बालाजी माहात्म्य - भाग ११

ब्रह्माण्ड पुराण, वराहपुराण, वामन पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण इत्यादी अनेक पुराण कथांमध्ये श्री व्यंकटेशाचे महात्म्य अनेक ठिकाणी वर्णन केले गेले आहे.


स्वामी पुष्करणीच्या खालोखाल पापविनाशन तीर्थ एक अत्यंत महान सांगितले जाते. तेथपर्यंत बसेस वगैरे जातात. तेथे यात्रेकरुंची ये जा चालू असते. पापविनाशन तीर्थात स्नान करण्याने एक दिव्य अनुभव येतो. ब्रह्माचे चारी मुलगे. सनक, सनन्दन, सनन्तकुमार व सनातन येथेच तपश्चर्या करत होते.
ह्या पुण्यतीर्थाच्या महिमा सांगणार्‍या अनेक कथा प्रसिद्ध आहेत
गरीब ब्राह्मणास धनप्राप्ती भद्रवति नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पुष्कळ बायका होत्या. तो अत्यंत गरीब होता. त्याच्या सर्व परिवाराला पुरेसे एका वेळेस लागणारे जेवणपण मिळवता नाकीनऊ येत होते. तो भीक मागत असे. व उधारी पण करीत असे तरीही त्यांची पोटे भरत नसत.
एक दिवस त्याची बायको कामिनी त्याला म्हणाली, “ माझ्या लहानपणी माझ्या वडिलांना नारदमुनी म्हणाले होते की, तिरुपती पहाडावर पाप विनाशन नावाच्या तिर्थात स्नान करुन त्या पवित्र पाण्यानेबरोबर काही दान केले तर त्याची सर्व संकटे दूर होतात. तुम्ही तसे कां नाही करीत. तुम्हाला जी तीन फूट जागा दान मिळाली ती तुम्ही दान करुन टाका, कोण्या ब्राह्मणाला’ तेव्हां त्या पुण्यकार्याने रोजच्या रोज थोडा थोडा तो सुखी जीवन जगू लागला व त्याला पुढे मोक्ष प्राप्ती झाली.
एक ब्राह्मण नालायकांना वैदिक रहस्य बोलला. आणि स्वतः ब्रह्मराक्षस झाला. त्याला त्याच्या वडिलांनी अगस्त्याश्रमात नेले. अगस्त्य मुनीच्या सांगण्यावरुन ते वडील व मुलगा वेंकटाद्रिवर जाऊन पापविनाशन तिर्थात स्नान करुन आले व त्या ब्राह्मण कुमाराला शापापासून विमोचन प्राप्त झाले. तसेच एका ब्राह्मणाचे तोंड गाढवाचे होते. तो पण तिर्थात स्नान केल्याने पापमुक्त झाला.
तुम्बुरु ऋषी पण पापापासून मुक्त झाले. तीर्थस्नानात आंघोळ केल्याने सर्वाचे पापापासून विमोचन होते.
वेंकटाद्रि महात्म्य
आकाशगंगा:- मेषराशी व चित्रानक्षत्र यांचा संयोग झालेल्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर जो कोणी आकाशगंगा नदीत स्नान करील त्याला मोक्ष प्राप्त होतो.
देवीदेवता ऋषीमुनी आणि योगी पुरुष वेंकटाद्रीस परमात्म्याचे निवासस्थान मानतात. त्यालाच कृतयुगात अंजनाद्रि, त्रेतायुगात नारायणाद्रि, द्वापरयुगात सिंहाद्रि आणि कलियुगात वेंकटाद्रि म्हणतात. सात योजने लांब आणि एक योजन उंच असा हा वेंकटाद्रि आहे. दुसर्‍या देशात राहणारा जो कोणी या पर्वताच्या दिशेने भक्तिभावपूर्वक प्रणाम करतो. तो सर्व पापमुक्त होऊन विष्णुलोकाप्रत जातो.
कुमारधारा तीर्थ:- याच पर्वताचे वर अत्यंत पवित्र असे कुमारधारातीर्थ नावाचे एक सरोवर आहे. रविवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य कुंभराशीत आल्यास मघा नक्षत्राचे मध्यान्हकाळी जो कोणी त्या तीर्थात स्नान करील त्यास सतत एक तप गंगानदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. याच तीर्थावर जो कोणी अन्नदान दानधर्म करील त्यालाही पण तसेच पुण्य लाभते.
तुबरतीर्थ:- जो कोणी मनुष्य सूर्य मीन राशीत आला असतांना पोर्णिमेस उत्तर फाल्गुनी नक्षत्राचे मुहूर्तावर तुंबुरुतीर्थात स्नान करील तो पुनर्जन्मांचे फेर्‍यातून मुक्त होईल.
पांडवतीर्थ:- वैशाख महिना द्वादशी तिथी रविवार अशा शुद्ध वा वद्य पक्षामध्ये जो कोणी पांडवतीर्थात स्नान करील त्यास जन्मभर कधी दुःख भोगावे लागणार नाही. परलोकी पण त्यास सुखच प्राप्त होईल.
पापनाशनतीर्थ:- पौष मासात शुद्ध वा वद्य पक्षांत हस्त नक्षत्राचे मुहूर्तावर रविवारी सप्तमी आली तर त्या दिवशी पापनाशन तीर्थात स्नान केले असता जन्मजन्मातरीची पापे नष्ट होतात.
देवी तार्थ श्रीनिवासाच्या या दिव्यालयाचे वास्तव्य वायव्य दिशेस एका गिरीकंदरावर एक अति रहस्यमय असे तीर्थ असून त्याचे नांव देवीतीर्थ आहे. पुष्य नक्षत्रावर गुरुवार आला असताना जो कोणी या तीर्थात स्नान करील त्याचे हातून जाणता व अजाणता जे काही पाप घडले असेल ते नष्ट होते. पुण्याची वाढ होते. पुत्रपौत्र संतती लाभून त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते व अंती तो स्वर्गलोकाप्रत जातो. त्या दिवशी जो अन्नदान करतो त्याला जन्मभर अन्नदान केल्याचे पुण्य लाभते.

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP