उत्तरार्ध - अभंग ४०१ ते ५००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


गेला समय पुन्हा नाहीं येत । परमात्मा सामावलेला समयांत । समय करी आत्मध्यानीं समर्पित । बहुमोल त्यास समजुनी ॥१॥
त्याग नको संसाराचा । त्याग हवा संसारभ्रमाचा । संसाररूप सर्वेश्वरा साचा । जाणुनी घेई ॥२॥
सर्वत्याग केला । अन्नवस्त्र त्यागही घडाला । परी जेव्हां त्यागच त्यागिला । प्रवृत्तींत पूर्ण निवृत्ती लाधली ॥३॥
तुझें असे काय तुझ्यापाशीं । जें तूं त्यागूं शकशी । भिन्न भोगही भोगण्यासी । असती का ॥४॥
त्याग भोग द्वंद्वभ्रम । जेव्हां जाई हा संभ्रम । पूर्ण ह्रदयखुशीचें वर्म । कळों येतें ॥५॥
प्रवृत्ती निवृत्तीबाधक । धरूनी हा गैरसमज एक । त्याग केला एकेक । शोध शोधुनी ॥६॥
होतां नित्यानंदकृपाप्राप्ती । प्रवृत्तींतील पूर्ण निवृत्ती । अनुभवली ही संपूर्ण अनुभूती । योग्य समय होण्यानें ॥७॥
शुष्क काव्य रचे नर-कवी । वस्त्र त्यागी वल्कल नेसी गोसीवी । दुसरा डोळे वर चढवी । बकध्यानानें ॥८॥
मुक्तानंदा निरखुनी पाही । आचरट प्रकार असे कांहीं । अंतरशांती कसली नाहीं । ढोंग धत्तुरा सारा ॥९॥
अंतरशांतीविना त्याग नग्न । वल्कलें फकीरी अन्तरशांतिहीन । मुक्तानंदा जप तप साधन । केवळ श्रमरूप धन ॥४१०॥
कुलाचार स्मरण । विद्याभ्यासाचें गर्विष्ठपण । मनुष्यबळाचा अभिमान । अधोगतीस कारण ॥११॥
ब्राह्मण बनला । ब्रह्म न पावला । योगी झाला । समाधीविना ॥१२॥
भक्त म्हणे स्वतःला । प्रेमनदींत न डुंबला । मुक्तानंदा कशाची पावला । हा कमाई ॥१३॥
घडलेल्यास काय घडविणें । बिघडलेल्यास काय बिघडविणें । शुद्ध आत्मारामास काय धुणें । सर्व त्यागुनी स्वस्थ राही ॥१४॥
समयपर दे सोडुनि घरादारा । एक दिन सोडणारच सगासोयरा । आपोआपच सुटेल सुटणारा । न सोडी निजगुरु नित्यानंदा ॥१५॥
घर सोड पंथ सोड । इंद्रियांचें लालनपालन सोड । मुक्तानंदा परी नको धरसोड । श्रीगुरु नित्यानंदांची ॥१६॥
देवभक्त गुरुशिष्य । पतिपत्नी पितापुत्र रहस्य । मित्रमित्र सख्य-गौप्य । समर्पणाचें समाधान ॥१७॥
संसारी, विना समर्पण । स्नेह शांती नसे संपूर्ण । समर्पण परमधन पूर्ण । सतत हवें सार्‍याचें ॥१८॥
पतिपत्नीचें धर्मयुक्त । समर्पण असे अभिप्रेरित । उभयीं परस्पर पूर्ण समर्पित । श्रद्धा मैत्री वाढते ॥१९॥
असेल समर्णण भावभय । जीवन नवस्फूर्तियुक्त होय । बनेल अमृतमय । हो समर्पण-योगी ॥४२०॥
समर्पण जसे परमात्माप्रती । परमात्म्याचीही तशी समर्पिती । जेवढय तेवढी हो प्राप्ती । पूर्ण समर्पणयोगानें ॥२१॥
ह्रदयकमलाचें एकेक दला । गुणमयी दिव्यकला विशाल । मुक्तानंदा ध्यानांत प्राप्त होईल । समर्पण द्वारा ॥२२॥
ध्यानाची चढती वाढती । समर्पणानेंच होई प्रगती । मुक्तानन्दा आत्मसमर्पण अती । परम कमाई ॥२३॥
श्रीगुरूला शिष्यही पण । करील पूर्ण समर्पण । प्राप्ता गुरुभाव संपूर्ण । फलरूप होई ॥२४॥
गुरुभक्ति पाझरे ह्रदयांतुन । श्रीगुरुचें चिन्तन मनन ध्यान । निजकर्माचें पडिलें इंद्रिया वळण । असा शिष्य काशी जाण ॥२५॥
शिष्य गुरुचरणीं पुरा अर्पण । शिष्यत्व बने गुरुरूप सर्वांगीण । शिष्य शिष्यत्व पावतां संपूर्ण । गुरुप्राप्ती होते पूर्ण ॥२६॥
गुरुमध्यें ना पूर्ण प्रेमभाव । गुरुस्थानीं तीर्थभावाचा अभाव । गुरुआज्ञापालन नसे स्वभाव । भिकारडेंच असें शिष्यत्व ॥२७॥
गुरुवांचुनी भिन्न अन्य देवता । आश्रमाहुनी अन्य तीर्थास पुजितां । सोऽहम् सोडुनि अन्य मंत्र जपतां । व्यभिचार घडे ॥२८॥
गुरु गुरगुरण्यानें । गुरुनाम बदनाम करणें । गुरूची कीतीं असे वाढविणें । तर गुरुभाव पाहिजे ॥२९॥
निंदा इर्षा मात्सर्य । रडणं कढणं अवडम्बर गुह्य । मुक्तानंदा हीं  लक्षणें काय । गुरुप्रसादप्राप्तीचीं ॥४३०॥
परद्वेश परद्रोह अनुदिन । हेव दावा परसम्पत्ती देखुन । पुण्यस्मृती दिली सोडुन । भगवन्ताची ॥३१॥
परदोष सप्रेमें पाही । आपपरभाव राही । अशा पापाचें सख्य नाहीं । मुक्तानंदा गुरुकृपेशीं ॥३२॥
मुक्तानंदा परद्वेषानें । गुरुप्रेमी निंदण्यानें । शांती पावेल तेणें । जर मानव ॥३३॥
तर पूर्ण हिंसक कसाई । शांतीचा सागर होई । शांतिपाठ नित्य गाई । पण असें घडे का ॥३४॥
भक्तराजा तूं हुषार बहुत । स्वतःच स्वतःतें ठकवीत । परनिंदा परद्रोह करीत । जीवना वितरी ॥३५॥
परपीडा, परसुखानें जळणं । मुक्तानंदा, अशी शिकवण । गुरु नित्यानंदांनीं पण । कधीं दिली नाहीं ॥३६॥
गुरुभावानें सर्वां देखुनी । सदैव राही सुहास्यवदनी । सहर्ष सप्रेमें सुस्वागत करुनी । सहकार्य दे सदा ॥३७॥
परी दुर्लभ ज्ञानी गुरुभक्ति । नित्यानंदकृपेविना न होई प्राप्ती । सप्रेम सुहास्यवदना सर्वांभूतीं । प्रीति वाटणें गुरुप्रसाद ॥३८॥
भक्तराज, निजद्दष्टीं । वसव श्रीगुरुसृष्टी । ही गुरुशिष्याची गोठी । मुक्तानंदा ॥३९॥
तुझी लायकी जशी । सृष्टी राही तशी । उत्तम स्वर्गभूमी साजेशी । बनुं दे तुझी सृष्टी ॥४४०॥
समयपर पुरी । साधना करी । नको राहुं दे अधुरी । साधनाहीन जगतीं लाभ काय ॥४१॥
शास्त्राभ्यासानें । सज्जनोपदेश श्रवणानें । शिवोऽहम् जाणीवेनें । मुक्तानन्दा राही ॥४२॥
गुरुशक्ती प्राप्त करणें । साक्षात्कार प्रकट अनुभवणें । साधनाच ही मानणें । मुक्तानंदा ॥४३॥
ठेविलें सदा स्वच्छ मन । साधें सरळ आसन । एकाग्र मानस गुरुनामचिन्तन । मुक्तानंदा हीं साधकलक्षणं ॥४४॥
श्रीग्रुरु महादेव मान । गणेशपुरी परशिवाचें कैलासस्थान । गणेशपुरीनिवासी भगवान । श्रीनित्यानंद महान ॥४५॥
श्रीगुरुमंत्र मंत्र महान । मुक्तानंदा गुरुआज्ञापूर्ण जीवन । पातिव्रत्य महाभक्ती गहन । अति दुर्लभ ॥४६॥
गुरुनें देतां घ्यावें । गुरुनें घेतां द्यावें । गुरुचा होऊनि रहावें । गुरुभक्तीचें हें लक्षण ॥४७॥
नाहीं नियमबद्धता । विवेकहीन भाविकता । पर-स्थिति गती न समजतां । मुक्तानंदा ती भक्ती वांझ ॥४८॥
मनमानी भक्ती । स्वच्छंद वृत्ती । आदर्शपूर्ण ना ती । समजली जाते ॥४९॥
भक्ती प्रेम उमंगयुक्त । प्रेम निर्मी मानव-शिस्त । शिस्तीनें संयम नियम जीवित । बने आपोआप ॥४५०॥
गुरुसेवा गुरुध्यान । गुरुबोध गुरुकृपा महान । होतां शिष्याचें गुरुमीलन । तेव्हां कळों येई ॥५१॥
करणें करविणें ध्यान । ध्यानमग्न राहणें आश्रमजीवन । मुक्तानंदा ध्यानलोका जेथ महान । चाले ध्यानानंदाची देव घेव ॥५२॥
राजे समजले रामाला राजा । शूर वीरांनीं शूर वीरजा । नीतिवानांनीं म्हटलें धर्मराजा । मुनींनीं मानलें ज्ञानी ॥५३॥
शत्रु वाटला पापींना । पुराणपुरुष पुराणांना । धोबी-ह्रदयाचा चाण्डालपणा । ठरवी रामा पापी ॥५४॥
मुक्तानंदा ह्रदयाचें पाप । बाहेर न देखे कांहीं निष्पाप । आश्रमास पाही निन्मयरूप । निष्पाप द्दष्टीनें ॥५५॥
दिन जसा अंधास । बहिर्‍यास वा संगीत श्रवणास । मिष्ठान्न जसें रोग्यास । जठराग्नी मंद ज्याचा ॥५६॥
असेंच दोषयुक्त जाण । जयाचें अंतःकरण । आश्रम जरी परिपूर्ण । वाटे सदोष ॥५७॥
स्वच्छ नसे ह्रदय । शुद्ध नाहीं कर्म कार्य । प्रेमभावाचा अभाव जेथा होय । स्वर्गांतही सुखी तो नाहीं ॥५८॥
सिद्धपीठांत वसती । योगीश्वराची संगती । गादीवर वा आरूढती । सत्ताधारीच्या ॥५९॥
बसो अथवा ध्यानमंदिरीं । चाण्डाल ह्रदयाचा जर अंतरीं । सर्वत्र जग ओळखे तरी । आपुल्यावरोनी ॥४६०॥
कुकर्माचें चिन्तन । दोषांचें अंतरमनन । पापभेदाचा कुभाव ठेवून । मुक्तानंदा ॥६१॥
असा चाण्डाळकर्मी । राहुनी सिद्धधामीं । नर्कदर्शनीं रमी । सदोष द्दष्टीनें ॥६२॥
जाई पूर्वेला वा पश्चिमेला । दौलतनगरी वा कंगालपुरीला । कोठेंही केव्हांही तूं गेला । तरी तूंच जाशी ना ॥६३॥
स्वच्छन्दतायुक्त स्वतंत्रता । जंगली जनावरांची अधिक मुक्तता । आज्ञापालनयुक्त परतंत्रता । गुरुकुलींची हीच परम स्वतंत्रता ॥६४॥
धर्मालय स्वाध्याय क्षेत्रांत । पदवीचें प्रयोजन न रहात । पदवी कर्तृत्वभेदानें निर्मित । स्वाध्यायास परी आत्मअभेदता ॥६५॥
व्यवहार प्रवृत्तीचा सहायक । कुलाचार बनावा प्रत्येक । मुक्तानंदा परमांत्मा-समावेशक । सामावुनी जा त्यांत ॥६६॥
व्यवहारी वर्ण जाती । न आवश्यक परमार्थी । सर्वात्मा समानार्थी । मंदिर मठवासींचा ॥६७॥
निद्रेमध्यें जागृतिविस्मरण । सत्ताधारित्वाचें तसें नको स्मरण । मठधर्मक्षेत्र सज्जनता जेथ पूर्ण । नीतिज्ञ ज्ञानींमध्यें तसेच ॥६८॥
त्यागानें  न संतप्त । ना भटकुनी दिन बहुत । मठवासी शांती पावे निश्चित । ध्यान करी मुक्तानंदा ॥६९॥
श्रीगुरुदेव जपत राही । मुक्तानंदा जगा बोलुं दे कांहीं । आत्मस्मरणींच विश्रांती ही । लाभे पाही ॥४७०॥
जसा निज भाव । तसा जगाचा उठाव । आपले भोग सर्व । आपलेंच कर्मफल ॥७१॥
मुक्तानंदा गुरुभावाचा उदय । आश्रमादि सर्वोद्भव होय । गुरुप्रेमाचा तेणें उमंगोदय्य । सर्वकाळ ॥७२॥
आश्रमवासी जन, वन, वस्त्र । जल प्रकाश अत्र तत्र । आश्रमाच्या अणुअणूंमध्यें सर्वत्र । गुरुपरमाणूच व्याप्त ॥७३॥
आश्रमवास नाजुक अती । आश्रमी चितीकिरणपुंज जमती । मुक्तानंदा आदर ठेवी सर्वांप्रती । तरीच निष्पाप होसी ॥७४॥
ज्याचें धन जपयुक्त । चंचलतारहित चित्त । मुक्तानंदा चिंतन प्रेमासहित । कैलास मग दूर नाहीं  ॥७५॥
जपानें योग जपानेंच ध्यान । जपानेंचा प्रेम जपानें विज्ञान । मुक्तानंदा अजपाजप घे जाणून । परशिव असे तुझ्यांत ॥७६॥
सदा येतां जातां उठत बसतां । देतां घेतां कार्य करतां झोपतां । हातानें काम मुखानें राम जपतां । मुक्तानंदा देंच तापस होई ॥७७॥
ओम् नमः शिवाय । हा महामंत्रच तारणोपाय । मुक्तानंदा अवतारक होय । हा सहज ॥७८॥
ऋषिमुनी यती सिद्धांनीं गायला । ओम् नमः शिवाय सदा जपला । परम पावन पंचाक्षरी पावला । कलियुगीं सर्वत्र ॥७९॥
पंचाक्षरीमंत्र बलशाली अनन्त । मुक्तानंदा हा परशिव स्फुरित । ह्याला जपी सर्वदा सतत । सर्वकाळीं ॥४८०॥
उच्च नीच, मूढ, पंडित । स्त्रीपुरुष पावन पतित । सर्व झाले सदा पुनीत । पंचाक्षरीनें ॥८१॥
मुक्तानंदा मंत्र पंचाक्षरी । सप्तकोटी महामंत्रेश्वरी । मूळ जननी परमेश्वरी । असे कीं ॥८२॥
पंचाक्षरी मंत्र सर्व देवमय । तसाच राही सर्वतीर्थमय । जगताची उदयलय । जपी ह्यातें ॥८३॥
येतां जातां स्नान भोजन होतां । प्राणापानीं ओम् नमः शिवाय जपतां । मुक्तानंदा सत्वर कल्याणप्राप्तता । फलश्रुती ॥८४॥
सर्व स्थिती सर्व गती । सर्व व्यवहारी सर्व मती । मंत्री जपी पवित्रतेनें अति । अक्षय पावशी शांती ॥८५॥
श्रीगुरु, तूं, मंत्र । मंत्र लक्ष एकवटती एकत्र ठेवुनी हा भावच मात्र । जपी हा मंत्र ॥८६॥
शिव ना शैव । ना बौद्ध ना वैष्णव । आत्माच केवळ तव । जाणी ॥८७॥
शिव ना हिंदु ख्रिस्ती मुसलमान । सर्वात्मा शिव अन्तरानंद महान । शिव अन्तरप्रेमनिधान । शिवजप सदा करी ॥८८॥
अन्तरींचा मंत्र । असे महामंत्र । समजुनी त्याचें तंत्र । जप करी ॥८९॥
रातदिन सोऽहम् सो‍हम् । अजपाजप चाले क्रम । अंतरजप सदा श्राव्य सुगम । मुक्तानन्दा अजपा निष्पाप ॥४९०॥
श्वासोच्छ्‍वासा साथ साथ । सोऽहम् राही जपत । प्राणापानाची पाही गत । इकडे तिकडे नको पाहूं ॥९१॥
सकाराच्या साथ अन्तरीं । हकाराच्या बरोबर बाहेरी । सो‍ऽहम् जपाची एकतारी । दिव्य धुन ऐक तरी ॥९२॥
मुक्तानंदा आंतुन । सोऽहम् धुन । चिदाकाशाची निरंजन । धुन असे ॥९३॥
समजहीनतेनें कमतरता । सोऽहम‍चा उदय होतां । मुक्तानन्दा मी तर परिपूर्णता । जाणीव ही होई ॥९४॥
आत्मा  खरा परमेश्वर । संदेह  मुळीं न घर । निज आत्मा पूर्णेश्वर । सदा सोऽहम् जप कर ॥९५॥
उभयरूपी ओम् । क्रियाशील परम । मुक्तानन्दा । ओम् च सोऽहम् । जपानें बन ओम् ॥९६॥
ओम् जगत ओम् देवीदेवता । ओम् भगत ओम् नें प्रपंचता । मुक्तानंदा तूंही तत्त्वतां । ओम् च असशी ॥९७॥
ओम् नर ओम् नारी । ओम् जगत् जगदात्मा सर्वतोपरी । ओम् निर्मित जगही ओम् खरोखरी । मुक्तानंदा ओम् च नित्यानन्द ॥९८॥
ओम् इति एकाक्षरं ब्रह्म । ओम् तत् सर्वम् ओम् तत् सत्यम् । ओम् तत् आत्मन् श्रुतिवचनम् । गणेशपुरीं, नित्यानंदही ओम् पूर्ण ॥९९॥
नित्य-स्वतंत्र-स्फुरणरूप ॐ कार । परब्रह्म आकाशाचे बोल साकार । मुक्तानंदा तव ह्रदयाकाशीं स्फुरणार ध्यानीं ऐकुनी खूश होई ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP