आवेशें कपि शिळा टाकिती ॥ असुरांचे मुखांवरी आदळती ॥ रक्ते भडाभडां उसळती ॥ मस्तकें उडती तडतडां ॥५१॥
उर्ध्वपंथें शिरें उडती ॥ स्वर्गपंथा भेदीत जाती ॥ नाशिवंत म्हणोनि उतरती ॥ सीतापति पाहावया ॥५२॥
समरभूमीसीं धडें नाचती ॥ दोनी हस्तें टाळी वाजविती ॥ आम्हांसी येथेंचि आहे गती ॥ नृत्य करिती म्हणूनियां ॥५३॥
रणीं भ्याड जे तयांप्रती ॥ तुटली शिरें गदगदां हांसती ॥ आम्ही पावलो मोक्षगती ॥ तुम्हांस नाही हो सर्वथा ॥५४॥
असो वानरवीर प्रचंड ॥ तों गजभार लोटलें उदंड ॥ कपी ओढूनि शुंडादंड ॥ आकाशपंथें भोवंडिती ॥५५॥
गजदंत मोडोनि लवलाहें ॥ वरिल्या ताडिती त्याचि घायें ॥ शुंडा मिळोनियां पाहें ॥ कुंभस्थळें फोडिती ॥५६॥
पुच्छीं धरूनियां वारण ॥ गगनीं देती भिरकावून ॥ त्याचें लक्ष वेधून ॥ दुसरा गज भिरकाविती ॥५७॥
ऐसे लक्षांचे लक्ष वारण ॥ गगनीं करिताती भ्रमण ॥ एक तुरुंग पायी धरून ॥ स्वारांसहित आपटिती ॥५८॥
वृक्षमंडित पर्वत ॥ रथांवरी टाकिती अकस्मात ॥ रथ सारथियांसमवेत ॥ पिष्ट होती तया घायें ॥५९॥
असो तीन रात्री तीन दिवस ॥ युद्ध झालें आसमास ॥ सुरांचे अवतार किंपुरुष ॥ लोटिले राक्षस माघारे ॥१६०॥
ऐसें देखोनि वीर धूम्राक्ष ॥ रथारूढ धांवे रणदक्ष ॥ तेणें निजबाणीं लक्षानुलक्ष ॥ वानरवीर पाडिलें ॥६१॥
शिळा पर्वत एकसरी ॥ कपि टाकिती धूम्राक्षावरी ॥ परी तो चपळ बाणधारी ॥ पिष्ट करूनि टाकित ॥६२॥
असंख्यात वानरगण ॥ धूम्राक्षें मारिले न लागतां क्षण ॥ कपीचें भार पळोन ॥ पराजय पावले ॥६३॥
उणें देखतांचि सत्वर ॥ वेगे धांवला रुद्रावतार ॥ उचलोनियां गिरिवर ॥ धूम्राक्षावरी टाकिला ॥६४॥
अश्र्व सारथी रथ चूर्ण ॥ पर्वताखालीं जाहले जाण ॥ धूम्राक्ष चपळ उड्डाण । करूनि गेला एकीकडे ॥६५॥
मग शूळ घेऊनि ते अवसरी ॥ धूम्राक्ष धांविन्नला मारुतीवरी ॥ मारावया सर्पारी ॥ अळिका जैसी चपेटे ॥६६॥
वारणावरी धांवे मृगेंद्र ॥ तैसा आवेशें वायुपुत्र ॥ मुष्टिघातें त्याचें शिर ॥ मृत्तिकाघटवत चूर्ण केले ॥६७॥
गजासी पर्वतपात जाहला ॥ कीं महावृक्ष उन्मळिला ॥ तैसा धूम्राक्ष पडिला ॥ गतप्राण होऊनियां ॥६८॥
धूम्राक्ष पडतांचि तात्काळ ॥ पळों लागलें घायाळ ॥ जैसें मन आकळितां बळ ॥ इंद्रियांचें न चले कांहीं ॥६९॥
जेथोनि मन उडे निश्र्चितीं ॥ तेथें कैंची राहिली प्रीती ॥ कीं देखणियाची गती ॥ नेत्र गेलिया मावळे ॥१७०॥
तैसा धूम्राक्ष पडतां ते काळीं ॥ घायाळें लंकेत प्रवेशलीं ॥ रावणें वार्ता ऐकिली ॥ हृदयीं वाढली परम चिंता ॥७१॥
मग दळभारेंसी वज्रदंष्ट्री ॥ दशमुख तयासी आज्ञा करी ॥ तो समरभूमीसी झडकरी ॥ येता झाला वातवेगें ॥७२॥
वानर राक्षस ते समयीं ॥ मिसळल एके ठायीं ॥ वानवीरों राक्षस महीं ॥ प्रेतें करूनि पाडिलें ॥७३॥
रथारूढ वज्रदंष्ट्री ॥ हरिदळीं मिसळला झडकरी ॥ दोन लक्ष कपि भूमीवरी ॥ प्रेतें होऊन पडियले ॥७४॥
ऐसें देखोनि वाळीसुत ॥ वेगें धांवला कृतांतवत ॥ शतांची शतें पर्वत ॥ उचलोनि टाकी अरीवरी ॥७५॥
पर्वतासरी ते क्षणीं ॥ राक्षस मारिले एक अक्षौहिणी ॥ अशुद्धेंकरूनि धरणीं ॥ पूर वाहाती भडभडां ॥७६॥
मग तारातनयें ते अवसरीं ॥ उचलिला बहुश़ृगांचा गिरी ॥ भिरकाविला वज्रदंष्ट्रीवरी ॥ परमावेशें तेधवां ॥७७॥
तों राक्षसें सोडोनियां बाण ॥ क्षण न लागतां केला चूर्ण ॥ ऐसें अंगदें देखोन ॥ महावृक्ष उन्मळिला ॥७८॥
परम प्रतापी वाळीनंदन ॥ भुभुःकारें गर्जवीत गगन ॥ वृक्षघायासरसा प्राण ॥ वज्रदंष्ट्रीचा घेतला ॥७९॥
शरीर जाहलें शतचूर्ण ॥ मही भिजली अशुद्धेकरून ॥ जैसा रगडितां मत्कुण ॥ न उरेच कांही उरी ॥१८०॥
तों अकंपनदळभारें करून ॥ रणासी आला न लागतां क्षण ॥ तेणें सोडिले असंख्यबाण ॥ कपिचक्रावरी पैं ॥८१॥
सिंहचपेटे देखोनि वारण ॥ तेंवि पातला सीताशोकहरण ॥ वृक्षघातें करून ॥ रणी अकंपन विदारिला ॥८२॥
राक्षसदळीं हाहाकार ॥ शोकार्णवीं मग्न दशकंधर ॥ मग तयास शांतवी ज्येष्ठ कुमर ॥ शक्रजित नाम जया ॥८३॥
म्हणे राया तूं चिंता न करीं ॥ तुझे शत्रु समरभूमीवरी ॥ आजि पहुडवीन निर्धारी ॥ शक्रजित तरी नाम ॥८४॥
नाहीं तरी मी जैसा जंत ॥ पोटासी आलों यथार्थ ॥ मग असंख्य दळासहित इंद्रजित ॥ जनका नमोनि निघाला ॥८५॥
असंभाव्य सेनासागर ॥ रणमंडळासी आला सत्वर ॥ तंव ते अपार वानर वीर ॥ रणपंडित प्रतापी ॥८६॥
घेऊन शिळा तरुवर ॥ असुरांत मिसळले वानर ॥ जैसें वायसांमाजी सुंदर ॥ राजहंस मिसळले ॥८७॥
किंवा गारांमाजी हिरे ॥ मिसळती जैसें एकसरें ॥ तैसे वानर प्रतापें थोरें ॥ असुरदळीं चौताळती ॥८८॥
कपींचा प्रताप आगळा ॥ देखोनि इंद्रजिते रथ लोटिला ॥ तों वाळीपुत्र धांविन्नला ॥ महापर्वत घेऊनियां ॥८९॥
जंबुमाळी प्रतापी वीर ॥ त्यावरी धांवला वायुकुमर ॥ विद्युन्माळी यावरी श्र्वशुर ॥ सुग्रीवाचा उठावला ॥१९०॥
जंधनामें असुर प्रबळ ॥ त्यावरी धांवे वीर नळ ॥ परम मांडलें रणमंडळ ॥ हांकें निराळ गर्जतसे ॥९१॥
वानरराक्षसांचीं प्रेतें ॥ एके ठायीं पडलीं अगणितें ॥ जैसे खडे आणि मुक्तें ॥ एकें ठायीं विखुरलीं ॥९२॥
हनुमंतें पायांतळीं ॥ घालोनि चिरिला जंबुमाळी ॥ विद्युन्माळी ते काळीं ॥ सुषेणें आपटोनि मारिला ॥९३॥
नीळें जंध मारिला ते क्षणीं ॥ तो अस्ता गेला वासरमणी ॥ अंधारें कोंदली रजनी ॥ कोणासी कोणी न देखे ॥९४॥
कोणरे कोण असुर पुसत ॥ कपि म्हणती आम्ही रामदूत ॥ असुरवीर अकस्मात ॥ घाय हाणिती सरिसाचि ॥९५॥
कोणरे कोण पुसती वानर ॥ जे म्हणती आम्ही असुर ॥ घायें हाणोनी कपिवर ॥ करिती चूर राक्षसांचा ॥९६॥
सवेंच उदय पावे अत्रिपुत्र ॥ आनंदले सकळांचे नेत्र ॥ परी वानरवीर अनिवार ॥ आटिले असुर पराक्रमें ॥९७॥
मग तो शक्रजित तो वेळां ॥ रथासहित सेनेंतून उडाला ॥ जलदजाळांत लपाला ॥ वर्षों लागला सर्पबाण ॥९८॥
राक्षसांचें कापट्य अद्भुत ॥ बाण तेच सर्प होत ॥ कपींचे अंगीं संचरत ॥ विकळ पडती वीर तेणें ॥९९॥
मग रामलक्ष्मणावरी ॥ सर्पबाण सोडी शक्रारी ॥ अयोध्यानाथ ते अवसरीं ॥ चहूंकडे पाहे तटस्थ ॥२००॥