उत्तरार्ध - अभंग २०१ ते ३००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


मेघामृत रसमय चातकास । मुक्तानंदा परा निंदेस । न मानिती अमृतरस । पुण्यवान नीतिज्ञा ॥१॥
स्वकुटुम्ब आपुलें घर । पहा निरक्षुनि निज संसार । पुण्य स्वर्गनिवास खरोखर । मुक्तानंदा, आहे का? ॥२॥
पत्नीद्रोह, ह्रदयीं द्वेष । भागीदारांशीं वंचना विशेष । मुक्तानंदा सम्यतेचा वेष । असला कसला ॥३॥
पाही कन्या पुत्र कुलाचार । मुक्तानंदा गुप्ता आचार विचार । परदारतीर्थ मानण्यांता पवित्र । कसली तुझी प्रतिष्ठा ॥४॥
देवाघरचा पुरा न्याय । संतती-स्वकर्मीं स्पष्ट होय । मुक्तानंदा, करी स्वसंशोधन कार्य । नको बघूं दुसर्‍यांकडे ॥५॥
निजपाप स्वदशा बघ कर्महीन । परनिंदेचें मात्र पूर्ण व्यसन । मुक्तानंदा, भूतल-नर्क ह्याहुन । कोणता राही ॥६॥
नरकीं तुझी वस्ती । कुटुंबीही तेथ राहती । व्यवहार कर्म वितरती । नरकाचेंच ॥७॥
मुक्तानंदा नरकीं राहसी । तरी जन हे निर्दोषी । कां नाहक निंदीशी । सांग बरें ॥८॥
विंचुदंशाची वेदना क्षणिक । सर्पदंशाची घंटोघंटी अधिक । ऐशा यातना कित्येक । पुरविल्या ॥९॥
आगीनें होरपळलेलें अंग । पाण्यामध्यें डुंबणेंही चांग । परी गुरुकृपाहीन निंदक-संग । प्राणाशीं गांठ ॥२१०॥
वनपशुस न चिंता उद्यांची । जंगली पक्ष्यास नसे भविष्याची । परपीडारत नरपशुची । मात्र भीती धरावी ॥११॥
जरा क्षुधा सतावे बहुत । तरीच प्राणी प्राण्यां भक्षतात । मनुष्यप्राणी स्वसंतोषा हिंसतात । ना उदरभरण्य़ा केवळ ॥१२॥
अंतरींच स्वसुखपूर्ण विश्रांती । समजेही गुप्ता गोष्ट पुरती । रमण्यास रमण्याचीही रती । आपल्या आपणी होई ॥१३॥
परसुधार न ये घडुन । स्वतःतें बिघडवुन । स्वतः शुद्ध स्वच्छ बनुन । इतरे जना सुधारी ॥१४॥
पापाचारीचें पापचिंतन । वा दर्शन कथन लेखन । पेक्षा स्वात्मनिर्दोष मनन । मानवाचा वैकुण्ठधर्म ॥१५॥
परनिंदेची लाज वाटणें । परदोषकथन नरक समजणें । पूर्व कर्मफलप्राप्तीनें पस्तावणें । मुक्तानंदा नीतिज्ञाचीं लक्षणें ॥१६॥
तुझें भाग्य प्रत्यक्ष । दे तवा लायाकीची साक्ष । ठेवी वर्तमानीं लक्ष । भविष्याची शिदोरी जी ॥१७॥
मानवा, कृतघ्न कां होशी । साधुजन कां निंदीशी । एकता पावुन जगांतील सत्याशीं । मुक्तानंदा बुद्धिमान बहु असती ॥१८॥
मानव गुणींना दोषतो । पापातें पुण्य मानतो । जसें करतो तसें पावतो । मुक्तानंदा कृती कधीं न छिपे ॥१९॥
जगीं निजगुण लपवावे । स्वपाप प्रकट करावें । मुक्तानंदा न कोणा निन्दावें । यापरती स्वनिन्दा योग्य ॥२२०॥
समज पुण्यास संपत्ती । दडवुनि ठेव ती । दोषच आपत्ती । निंद्य अती ॥२१॥
मुक्तानंदा न देखी परपाप । तेणें क्षीण पुण्य आपोआप । योग्यताही पावे लोप । नकळत ॥२२॥
जगती व्यसनाधीन । आपुल्या रुचीस धरून । मुक्तानन्दा जाती रमुन । इंद्रियभोगांत ॥२३॥
पापी रमती निंदेंत । तूं परस्तुती करत । रमुनी जा पुण्यांत । भला बरा ॥२४॥
पवित्र ह्रदयाचें लक्षण । पापकथन न सतावण्या दुर्जन । मुक्तानंदा पवित्र ह्र्दय म्हणुन । परस्परास देखे पावन ॥२५॥
जगीं दोन द्दष्टींचें मार्गदर्शन । गुरुमय वैकुंठीं दे एक लावून । नरकीं दुजी, पापी दोषदर्शनानं । मुक्तानंदा, तव द्दष्टी, कोण ॥२६॥
आत्मापरमात्मा चिंतन । दैवी संपत्तीचें संपादन । निर्दोष ईशद्दष्टी म्हणून । मुक्तानंदा करी प्राप्त ॥२७॥
निर्दोष द्दष्टी समान । जगीं स्वर्ग न । नरकमय न जीवन । दोष द्दष्टी सम ॥२८॥
मुक्तानंदाम, राही धनी बनुन । निर्दोष दैवी सम्पत्तीचा म्हणून । कंगालास पाही कोण । विचारी तरी का ॥२९॥
कर्मेंद्रियांच्या पापाहुनि केवळ । ज्ञानेंद्रिय-पाप अति प्रबळ । मुक्तानंद द्दष्टीच राखी निर्मल । निष्पाप म्हणुन ॥२३०॥
स्वद्दष्टीनुरूप मानव । रची निजजगत बरवं । मुक्तानंदा तुझा वैकुंठ भाव । तव द्दष्टीनुसार ॥३१॥
भेदभुक्त द्दष्टी । निपजवी स्वर्ग नर्क सृष्टी । मुक्तानंदा, सुधारलेली निजद्दष्टी । पाही नरकींही स्वर्ग ॥३२॥
मानव कल्पी जशी कल्पना । तशी सफल हो निज कामना । मुक्तानंदा शुभ भावना । वैकुंठ यात्राच ॥३३॥
भावमय जगत भाविक भक्त । भावच प्रभावी सार्‍या व्यवहारांत । मुक्तानन्दा केवळ स्वभावांत । स्वर्ग उभा ठाके ॥३४॥
ईशसृष्टींत जोंवरी । जीवद्दष्टी भासे तोंवरी । वैकुंठींही सुख तरी । न लाभे ॥३५॥
मुक्तानंदा जधीं जीवद्दष्टी । मिळुनि जाई समष्टी । बने शिवरूप सृष्टी । परमानन्द तेव्हांच ॥३६॥
द्दष्टी करा ज्ञानमयी । सृष्टीतें बघा राममयी । आदेश पाळा हा सर्वोदयी । धर्मशास्त्रांचा ॥३७॥
मुक्तानन्दा तुझा द्दष्टिकोण । सृष्टीभेदाचें निरीक्षण । करी का, तेंही पण । आधीं पहा ॥३८॥
जशी आपुली द्दष्टी । तशी उभी सृष्टी । द्दष्टीनुसार अंतरकर्मपुष्टीअ । मुक्तानन्दा दिठी सुधारी आपुली ॥३९॥
जगत द्दष्टीही आपुली । ज्यानें त्यानें निजसृष्टी रचिली । मुक्तानंदा भेदरूपी तूंही देखिली । नित्यानंदमयी द्दष्टी बनूं दे ॥२४०॥
नारकीय होऊनि नरकवासी । सहज भोगी नरक भोगासी । मुक्तानंदा तूं तर नरक भोगीसी । केवळ नरक द्दष्टीनें ॥४१॥
द्दष्टींत भरतां हरी करुणा । मुक्तानंदा तो शहाणा । नरकांतही बघे देखणा । स्वर्गच कीं भला ॥४२॥
परमात्म्याच्या दरबारीं । सर्वांची समान बरोबरी । तूंही विश्रांती करी । तेथा जाऊनी ॥४३॥
मुक्तानंदा येथ तूं राहुनी । दुसर्‍यास पाहुनी । पेटवुनी ईर्ष्याग्नि । कां जाळसी स्वतःतें ॥४४॥
जगाला समजाविशी । सफलता तींत मानिशी । स्वदोष निर्दोष करण्या झटशी । तरीच सफलता पावशी ॥४५॥
असशी स्वतः गुणहीन । गुणींचें देखोनि स्थान । तसेंच धनवानांचा तूं धनहीन । कां करिसी मत्सर ॥४६॥
मुक्तानंदा स्वतःतें देख । तूं कशास असशी लायक । तव द्दष्टींतील सृष्टी अनेक । कशा तर्‍हेची ॥४७॥
जगाचें जगणें । ठगाचेंच ठगवणें । अभेदी भेद भिन्नपणें । जगदीशींच जग जगतें ॥४८॥
जगीं देखणें विषमसृष्टी । सोडन दे ही पापद्दष्टी । मुक्तानंदा करो सर्व समष्टीं । चिती-निरीक्षण ॥४९॥
द्दष्टीनें दर्शन । दर्शनानें भावीतपणा । भावपूर्ण मनन । जेथ ॥२५०॥
मननाचा परिणाम मग । चित्ताचा अन्नभोग । मुक्तानंदा तवा द्दष्टीयोग । कोणता राही ॥५१॥
वर्णातीत स्वर्ग नरक । हरीहर ब्रह्मादि प्रत्येक । मुक्तानन्दा तीर्थक्षेत्रही अनेक । वर्णहीन आत्म्यामुळें ॥५१अ॥
वर्णभेदास समजुनी धर्म । नको पसरवूं कसला भ्रम । मुक्तानन्दा परशिवास जाती कर्म । असे का ॥५२॥
वर्ण-भेद, उच्चनीच भेद । परमात्मा वर्णातीत अभेद । मुक्तानंदा शांतीप्राप्तीस सुखद । वर्णातीत व्हावें अलगद ॥५३॥
जाती कुलाचार शरीर सापेक्षी । शरीरपरे अलौकिक नीलाकाशी । मुक्तानन्दा ध्यानाविना कोणासी । पोहचतां येतें का ॥५४॥
मृत्तिकेची मूर्ती । अवयव सारी माती । मुक्तानन्दा जाण्या देहमोहा अती । मांसमय देह देख असा ॥५५॥
जातीभेदरहित तृप्ती । सम्प्रदाय धर्मभेदाविना शांती । तृप्ती एकच समान वृत्ती । सर्व समाजाची ॥५६॥
मुक्तानन्दा करूनि ध्यान । घे तीस मिळवुन । जो पंथ शांतीहीन । काय त्याचें प्रयोजन ॥५७॥
एक अ वर्णापासुनि चारी वर्ण । एकाचे चार, चारींत एक पूर्ण । मुक्तानन्दा एकाच आत्म्याचेंही पण । सारे जाती भेद वर्ण ॥५८॥
विश्वकुटुंबाचें ज्ञान मिळव । विश्वाचा प्रत्येक मानव । असे तुझा बान्धव । मुक्तानंदा ॥५९॥
राग द्वेषानें जाशी जळुन । सारे मम म्हणुन । पेक्षां वसुधैवकुटुम्बक बनुन । सुखी होशी ॥२६०॥
आत्मा शुद्ध अमल । परम पुण्यशील । सर्वात्मा एक सुशील । मुक्तानंदा ॥६१॥
अल्प क्रियाकर्म भेद भिन्न । कां मानिसी त्यांतें महान । व्यर्थ मोठेपणा देऊन । कशापायीं ॥६२॥
रूढीवाद सम्प्रदायवाद निर्मिती । करी काठिण्याची प्राप्ती । न लाभे कसली तृप्ती । मुक्तानंदा ॥६३॥
सहस्त्रारमध्य अस्मानी । नीलेश्वरातें देखोनी । घेशील परम शांती पावोनि । मतभेदरहित ॥६४॥
सार्‍या देहीं राम रमतो । द्वंद्वदोष कशास तूं हुडकतो । समतेचा शांति अमृतरस तो । मुक्तानन्दा पान करी ॥६५॥
सर्व जाती रामाच्या दरबारीं । हिंदु वा मुसलमान एक तरी । धर्ममूढतेस मग कशास वरी । व्यर्थ लढाई सारी ॥६६॥
परमेश्वर वस्तु सुदाम । सर्वांसाठीं एकच दाम । अन्न जल वायु प्रकाश एकदम । सर्वांसाठीं समान ॥६७॥
पृथ्वी दे समान आधार । मुक्तानन्दा जातीभेद लढकर । मालकाचा गुन्हेगार । कां बनशी ॥६८॥
मतामतांचा गलबला । नको फसूं, उगाच हमला । अनुसरी आत्मध्यानधर्माला । परिपूर्ण जो असे ॥६९॥
जातीपाती देशभाषावाद । ह्यापरता महात्मा निर्विवाद । मार्गदशीं करूनी संवाद । मार्गदर्शक तोच खरा ॥२७०॥
देशविदेश जाती व्यक्ती । मत्सराग्नींत दग्ध होती । मुक्तानन्दा, भगवन्ताची व्याप्ती । भेदरहित ॥७१॥
फ्रान्स अमेरिका भारत पाकिस्तान । य़ूरोप रशिया चीन जपान । सारा संसार नारायणाचा सम्मान । पूर्व पश्चिम भेद व्यर्थ म्हणुन ॥७२॥
सर्व देश श्रेष्ठ । समाज सारे ना कनिष्ठ । सार्‍या व्यक्ति उत्कृष्ट । मुक्तानन्दा श्रेष्ठ बनुनि पाही ॥७३॥
मानवरचित भेदाभेद । मानवनिर्मित धर्मभेद । उच्चनीच भेद सखेद । मानवप्रेरित ॥७४॥
हिंदु मुसलमान ख्रिश्चन । ना निर्मिले परमेश्वरानं । मुक्तानन्दा सर्वां देखणें समान । पारमेश्वरी धर्म जाण ॥७५॥
तुझ्या अंतरीं वसे राम । सर्वांतरींही त्या एकासम । दुजा नसे कोणी विषम । वास करूनीही ॥७६॥
मुक्तानंदा सर्वांठायीं । समता प्रेम उपायी । समतायज्ञ करी ठायींठायीं । पारमेश्वरीय ॥७७॥
श्वान कैलासीं जाई । परी श्वानच राही । वैकुंठीं पोहचुनीही । काकः काकः बकः बकः ॥७८॥
स्वर्गांतही डुक्कर डुक्कर । मुक्तानंदा समतावान खरोखर । विषमतेंतही पावणार । समताच ॥७९॥
सुख पाहिजे सर्वत्र । तरी ह्या विषमतेंत विचित्र । समतेचें पाळी तंत्र । मुक्तानंदा ॥२८०॥
हवी असेल शांती । पाही विषमतेहुनी विपरीत ती । विषमता नरक अती । समताच स्वर्ग ॥८१॥
कुणी निंदा कुणी वन्दा तरी । मी अंतरमस्तीचा पुजारी । मुक्तानंदा ह्रदयमस्ती उमडणारी । समतेमधेंच ॥८२॥
मुक्तानंदा मानव शरीरीं । उच्चनीच विचार बहुत जरी । मुख व गुद निजांग तरी । दोन्हीही समान ॥८३॥
सदा सर्वांशीं स्नेहभाव । मुक्तानंदा मानव-रनेह-स्वभाव । पारमेश्वरीच भक्तिभाव । भक्तीचें अंग ॥८४॥
सन्त महात्मा युगीं युगीं । संभवती सर्व पंथीं उगाउगी । जगाच्या कल्याण सारेच उपयोगी । एकच लक्ष्य ठेवोनी ॥८५॥
संत महात्मा भारतीय । असती जे सर्वदेशीय़ । तेच भारताची संपत्ती होय । खरोखरी ॥८६॥
परस्परो देवो भव । सर्वत्र हीच द्दष्टी ठेव । नरनारीचा एकच स्वभाव । श्रीगुरु नित्यानंद भाव ॥८७॥
नरच नारी, नारीच नर । एका पंचतत्त्वाची कृती अम्र । अभेदयोग हा साध्य कर । मस्त राही जा ॥८८॥
एकाला मानिला मित्र । दुसर्‍याला शत्रु सर्वत्र । तिसरा अबन्धु मात्र । न जाणिलें स्वतःला ॥८९॥
मुक्तानंदा स्वतःतें जाणी । अंतरीं बाहेरी आणि । तुझेंच गोत्र गणी । अभेदभावानें ॥२९०॥
शील धन वर्ण सत्तादि भेद । मानवकल्पित लौकिक संपद । परमात्माप्रेमानेंच, मुक्तानंद । खरीदला जातो ॥९१॥
हवी महामस्तानी-अन्तरमस्ती । मुक्तानंदा करी स्वतःवर प्रेम प्रीती । अंतर-प्रीती-उमंग-प्रतीती । बाहेरही नित्यानंद प्रचीती ॥९२॥
सूर्य प्रकाशे प्रेमानें । चंद्रही पाडे शीतल चांदणें । गगनीं मेघांचें वर्षणें । सारें कांहीं परम प्रीतीनें ॥९३॥
मुक्तानंदा लाधतां गुरुप्रेमामृत । कुण्डलिनी होते जागृत । बने क्रियाशील क्रियान्वित । गुरुप्रेमयोगानें ॥९४॥
आपुल्या अन्तराकाशीं । मधुरतम प्रेममहारसीं । मुक्तानंदा तींत न नाहशी । निंदा गटारगंगी कशाला ॥९५॥
प्रेम बनुं दे निज जीवन । प्रेमच देवदेवता पूजन । लागुं दे प्रेमाचेंच व्यसन । मुक्तानंदा ॥९६॥
प्रेमव्यसन जोंवरी । नसे तोंवरी । मानवही खरोखरी । तूं नाहीं ॥९७॥
सर्वत्र आत्मवत् प्रेम करी । राखी निष्कामता पूरी । मुक्तानंदा निष्काम प्रीती खरी । पूजा ठरेल ॥९८॥
नारीस स्त्री समजुनी । भयभीत झालास जीवनीं । मुक्तानन्दा नारीस देखतां नारायणी । निर्भयता पावलास ॥९९॥
विधवा अथवा सधवा । नारायणीच छोटी मोठी वा । लक्ष्मी सरस्वतीचा मानावा । अंश सारा ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP