श्रीगणेशाय नमः
॥ श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥
जेंवस्तुवेदांतवदप्रतिपाद्य ॥ जें अनादित्वें जगदाद्य ॥ जें वंद्याहि परमवंद्य ॥ तो वंदिला सिद्धविनायकु ॥१॥
सुखाचें मस्तक प्रचंड ॥ हारुषाचें वोतिलें तोंड ॥ झेलित आनंदाची सोंड ॥ एकत्वें अखंड एकदंतु झळके ॥२॥
ज्ञानतेजें सतेज परशु ॥ अखंड स्मरणाचा अंकुशु ॥ अभयवरदें अतिविश्वासु ॥ स्वानंदाचा सुरसु लाडू देशी ॥३॥
प्रकृति पुरुष चरण दोन्ही ॥ तळीं घालिसी एकपणीं ॥ तयावरी सहजासनीं ॥ अगम्यगुणीं शोभसी ॥४॥
त्यामाजीं चराचर रहिवासु ॥ जो सकळ गणांचा निजईशु ॥ तो वंदिला श्रीगणेशु ॥ परमार्थविलासु ग्रंथार्थी दावी ॥५॥
सारासारविभाग जनीं ॥ जें विवेकें दावी प्रबोधुनी ॥ ते वंदिली शारदा जननी ॥ असार जिचेनी निजसार ॥६॥
शुक्लांबर सुवासी ॥ चिदंबर झळके कांसेसी ॥ चिद्रत्नें सेवी अहर्निशीं ॥ तये परमंहसीं आरुढ ॥७॥
स्वखर्ण शब्दांत वीणा ॥ वेदार्थाची पोथीजाणा ॥ तुझिये कृपादृष्टीचा पान्हा ॥ सबाह्य कविजनां निवविसी ॥८॥
वाच्य वाचक वचन ॥ वाग्देवता जाली आपण ॥ तिचे नमस्कारितां चरण ॥ ज्ञानविज्ञान प्रकाशे स्वयें ॥९॥
यापरी वाग्देवता ॥ शब्दीं वदवी निः शब्दता ॥ अक्षरीं दाव , अक्षरार्था ॥ साह्य परमार्था सर्वदा ॥१०॥
आतां वंदूं कुळदेवता ॥ जे कां एकवीरा एकनाथा ॥ तिचेनी नांवे मी ही कविता ॥ अतिश्लाघ्यता जंवमानी ॥११॥
तंव नांव रुप गुण वार्ता ॥ उरों नेदी कुळदेवता ॥ निर्दाळुनि कवित्वअहंता ॥ एकात्मता भजनें भजवी ॥१२॥
भजतां कुळदेवता केवळ ॥ तंव कुळशील केलें अकुळ ॥ भज्य भजनचि मूळ ॥ केलें निर्मूळ मूळान्वयें ॥१३॥
यापरी एकनाथा ॥ एकत्व दे निजभक्त ॥ अर्थ स्वार्थ परमार्था ॥ मुख्यत्वें अद्वैतामाजीं मिरवी ॥१४॥
यापरी ते जगदंबा ॥ अकुळें आणिली कुळासी शोभा ॥ ते वंदिली ग्रंथारंभा ॥ कवित्वकदंबा जीवन ॥१५॥
आतां वंदूं निजसज्जन ॥ जे दीनदयाळ चातकघन ॥ ज्यांसी जन वन विजन ॥ समसमान समत्वें ॥१६॥
सर्वसमन समतें ॥ हेंचि भांडवल संतांतें ॥ तेणें भांडवलें जे पुरते ॥ ते परब्रह्मातें आकळिती ॥१७॥
संत कृपा करिती जेथें ॥ परमानंदु प्रकटे तेथें ॥ यालागीं निज संतातें ॥ वित्तें जीवितें अनन्य ॥१८॥
संतांसी जो अनन्य शरण ॥ त्यासी ओंविळें शिवपण ॥ ऐसा होय परम पावन ॥ संतभजन केलिया ॥१९॥
सेवितां संतचरणतीर्था ॥ तीर्थे पायवण्या वोडविती माथा ॥ चहुं मुक्तीतें हाणे लाथा ॥ ते संत कृपार्था वंदिले ॥२०॥
आतां वंदू श्रीजनार्दन ॥ ज्याचें नाम निर्दळी नामाभिमान ॥ जिवाचें नुरे जीवपण ॥ सद्भावें आठवण करितांचि ॥२१॥
साचार जालिया आठवण ॥ आठवा नाठवा बोळवण ॥ कामक्रोधाचें निर्दळण ॥ नामस्मरण केलिया ॥२२॥
अगाध श्रीजनार्दननाम ॥ समूळ उडवी कर्माकर्म ॥ लाजा लोपती धर्माधर्म ॥ प्रपंचपरब्रह्म एकत्वें प्रकटे ॥२३॥
वंदितां श्रीजनार्दनचरण ॥ जन्ममरणांसी ये मरण ॥ ज्यासी झालिया अनन्यशरण ॥ ब्रम्ह परिपूर्ण स्वयें होती ॥२४॥
लिंगदेहाचें मर्दनें ॥ तेंचि जनासी अर्दन ॥ यालागी नांव जनार्दन ॥ करी गर्जना वेदांनुवादु ॥२५॥
यापरी श्रीजनार्दनु ॥ करतळामळक करी विज्ञानु ॥ त्या करतळामळकाचें व्याख्यान ॥ करावया आपण प्रेरक झाला ॥२६॥
ग्रंथपीठिकेचें रुप ॥ बारा श्लोकीं चित्स्वरुप ॥ परमानंदे स्वरुप ॥ अद्वैतदीप प्रकाशिला ॥२७॥
अनपत्या एक अपत्य ॥ जन्मला सकळ शमांत ॥ जैसा देहामाजीं दीप गुप्त ॥ तैसा ब्रह्म सदोदित जन्मला ॥२८॥
ज्यासी बहुसाल अपत्यें ॥ तो अखंड भोगी आपत्तीतें ॥ यालागीं नांव अपत्यें ॥ जाणोनि वेदार्थे अभिधान केलें ॥२९॥
जे पितरांते तारिती ॥ जे पूर्वजातें उद्धारिती ॥ सुपुत्र त्यातें ह्नणती ॥ तें पुत्रसंपत्ति दुर्लभ ॥३०॥
शोकसंतापकारक ॥ घरोघरीं पुत्र देख ॥ अनेकीं जन्मती अनेक ॥ सुपुत्राचें मुख विरळा देखे ॥३१॥
कोणीएक ब्राह्मणाचे गृहीं ॥ परमभाग्यास्तव पाही ॥ जन्म पावला चर्मदेहीं ॥ त्याचें वैभव तेंही नेणिजे ॥३२॥
जेवीं शुक्तिकेमाजी रत्न ॥ कां लोहामाजी गुप्तधन ॥ तेवीं याचे हदयीचे ज्ञान ॥ इतर जन नेणती ॥३३॥
कोहंभावें करावें रुदन ॥ सोहंभावें हास्यवदन ॥ दोन्ही सांडुनि आपण ॥ मुळींच मौन अखंडत्वें ॥३४॥
तो जन्मोनिया जाण ॥ ‘ जन्मलों ’ नह्नणे आपण ॥ त्यासी नाहीं रडकेपण ॥ मा कोहंभावें कोण टाहो फोडी ॥३५॥
टाहो न फोडी बाळक ॥ तेथें मिळाले लोक ॥ अवघे ह्नणती अलौकिक ॥ निश्चयो एक न करवे ॥३६॥
प्रेत ह्नणों तरी प्राण आहे ॥ अंध ह्नणों तरी पाहतें पाहे ॥ हें ठाईचें रडों नेणें काय ॥ अभिनव माये बाळक ॥३७॥
तेज अंगीं न समाये ॥ देखतां तहानभूक जाय ॥ केवळ वेडें नव्हे माय ॥ या जन्माची सोय चोजवेना ॥३८॥
पालखीहूनि तळीं पडे ॥ कां झोंबलिया मुंग्या माकोडे ॥ तरी सर्वथा न रडे ॥ द्वंद्व चरफडें चरफडीना ॥३९॥
सर्वथा न करी रुदन ॥ मातेनें मुखीं घातल्या स्तन ॥ चोखून न करी स्तनपान ॥ स्वानंदे पूर्ण नित्यतृप्त ॥४०॥
स्तनपान नकरी सर्वथा ॥ यालागीं उदास जाली माता ॥ कदा नकरी अहंमभता ॥ यालागी पिता उपेक्षी ॥४१॥
जाली अष्ट वरुषें पूर्ण ॥ केवी करुं उपनयन ॥ जन्मूनियां यासी लागलें मौन ॥ गायत्रीस्मरण करीना ॥४२॥
गायत्रीमंत्राचें पठण ॥ एक वेळा करीतां संपूर्ण ॥ तैं यासी येतें ब्राह्मणपण ॥ ऐसी चिंता पूर्ण पितयासी ॥४३॥
पुत्राचा निश्चयो पूर्ण ॥ करितां गायत्रीमंत्र पठण ॥ अंगी लागेल ब्राह्मणपण ॥ मज चारीवर्ण विटाळू ॥४४॥
नकरी गायत्री स्मरण ॥ पितेन घातला दवडून ॥ जरी माता नेदी अन्नपान ॥ तरी दीनवदन तो नव्हे ॥४५॥
ऐसी त्या बालकाची स्थिती ॥ तेचि समयीं सहजगती ॥ शंकराचार्य भिक्षार्थी ॥ त्या गृहाप्रती आपण आले ॥ ॥४६॥
व्यवहारे अतिसधन ॥ अग्निहोत्री सुब्राह्मण ॥ भिक्षार्थी आचार्यासी आपण ॥ बहुसाल जाण प्रार्थिती ॥४७॥
उपेक्षुनी त्याचे भिक्षेसी ॥ साक्षेपें आलें त्याचिया गृहासी ॥ देखोनि स्थिती बाळकापासी ॥ झाले संतोषी आचार्य ॥४८॥
देखोनियां त्याचें चिन्ह ॥ जाणोनि त्याचें हृदयीचें ज्ञान ॥ शंकराचार्य सुप्रसन्न ॥ स्वयं संतोषोन सुखमय जाले ॥४९॥
त्यासि देखतांचि दिठीं ॥ आचार्यासि आनंद कोटी ॥ त्याच्या परमानंदगोठी ॥ ऐकावया पोटीं प्रश्नादरु केला ॥५०॥
अतिशयेंसी श्रीशंकरु ॥ करितां जाला प्रश्नादरु ॥ ज्ञान विज्ञान निजनिर्धारु ॥ आत्मसाक्षात्कारु प्रगटावया ॥५१॥