अध्याय चाळीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


झालें त्याचे व्रतबंधन ॥ तों सवेंच पावला मरण ॥ तंव पित्यानें उचलोन ॥ राजद्वारा आणिला ॥५१॥

राघवास म्हणे ब्राह्मण ॥ त्वां काय केलें दोषाचरण ॥ अकाळीं बाळ पावला मरण ॥ करी प्रयत्न लवकरी ॥५२॥

परम चिंताक्रांत रघुनाथ ॥ तंव पातला कमलोद्भवसुत ॥ सीताकांतें वृत्तांत ॥ नारदासी सांगितला ॥५३॥

नारद म्हणे जानकीपती ॥ कोणी तप करितो शूद्रयाती ॥ त्या पापेंकरूनि निश्चितीं ॥ ऋृषिकुमर निमाला ॥५४॥

तप करणें हा ब्राह्मणांचा धर्म ॥ इतरांसी तो सहजचि अधर्म ॥ शूद्र तप आचरतां परम ॥ अकाळीं मरण होय पैं ॥५५॥

ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ राम चिंती पुष्पकविमान ॥ तें तत्काळ आलें धांवोन ॥ राघवें बाहिलें म्हणोनियां ॥५६॥

प्रधान सेनेसहित तत्काळ ॥ वरी आरूढे तमालनीळ ॥ शोधूं लागला पृथ्वीमंडळ ॥ गुहा अचळ कठीण स्थानें ॥५७॥

जो जो तपस्वी दृष्टी दिसे ॥ तयास कोणी जाती राघव पुसे ॥ तंव ते बोलती त्याचिसरसे ॥ श्रेष्ठवर्ण ब्राह्मण ॥५८॥

तयांसी राघव नमून ॥ करी मग तयांचे पूजन ॥ याचपरी उर्वीं संपूर्ण ॥ रघुनंदन शोधितसे ॥५९॥

दक्षिणपंथें शोधी श्रीराम ॥ तों लागले निबिड परम ॥ गिरीकंदरीं एक अधम ॥ किरात तप करीतसे ॥६०॥

तेणें आरंभिले धूम्रपान ॥ तयास पुसे जनकजारमण ॥ म्हणे कोण वेद कोण वर्ण ॥ तप किमर्थ आरंभिले ॥६१॥

तंव तो म्हणे मी किरात ॥ स्वर्गानिमित्त तप करितों येथ ॥ ऐकतां कोपला जानकीनाथ ॥ म्हणे हा आचरत परम अधर्म ॥६२॥

बाण तीक्ष्ण परम चपळ ॥ छेछिलें त्याचें कंठनाळ ॥ तो उद्धरूनि तत्काळ ॥ स्वर्गलोक पावला ॥६३॥

तो विमानीं बैसोन अमरनाथ ॥ रघुनाथासी येऊनि भेटत ॥ म्हणे बरा वधिला किरात ॥ पुरले मनोरथ देवांचे ॥६४॥

सीतावल्लभा रघुनंदना ॥ पुराणपुरुषा गुणसंपन्ना ॥ मज कांहीं सांगावी आज्ञा ॥ ते मी सिद्धी पाववीन ॥६५॥

रघुनाथ म्हणे ऋषिनंदन ॥ अयोध्येंत पावला मरण ॥ तयासी द्यावें जीवदान ॥ सहस्रनयन अवश्य म्हणे ॥६६॥

इंद्रआज्ञेंकरून ॥ परतला ऋषिपुत्राचा प्राण ॥ जैसा ग्रामासी जातां पंथीहून ॥ येत परतोन माघारा ॥६७॥

बहुतांचे सुत त्यावेगळे ॥ पूर्वीं होते जे निमाले ॥ तेही इंद्रें आणोनि दिधले ॥ तद्रूप तैसेच पूर्ववत ॥६८॥

उसनी जेवीं वस्तु नेत ॥ ती परतोनि तैसीच देत ॥ तैसे तयांचे त्यांसी सुत ॥ अमरेश्वरें दीधले ॥६९॥

असो इकडे अयोध्यापती ॥ अगस्तीच्या काननाप्रती ॥ जाता जाहला सहजगती ॥ वनें उपवनें विलोकित ॥७०॥

तों पुढें दोन पक्षी येऊन ॥ राघवासी घालिती लोटांगण ॥ म्हणती आमचा वाद निवडोन ॥ पुढें जावें राघवेंद्रा ॥७१॥

तें रघुत्तमें ऐकोन ॥ स्थिर केले विमान ॥ तों उलूक गृध्र दोघेजण ॥ बोलते जाहले तेधवां ॥७२॥

दिवाभीत बोले वचन ॥ गृह माझे पूर्वींहून ॥ हा गृध्र मज दवडून ॥ बळेंच येथे नांदतो ॥७३॥

मग गृध्र वचन बोलत ॥ उगेंच पीडितो दिवाभीत ॥ गृह माझें यथार्थ ॥ बहुकाळ येथेंचि ॥७४॥

प्रधानास म्हणे सीतावर ॥ यांचा वाद निवडावा सत्वर ॥ सत्य निवडोन मंदिर ॥ ज्याचें त्यास देइंजे ॥७५॥

तों गृध्र बोले पापमती ॥ जंव येथें पृथ्वी नव्हती ॥ तों या वृक्षावरी निश्चितीं ॥ गृह माझें म्यां रचियेलें ॥७६॥

दिवाभीत बोले वचन ॥ ईश्वरें पृथ्वी केली निर्माण ॥ मग वृक्ष वाढला पूर्ण ॥ म्यां सदन निर्मिलें तैं ॥७७॥

प्रधान म्हणे गृध्र सत्य ॥ बहुत काळाच्या गोष्टी सांगत ॥ ऐकोनि हांसिन्नला रघुनाथ ॥ म्हणे केवीं हा अर्थ निवडिला ॥७८॥

पृथ्वी वृक्षासी आधार ॥ नीडासी आश्रय तरुवर ॥ दुरात्मा गृध्र साचार ॥ उलूकालागीं पीडितसे ॥७९॥

निवडूनि यथार्थ व्यवहार ॥ राम उलूकासी देत मंदिर ॥ म्हणे हा गृध्र चांडाळ थोर ॥ यासी वधीन मी आतां ॥८०॥

बाण काढिला तये क्षणीं ॥ तंव गर्जिली तेथें आकाशवाणी ॥ म्हणे हे राम कोदंडपाणी ॥ यासी न मारीं सर्वथा ॥८१॥

हा पूर्वी भूपति ब्रह्मदत्त ॥ गौतम ऋषीचा अंकित ॥ तों याचे सदना अकस्मात ॥ भोजना आला गौतम ऋृषि ॥८२॥

तयासी येणें मांस वाढिले ॥ देखतां गुरूचे मन क्षोभले ॥ तत्काळ यासी शापिलें ॥ गृध्र होय म्हणूनियां ॥८३॥

मग हा लागला गुरुचरणी ॥ उःशाप बोले गौतम मुनि ॥ रामदर्शन होतां ते क्षणीं ॥ जासी उद्धरून स्वर्गातें ॥८४॥

ऐसें देववाणी बोलत ॥ तों विमान पातलें अकस्मात ॥ दिव्य देह पावल ब्रह्मदत्त ॥ भावें नमीत रामचंद्रा ॥८५॥

स्तवोनियां कोदंडपाणी ॥ तत्काळ बैसला विमानीं ॥ रघुवीरप्रतापेंकरूनी ॥ स्वर्गी सुखी राहिला ॥८६॥

असो कलशोद्भवाचे आश्रमासी ॥ येता जाहला अयोध्यावासी ॥ साष्टांग नमून ऋषिसी ॥ राघव उभा राहिला ॥८७॥

बहुत करून आदर ॥ आश्रमीं पूजिला रघुवीर ॥ हस्तकंकण एक सुंदर ॥ ऋषीनें दिधलें राघवा ॥८८॥

पृथ्वीचे मोल संपूर्ण ॥ ऐसें एक एक जडलें रत्न ॥ तें सीतावल्लभें देखोन ॥ घटोद्भवाप्रति पुसतसे ॥८९॥

म्हणे यासी निर्मिता चतुरानन ॥ स्वर्गीची वस्तु प्रभाघन ॥ मनुष्यांसी दुर्लभ पूर्ण ॥ तुम्हांस कैसी लाधली ॥९०॥

मग अगस्ति ते कथा सांगत ॥ पैल ते सरोवरीं पाहें प्रेत ॥ वैदर्भदेशींचा नृपनाथ ॥ पुण्यवंत तपोराशी ॥९१॥

दानें केलीं अपरिमित ॥ रामा तप आचरला बहुत ॥ परी अन्नदान किंचित ॥ घडलें नाही यापासूनि ॥९२॥

स्वर्गास गेला तो नृपनाथ ॥ परी क्षुधेनें पीडिला अत्यंत ॥ मग तयासी म्हणे पह्यजात ॥ नाहीं भक्षार्थ तुज येथें ॥९३॥

नाही केलें अन्नदान ॥ येथें न पाविले दिधल्याविण ॥ तरी तूं भूतळाप्रति जाऊन ॥ आपलें प्रेत भक्षीं कां ॥९४॥

तूं भक्षितां नित्यकाळ ॥ मांस वाढेल बहुसाल ॥ मग तो विमानीं बैसोन भूपाळ ॥ नित्यकाळ येत तेथें ॥९५॥

तों तें आपुलें प्रेत भक्षून ॥ स्वर्गासी जाय परतोन ॥ अन्नोदकाएवढे दान ॥ दुजें नाहीं राघवा ॥९६॥

भाग्य ते वैराग्य निश्चित ॥ दैवत एक सद्गुरुनाथ ॥ शांतिसुखाहून अद्भुत ॥ दुजें सुख नसेचि ॥९७॥

तिथींमाजी द्वादशी श्रेष्ठ ॥ कीं मंत्रांत गायत्री वरिष्ठ ॥ कीं तीर्थामाजीं सुभट ॥ प्रयागराज थोर जैसा ॥९८॥

तैसें दानांमाजी अन्नदान ॥ राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण ॥ असो त्या रायासी कमलासन ॥ बोलता झाला ते काळीं ॥९९॥

म्हणे अगस्तीचे होतां दर्शन ॥ तुझें कर्म खंडेल गहन ॥ तंव एके दिवशीं येऊन ॥ प्रेत भक्षी नृपवर ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP