खंड ७ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दिति म्हणे कश्यपाप्रत । स्वामी माझे दोन पुत्र मृत । होते म्हणून व्रत केलें अविरत । परी वांछा न माझी पूर्ण झाली ॥१॥
या वेळीं इंद्राचा वध करील । ऐसा पुत्र व्हावा प्रबळ । ही इच्छा झाली फोल । सुत जो झाला तो इंद्रमित्र ॥२॥
नाना स्वरूपयुक्त सुत । एकूणपन्नास रूपें विलसत । ते सारे इंद्राचे मित्र होत । दैत्य दुःखित जाहले ॥३॥
त्यांच्यासाठीं काय करावें । सांगा नाथा मज आघवें । माझा प्रयत्न पूर्वत्व न पावे । निष्फळ झाला व्याप सारा ॥४॥
तूं असतां माझा नाथ । ऐसें दुःख मज व्हावें प्राप्त । याची तुजला काय खंत । सांग आतां काय करूं ॥५॥
पुत्रपौत्रादि संयुक्त । ऐसा संसार मनीं वांछित । तो तूं असताही न साध्य मजप्रत । निष्फळ झालें जीवन ॥६॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । तिचें तें वचन ऐकून खेदयुक्त । प्रजापति स्मित करून म्हणत । योगींद्र तो परमार्थवेत्ता ॥७॥
कश्यप म्हणे खेद न करी । कर्मांची गति ऐशीच खरी । कल्याणि दुःखमोहादि संसारीं । अटळ ऐसें शास्त्र सांगे ॥८॥
दैत्य पापकर्मपर । देव पुण्यांत मग्न फार । पाप्यांस न मिळे सुखलाभ थोर । वेदवचन हें शाश्वत ॥९॥
ऐसें जेम वेदाचें वचन । तें सत्य असे त्यांत संदेह न । तेव्हां ममता दे सोडून । पुत्र जाहले ना तुला ॥१०॥
त्या एकूणपन्नास पुत्रांचे सुत । होऊन वंश तुझा वाढेल जगांत । दैत्य मृत्युयोग्य असत । त्यास्तव वृथा कां तूं श्रमसी ॥११॥
कश्यपाचें ऐकून वचन । दिति पुनरपि खिन्नवदन । म्हणे शोक संतप्त गात्र दीन । तेजःपुंज स्वपतीस ॥१२॥
सृष्टिकर्ता तूं साक्षात । तूं समर्थ संशयातीत । अघटित तें शक्य तुजप्रत । अतर्क्य शक्ति असे तुझी ॥१३॥
सर्व भावांत ममता त्यागून । योगिसत्तमा जाणून वेदज्ञान । बैसला अससी स्थितप्रज्ञ । महामते बुद्धिमंता ॥१४॥
परी मी मोहांत निमग्न । तापत्रयांत बुडून । जलतें सर्वदा मनीं खिन्न । ममतात्याग कैसा करूं ॥१५॥
याचा मार्ग मज सांगावा । जेणें शांतीचा लाभेल ठेवा । माझा अन्तर्दाह शमाचा । होणार तें सूखें होवो ॥१६॥
तिचें हें ऐकून वचन । कश्यपासी दया येऊन । शांतिमार्गीं लागण्या मन । म्हणे तिजला हर्षयुक्त ॥१७॥
येथ एक इतिहास पुरातन । सांगतों तुजला तो ऐकून । तूं होशील शांतियुक्त मन । भजशील देव गजाननासी ॥१८॥
हिमालयाची सुता पार्वती । भगिनी तुझी झाली जी जगतीं । महामाया आराधिली प्रीती । त्या पर्वतश्रेष्ठानें तैं ॥१९॥
हिमालयावरी जाऊन । शिव बैसला ध्यानपरायण । उग्र तप आचरून । गणेशाचें चिंतन करी ॥२०॥
तेथ जाऊन पार्वती । सेवा करण्या उत्सुक चित्तीं । महेशासी मानून पति । यत्नपूर्वक आराधित ॥२१॥
महादेव तें जाणून । चित्तीं क्रोध करी महान महान । माझी आज्ञा उल्लंघून । दक्षयज्ञीं पूर्वीं गेली ॥२२॥
जिला आपुलें हित न कळत । ऐसी पत्नी अयोग्य ख्यात । वेदशास्त्र ऐसें सांगत । म्हणोनी पत्नीविहीन मी ॥२३॥
सतीनें आज्ञा अवमानिली । आतां पत्नीची आशा न उरली । मीं विघ्नपाच्या पूजेंत वाहिलीं । इतुकीं वर्षें निष्ठेनें ॥२४॥
ऐसा विचार करून मनीं । महेश्वर पार्वतीस न मानी । ती जवळी येतां तत्क्षणीं । मौन धरी महादेव ॥२५॥
म्हणून पार्वती खेडयुक्त । परी नियमानें सेवा करीत । सौंदर्यवती ती भक्तियुक्त । हावभाव बहु दाखवी ॥२६॥
तिज नित्य सेवा परायण । पतिभावपर एकनिष्ठ मन । पाहून शिव करी गमन । दूर तो पर्वत सोडूनी ॥२७॥
सदाशिव दूर जातां विमन । पार्वती शोकाकुल होऊन । देहत्याग करण्या तत्क्षण । निश्चय करती जाहली ॥२८॥
ती द्विरदाननाचें स्मरण । चित्तीं करी भक्ति परायण । त्या स्मरणमात्रें स्फूर्ति उत्पन्न । जाहली तिच्या अन्तःकरणीं ॥२९॥
विचार करी ती मनांत । अत्यंत दुःखें पीडित । मज त्यागून गेला निश्चित । देव शंकर वीतरागी ॥३०॥
आतां तो न मज वरणार । त्याचा दृढ असे विर्धार । परी तपःप्रभावें दुष्कर । कांहीं नसे जगतांस ॥३१॥
ऐसें वेदवाक्य सांगत । म्हणून मी आचरीन तप अविरत । जेणें शंभु मज लाभेल निश्चित । पार्वती ऐसा विचार करी ॥३२॥
तदनंतर राहून वनांत । सखीसहित ती ध्यात सतत । सदाशिवास आपुल्या चित्तांत । पंचाक्षर विधाने एकनिष्ठा ॥३३॥
लिंगपूजापरायण । नाना तपांचे करी आचरण । ऐसा बहुत कालही जातसे मन । संतुष्ट न झालें शंकराचें ॥३४॥
तो स्वभावें क्रोधयुक्त । तिज न मानी कदापि मनांत । तेव्हां एकाक्षरमंत्रें ध्यात । विघ्नेश्वरासी ती नित्त्य ॥३५॥
पूजापरायणा ती सतत । विश्वेश्वरासी तोषवित । सदाशिवास त्यागून होत । गणेशभजनीं रत सदा ॥३६॥
वारा पिऊन ती वसत । गणेशमूर्तीस पूजी भावयुक्त । ध्यान करी ती सतत । उत्तम मंत्र जपूनिया ॥३७॥
पुरश्चरण करी मंत्राचें । तैं द्रवलें मन शिवाचें । मनोमीलन होऊन त्यांचें । गणेशाच्या कृपेनें ॥३८॥
शिव चिंता करी मनांत । मजसाठी देवी तप आचरित । माझ्यासाठीं नियमस्थित । आतां तिजजवळीं मीं जाईन ॥३९॥
जो देहधारी असत । त्यास कैसा अपराध घडत । म्हणून क्षमा करून तिजप्रत । वरीन तिजला मीं निःसंशाय ॥४०॥
ऐसा विचार करून चित्तांत । देवेश शंकर तेथ जात । पार्वती जेथें तप करित । श्रमयुक्त विकलांगी ती ॥४१॥
तिज श्रमक्लिन्न पाहत । तेव्हां शिव झाला विस्मित मोहित । ब्रह्मचारी रूप घेत । प्रकटे नंतर तिच्या समोर ॥४२॥
स्वतःचीच करी निंदा । पार्वतीस ती वाटे आपदा । निर्भर्त्सना करून त्वरितपदा । वनांत जाऊ लागली ॥४३॥
तेव्हां अति संतुष्ट होऊन । प्रकट करी स्वरूप मोहन । तें पाहतां शोभन । जगदंबिका प्रणाम करी ॥४४॥
महादेवास ती स्तवित । तेव्हां तो तिज वर देत । बोले मोहयुक्त वचन । त्वरित । ईश्वरेश्वर पार्वतीसी ॥४५॥
वर माग महाभागे मीं विजित । तुझ्या तपानें अविरत । देईन जें असेल कांक्षित । निःसंदेह आदरानें ॥४६॥
मीं नित्य तुझ्या आज्ञेंत । राहीन पार्वती प्रेमयुक्त । भार्या माझी होई त्वरित । कल्याणी प्राचीन पति मी तुझा ॥४७॥
पार्वती म्हणे तयासी विनत । जरी प्रसन्न भावें वरद पुढयांत । शंकरा तूं प्रकट पुनीत । तरी आता ऐसें करी ॥४८॥
जाऊन माझ्या पित्यासन्निध । मागणी घाली मजला अनिर्वेध । पतिव्रताक्षर्म दे सुबोध । विघ्नहीन जो सदा असे ॥४९॥
त्यायोगें नित्य संतुष्ट । महादेवा सेवापरायण इष्ट । सेवीन तुजला मीं सतत । तेव्हां शिव तें मान्य करी ॥५०॥
पार्वतीसी तैं आश्वासित । पूर्ण होतील मनोरथ समस्त । यांत संशय अल्प नसत । मागणी घालीन तुला मीं ॥५१॥
तुझ्या पित्याजवळीं जाऊन । याचना तुझी मी करिन । नंतर तुजला वरीन । विधिपूर्वक निश्चयें मीं ॥५२॥
अहो आश्चर्यकारक तप । धैर्य तैसें देहताडण निष्पाप । सर्वपूज्य तूं सुरूप । महादेवी होशील ॥५३॥
कश्यप म्हणे दितिप्रत । ती भाद्रपद शुक्ल तृतीया असत । शिवासीं होऊन संयुक्त । देवी पूजी गणनायकासी ॥५४॥
तदनंतर चतुर्थी तिथि येत । त्या दिवशी प्रहर्षें होम करित । पंचमीस । उपवास सोडित । ब्राह्मणांसहित जग्दंबिका ॥५५॥
ऐसी पारणा महोत्सवें करून । ती मूर्ति मृण्मय घेऊन । हर्षभरें जळीं विसर्जन । करून प्रार्थी विघ्नेशासी ॥५६॥
तदनंतर शिव स्वस्थानीं जात । पार्वती स्वपितरांसी नमित । तेथ राहिली हर्षयुक्त । शंकरसमागमें तुष्ट झाली ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते शिवपार्वतीसमागमो नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP