पोवाडा - पेशवाई दक्षिणा

भाटकामगार इंजिनियर खात्यांत कशी पेंढारगर्दी करितात, याविषयीं.

पेशवाई दक्षिणा रमणा इंजिनियर खातीं ।
भरिती होळकरी पोतीं ॥ध्रु० ॥
भीक मागतां लाज न वाटे घरोघरी फिरती । आळसी धर्माआड लपती ॥
बिगार्‍यांचा धंदा मतलबी नीच मानिती । खुशामत करिती किती ॥
ब्राह्मणाचें कसब लिहिणें कारकुन्या करिती । कुणब्या दिवसा नाडीती ॥
हाजरी पुस्तक हातीं घेऊन फैलांवर जाती । हाजेर्‍यामौजेनें घेती ॥
बिन फीचे मजूर पाहून हाकलून देती । नाहीं तो दोष लाविती ॥
चाल॥
मेस्त्रिला धमक्या देऊन ॥ कानावर पगडी चढवून ॥ सोंग बिगार्‍यादावून ॥
उभा राही दूर जाऊन ॥ पांढरे डोळे करुन ॥ बोले दांत खाऊन ॥
चाल ॥ दूर सोडून फैलास ॥ मेस्त्री नेती बाजूस ॥ शुरुं कानगोष्टीस ॥
चाल॥
पाजिल हजर्‍याभरल्या नांवे वाचुन दाविती ॥ आढावा वरचेवर पाहती ॥
बिगार्‍याची घोंगडी, दादा आसनावर बसती ॥ भरिती होळकरी पोतीं ॥१॥
पांडया दिवस बारा सार्‍यामहिन्यामधीं भरती । बाकी अठरा आपल्या हातीं ॥
आठ दिवस खंडयाचे बाकीचे सात सोबती । शिलक बेवीसा भरती ।
तुझ्या घरचीं सर्व माणसें पगारा पुरतीं । पावली दर त्यांच्या हातीं ॥
सर्व बायका पोरीवजा सव्वीस दिन असती । उरली शिलक मोजिती ॥
राण्या, नान्या, पोरें नव्हतीं दो दिवसां वरतीं । भरती आगाउ फी पुरतीं ॥
रोजी बैल दिवस दाहा नाहीं महिन्याला कमती । तीच रे भिस्त्याची गति ॥
चाल॥
आम्ही जातीचे ब्राह्यण ॥ अति लाचारी घेऊन नातें धर्माचें दाऊन ॥
मोहिती हळूच सांगून ॥ नजर सरकारी चुकवून ॥ करावें आमचें पाळण ॥
चाल॥
बांधून धोतर कंबरेस । झटती कसे चाकरीस ॥ टळेना नित्यनेमास ॥
चाल॥
आठ वाजल्या वेळ झाला घोडयावर बसती । घरचा रस्ता धरिती ॥
परतुनी येतां नित्य मळयांवर धाडा घालिती । भरिती होळकरी पोतीं ॥२॥
मेस्त्रिच्या जिवलग गडण्या धुंडून काढिती । त्यांच्या हजेर्‍यामांडिती ॥
घोडयापुरता गडी देऊन त्यास रिझविती । भुताला सहज आळविती ॥
पोकळ मेस्त्रि म्हणतां म्हणतां नाग्या फुगविती । चढविती वेळूंच्या वरती ॥
मधींच कधीं भोजन देऊन मिंधा करिती । कसी पाहा संधि साधिती ॥
जेऊं घालतां स्त्री सूचवी सरपणाची कमती । पतीला सोडून कळविती ॥
भाजीपाल्या आग लागली खेडयाची वस्ती ।लिंबे लोणच्या पुरतीं ॥
चाल॥
वाढिती फार दुरुन ॥ सोंवळे चाव करुन ॥ गोविती गोड बोलून ॥
भोजनीं नादीं लावुन ॥ साधिती कसें भॊंदून ॥ घेति जागा सारवून ॥
चाल॥ डागितों पाहून वर्मास ॥ सोडा ह्या नीच कर्मास ॥
आग लागो या धर्मास ॥चाल॥ संकत पडतां हळूच मेस्त्री तोंडाशीं देती ।
निराळे बाजूला होती ॥ मेस्त्रिला लळा लावुन गळा कापिती ॥ भरिती होळकरी पोतीं ॥३॥
गवताकरितां नित्य बिगारी घोडयाची भरती । पाळिनें घोडे खाजविती ॥
फैलामधून शूद्र बायका भांडी घांसिती । बिगारी बिछाने करिती ॥
वेडसरसा कुणबी पाहून पाय दाबिवती । मजेनें झॊंपा मारिती ॥
स्वजातीचे भिक्षूक ब्राह्यण फैलावर नेती ॥ भिक्षा गाठून देविवती ॥
मिळकतीचे वांटे हुजूर सोबत्यांना देती । समजूत वरच्यावर करिती ॥
दप्तरदारा हप्ते बांधून भेटीला जाती । शिपायां विडयास बोलाविती ॥
चाल॥
ठेपलें गोरें येऊन ॥ कचेरी तंबू घेऊन ॥ थकले शिकार खेळून ॥
कागदीं सह्या करुन ॥ भटावर बाकी सोंपून ॥ विसावा ग्लास घेऊन ॥
चाल॥ शोभती खासे कोचास ॥ वाचिती न्युजपेपरास ॥ मान पाहा मधीं डुकलीस ॥
चाल॥
बिगा-यांच्या कोंबडया वगैरे सामानाची भरती । पैसा मधींच कीं खाती ॥
बुटलेराच्या हातून गोर्‍याजुलाब करविती । भरिती होळकरी पोतीं ॥४॥
नुकसानीचा पैसा माती भरीस घालिती । दाखला फिगरेठी लिहिती ॥
लूट धुमाळी पैसा आठवण रमण्याची होती । रपोटीं मेळ मिळविती ॥
खजिन्यामधीं पैसा सरतां कर योजिती । हाडे कुणब्यांची पिळीती ॥
कर्मनिष्ठ चाकर बनले लक्षाधीपती । बुधली कुणब्याची वरती ॥
टोपीवाल्या गुह्य कळतां राजिनामे देती । हवेल्या तीन मजली करती ॥
न्यायशील म्हणवितां आतां तुम्हीं आमचे भूपती । दया नाहीं शूद्रांची चित्तीं ॥
चाल॥ अनुभव स्वतां लक्षून ॥ सांगतों खरें निक्षून ॥ सर्व जाती निवडून ॥
घ्याव्या संख्या प्रमाण ॥ द्यावीं कामें नेमून ॥ होईल सुख साधन ॥
चाल॥
घालितों पदरीं चुकीस ॥ नेमितां एका जातीस ॥ प्रवेश नाहीं शूद्रांस ॥
चाल॥
एक जातीचे सर्व मिळून देशा नाडिती । बाकीचे तोंडाकडे पहाती ॥
जोतीराव बोधी करुं नये एक जात भरती । भरती होळकरी पोतीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP