अध्याय २ रा - श्लोक ३१ ते ४०

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .


स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥

करोनि विचार । अजूनी हि पाहें । काय चिंतिसी हें । मनामाजीं ॥२९१॥

स्व -धर्माचा कैसा । पडला विसर । तरावें साचार । जेणें योगें ॥२९२॥

आतां कौरवांचें । वाटेल तें होवो । प्रसंग वा येवो । तुजवरी ॥२९३॥

काय सांगूं फार । रणांगणीं येथ । जरी का युगान्त । ओढवला ॥२९४॥

तरी पार्था पाहें । स्वधर्म जो आहे । तो गा त्याज्य नोहे । सर्वथैव ॥२९५॥

जरी हृदयासी । फुटला पाझर । नाहीं तारणार । दयावृत्ति ॥२९६॥

म्हणोनि हें जाण । तुज अनुचित । सर्वथैव येथ । रणांगणीं ॥२९७॥

पाहें पार्था जरी । जाहलें गोक्षीर । नाहीं पथ्यकर । नवज्वरीं ॥२९८॥

ऐसें असोनी हि । ज्वरार्त रोग्यासी । दिलें तरी त्यासी । मारक तें ॥२९९॥

म्हणोनि स्व -धर्म । सांडोनि वागतां । लागेल स्व -हिता । मुकावें गा ॥३००॥

तरी कशासाठीं । वायां व्याकुळता । पार्था , होई आतां । सावधान ॥३०१॥

सेवितां कदापि । न घडे पतन । तो तूं ध्यानीं आण । निजधर्म ॥३०२॥

पाहें पडु -सुता । मार्गे चि चालतां । अपाय सर्वथा । नोहे जैसा ॥३०३॥

किंवा प्रदीपाचा । आधार घेवोनि । चालूं जातां कोणी । ठेंचाळे ना ॥३०४॥

तैसें जरी घडे । स्वधर्माचरण । सहजें संपूर्ण । सर्व काम ॥३०५॥

म्हणोनि संग्रामा -। वांचोनि आणिक । योग्य नहीं देख । क्षत्रियांसी ॥३०६॥

परस्परांवरी । करावे प्रहार । समोरासमोर । राहोनियां ॥३०७॥

रणांगणीं ऐसें । लढावे सावेश । परी मनीं द्वेष । ठेवूं नये ॥३०८॥

असो पार्था , तुज । प्रत्यक्ष हें ठावें । काय तें बोलावें । फार आतां ॥३०९॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमावृतम् ‍ ।

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ‍ ॥३२॥

युद्धाचा हा नोहे । प्रसंग सामान्य । वाटे पूर्वपुण्य । फळा आलें ॥३१०॥

किंवा हें निधान । सर्व हि धर्माचें । प्रकटलें साचें । तुम्हांपुढें ॥३११॥

नव्हे हा संग्राम । स्वर्ग मूर्तिमंत । अवतरे येथ । युद्धरुपें ॥३१२॥

किंवा मज वाटे । नव्हे हा संग्राम । तुझा पराक्रम । उगवला ॥३१३॥

किंवा गुण -लुब्ध । कीर्ति आली आज । वरावया तुज । उत्कंठेनें ॥३१४॥

पार्था , थोर पुण्य । क्षत्रियें करावें । तरी च पावावें । ऐसें युद्ध ॥३१५॥

जेविं मार्गे जातां । पाय आदळावा । तों तेथें मिळावा । चिंतामणि ॥३१६॥

येवोनि जांभई । तोंड उघडावें । अमृत पडावें । तों चि त्यांत ॥३१७॥

तेविं अनायासें । जोडलें हें झुंज । धनंजया आज । तुजलागीं ॥३१८॥

अथ चेत्त्वामिमं धर्म्य संग्रामं न करिष्यसि ।

ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापमवाप्य्स्यसि ॥३३॥

अव्हेरोनि ह्यातें । लटक्याचा शोक । करितां निःशंक । हानि होय ॥३१९॥

नको नको हानि । करुं तुझी तूं च । जोडिलें जें साच । पूर्वजांनीं ॥३२०॥

नको धनंजया । घालवूं तें वायां । शस्त्र सांडोनियां । आज येथें ॥३२१॥

जोडल्या कीर्तीसी । येणें मुकशील । निंद्य तूं होशील । जगामाजीं ॥३२२॥

आणि महा -दोष । अर्जुना समस्त । येतील शोधीत । तुजलागीं ॥३२३॥

पार्था , पदोपदीं । पावे अपमान । नारी पतिहीन । जैशा परी ॥३२४॥

तैसी दशा जाण । स्वधर्मावांचोन । जीवितालागोन । प्राप्त होय ॥३२५॥

रणांगणीं प्रेत । पडे जें उघडें । फाडिती गिधाडें । चौ बाजूंनीं ॥३२६॥

तैसे महा -दोष । स्वधर्महीमास । घेरिती निःशेष । पंडु -सुता ॥३२७॥

अकीर्ति चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ‍ ।

संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥३४॥

सोडोनि स्वधर्म । जरी वागशील । धनी तूं होशील । पातकाचा ॥३२८॥

आणि दुष्कीर्तीचा । लागेल जो डाग । फिटेल ना मग । कल्पान्तींहि ॥३२९॥

शिवे ना दुष्कीर्ति । तोंवरी च पार्था । जगावें सर्वथा । जाणत्यानें ॥३३०॥

तरी सांगें आतां । युद्ध हें टाळून । रणांगणांतून । निघावें का ? ॥३३१॥

धरोनि करुणा । सांडोनि मत्सर । घेसील माघार । येथोनियां ॥३३२॥

तरी तें सर्वासी । मानेल का सांगें । ते तुज निजांगें । वेढितील ॥३३३॥

चार हि बाजूंनीं । मग होतां मारा । कैसा धनुर्धरा । सुटशील ॥३३४॥

प्राणावरी ऐसें । येतां चि संकट । दावील का वाट । दया -वृत्ति ॥३३५॥

प्रसंगें त्यांतून । वांचलासी नीट । तरी तें वाईट । मृत्युहून ॥३३६॥

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ‍ ॥३५॥

आणिक हि पाहें । येथें झुंजायास । धरोनि आवेश । आलासी तूं ॥३३७॥

आणि जरी आतां । निघशील मागें । स्वीकारोनि अंगें । दयावृत्ति ॥३३८॥

तरी तें ह्या दुष्टां । वाटेल का सत्य । पार्था तुझें कृत्य । सांगें मज ॥३३९॥

अवाच्यवादांश्व बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ‍ ॥३६॥

कैसा धनुर्धर । आम्हांसी हा भ्याला । पहा गेला गेला । पळोनियां ॥३४०॥

ऐशापरी वैरी । निंदितील देख । सांगें हा कलंक । भला काय ॥३४१॥

बहुत सायास । करोनियां लोक । वाढविती एक । निज -कीर्ति ॥३४२॥

कीर्ति -संवर्धन । करावया जाण । प्रसंगें स्व -प्राण । वेंचिती ते ॥३४३॥

जोडली ती तुज । अनायासें पूर्ण । जैसें का गगन । अद्वितीय ॥३४४॥

तैसी तुझी कीर्ति । अतुल अनंत । तूं चि गुणश्रेष्ठ । तिन्हीं लोकीं ॥३४५॥

दिगंतीचें राजे । होवोनियां भाट । वाखाणिती श्रेष्ठ । यश तुझें ॥३४६॥

ऐकोनि तें यश । कृतांतादि सर्व । झाले हतगर्व । घेती धाक ॥३४७॥

पार्था , तुझी कीर्ति । निर्मळ गहन । गंगानदी जाण । दिसे जैसी ॥३४८॥

थोरवी देखोनि । जगीं योद्धे भले । थोजोनियां गेले । आश्चर्यानें ॥३४९॥

सोडिली सर्वानीं । जिविताची आस । अद्भुत पौरुष । ऐकोनियां ॥३५०॥

सिंहाची गर्जना । ऐकोनि युगान्त । होय मदोन्मत्त । हत्तीतें हि ॥३५१॥

सर्व कौरवांसी । तैसा तुझा धाक । वाटे अलौकिक । पराक्रम ॥३५२॥

पर्वत वज्रातें । सर्प गरुडातें । तैसे सदा तूतें । मानिती हे ॥३५३॥

झूंजल्यावांचून । रणांगणांतून । जाशील निघून । जरी आतां ॥३५४॥

तरी तो महिमा । तुझा हारपून । अंगा हीनपण । येईल गा ॥३५५॥

निघालासी तरी । न पळूं देतील । तुज वेढितील । रणांगणीं ॥३५६॥

मग फजितीस । नाहीं पारावार । प्रत्यक्ष अपार । निंदा होतां ॥३५७॥

तिये वेळीं त्यांचे । भेदक ते बोल । तुझ्या झोंबतील । हृदयासी ॥३५८॥

तरी कां शौर्यानें । न झुंजावें आतां । भोगावें जिंकितां । महीतळ ॥३५९॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ‍ ।

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥३७॥

किंवा रणीं येथें । वेंचलें जीवित । तरी स्वर्ग प्राप्त । अनायासें ॥३६०॥

नको करुं आतां । आणिक विचार । ऊठ घे सत्वर । चाप -बाण ॥३६१॥

स्वधर्म हा पार्था । आचरितां पाहीं । दोष असते हि । दूर होती ॥३६२॥

मग पातकाची । कोठून ही भ्रांति । येथें तुझ्या चित्तीं । उपजली ॥३६३॥

कोणी नौकाघारे । बुडेल का सांग । ठेचाळेल चांग । मार्गे जातां ॥३६४॥

परी तें प्रसंगीं । तैसें हि घडेल । जरी न कळेल । जावें कैसें ॥३६५॥

होय विष -मिश्र । दुग्धाचें सेवन । तरी तें कारण । मृत्यूतें चि ॥३६६॥

तैसा फलाशनें । सेवितां स्वधर्म । होय तेंचि कर्म । दोषयुक्त ॥३६७॥

म्हणोनि फलाशा । सांडोनि सर्वथा । पाप ना झुंजतां । क्षात्रधर्मे ॥३६८॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥

होतां सुख -प्राप्ति । न जावें हर्षून । दुःखीं तरी खिन्न । होऊं नये ॥३६९॥

आणि होवो लाभ । किंवा होवो हानि । सर्वथा तें मनीं । धरुं नये ॥३७०॥

होईल विजय । येईल वा मृत्यु । पुढील हें चिंतूं । नये आधी ॥३७१॥

स्वधर्मानुसार । वागतां उचित । पावे तें निवांत । साहावें गा ॥३७२॥

ऐशा परी मन । ठेवितां अलिप्त । स्वभावें दुरित । घडे चि ना ॥३७३॥

म्हणोनि निभ्रांत । करावया युद्ध । धनंजया , सिद्ध । होई आतां ॥३७४॥

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।

बुध्द्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यासि ॥३९॥

सांख्य -तत्त्वज्ञान । ऐसें हें संक्षिप्त । सांगितलें येथ । तुजलागीं ॥३७५॥

बुद्धियोगाचा तो । निश्चित सिद्धान्त । सांगतसें चित्त । देई आतां ॥३७६॥

येथें बुद्धियोग । साधितां हा पार्था । बाधे ना सर्वथा । कर्म -बंध ॥३७७॥

शस्त्रांचा वर्षाव । करुं ये सहन । कवच लेवोन । वज्राऐसें ॥३७८॥

काय सांगूं मग । नुरोनियां भय । संपूर्ण विजय । लाभे जैसा ॥३७९॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।

खल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ‍ ॥४०॥

बुद्धियोगें तैसें । नासे ना ऐहिक । अनायासें देख । मोक्ष -लाभ ॥३८०॥

आपुल्या कर्माचा । पूर्व -अनुक्रम । चोखाळे उत्तम । येणें योगें ॥३८१॥

कर्मी तरी सुखें । वर्तावें किरीटी । नसावी आसक्ति । कर्म -फळीं ॥३८२॥

मांत्रिकातें जैसें । झपाटी ना भूत । तैसा उपाधींत । राहे तरी ॥३८३॥

तया बुद्धियुक्ता । न बाधे उपाधि । प्राप्त होतां सिद्धि । नैष्कर्म्याची ॥३८४॥

स्पर्शती ना जेथें । पुण्य आणि पाप । असे जी निष्कप । अति सूक्ष्म ॥३८५॥

सत्त्व रज तम । त्रिगुणांचा लेप । न लागे निर्लेप । ऐसी जी का ॥३८६॥

साम्यबुद्धि साच । अल्प चि अंतरीं । प्रकाशली जरी । पुण्य -बळें ॥३८७॥

तरी धनंजया । संसाराचें भय । लोपोनिया जाय । संपूर्णत्वें ॥३८८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP