शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ४
शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.
लढे रांगणी विशालगडी घेई पन्हाळयास ।
केले मग शुरु खंडणीस ॥
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास ।
नेमिला कोल्हापूरास ॥
स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास ।
आला थेट पन्हाळयास ॥
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस ।
अती जेर केलें त्यास ॥
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास ।
परत मग आला गडास ॥
राजापुर दाभॊळ लुटी भरी खजीन्यास ।
मात गेली विजापुरास ॥
सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस ।
सांवत सिद्दी कुमकेस ॥
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळयास ।
करी मग जमा बेगमीस ॥
वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास ।
केले महाग दाण्यास ॥
त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस ।
कोंडिलें गडी फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास ।
योजना करी उपायास ॥
कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास ।
उपद्रव झाला रयतेस ॥
पासलकर बाजीराव पडले वाडीस ।
दु:ख मग झालें शिवाजीस ।
सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास ।
खुशाल गेला भेटीस ॥
वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास ।
कच्चा मग ठेवी तहास ॥
सिद्दीस लाडी गोडी मधीं मान डुकलीस ।
गेला थाप देऊन गडास ॥
सिद्दया पोटीं खष्याली जाई झोपीं सावकास ।
हयगय झाली जप्तीस ।
तो शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस ।
फसविलें मुसलमानास ॥
सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमु-यास ।
स्वारदळ लावी पाठीस ॥
चढत होता खींड शिवाजी गांठलें त्यास ।
बंदुका लावी छातीस ॥
बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास ।
एकटा गेला रांगण्यास ॥
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस ।
हरवी नित्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास ।
धन्य त्याच्या जातीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास ।
खवळला बाजी युद्वास ॥
अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास ।
पडला परभू भूमीस ॥
तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस ।
अंती मनी हाच ध्यास ॥
बार गडीं ऐकून सुखी ह्यणे आपल्यास ।
नीधून गेला स्वर्गात ॥
सय्यद मार्गे सरे जागा देई बाजीरावास ।
पाहून स्वामीभक्तीस ॥
विजापुरी मुसलमान करी तयारीस ।
खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे दिले घेई बहूं किल्ल्यांस ।
वश करी चाचे लोकांस ॥
दळव्यांची लढून घेई शृंगारपुरास ॥
मारलें पाळेगारांस ॥
लोकप्रीतीकरितां करी गुरु रामदासास ।
राजगडीं स्थापी देतीस ॥
मिष्ट अन्नभोजन दिलें सर्वा बक्षीस ।
केली मग मोठी मजलस ॥
तानसेनी भले गवघ्या बसवी गायास ।
कमी नाहीं तालस्वरास ॥
॥चाल॥
जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाहि हिमानी ॥
सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥
छोटे भाइकूं हूल दिया । बडे भाइकी जान लिया ॥
छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥
मजला भाई भगादिया । आराकानमें मारा गया ।
सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलिया ॥
भाईबंदकू इजा दिया । रयत सब ताराज किया ।
मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥
आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥
बेर हुवा करो सलामी । हिंदवाणी गाद नामी ॥
॥चाल॥
आदी अंत [न] सर्वां कारण ॥
जन्ममरंण । घाली वैरण ॥
तोच तारण । तोच मारण ॥
सर्व जपून । करी चाळण ॥
नित्य पाळण । लावी वळण ॥
भूती पाहून । मनीं ध्याइन ॥
नांव देऊन । जगजीवन ॥
सम होऊन । करा शोधन ॥
सार घेऊन । तोडा बंधन ॥
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा ॥
घई मुजरा शाई [रा] चा ॥
सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP