॥अभंग ॥
काया पुरती लंगोटी । फिरती नांगराचे पाठीं ॥१॥
एका घोंगडयावांचूनी ॥ स्त्रिया नसे दुजे शयनीं ॥२॥
ढोरामागें सर्वकाळ । पोरें फिरती रानोमाळ ॥३॥
ताक कण्या पोटभरी । धन्य म्हणें तो संसारी ॥४॥
असे वस्त्रांची कमती । एकमेकां चिकटतीं ॥५॥
सरकारी पट्टी नेट । पडें तीन शेंडया गांठ ॥६॥
कर्जरोखीं लिहिणें आट । निर्दय मारवाडी काट ॥७॥
आज्ञान्याला समजत नाहीं । कुळकर्ण्यानें लिहिलें कांहीं ॥८॥
वकीलाची माहागाई । न्यायाधिशा दया नाहीं ॥९॥
पापपुण्य़ जेथें नाहीं । पैशापुरते दादा भाई ॥१०॥
नित्य जमती एका ठायीं । शूद्रांची दाद नाहीं ॥११॥
राजे धर्मशील म्हणविती । आतां कारे मागे घेती ॥१२॥
विद्या द्यावी पटटीपुरती । धि:कारुनी सांगे जोती ॥१३॥

भटांच्या मतलबी ग्रंथाचें कसब याविषयीं
॥अभंग॥
लेपाच्या उबीत आंगमोड देई ॥ झॊंप येत नाहीं ॥ आळशास ॥१॥
दंव थबथबी शेतीं बांधावरी ॥ बैलास तो चारी ॥ शुक्रोदयीं ॥२॥
ऊन पाणी नित्य सोंवळयाचा थाट ॥ संध्येसाठीं पाट ॥ मौन्य सुख ॥३॥
नीटनेट करी गाडया आऊतासीं ॥ तुटक्या दोरासी ॥ चार गाठी ॥४॥
पायीं चर्मी जोडा नि-याचे घोतर ॥ पगडीचा भार ॥ दुजी वस्त्रें ॥५॥
उघडा तो बंब लंगोटया बाहदर ॥ चिंध्या डोईवर ॥ घोंगडीच्या ॥६॥
अन्नशुद्विमिषें तुप भातावर ॥ करी चेष्टाचार ॥ चित्राहूती ॥७॥
जोंधळयाच्या कण्या ताक पोटभरी ॥ सुखा नाहीं थोरी ॥ नांग-याच्या ॥८॥
टेकुनी लोडाशीं काम लिहिण्याचें ॥ बोल दिमाखाचे ॥ रेडा जैसा ॥९॥
अनवाणी पाय मूठ नांगरास ॥ हाकी बैलास ॥ गीत गात ॥१०॥
ताट पिकदाणी तेजाळ समयी ॥ द्विज झॊंप घेई ॥ बिछान्यांत ॥११॥
कोरडी तंबाखू चुन्यासवें खाई ॥ गोड झॊंप घेई ॥ घोंगडींत ॥१२॥
अवयव बुद्वि दोघांस सारखी ॥ ब्राह्यण का सुखी ॥ झाला ऐसा ॥१३॥
सत्तेच्या मदानें विद्या बंद केली ॥ शूद्रांनी मानिली ॥ बंदी सदा ॥१४॥
मनु तो जळाला इंग्रजी बा झाली ॥ ज्ञानाची माऊली ॥ पान्हा पाजी ॥१५॥
आतां तरी तुम्हीं मागे घेऊं नका ॥ धि:कारुनी टाका ॥ मनूमतां ॥१६॥
विद्या शिकतांच पावाल तें सुख ॥ घ्यावा माझा लेख ॥ जोती म्हणे ॥१७॥

भटांचे कसब आणि शूद्रांचा देवभॊळेपणा याविषयीं.
॥अभंग॥
रडूं लागे शेजा-याशीं ॥ आसूं नाहीं डोळे पुसी ॥१॥
मोल घेई रडूं लागे ॥ बहुरुपी आणी सोंगे ॥२॥
सर्वसाक्ष जगत्पती ॥ त्याला नको मध्यस्ती ॥३॥
विटाळसा तोडी ताल ॥ करी पुजा घेई मोल ॥४॥
मुढा देऊनियां थाप ॥ पापी करितो बा जप ॥५॥
वकीलाला चाड नाहीं ॥ कर्ता आमुचा सर्वन्यायी ॥६॥
त्राता सर्वाला सारखा ॥ नाहीं कोणाला पारखा ॥७॥
भोंदू भट शुद्रांघरीं ॥ देई थापां पोटभरी ॥८॥
ऐका जोतीबाचा सार ॥ घाला देवाजीवर भार ॥९॥
-समाप्त-

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP