणून , दुसर्‍यानं नांव उच्चारलं म्हणजे बरं नाहीं का वाटत माणसाला ?

मंदा : फार काळजी माझ्या बर्‍याचि तुम्हांला !

सुलभा : आहेच .

मंदा : म्हणूनच गळा कापलांत माझा . पत्र अण्णांना दाखवुन !

सुलभा : नाहीं बरं दाखविलं तुमचं पत्र मीं कुणाला . काळजी करूं नका .

मंदा : खरंच ?

सुलभा : इतकासुद्धां विश्वास नाहीं तुमचा आणि म्हणे वहिनी आमची लाडकी आहे . अहो , सहज थट्टा केली . भूक लागली असेल ना ? का झालंय ‌ खाणं त्याच्याबरोबर , हॉटेलांत ?

मंदा : वहिनी , अशी थट्टा ना . य करायची .

सुलभा : बरं राहिलं आडनांव काय त्याचं ? ( असं म्हणत पडदा पुढें ओढून घेते . )

मंदा : भांडारकर .

सुलभा : भांडारकर ? कसा आहे मुलगा ? हं , लाजूं नका . वडील वगैरे आहेत ?

मंदा : हो , एम ‌. ए , आहेत . लेक्चरर आहेत आमच्या कॉलेजवर .

सुलभा : वडील ?

मंदा : अं ऽ हं . ते .

सुलभा : ते का ? अस्सं ! बंर , आणखी कुणी भावंडं ?

मंदा : कुणी नाही . एकटेच हे .

सुलभा : आणि इस्टेट ?

मंदा : स्वतःचीं घरं आहेत दोन , आणि शेतीहि आहे जवळच खेडयांत .

सुलभा : चांगलं आहे कीं स्थळ ! मग विचारूं का मामंजींना ?

मंदा : नको , नको .

सुलभा : कां ? गुपचूप करायचंय ‌ ?

मंदा : आपल्या वडिलांची संमति मिळाल्यावर .-- आजच .

सुलभा : आणि नाहीं मिळाली संमति तर ?

मंदा : ( तिच्या तोंडावर हात ठेवून ) तसं नाहीं होणार .

सुलभा : कां ? वडिलांच्या आज्ञेंत आहेत वाटतं ?

मंदा : हो .

सुलभा : असायलाच पाहिजे , राहतात कुठं ? ( अण्णांच्या खोलींतल्या बाहेरून येण्याच्या दरवाजातून सुरेश पत्त वाचत प्रवेश करतो . )

सुरेश : रुक्मिणी -- सदन , टिळकवाडी , डेक्कन जिमखाना , केअर ऑफ विष्णु वामन भांडारकर .

सुलभा : भाऊजी , कोणाचा हो पत्ता ?

सुरेश : आमच्या कॉलेजांत आलेत लेक्चरर म्हणून , लेकाचे छत्र्याघेत नाहींत विकत . मला विचारलं , मिस्टर सुरेश ! जरा छत्री देतां मीं म्हटलं वार्‍यानं उलटेल . तर म्हणे कोण ? मीं म्हटलं छत्री . तर म्हणे चालेल ; मी नवी देईन आणून , हे देणार नवीन ! मी मनांत म्हणालोंसुद्धां नवी आणून देणार होतांत तर मग आधींच कां नाहीं घेतलीत ? पोरींच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठीं लेलाचे अप ‌-- टु -- डेत कपडे घालून येतात ,

सुलभा : दिलीत कशाला मग छत्री ?

सुरेश : नाहीं म्हणालों असतों , तर काढला अस्तान ‌ कांटा क्लासमध्ये . संस्कृत विषय आहे ना त्यांचा . त्या विषयांत आहे आमची रड . काय बाकी झालों असतों नापास तर सांगायचं ठरवलं होतं म्हणा मी , घरांत --

सुलभा : काय ?

सुरेश : पुढच्या वर्षी क्लास मिळविण्यासाठीं थंदा ड्रॉप घेतला आहे . पण म्हटलं नको , प्रोफेसरशीं संधान बांधून परीक्षा पास होऊं या , काय म्हणा , या लेकाच्यांचे उद्योग त्यांतलेच . भावाशीं संधान बांधून लेकाचे बहिणीशीं लग्न जमवायला बघतात .

मंदा : ( इकडून ) सुरेश .

सुरेश : ओ ऽ हो . आक्काबाई ! तुम्ही आहांतच वाटतं पलीकडं ! सगळं कॉलेज कोकलतंय तुमच्या नांवानं . सगळ्या प्रकारच्या भिंतींवर जाहिरनामे लागलेत तुमच्या स्वयंवराचे .

मंदा : तुझं काय बिघडलं त्यांत ?

सुरेश : आमची पोझिशन डँम झाली .

सुलभा : कां हो भाऊजी ?

सुरेश : कां हो , काय ? त्याला अन ‌ मला समोर बघितलं , कीं पोरं मला म्हणतात , ‘ आहे ब्बुबा !’ जसं कांहीं माझ्याशींच लग्ना होणार आहे त्याचं ,

मंदा : सुर्‍या , मार खाशील हं !

सुरेश : सुर्‍या का ? सुर्‍या का ? चांगलं आईनं सुरेश नांव ठेवलंय ‌. तर म्हणे सुर्‍या , त्या रमेशला म्हणशील का रम्या ?

सुलभा : नवर्‍याला अशी हांक मारतात वाटतं कुठं भाऊजी ? ( वेळेला पलीकडे अण्णा येऊन मंदाचीं पातळें घडया करून ठेवत असते हातांतली पिशवी बाजूला ठेवतात . ) आणि तुम्ही तरी इतके कां भाऊजी , यांचं जर लग्न जमलं परस्पर तर मामंजींचे श्रम का वांचणार वरसंशोधनाचे ?

सुरेश : ह्यांचं संशोधन चाललंय ‌ , पण आमच्या सगळ्या रसायनांची भट्टी उलटलीय ‌.

सुलभा : कसली भट्टी ?

सुरेश : फर्स्ट क्लास करिअरचा मुलगा म्हणून इम्प्रेशन ठेवतोंय ‌ मी कॉलेजांत उभं राहायचं होतं मला गँदरिंगच्या निवडणुकीला सेकेटरी म्हणून , आमचं सगळं धोरणच मुळी बिनसलंय ‌. फियास्को झालाय़् ‌ सगळा !

मंदा : तूं राहा कीं उभा ; तुला कोण नको म्हणतंय ‌ ?

सुरेश : ( तिची नक्कल करीत ) तूं राहा कीं उभा . तुला कोण नको म्हणतंय ‌ ? कोण देणार मतं आम्हांला ?

मंदा : कां ?

सुरेश : तुझा भाऊ म्हणून आतां मुलींची मतं मिळायचीं नाहींत .

सुलभा : का ? यांनीं काय केलंय ‌ त्या मुलींचं ?

सुरेश : त्या सगळ्या जळत असतील ना ? आपला चान्स गेला म्हणून .

सुलभा : कसला ? स्वयंवराचा ?

सुरेश : मला नाहीं माहीत . आणि मुलींची मतं ज्या बाजूला , त्या बाजूला मुलांचीं मतं , त्यांची तोंडं जिकडं फिरतील तिकडं यांचे पाय , बाईलबुद्धे लेकाचे !

सुलभा : तुम्ही का भडकलांत एवढे ?

मंदा : मला विचारा . त्या कुंदानं काढली असेल कांहीं तरी खरड .

सुरेश : गप्प बैस हं अक्का !

सुलभा : सांगा हो तुम्ही , ही कोण कुंदा ?

मंदा : गुप्ते ! ज्यूनियरला आहे यंदा . नटवी मेली !

सुरेश : चांगलं तोंड नाहीं दिलं वाटतं देवानं ? तुम्ही मुली दुसर्‍या मुलींच्याबद्दल कधीं चांगलं तोंड नाहीं दिलं वाटतं देवानं ? तुम्ही मुली दुसर्‍या मुलींच्याबद्दल कधीं चांगलं बोलत नाहीं . अगदींच कांहीं नाहीं वाईट सांपडलं तर निदान तिचं पातळ तरी माझ्यापेक्षा हलकं आहे असं म्हणतांच . सरळ शब्द वापरायला काय होतंय ‌ ?

सुलभा : तुमच्या नाकाला कां एवढया मिरच्या झोंबल्या भाऊजी ? वे . २

मंदा : अग , झोंबणारच , सारखा मेला घिरटया घालत असतो तिच्या घराभोंवतीं , सायकलवरनं .

सुलभा : हाय का हो भाऊजी ?

सुरेश : होय बरं , होय , दादासुद्धां हेंच करत होता , आतां झालाय ‌ मोठा स्टोरी -- रायटर !

सुलभा : तुम्ही राहात होतां वाटतं त्यांच्या पाळतीवर ?

सुरेशा : मग ? आपण मोठेपणीं कसं वागायचं , त्याचे धडे घेत होतों , आणि आम्हीं असं केलं तरी आम्ही पुरुष आहोंत . पण हिचं काय ? अण्णांना जर समजलं ना , -- हिनं लग्न जमवलंय ‌ परस्पर एका प्रोफेसरशीं म्हणून ,-- तर काय होईल आहे का माहीत ?

अण्णा : ( इकडून ) कांहीं होणार नाहीं , सरळ उठेन आणि तिचा हात त्याच्या हातांत देईन ! त्यांच्याबरोबर पळून जाऊन हिनं पुढं आमच्या तोंडाला काळोखी फासण्यापेक्षां आपणच पोरगी पिवळी केलेली काय बाईट ?

सुरेश -- सुलभा -- मंदा : अरे बापरे ! मामंजींनीं ऐकलं वाटतं ?

अण्णा : ऐकायला कशाला हवं ? या , या , इकडं या , [ येतात . ] घरोघरीं हेंच घडतंय ‌ . नांवं आणि चेहरे वेगळे . माणसं तींच . मींच लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या माझ्या नाटकांत पूर्वीच .

मंदा : विभक्तीचा प्रत्यय , हो ना अण्णा ? काय छान नाटक आहे तें

सुरेश : हो , अण्णांना माहीत आहे , तूं सांग आतां , म्हणे काय छान नाटक आहे ! लाडीगोडी लावते . अण्णा । बोलायला नकोत ना ! तुमच्या अपरोक्ष अण्णा , ही नांव ठेवत असते तुमच्या नाटकाला .

अण्णा : अरे , तेंसुद्धां लिहून ठेवलंय ‌ मीं .

मंदा : अशा कवींना द्रष्टा म्हणतात ना हो अण्णा ?

सुरेश : बघा , बघा अण्णा , तुमच्या तोंडावर तुमची निंदा करतेय ‌.

मंदा : निंदा ?

सुरेश : नाहीं तर काय ? द्र्ष्टा -- म्हणजे शिवी आहे नतद्रष्टासारख संस्कृतांत .

अण्णा : संस्कृतांत ? संस्कृतचं ज्ञान अगाध आहे आपलं ! संस्कृतचे कोण प्रोफेसर आहेत आपले ?

सुरेश : भांडारकर , नवीनच आलाय ‌. सॉरी आलेत ! कांहीं येत नाहीं शिकवायला .

मंदा : आपलं असतं का लक्ष क्लासमध्ये ? सांगूं का अण्णांना ?

अण्णा : अग , पण दूं कां इतका कैवार घेतीयस त्याचा ?

सुरेशा : आतां सांगूं का ?

सुलभा : भाऊजी .

अण्णा : जाऊं दे ग ! नवीन काय सांगणार आहे तो ? सगळं कळलंय ‌ मला ! हें , काय म्हणतेस मंदा ? कसा आहे मुलगा ?

सुरेशा : बावळट आहे , प्रोफेसर आहे संस्कृतचा , वाटतो सायन्सचा , बोलतो गणितांत !

अण्णा : गप्प बैस रे ! मूर्खासारखं असं तोंड घालूं नये भलत्या विषयांत . हं , केव्हां येणार आहेत ते मला विचारायला ?

सुलभा : आपल्या वडिलांना विचारून संमति मिळाल्यावर येणार आहेत . यांच्याकडे , आजच !

अण्णा : माधवकडे ? बरोबर आहे . हुंडयाचि जबाबदारी त्याच्यावर आहे ! कर्ता तो आहे ना घरांतला . ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे . मी आनंदानं देईन हं संमति .

सुलभा : मामंजी , इतक्या लवकर तुम्ही ‘ हो ’ म्हणाल असं नव्हतं वाटत वन्संना ,

अण्णा : नाहीं वाटायचं , आम्हां म्हातार्‍यांकडं बघण्याचा तुम्हां तरूण लोकांचा द्दष्टिकोण विचित्र असतो , अडगळीसारखे वाटत असतों आम्ही म्हातारे तुम्हांला . चालत असतांना पाय घसरूं दिला नाहीं म्हणजे झालं . सांगून -- सवरून , विचारून -- पुसून लग्नं केलीं तर नको का म्हणणार आहोंत आम्ही ? आतां एवढी मोठी मुलगी हातावेगळी करतांना मन जरा जड होतं म्हणूअन वास्तपुस्त करावीशी वाटते ; तर तो वाटतो तुम्हां तरुणांना आमचा खाष्टपणा ! आतां वाईंट एवढंच वाटतं , कीं जांवई बघायला , आणि तुला सासरीं पाठवायला तुझी आई असायला हवी होती . कनवटीला सुपारी लावून -- ( आलेला हुंदका दाबून डोळे पुसतात . )

सुलभा : मामंजी .

मंदा : अण्णा .

अण्णा : बसा , बसा ! ( दोघींना दोन बाजूंना घेऊन बसतात . ) या आठवणी बरं सूनबाई ,-- या आठवणी . ही जशी तशीच तूं , मुलगीच माझी , तूं सासरीं आली आहेस . होते का आठवण तुला माहेरची ?

सुलभा : नाहीं मामंजी . तुम्ही असलांत म्हणजे तेच बोलतात माझ्याशीं असं वाटतं मला . माहेर आणि सासर या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात . असं कधींच वाटलं नाहीं मला इथं आल्यापासून .

अण्णा : आणि तुझा नवरा वंगळं व्हायची भाषा बोलतोय ‌. एकत्र कुटुंबाची हीच गोडी आहे पोरींनो . आम्हां म्हातार्‍यांचं दुसरं कांहीं ऐकूं खोटया कल्पनेनं घर विभक्त करूं नका . अरे हो . विसरलोंच मी . सुरेश . सुरी आण बघूं जरा घरातनं !

सुरेश : कुटुंब विभक्त करूं नका म्हणतांय ‌ अन ‌ सुरी आणायला सांगतांय ‌ !

अण्णा : चावटपणा करूं नकोस , सुरी आण ! [ सुरेश जातो . ] ( पिशवींतून काकडया काढतात . )

मंदा : अय्या !. अण्णा , आपल्या घरांतल्या ?

सुरेश : ( प्रवेश करून ) नाहीं ; बागेंतल्या . ( अण्णांना सुरी देतो , अण्णा त्या काकडया कापतात . )

अण्णा : मंदा , घे . ( सुलभाला ) घे ग . हा तुझ्या नवर्‍याचा वांटा ( सुरेशला ) घे रे तुझी , आपल्या हातानां लावलेल्या फळांची गोडी कांही अवीट असते पोरांनो !

सुरेश : अण्णा , पण ही काकडी कडू आहे .

मंदा : खरंच कीं .

माधव : आहे , आहे , खरंच आहे . असायचीच . सगळींच फळं गोड मिळतील असं थोडंच आहे ? एखादं कडूहि असायचंच . ( माधव दरवाजांत उभा राहतो . )

मंदा : दादा आला .

अण्णा : काय झालं तुझ्या स्टोरीचं ? डिस्कशन झालं ?

माधव : ( आपल्या खोलींत जाऊन पडदा ओढून घेतों . सुरेशला तिथून उठवतो . ) हिनं पोंचवलीन ‌ वाटतं बातमी तुमच्यापर्यंत ! तीळ नाही भिजत तोंडांत . थोडंसं तरी खासगी आयुष्य जगायला शिका कीं म्हणावं .

अण्णा : अरे पण , सांगितलंन ‌ तें मलाच सांगितलंन ‌ ना तिनं ? मी बापच आहे तुझा , का वैरी आहे ?

माधव : ज्या त्या बाबतींत तुमचा सल्ला ! ज्या त्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन ! घरांत मिळवून आणतों मी , श्रम करतो मी , धान्य आनायचं मी , चढवायचं चुलीवर मीं ; आणि स्वयंपाक झाल्यावर हिनं विचारायचं तुम्हांला पानं घ्यायचीं का म्हणून . कां ? पण कां ? कशासाठीं ? मला किंमत नाहीं ? माझी किंमतच कुणाला वाटत नाहीं . घरांत ती नाहीं ; बाहेर -- सुद्धां नाहीं , स्वतंत्र अस्तित्वच उरलं नाहीं मला .

अण्णा : पुढचं वाक्य बोलून टाक , वेगळं व्हायचंय मला . बोल , बोल ! म्हणे स्वतंत्र अस्तित्व उरलं नाहीं मला . अरे , तुला टिकवतां येत नाही ते , त्याला मी काय करूं ? जसे तुझे विचार तसे तुझे आचार . जसे तुझे आचार तसं तुझं वाङ्गाय , कसं टिकावं तें ? कसं पटावं तें ? लोकांना खरं हवं असतं .-- जे अनुभवायला मिळतं , भोगावं लागतं , भोगावंसं वाटतं -- असं कांही तरी .

माधव : नाहीं , लोकांना कांहीं नको असतं , आम्हांला कळतं लोकांना काय हवं असतं तें , तुमची पिढी संपलीय ‌ आतां , तरी पण तुम्हांला हवं असतं , आपलं वठलेलं बाङ्गाय टिकवायला . म्हणून घेतां तुम्ही तोंडसुख वाटेल तसं , वाटेल त्याच्यावर , तुम्हीं चंग बांधलाय ‌ ना नवीन वाङ्गायाला सुरुंग लावायचा !

अण्णा : अरे , फुंकर मारली तरी जें उडून जाईल , त्याला सुरूंग रे काय करायचा ?

माधव : हेंच तें . जिथं तिथं गळचेपी ! जिथं तिथं मुस्कटदावी ! नवीन नवीन म्हणून जें जें जन्माला येतं तें तें तेवढं तुमचे शत्रु .

अण्णा : जुन्याच्या पोटीं ते जन्माला येतं एवढं तरी विसरूं नकोस ,

माधव : कांहीं ऐकायचं नाहीं मला . कसला उपदेश नकोय ‌ मला . वीट आलाय ‌ मला या घराचा -- या बंधनांचा !

अण्णा : तो विनायक विघ्ने भेटला होता का काय तुला ? आपल्या पावलावर पावलं टाकायला सांगितली असतील त्यानं .

माधव : हो , तोच मेटला होता . लिखाणांवर खुष आहे ना माझ्या तो ? म्हणून सलतेय् ‌ आमची मैत्रि तुमच्या डोळ्यांत . बघवत नाही < मुलाला मिळत असलेला नावलौकिक !

अण्णा : खुळा आहेस तूं ! मोहोर कितीहि जास्त झाला तरी आम्र -- वृक्षाला भार नाही होत त्याचा ! अजून बाप झाला नाहींस , म्हणून बोलतो आहेस हें !

माधव : त्याला कांही अक्कल लागत नाहीं !

अण्णा : लागते . ती असती तर तुला बापाशी काय बोलावं आणि काय बोलूं नये ते कळलं असतं . सूनबाई , जा बाई . त्याला शांत कर , बाहेरचा उकाडा घेऊन घरांत आलाय् ‌ तो . का रे पोरांनो , तुम्ही का असे गोंधळल्यासारखे उभे राहिलांत ? ( सगळे वातावरणा सुन्न झालेले ! कपडे चढवतांना अण्णा आपल्याशींच म्हणतात . )

मना त्वांचि रे पूर्व संचीत केलें । तयासारखें भोगणें प्राप्त आलें ।

असे हो जया अंतरीं भाव जैसा । वसे हो तया अंतरीं देव तैसा ।

अनन्यासि रक्षीतसे चापणाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।

हे बघ मंदा , जरा बाहरे जाऊन येतो मी .

सुरेश : पण अण्णा ; रात्रीं आपल्याला नाटकाला जायचं ना ? अध्यक्ष आहांतना तुम्ही ? आम्हीहि येणार आहोंत .

मंदा : छत्री घेऊन जा ना अण्णा , पावसाचा रंग आहे .

अण्णा : ( पडद्याकडे बघत बघत आणि म्हणत बाहेर जात -- )

मना सर्वथा सत्य सोडूं नको हो । मना अंतरी सारवीचार राहो ।

( ते गेल्यानंतर सुरेश तिथेंच खुर्चीवर बसतो . मंदा घरांत जाते . पडद्याच्या पलीकडे माधव आपल्या खुर्चीवर आहे आणि सुलभा खिडकींतुन बाहेर बघत स्वस्थ आहे . सुरेश कांहीं वेळानें म्हणतो -- )

सुरेश : वैनी , मल भूक लागलीय ‌. ( वैनी इकडे यायला निघते , माधव तिला आडवतो . )

सुरेश : ए वैनी ! ( आंतून मंदा प्रवेश करते . )

मंदा : नका हो येऊं तुम्ही ; मी देतें याला खायला . चलरे घरांत , इथं काय करतोयस ? [ दोघे जातात . ]

माधव : का ग सुल ‌. बोलत नाहींस , रागावलीस ?

सुलभा : हो !

माधव : कां ? उशिरां आलों म्हणून ?

सुलभा : नाहीं , आणखी थोडे उशिरां आलां नाहींत म्हणून : जरा थंड होऊन आलां असतांत बाहेरून , किती चिडलांत मामंजींवर !

माधव : त्यांच्यावर नाहीं ग . आमच्या या धंदेवाल्यांवर चिडलोंय ‍ मी . कांहीं तरी निमित्त काढून पैसे द्यायच्या तारका पुढें ढकलतात . आज निघाला होता विभक्त कुटुंबं असावींत कीं नसावींत हा वाद . मी म्हणत होतों . असावींत , विभक्ते कुटुंबाचं सुख केव्हांहि मोठं आहे . कुणीच पटवून घेईना ,

सुलभा : कसं पटेल कुणाला ? तुम्हांला एक तसं वाटतं , म्हणून लोकांनाहि तें पटावं होय ? कांहीं झालं तरी वडीलधारी माणसं ! काय वाटलं असेल मामंजींना ?

माधव : त्यांना कांहीं वाटत नाहीं , वय झालं म्हणजे चळ लागतो माणसाला . तशी झालीय ‌ त्यांची स्थिति .

सुलभा : मुळींच नाहीं , त्यांच्याइतके समतोल विचार तरुणांतहि नाहीं सापडायचे .

माधव : कां ग ? सासर्‍याची आज एवढी तरफदारी !

सुलभा : वडिलांची किंमत ते जवळ असले म्हणजे नाहीं कळत . यासाठीं माझ्यासारखं लांब येऊन राहावं लागतं .

माधव : बघणार्‍याच्या द्दष्टिकोणावर आहे . ( याच वेळीं सुरेश आंतून बाहेर येतो आणि बाहेर जाण्याची सर्व तयारी करून दरवाजांतून जातां जातां पार्टिशनच्या आडून ऐकतो . ) चंद्रावर जमलेल्या ढगांसारखी असते ही म्हतार्‍या माणसांची आपुलकी , ढगांच्या द्दष्टीनं तो असतो आपलेपणा , पण विचार्‍या चंद्राला वाटत असतं संकट .

सुलभा : कल्पना करतां येतात म्हणून तुम्ही लेखक झालांत . पण विचार्‍या चंद्राला वाटत असतं संकट .

सुलभा : कल्पना करतां येतात म्हणून तुम्ही लेखक झालांत . अण मामंजींच्या अनुभवाचा कस नाहीं त्यांत .

माधव : सगळी तरूण पिढी लेखक म्हणून मला डोक्यावर घेऊन नाचतेय ‌.

सुलभा : चकाकणारी प्रत्येक वस्तु सोन्याच्या मोलाची असती तर पितळेची भांडीं सोनाराच्याच दुकानांतून विकत घ्यावी लागलीं असतीं .

माधव : जाऊं दे ना ! तुजं माझं नातं कांहीं लेखल -- टीकाकाराचं नाहीं , या साहित्यांतल्या कटकती संसारांत हव्यात कशाला ? इतका वेळ तिकडं तेंच चाललं होतं . जरा वेळानं आणखी एक विद्वान येणारच आहेत . त्यांना जर गोष्ट पसंत पडली , तर पिक्चर घेणाअर आहेत म्हणे . वडील श्रीमत आहेत . मुलगा आहे एकुलता एक , हं ! सगळयांच्याच नशिबी कांहीं आमच्या वडिलांचं भाग्य नाहीं , इथं पैसा पैसा आम्हांला मोजावा लागतोय ‌. अन ‌ तिथं कवडी कवडी बाप मुलासाठी जोडतोए .

सुलभा : पटत असेल त्यांचं आपल्या वडिलांशीं .

माधव : मूर्खपणा आहे झालं . पुन्हां त्याच्याशीं हीच चर्चा करायचि . नाहीं कबूक झाला . तर मीच काढणार आहें बोलपट .

सुलभा : तुम्ही ?

माधव : मी म्हणजे -- आहे एक दोस्त माझा -- विनायक विघ्ने ! तो देणार आहे मला पैसे कर्जाऊ .

सुलभा : कर्जाऊ ? कशाला तसल्या माणसाच्या भानगडीत पडतां ?

माधव : दाखवतोंना एकदां अण्णांना ; माझ्याजवळहि जिद्द आहे पाह्यलंस , पुन्हां आलों नको त्या विषयावर , [ मंदा प्रवेश करते . ]

मंदा : मेल्या चोरून काय ऐकतोयस ! दादा , बघ रे हा सुरेश आडून ऐकत होता तुमचं बोलणं . डोकावून बघत होता तुमच्या खोलींत .

( तीं दोघें बाजूला होतात , अन ‌ मंदा सुरेशचा कान धरून त्याला पलीकडच्या खोलींत घेऊन जाते . )

माधव : का रे सुरेश ? काय म्हणते मंदा ?

सुरेश : काय वाटेल तें सांगते . म्हणजे आम्हांला काया नवरा -- बायको खोलींत असतांना चोरून ऐकूं नये इतकंसुद्धां समजत ‍ नाहीं वाटतं ? केवढयानं लागलं बघ पाठीवर !

माधव : पुरे ! हें बघ मंदा , एक गृहस्थ यायचेत् ‌ माझ्याकडं . कामाला बसणार आहोंत आम्हीं , चहाची तयारी करून ठेव .

सुलभा : मी करतें कीं .

माधव : नको . तूं चल जरा बाहेर , काम आहे तुझंच . परचां बघून ठेवलेलं पातळ आणायचं आहे ना ? दुकान बंद होईल . मग बसशील ओरडत , घरांत नेसायला कांहींच नाहीं म्हणून . तुम्हां बायकांना कितीहि पातळं आणा , रोजच्याला नेसायला कांहींच नाहीं म्हणून , तुम्हां बायकांना कितीहि पातळं आणा , रोजच्याला नेसायला नाहीं ही रड कांहीं संपायची नाहीं , चल , चल . येतों रे आम्ही परत .

मंदा : दादा , थोडे पैसे लागतील .

माधव : कशाला ग ?

मंदा : साखर संपलीय ‌ .

माधव : मग अण्णांच्याकडून घे ना पैसे .

मंदा : ते नाहींत घरांत .

माधव : ( खिशांत हात घालून नाइलाजानें पैसे काढतो आणि तिला देतांना -- ) घ्या . सगळ्या बाबतींत आमच्यावरच अवलंबून तुम्ही ! तरी आम्हांला किंमत नाहींच . [ जातात . ]

मंदा : सुरेश , जा रे साखर घेऊन ये एक शेरभर .

सुरेश : आपण नाहीं जाणार . आमच्याकडे एक गृहस्थ यायचेत .

मंदा : असा किती वेळ लागणार आहे ? आत्तां परत येशील .

सुरेश : पण मी इथं नसतांना ते आले म्हणजे मग ? तुला भेटतील ना .

मंदा : मग काय बिघडलं ?

सुरेश : सगळंच बिघडलं . तुलाच भेटायला येणार आहेत . उगीच मंच आपलं निमित्त आहे . आम्ही ओळखलीय ‌ त्यांची ट्रिक , छत्री घेऊन गेलेत आमची , पावसाकरतां छत्री घेतली अन ‌ छत्रीकरतां पत्ता घेतला .

मंदा : म्हणजे सर येणार आहेर ?

सुरेश : येस ‌. !

मंदा : ए सुरेश , सुरेश !

सुरेश : काय आहे ?

मंदा : जा जा : साखर घेऊन ये ना ! एवढं मोठया बहिणीचं ऐकायचं नाहीं ? शाहणा ना तूं ?

सुरेश : आतां लाव लाडीगोडी . म्हणे शाहणा ना तूं , मी काय शाळकरी पोरगा आहें होय माझी समजूत घालायला ?

मंदा : मी नाहीं वाबा , ती कुंदाच परचां म्हणत होती .

सुरेश : काय ?

मंदा : खूप हुशार आहे म्हणत होती तुझा भाऊ .

सुरेश : माझ्याबद्दल बोलत होती ?

मंदा : हो . आनखीन ‍ म्हणत होती , म्हणत होती तुझी कविता . फार आवडली तिला .

निळे निळे केस तुझे .

दांत गुलाबी गहिरे .

नेत्र तुझे शुभ्र वर्भ .

कुरळ नासिका बरें .

सुरेश : अग तसं नाहींय ‌.

निळे निळे नयन तुझे .

गाल गुलाबी गहिरे .

दांत तुझे शुभ्र वर्ण .

नेत्र तुझे शुभ्र वर्ण काय ? डोळे कुठें पांढरे असतात वाटतं ! सरळ नासिका बरें , कुरळ नाहीं .

मंदा : तेंच तेंच . आणखी म्हणत होती की तुला भेटणार आहे .

सुरेश : केव्हां ?

मंदा : आपण नाहीं बुवा सांगत .

सुरेश : असं काय गं ?

मंदा : मग सांगेन ; मला चहा करूं दे अगोदर . दादा आला आणि उशीर झाला म्हणजे उगीच रागावेल ?

सुरेश : तो रागावेल का रमेश रागावेल ?

मंदा : चावटपणा करूं नकोस . हे घे पैसें .

सुरेश : चालत नाहीं हं जाणार इतक्या लांब . दोन आणे सायकलचे , दोन आणे कमिशनचे .

मंदा : घे त्यांतनंच . ( तो -- आतुरता मनिची उसासे , क्षण युगसम भासे नको नको त्या येत कल्पना चैन पडेना . असें म्हणत बाहेर जातो . मंदा माधवच्या खोलींत जाते . घडयाळ बघून खिडकींतून वांकून बघते . पुन्हां घडयाळाकडे येते . शेवटीं कंटाळून भिंतीकडे तोंड करून घडयाळ ठेवते . इतक्यांत बूट बाजतात , म्हणून दरबाजाशी जाते . दरवाजांत उभा आहे -- ) तूं आहेस होय ?

सुरेश : मी आहेंच , पण तेहि . आलेत .

मंदा : पण तूं जातोयस ना ?

सुरेश : कटवूं नकोस . पिशवी घेऊन जातों . ते आलेत म्हणून सांगायला आलों होतों . आमची आपली ज्याला अडचण .

[ तो जातो व रमेश आंत येतो . ]

मंदा : काय झालं ? वडिलांना विचारलंत ? काय म्हणाले ते ? संमति दिली का ? नाहीं म्हणाले ? बोलत कां नाहीं तुम्ही ?

रमेश : दोन हजार रुपये हुंडा मागितलाय ‌ माझ्या वडिलांनीं . देतील तुझे वडील ?

मंदा : हें काय बोलताहांत तुम्ही ? दोन हजार रुपये हुंडा ? आणि मग लग्न ? असा एखादा हिशेव घातल्यासारखा विचार करतां तुम्हीं आपल्या आयुष्याचा ?

रमेश : माझे वडील करतात . ते म्हणतात आयुष्य हें एक गणितच आहे . मंदा ! बेरीज -- वजाबाकी , गुणाकार -- भागाकार , सगळे जमले बरोबर , तर आयुष्याच्या शेवटीं यशस्वी पूर्णांकांत उत्तर मिळतं . व्यवहारी अपूर्णांकांना किंमत नाहीं . हुंडयाच्या बाबतींत नाहीं जमलं , हुंडयापेक्षां विचारांच्या बाबतींत नाहीं जमलं , संस्कारांच्या बाबतींत नाहीं जमलं , तर समजायचं या लग्नाच्या बाबतींतसुद्धां नाहीच जमलं .

मंदा : रमेश !

रमेश : ( आपल्याशींच हंसत ) धीर सोडूं नकोस आणि अधीरहि होऊं नकोस , लग्नबंधन हें गुंतवळासारखं कसं तरी गुंडाळून भागत नाहीं . पद्धतशीर रीतीनं बांधावं लागतं .

सुरेश : ( प्रवेश करून ) साखर आणलीय ‌,

रमेश : छत्री आणलीय ‌.

सुरेश : ओ ! डझन्ट मँटर ! इतकी कांहीं घाई नव्हती , सर , तुमच्या , कडून केव्हांहि मिळाली असती . हो का नाहीं अक्का ? ( भरलेले डोळे पुसून पिशवी घेऊन जाते . छत्री हातांत घेऊन सुरेश विचारतो -- ) काय झालं हो हिला ?

रमेश : ( ती गेली त्या दिशेकडे बघत ) उलटली .

सुरेश : कोण ?

रमेश : ( वळून ) छत्री . वादळ झालं छोटंसं आणि उलटली ,

सुरेश : नवीन नाहीं ना आणलीत ?

रमेश : नाहीं .

सुरेश : तेंच म्हटलं मीं , तुम्ही काय आणतां नवीन !

रमेश : काय ?

सुरेश : मीं घेतलीच नसती , तुम्ही काय आणतां !

रमेश : हां . मी बसूं ना ?

सुरेश : तुम्ही थांबणार आहांत ?

रमेश : हो , का जाऊं ?

सुरेश : तसं नाहीं ; बसा ना .

रमेश : तेंच . पण कुठं ?

सुरेश : आमच्या दादाची खोली आहे ना . या दाखवितों . ( त्याला पलीकडच्या भागांत घेऊन जातो . )

सुरेश : कुठंयू खोली ?

सुरेश : तुम्ही उभे आहांत हीच . आमच्या दादाची फँमिली रूम आहे ही . आमचं घर लहान आहे . गैरसोयीचं आहे . गैर सगळं पलीकडचं , सोय इथं आहे बसण्याची . बसा ना , बसा .

रमेश : हं , बसा ना तुम्ही .

सुरेश : आलोंच मी . चहा घेऊन येतों .

रमेश : मलाहि आणा .

सुरेश : नाही , तुम्ही घेऊन येतों म्हणालांत .

सुरेश : हां , म्हणजे तुम्ही जोक केलांत . घेऊन म्हणजे पिऊन नाहीं . हातांत घेऊन येतों . ( पडद्याजवळ जाऊन पुन्हा परत येऊन ) हातांत म्हणजे कपांत .

रमेश : या , या ! ( सुरेश दरबाजापर्यंत जाऊन पोंचतो न पोंचतो तोच माधव प्रवेश करतो . बरोबर सुलभाहि आहे . ती पातळं घेऊन परत जाते . )

माधव : काय रे , कुणी आलं आहे का ?

रमेश : ( पलीकडून ) मी आलोंय ‌ हो ! भांडारकर ,

माधव : अरे वा , तुम्ही आलांत वाटतं ? आलों हं ; जरा उशीर झाला . जा रे . चहा ठेवायला सांग , ( सुरेश घरांत न जातां बाहेर पळतो . )

माधव : ( खोलींत येऊन ) आपला फार वेळ नाही ना गेला ?

रमेश : गेला -- पण मजेत गेला . आपले धाकटे बंधु होते आमची करमणूक करायला .

रमेश : बरं तर , आपण मूळ विषयाला हात घालूं या , गोष्त वाचलीय ‌ मीं तुमचीम , खरं सांगूं का ? मला नाही वाटत तुमची गोष्ट मला स्वीकारता येईल असं .

माधव : कां ?

रमेश : मला दोन मुद्दे जरा खटकतात .

माधव : कोणते ?

रमेश : तुमच्या गोष्टींत बहिणीच्या लग्नासाठी हुंडा द्यायला नको म्हणून मुलगा बापापासून वेगळा होतो !-- होऊं शकतो ?

माधव : केव्हांहि होईल .

रमेश : बंर , त्या स्वातंत्र्यानं त्याला सुख मिळेल ?

माधव : त्याला जें हवं तें सुख नक्की मिळेल .

रमेश : पण , मुलगा वेगळा झाल्यामुळं वडिलांचे जे हाल होतात , त्याला जबाबदार ?

माधव : वडील !

रमेश : कां हो ? इतके दिवस त्या वडिलांनी मुलाला सांभाळलं , त्याचं शिक्षण पुरं केलं , हाल करून घेऊन स्वतःचे आणि आतां तो मोठा झाल्यावर या किरकोळ कारणासाठीं वडिलांना सोडून जातो . शहाणपणाला धरून आहे .

माधव : माझ्या कथानकाला धरून आहे . माझं कथानकच विमत्त कुटुंबाबर आहे .

रमेश : पण कथानक लोकरूढीला धरून असायला नको का ?

माधव : लोकांना नाही लागत त्यांतलं कांहीं . लोकांना दोन -- तीन नाच दोन -- एवढा असला म्हणजे पुरतो , तुम्ही म्हणतां ते कथानकविथानक हल्लीं नाहीं लागत सिनेमात .

रमेश : पण माझ्यासारखे कांही प्रेक्षक येतात ना , त्यांना जर हा एक आदर्श बोलपट म्हणून पाहिल ,-- तुमच्या वडिलांच्या नांबाकडं पाहून ,-- तर लोक त्यांची किंमत कमी करतील .

माधव : मला त्याच्याशी तुम्ही केलेली माझी तुलना नको आहे . कथानकाचं काय ते बोला .

रमेश : रागावूं नका बुवा , बी ए स्पोर्ट . आतां तुमच्याच गोष्टींतलं उदाहरण . मी तुम्हांला डायरेक्टच पटवून देतों ना , माझं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे ; आणि मी तुमच्या बहिणीशीं लग्न करायचं ठरवलंय . [ पलीकडच्या बाजूने अण्णा येतात . ]

माधव : तुम्हीं ?

रमेश : हो , मी . कां ? कांहीं हरकत आहे ?

माधव : नाहीं , हरकतीचा मुद्द नाहीं ,

रमेश : तुमच्या नाहीं , तुमच्या बहिणीच्या द्दष्टीनं विचार करा ! मी घरंदाज आहें . मुशिक्षित आहें , घरीं पैसा भरपूर आहे , एकून काय , तुमची बहीण सुस्थळीं पडणार आहे . तुम्ही नकार द्याल ?

माधव : काहींच कारण नाहीं ,

रमेश : नाहीं ना ? पण माझ्या वडिलांनीं हुंडा मागितलाय ‌ दोन हजार रुपये , तुम्ही देणार कीं नाहीं ? अशा वेळीं तुम्ही काय कराल ?

माधव : मी तुम्हांला आपल्या वडिलांच्यापासून वेगळं व्हायला सांगेन !

रेमश : आणि त्यांना दुखवण्याची माझी तयारी नसेल तर ?

माधव : असली पाहिजे !

रमेश : कां पण ?

माधव : तिच्यावरचं प्रेम जर खरं असेल तुमचं , तर वडिलांना दूकवण्यांत कांहींच अडचण असायला नको , तिच्यासाठी हवा तो त्याग करायला ततार झालंच पाहिजे तुम्हीं !

रमेश : मी काय करायचं हा प्रश्न नाही , तुम्ही हुंडा द्याल की नाही तें मला सांगा !

माधव : भी ? ( विचार करतो . )

रमेश : कां हो विचारांत पडलांत ? तुमचं आपल्या बहिणीवर प्रेम तर आहे . ( अण्णा बाहेरून येतात . घरांत जाताना रमेशचे वाक्य ऐकून परत येतात . माधवच्या खोलीत येऊन -- )

अण्ण : अगदीं जिवापलीकडे .

रमेश : आपण ? आपण इथंच होतात ?

अण्णा : हो ! आपण मला ओळखतां ?

रमेश : वा ! अण्णासाहेब आगरकरांना कोण ओळखत नाही ? ( नमस्कार करतो ) बसा ना आपण .

अण्णा : नाही , चालू द्या तुमचं .

माधव : कशाला इथं आलांत अण्णा , तुम्ही ?

अण्णा : माझ्याच मुलीच्या लग्नाचा विषय चालला आहे . बसा ना . अरे , तुझी बहीण असली तरी माझीहि मुलगी आहेच ती .

माधव : त्यांच्याकडे लक्ष देऊं नका . त्यांचं आतां वय झालय ‌,

रमेश : म्हणजे वडील ना तुमचे ?

अण्णा : अहो , रागानं नाहीं कांहीं बोलला तो . शब्द वाईट वाटण्यासारखे असले तरी मनाचा चांगला आहे तो .

रमेश : म्हणूनच विचारलं मी त्यांना , तुम्ही हुंडा द्यायला तयार व्हाल कीं नाही ?

माधव : कधींच नाहीं ! हुंडा घेण्याची पद्धत अमानुष आहे !

रमेश : पण तुम्ही हुंडा देणार नसलांत तर तिचं लग्न मोडणार आहे . आतां तुमच्या बहिणीच्या आयुष्याचा विचार --, तो कुणीं करायचा ?

माधव : वडिलांनीं .

रमेश : मुलानं नाहीं ?

माधव : काय संबंध ?

अण्णा : काय बोलतोस काय माधव तूं ?

माधव : तुम्ही कशाला मधें बोलताहांत ?

अण्णा : तूं जर ही जबाबदारी स्वीकारली नाहीस तर स्वीकारायची कु्णीं ?

माधव : तुमची तुम्ही , मला माझा संसार आहे ; माझं हिताहित मला पाह्यलं पाहिजे !

रमेश : आणि घराचं ?

माधव : ज्याच्या घराचं त्यानं पाहावं ! इतरांच्या संसाराचा विचार करीत बसलों तर माझ्या संसाराचा आयुष्यभर विचार करायला मिळायचा नाहीं मला .

रमेश : आणि वडिलांनीं आजपर्यंत तुमच्या आयुष्याचा विचार केला तो ?

माधव : कुणीं कांहीं केलेलं नाहीं माझ्याकरितां .

अण्णा : माधव !

माधव : केलाय ‌ तो जन्मभर विरोध !

रमेश : कुणालाच न पटणारे विचार आहेत तुमचे . म्हणून तुमचं कथानक स्वीकारतां येत नाहीं मला .

माधव : आतां ऐका , चित्रपट काढण्यासाठीं तर तुमची गरज मला नाहींच , पण बहिणीच्य़ा लग्नासाठीं तर त्याहूनहि नाहीं , जो या कथानकासाठीं पैसे घालणार आहे तोच माझ्या बहिणीशीं लग्नहि करणार आहे .

अण्णा : कोण ? ( पडद्यापलीकडच्या दारांत उभा असलेला विनायक विघ्ने तिथूनच म्हणतो -- )

विनायक : मी आहें विनायक विघ्ने !

माधव : या विनायकराव , तुमच्याबद्दलच बोलणार होतों मी आतां . ( पलीकडच्या बाजूला मंदा चहाचे कप घेऊन उभी आहे -- नवें पातळ नेसून . )

विनायक : ( कप उचलून ) वा -- मंदा ! नव्या पातळांत छान दिसतेस तूं !

( अण्णा संतापानं उठून पलीकडे जातात . )

अण्णा : ( मंदाला ) काय आहे काम तुझं इथं ? नसल्या माणसांच्या समोर कशाला उभी राहिलीस तूं ?

विनायक : नसल्या म्हणजे मी वाटतं ? ती उभी असतांना मी आलों .

अण्णा : कां आलास तूं या घरांत ?

विनायक : तुमचा मुलगा सांगेल तें कारण ,

माधव : मीं बोलावलं होतं त्याला . काय म्हणणं आहे तुमचं ?

अण्णा : माझ्या घरांत हा माणूस पुन्हां आलेला मला चालणार नाहीं ,

माधव : हा या घरांत येणार ?

अण्णा : माधव !

माधव : तुमची इच्छा नसली तरी . ( विनायकला ओढून नेतो . )

( रमेश उठतो , आणि बाहेर येतो . )

रमेश : मंदा , तुमच्या घरांतलीं खाजगी भांडणं माझ्यासारख्या तिर्‍हाइतानं न ऐकलेलीं बरीं , हे प्रकार मला नवीन आहेत .

सुलभा : वन्सं !

मंदा : वहिनी !

रमेश : लाईट वाटून घेऊं नकोस नंदा , गणितं अर्धवट सोडायची संवय नाहीं मला . उत्तर सांपडलं नाहीं मला . उत्तर सांपडलं नाहीं तर ताळा करून पाहण्याची जुनी पद्धत माझ्या परिचयाची आहे .

विनायक : पसंत आहे मला .

अण्णा : इथं कां उभ्या राहिलांत पोरींनो ?

विनायक : तुझ्या गोष्टीची कल्पना --

अण्णा : चालत्या व्हा घरांत ! ( मंदा स्वैपाकधरांत जाते . तिच्याकडे बघत विनायक माधवला म्हणतो -- )

विनायक : तयार आहें मी तुला कर्जाऊ पैसे द्यायला .

अण्णा : माझ्या घरांत हे व्यवहार नकोत , बापापासून वेगळं होऊन त्याचीच इस्टेट उधळायची एवढाच धंदा आहे तुमच्यापुढं , माझ्या घरांत हे पाठ एकाला मिळालेत तेवढे पुरे . दुसर्‍याला मिळायला नकोत . जा तूं इथून .

माधव : थांब विनायक .

विनायक : आतां जातों -- तूंच ये घरीं , व्यवहार तिथं करूं , या घरांत नको . कारण हें घर तुझं नव्हे , वाट पहातों तुझी . [ जातो ]

( बाहेरून सुरेश बँग व होल्डॉल घेऊन येतो . )

अण्णा : कुणाचं रे समान हें ?

सुरेश : कुणी तरी मिलिटरीवाला आहे ! सामान न्यायला मी का हमाल आहें का असं विचारलं तर माझ्या थोबाडींतच मारलीन ‌ ! ( सामान आपतो . )

सुरेश : पाऊस पडतोय ‌. बाहेर टांगे आलेत . हेडमास्तर उभे आहेत . तुमचं नाटक आहे ना शाळेंत , ‘ विभक्तीचा प्रत्यय ’ ? मी येणार . आक्का , अहो वहिनी ! ह्या बायकांना कपडे बदलायला फार वेळ लागतो बुवा ! चला की लवकर . तुमच्याकरितां टांगे थांबलेत . ( सुलभा व मंदा बाहेर येतात . )

माधव : खबरदार सुलभा , तूं यांच्याबरोबर गेलीस तर !

सुलभा : मामंजी !

मंदा : वहिनी !

माधव : चल हो पलीकडं ! ( तिला आपल्या खोलींत ढकलतो . )

अण्णा : काय चालवलं काय आहेस माधव तूं ?

माधव : वीट , वीट आलाय ‌ मला या घराचा ! या बंधनांचा ! कशासाठीं असं वागलांत त्या विनायकशीं ? कां हांकललंत त्याला या घरांतून ? जिथं तिथं गळचेपी ! जियं तिथं मुस्कटदाबी ! तुम्ही सांगाल तसं मीं वागलं पाहिजे होय ! तुम्ही म्हणाल ते मी करायला हवं होय ? नाहीं व्हायचं यापुढं ! नाहीं राह्यचं मला यापुढं या घरांत -- तुमच्या बंधनांत ! वेगळं व्हायचंत ‌ मला !

काका : ( बाहेरून प्रवेश करतात . वाटतोय कर्नल , उग्र वाटणार्‍या मिश्या , मिस्किलपणों बघण्याची पद्धत , रुबाबदार प्रकृति ) माधव , मीद्दि तुला तेंच सांगायला आलों आहें , वेगळं व्हायचंय ‌ ना तुला ? मग तुझा हा कर्नक काका तुला सांगायला आला आहे -- खुशाल वेगळा हो तूं .

अण्णा : रघुनाथ !

काका : बोलूं नकोस , ! पोरांची मनं सांभाळतां येत नाहींत , बाप कशाला झालास ? आजपासून तुझा आणि तुझ्या मुलांचा संबंध तुटला ! उद्यांपासून या घरांत चुली दोन ! येण्याजाण्याचे दरवाजे दोन ! उद्यांपासून सीमारेषेप्रमाणें इथें मध्यें एक पडदा घातला जाईल आणि मग उद्यांपासून तें घर वेगळं आणि हें घर वेगळं ! ( असें म्हणून काका अण्णांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करतात ! नंतर सुरेशकडे पाहतात . सुरेश गाल चोळतो आणि पडदा पडतो . )

( अंक पहिला समाप्त )

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP