आर्य ब्राह्यणांनीं कसला जरी गुन्हा केला, तरी त्याच्या केसालाही धक्का न लावतां त्यास हद्दपार मात्न करावें म्हणजे झालें. ब्राह्यणांनीं आपली सेवाचाकरी शुद्रांस करावयास लावावें, कारण देवाजीनें शूद्रास ब्राह्यणाची सेवा करण्याकरितांच उत्पन्न केलें आहे. जर ब्राह्यणानें एखाद्या शूद्रास आपल्या कांहीं नाजुक कामांत उपयोगी पडल्यावरून, स्वतःच्या दास्यत्वापासून मुक्त केलें, तर त्यास पाहिजेल त्या दुसर्या भटब्राह्यणांनीं पकडून आपलें दास्यत्व करावयास लावावें. कारण देवाजीनें त्यास त्यासाठींच जन्मास घातलें आहे. ब्राह्यण उपाशीं मरूं लागल्यास त्यानें आपल्या शूद्र दासाचें जें काय असेल, त्या सर्वाचा उपयोग करावा. बिनवारशी ब्राह्यणाची दौलत राजानें कधीं घेऊं नये, असा मूळचा कायदा आहे. परंतु बाकी सर्व जातीची बिनवारशी मालमिळकत पाहिजे असल्यास राजानें घ्यावी. ब्राह्यण गृहस्थांनीं जाणूनबुजून गुन्हे केले, तरी त्यांस त्यांच्या मुलांबाळांसह त्यांची जिनगीसुद्धां त्यांबरोबर देऊन फक्त हद्दपार करावें. परंतु तेच गुन्हे इतर जातीकडून घडल्यास त्यांस त्यांच्या गुन्ह्याच्या मानाप्रमाणें देहांत शिक्षा करावी. ब्राह्यणाचे घरीं शूद्रास चाकरी न मिळाल्यास त्यांची मुलेंबाळें उपाशीं मरूं लागल्यास त्यांनीं हातकसबावर आपला निर्वाह करावा. अक्कलवान शूद्रानेंही जास्ती दौलतीचा संचय करूं नये,कारण तसें केल्यापासून त्याला गर्व होऊन तो ब्राह्यणाचा धिःकार करू लागेल. ब्राह्यणानें शूद्रापाशीं कधींही भिक्षा मागू नये. कारण त्या भिक्षेच्या द्रव्यापासून त्यानें होमहवन केल्यास तो ब्राह्यण पुढल्या जन्मीं चांडाळ होईल. ब्राह्यणानें कुतरे, मांजर, घुबड अथवा कावळा मारला, तर त्यानें त्याबद्दल शूद्र मारल्याप्रमाणें समजून चांद्रायण प्रायश्चित केलें म्हणजे तो ब्राह्यण दोषमुक्त होईल. ब्राह्यणांनी बिनहाडकांचीं गाडाभर जनावरें मारलीं अथवा त्यांनीं हाडकांच्या हजार जनावरांचा वध केला असतां, त्यांनीं चांद्रायण प्रायाश्चित घेतलें म्हणजे झालें. शूद्रांनीं आर्यब्राह्यणास गवताचे काडीनें मारिलें, अथवा त्याचा गळा धोतरानें आवळला, अथवा त्यांना बोलतांना कुंठित केलें, अथवा त्यास धिःकारून शब्द बोलले असतां, त्यांनीं ब्राह्यणाचे पुढें आडवें पडून त्यांपासून क्षमा मागावी." याशिवाय शूद्राविषयीं नानाप्रकारचें जलमी लेख आर्य ब्राह्यणांचे पुस्तकांतून सांपडतात, त्यांपैकीं कित्येक लेख येथें लिहिण्याससुद्धां लाज वाटते. असो, यानंतर आर्य लोकांनीं, आपल्या हस्तगत करून घेतलेल्या जमिनीची लागवड सुरळीत रीतीनें करण्याचे उद्देशानें द्स्यू लोकांपैकीं प्रल्हादासारख्या कित्येक भेकड व धैर्यहीन अशा लोकांनीं स्वदेशबांधवांचा पक्ष उचलून आर्य ब्राह्यणांशीं वैरभाव धरून तदनुरूप आरंभापासून तों शेवटपर्यत कधींही हालचाल केली नाहीं. त्यांस गांवोगांवचे कुळकर्ण्याचें कामावर मुकरर करून आपले धर्मांत सरतें करून घेतलें. यावरून त्यांस देशस्थ ब्राह्यण म्हणण्याचा प्रघात पडला आहे, कारण देशस्थ ब्राह्यणांचा अ येथील मूळच्या शूद्र लोकांच्या रंगरूपाशीं, चालचलणुकीशीं व देव्हार्यावरील कुळस्वामीशीं बहुतकरून मेळ मिळतो व दुसरें असें कीं, देशस्थ व कोकणस्थ ब्राह्यणांचा हा काळपावेतों परस्परांशीं बेटी व रोटी व्यवहारसुद्धां मुळींच होत नव्हता. परंतु कालच्या पेशवेसरकारांनीं देशस्थ ब्राह्यणांबरोबर रोटीव्यवहार करण्याचा प्रघात घातला. सदरची व्यवस्था अमलांत आगून आर्य ब्राह्यण येथील भूपति झाल्यामुळें त्यांचा बाकीचे सर्व वर्णाचे लोकांवर पगडा पडून त्यांस अठरा वर्णांचे ब्राह्यण गुरु म्हणूं लागले व त्यांनीं स्वतः ’स्वर्गपाताळ एक करून सोडल्यानंतर ’ आतां कांहीं कर्तव्य राहिले नाहीं, अशा बुद्धीनें ताडपत्नें नेसून, छातीवर तांबडी माती चोळून, दंड थोपटण्याचे विसरून त्याबद्दल स्नानसंध्या करून, अंगावर चंदनाच्या उटया लावून, कपाळावर केशर, कस्तुरीचे टिळे रेखून, स्वस्थ बसून मौजा मारण्याचा क्रम आरंभिला.त्यांपैकीं कोणी भांगेच्या तारेंत नानाप्रकारचे अपस्वार्थी ग्रंथ करण्याचे नादांत, कोणी योगमार्ग शोधून काढण्याचे खटपटींत पडून, बाकी सर्वांनीं आपआपसांत एकमेकांनीं एकमेकांस "अठरा वर्णांमध्यें ब्राह्यण गुरु श्रेष्ठ " म्हणण्याचा प्रचार सुरू केला. त्याच सुमारास येथील जंगल ( ज्यू ) फिरस्ते बकालांनीं आपला धर्म स्वीकारावा, म्हणून आर्य ब्राह्यणांनीं त्यांचा पाठलाग केला. यावरून त्यांनीं संतापून आर्यांचे विरुद्ध नानाप्रकारचे ग्रंथ करून आर्य धर्माची हेळणा करण्याकरितां एक निराळाच धर्म झाला असावा. नंतर आर्यब्राह्यणांच्या स्वाधीन झालेल्या येथील एकंदर सर्व क्षुद्र शेतकरी दासांचा, त्यांनीं सर्वोपरी धिःकार करण्याची सुरुवात केली. त्यांस आज दिवसपावेतों राज्य व धर्मप्रकरणीं आर्य ब्राह्यण इतके नागवितात कीं, त्यांच्यापेक्षां अमेरिकेंतील जुलमानें केलेल्या हप्शी गुलामांचीसुद्धां अवस्था फार बरी होती, म्हणून सहज सिद्ध करितां येईल. यथापि अलीकडे कांहीं शतकांपूर्वी, महमदी सरकारास त्यांची दया येऊन त्यांनीं या देशांतील लक्षावधि शूद्रादि अतिशूद्रांस जबरीनें मुसलमान करून त्यांस आर्य धर्माच्या पेचांतून मुक्त करून, त्यांस आपल्या बरोबरीचे मुसलमान करून सुखीं केलें. कारण त्यांपैकी कित्येक अज्ञानी मुसलमान मुल्लाने व बागवान आपल्या लग्नांत येथील शूद्रादि अतिशूद्रासारखे संस्कार करितात, याविषयीं वहिवाट सांपडते. त्याचप्रमाणें पोर्तुगीज सरकारनें या देशांतील हजारों शूद्रादि अतिशूद्रांस व ब्राह्यणांस जुलमानें रोमन क्याथलिक खिस्ती करून त्यांस आर्याचे कृत्निमी धर्मापासून मुक्त करून सुखी केलें. कारण त्यांच्यामध्यें कित्येक ब्राह्यण शूद्रांसारखीं गोखले, भोंसले, पवार वगैरे आडनांवाचीं कुळें सांपडतात. परंतु हल्लीं अमेरिकन वगैरे लोकांच्या मदतीनें, या देशांतील हजारों हजार गांजलेल्या शूद्रादि अतिशूद्रांनीं, ब्राह्यणधर्माचा धिःकार करूण, जाणूनबुजून खिस्ती धर्माचा अंगिकार करण्याचा तडाखा उडविला आहे, हें आपण आपल्या डोळयानें ढळढळीत पहात आहों. कदाचित् सदरच्या शूद्रादि अतिशूद्रांच्या दुःखाविषय़ीं तुमची खात्नी होत नसल्यास, तुह्यी नुकतेंच अलीकडच्या दास शेतकर्यांपैकीं सातारकर शिवाजी महाराज, बडोदेकर दमाजीराव गायकवाड, ग्वालेरकर पाटीलबुवा, ईदूरकर लाख्या बारगीर, यशवंतराव व विठोजीराव होळकरासारख्या खडे बडे रणशूर राजेरजवाडयांविषय़ीं, थोडासा विचार करून पाहिल्याबरोबर, ते अक्षरशून्य असल्यामुळें त्यांजवर व त्यांच्या घराण्यांवर कसकसे अनर्थ कोसळले हें सहज तुमचे लक्षांत येईल; यास्तव त्याविषयीं तूर्त येथें पुरें करितों. असो, येथील छप्पन देशांतील राजांनीं सदरचे लोकसत्तात्मक राज्याची कांस सोडिली व त्यामुळें आर्य ब्राह्यणांनी द्स्तू वगैरे लोकांची वाताहात करून हा काळपावेतों त्यांची अशी विटंबना करीत आहेत, हें त्यांच्या कर्मानुरूप त्यांस योग्य शासन मिळालें, यांत कांहीं संशय नाहीं, तथापि इराणा-पलीकडील ग्रीशियन लोकांनीं, पहिल्यापासून प्रजासत्तात्मक राज्य आपल्या काळजापलीकडे संभाळून ठेविलें होतें. पुढे जेव्हां इराणांतील मुख्य बढाईखोर " झरक्सिस " यानें ग्रीक देशाची वाताहात करण्याकरिता मोठया डामडौलानें आपल्याबरोबर लक्षावधि फौज घेऊन, ग्रीस देशाचे सरहद्दीवर जाऊन तळ दिला, तेव्हां स्पार्टा शहरांतील तीनचारशें स्वदेशाभिमानी शिपायांनीं रात्निं एकाएकीं थरमाँपलीच्या खिंडींतून येऊन त्यांचे छावणीवर छापा घालून त्यांच्या एकंदर सर्व इराणी फौजेची त्नेधात्नेधा करून, त्यांस परत इराणांत धुखकावून लाविलें-हा त्यांचा कित्ता इटाली देशांतील रोमन लोकांनीं जेव्हां घेतला, तेव्हां ते लोक प्रजासत्तात्मक राज्याच्या संबंधानें एकंदर सर्व युरोप, एशिया व आफ्रिका खंडांतील देशांत विद्या, ज्ञान व धनामध्यें इतकें श्रेष्ठत्व पावले कीं, त्यांच्यामध्ये मोठ्मोठे नामांकित वक्त्ते व सिपियोसारखे स्वदेशाभिमानी योद्धे निर्माण झाले. त्यांनीं आफ्रिकेंतील हनीबॉलसारख्या रणधीरांचा नाश करून तेथील एकंदर सर्व लोकांस यथास्थित शासन केलें. नंतर त्यांना पश्चिम समुद्रांत ग्रेट ब्रिटन बेटांतील. अंगावर तांबडयापिवळया मातीचा रंग देऊन कातडीं पांघरणार्या रानटी इंग्लिश वगैरे लोकांस, वस्त्नपात्नांचा उपयोग करण्याची माहिती करून देऊन, आपल्या हातांत चारपांचशे वर्षे छडी घेऊन त्या लोकांस प्रजासत्तात्मक राज्याचा धडा देऊन वळण लावीत होते; तों इकडे रोमन सरदारांपैकी महाप्रतापी ज्युलीयस सीझरनें आपल्या एकंदर सर्व कारकीर्ढीत सहा लक्ष रोमन शिपायांस बळी देऊन अनेक देशांतील पीढीजादा राजेरजवडयांवर वर्चस्व बसविल्यामुळें, त्याच्या डोळयावर ऐश्वर्याची इतकी धुंदी आली कीं, त्यानें आपल्या मूळ प्रजासत्तत्मक राज्यरूप मातेवर डोळे फिरवून, तिच्या सर्व आवडत्या लेकरांस आपले दासानुदास करून, आपण त्या सर्वांचा राजा होण्याविषयीं मनामध्ये हेतु धरिला. त्या वेळेस तेथील महापवित्न स्वदेशाभिमानी, ज्यांना असें वाटलें कीं, या राज्यसत्तात्मकतेपासून पुढे होणारी मानहानी आमच्यानें सहन होणार नाहीं, त्यांपैकीं ब्रूटस नांवाचा एक गृहस्थ, आपल्या हातांत नागवा खंजीर घेऊन, ज्युलियस सीझर प्रजासत्तात्मक राज्यमंदिराकडे सिंहासनारूढ होण्याचे उद्देशानें जात असतां, वाटेमध्यें त्याचा मार्ग रोखून उभा राहिला. नंतर ज्युलियस सीझर यानें आपल्या मार्गांनें आडव्या आलेल्या ब्रुटसाच्या डोळयांशीं डोळा लावल्याबरोबर मनामध्यें अतिशय खजिल होऊन, आपल्या जाम्याच्या पदरानें तोंड झांकतांच, ब्रूटसानें आपल्या स्वदेशबांधवांस भावी राज्य्सत्तात्मक शृंखले पासून स्वलंब करण्यास्तव परस्परामध्यें असलेल्या मित्न्त्वाची काडीमात्न पर्वा न करितां, त्याच्या ( ज्युलियस सीझरच्या ) पोटांत खंजीर खुपसून, त्याचा मुरदा धरणीवर पाडला. परंतु ज्यलियस सीझरनें पूर्वी सरकारी खजिन्यांतील पैसा बेलगामी खर्ची घालून सर्व लोकांस मोठमोठाल्या मेजवान्या दिल्या होत्या, त्यामुळे तेथील बहुतेक ऐषाअरामी सरदार त्याचे गुलाम झाले होते, सबव पुढे चहूंकडे भालेराई होऊन, तेथील प्रजासत्तात्मक राज्याची इमारत कोसळून, बारा सीझरांचे कारकीर्दीचे अखेरीस रोमन लोकांच्या वैभवाची राखरांगोळी होण्याच्या बेतांत रोमो लोक, इंग्लिश वगैरे लोकांस जागचे जागीं मोकळे सोडून, परत आपल्या इटाली देशांत आले. परंतु त्याच वेळीं इंग्लिश लोकांचे आसपास स्कॉच, स्याक्सन वगैरे लोक अट्टल उत्पाती असल्यामुळें त्यांनीं एखाद्या बावनकशी सुवर्णामध्यें तांब्यापितळेची भेळ करावी, त्याप्रमाणें, त्या प्रजासत्तात्नंक राज्यपद्धतीमध्यें वंशपरंपराधिरूढ वडे लोकांची व राजांची मिसळ करून, त्या सर्वांचे एक भलेंमोठें तीन धान्यांचे गोड मजेदार कोडबुळें तयार करून, सर्वांची समजूत काढली. त्या देशांत जिकडे तिकडे डोंगराळ प्रदेश असल्यामुळें लागवड करून सर्वांचा निर्वाह होण्यापुरती जमीन नसून. थंडी अतिशय; सबव तर्हे-तर्हेच्या कलाकौशल्य व व्यापारधंद्याचा पाठलाग करितांच, ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकंदर सर्व बेटांसह चार खंडांत विद्या, ज्ञान व धन संपादन करण्याचे कामीं अग्रगण्य होत आहेत, तों इकडे आरबस्थानांतील हजरत महमद पैगंबराचे अनुयायी लोकांनी इराणांतील मूळच्या आर्य लोकांच्या राज्य वैभवासह त्यांची राखरांगोळी करून, या ब्राह्यणांनीं चावून चिपट केलेल्या अज्ञानी हिंदुस्थानांत अनेक स्वार्या करून हा सर्व देश आपल्या कबजांत घेतला.