भगवंत - नोव्हेंबर ९

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खर्‍यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरुप. मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय.
सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत. माणसेसुद्धा एकासारखी एक कुठे असतात? पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामधले प्राणी एकमेकाला मारक असूनदेखील कसे जगतात, हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात. परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते, म्हणून एक दुसर्‍याला सहसा मारीत नाही. ज्याच्यामुळे दुसर्‍याच्या हिताचा घात होतो, अशी कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे. भगवंताच्या आड येणार्‍या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय. पण आपल्या स्वार्थकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचे मन दुखविणे, ही हिंसाच समजावी. दुसर्‍याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे, हे काही बरोबर नाही. आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात; उदाहरणार्थ, रोज एक वात लावायची, उजव्या हाताने पाणी प्यायचे, वगैरे. वास्तविक हे कसले नियम ! तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय, शेवटी दिवा लावावा लागतोच ! त्यापेक्षा, ‘ मी कुणाचे अंतःकरण दुखविणार नाही ’ असा नियम करावा. प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरुनच ‘ नको नको ’ म्हणते; कारण न जाणो, चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा ! हे जसे ती सांभाळते, त्याचप्रमाणे आपण कुणाचे अंतःकरण न दुखवण्याचा नियम केला की, आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू ! भगवंत चोहोकडे आहे असे आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही, याला काय करावे? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहावे हाच एक उत्तम मार्ग आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP