नववा स्कंध - अध्याय २

’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.


श्रीशुक म्हणतात -

अशा प्रकारे जेव्हा सुद्युम्न वनात गेला , तेव्हा वैवस्वत मनूने पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षेपर्यत तपश्चर्या केली . ॥ १॥

त्यांनतर त्याने संतान -प्राप्तीसाठी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्याचसारखे दहा पुत्र प्राप्त केले . त्यांपैकी सर्वात मोठा इक्ष्वाकू होता . ॥२॥

त्या मनुपुत्रांपैकी एकाचे नाव पृषध होते . त्याला गुरु वसिष्ठांनी गाईचे रक्षण करण्यासाठी नेमले . म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने वीरासनात बसून गाईंचे रक्षण करीत असे . ॥३॥

एके दिवशी रात्री पाऊस पडत होता . त्यावेळी गाईंच्या गोठ्यात एक वाघ घुसला . त्याला भिऊन झोपलेल्या गाई उठून उभ्या राहिल्या . त्या गोशाळेमध्ये इकडे -तिकडे धावू लागल्या . ॥४॥

बलवान वाघाने एका गाईला पकडले . ती अत्यंत भयभीत होऊन हंबरु लागली . तिचा तो आक्रोश ऐकून पृषध गायीजवळ धावत गेला . ॥५॥

रात्रीची वेळ आणि त्यात ढगांनी आच्छादिल्यामुळे तारेसुद्वा दिसत नव्हते . त्याने हातात तलवार घेऊन अजाणतेपणेच वाघ समजून वेगाने गाईचे शिर उडविले . ॥६॥

तलवारीच्या टोकाने वाघाचासुद्वा कान तुटला . रस्त्यात रक्त असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तेथून निघून गेला . ॥७॥

शत्रुदमन पृषध्राला वाटले , वाघ मेला . परंतु सकाळी त्याने जेव्हा गाईलाच मारलेले पाहिले , तेव्हा त्याला अतिशय दु :ख झाले . ॥८॥

पृषध्राने जाणून -बुजून जरी अपराध केला नव्हता , तरीसुद्वा कुलपुरोहित वसिष्ठांनी त्याला शाप दिला की "या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस . शूद्र होशील . " ॥९॥

गुरुदेवांचा शाप पृषध्राने हात जोडून स्वीकारला आणि यानंतर त्याने मुनींना प्रिय असणारे नैष्ठिक ब्रह्यचर्य व्रत धारण केले . ॥१०॥

सर्व प्राण्यांचा हेतुरहित हितैषी आणि सर्वाच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परम विशुद्व भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला . ॥११॥

त्याची सर्वाविषयीची आसक्ती नाहीशी झाली . सर्व वृत्ती शांत झाल्या . इंद्विये वश झाली . तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता . दैववशात जे काही प्राप्त होत असे , त्यावरच तो आपला जीवन -निर्वाह करीत असे . ॥१२॥

तो आत्मज्ञानाने संतुष्ट होता आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करुन बहुतेक वेळा समाधिस्थच राहात असे .तो वेडा , आंधळा अगर बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे . ॥१३॥

अशा प्रकारे राहाणार्‍या त्याने एकदा वनात भडकलेला वणवा पाहिला . मननशील पृषध्राने आपला देह त्या अग्नीत भस्म करुन तो परब्रह्याला प्राप्त झाला . ॥१४॥

मनूचा सर्वात लहान पुत्र कवी नावाचा होता . विषयभोगांबाबत तो अत्यंत नि :स्पृह होता . राह्य सोडून तो आपल्या बंधूंबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या ह्रदयसिंहासनावर विराजमान करुन किशोर अवस्थेतच तो परम पदाला प्राप्त झाला . ॥१५॥

मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले . ते मोठे ब्राह्यणभक्त , धर्मप्रेमी व उत्तरभागाचे रक्षण करणारे होते ॥१६॥

धृष्टाचे धार्ष्ट नावाचे क्षत्रिय झाले . या शरीरानेच शेवटी ते ब्राह्यण झाले . नृगाचा पुत्र सुमती , त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसू होता . ॥१७॥

वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान . ओघवानाच्या पुत्राचे नावसुद्वा ओघवानच होते . ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती . तिचा विवाह सुदर्शनाशी झाला . ॥१८॥

मनुपुत्र नरिष्यन्तापासून चित्रसेन , त्याच्यापासून ऋक्ष , ऋक्षापासून मीढ्वान , मीढ्वानापासून कूर्च आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली . ॥१९॥

इंद्रसेनापासून वीतिहोत्र , त्यापासून सत्यश्रवा , सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली . ॥२०॥

देवदत्ताचा अग्निवेश्य नावाचा पुत्र झाला . तो स्वत : भगवान अग्निदेवच होता . तोच पुढे कानीन आणि महर्षी जातूकर्ण्य नावाने प्रसिद्व झाला . ॥२१॥

परीक्षिता ! ब्राह्यणांचे आग्निवेश्यायन नावाचे गोत्र त्याच्यापासूनच चालत आले . अशा प्रकारे नरिष्यन्ताच्या वंशाचे मी वर्णन केले . आता दिष्टाचा वंश ऐक . ॥२२॥

दिष्टाच्या पुत्राचे नाव नाभाग होते . हा नाभाग दुसरा आहे . आपल्या कर्मामुळे तो वैश्य झाला . त्याचा पुत्र झाला भलंदन आणि त्याचा वत्सप्रीती . ॥२३॥

वत्सप्रीतीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला . प्रमतीचा खनित्र , खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविंशती . ॥२४॥

विविंशतीचा पुत्र रंभ आणि रंभाचा पुत्र खनिनेत्र . हे दोघेही धार्मिक होते . त्याचा पुत्र करंधम आणि करंधमाचा आवीक्षित .परीक्षिता ! आवीक्षिताचा पुत्र मरुत्त चक्रवर्ती राजा झाला . अंगिराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करविला होता . ॥२५ ॥२६॥

मरुत्ताचा यज्ञ जसा झाला , तसा आणखी कोणाचाही झाला नाही . त्या यज्ञातील सर्व काही सोन्याचे असून जे काही होते ते अत्यंत सुंदर होते . ॥२७॥

त्या यज्ञामध्ये सोमपान करुन इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने ब्राह्यण तृप्त झाले होते .त्यात मरुद्रण अन्न वाढणारे आणि विश्वेदेव सभासद होते . ॥२८॥

मरुत्ताच्या पुत्राचे नाव दम होते . दमाचा राज्यवर्धन , त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नर नावाचा पुत्र झाला . ॥२९॥

नरापासून केवल , केवलापासून बंधुमान , बंधुमानापासून वेगवान , वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला . ॥३०॥

तृणबिंदू आदर्श गुणांचे भांडार होता . अप्सरांमधील श्रेष्ठ अलंबुषा देवीने त्याला वरले . तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि इडाविडा नावाची एक कन्या झाली . ॥३१॥

मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्त्य यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करुन घेऊन इडविडेपासून कुबेराला जन्म दिला . ॥३२॥

तृणबिंदूला विशाल , शून्यबंधू आणि धूमकेतू असे तीन पुत्र झाले . त्यांपैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्याने वैशाली नावाची नगरी वसविली . ॥३३॥

विशालाचा हेमचंद्र , हेमचंद्राचा धूम्राक्ष , धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे कृशाश्व व देवज असे दोन पुत्र झाले . ॥३४॥

कृशाश्वाच्या पुत्राचे नाव सोमदत्त होते . त्याने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंताची आराधना केली आणि योगेश्वर संताचाआश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करुन घेतली . ॥३५॥

सोमदत्ताचा पुत्र सुमती आणि सुमतीचा जनमेजय झाला . हे सर्व तृणबिंदूची कीर्ती वाढविणारे विशाल वंशातील राजे झाले . ॥३६॥

अध्याय दुसरा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP