अध्याय पस्तीसावा - श्लोक १५१ ते २२१

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


यावरी भरत आणि लक्ष्मण ॥ उचंबळती प्रेमरसेंकरून ॥ एकमेकांसी आलिंगन ॥ देते जाहले तेधवां ॥५१॥

सुग्रीव आणि बिभीषण ॥ उभयतांसी म्हणे रघुनंदन ॥ भरतासी क्षेमालिंगन ॥ द्यावें आतां ते समयी ॥५२॥

ऐसें ऐकतां दोघेजण ॥ भरतासी करिती साष्टांग नमन ॥ सुग्रीवासी उठवून ॥ भरतें आधी आलिंगिलें ॥५३॥

सवेंचि उठोनि बिभीषण ॥ हृदयीं धरिला प्रीतीकरून ॥ यावरी नळ नीळ वाळिनंदन ॥ जांबुवंतादि भेटले ॥५४॥

याउपरी गुहक भक्त ॥ तोही भरताऐसा व्रतस्थ ॥ तेणें प्रेमभरें दंडवत ॥ केलें तेव्हां रामासी ॥५५॥

सर्वासी समान रघुनाथ ॥ गुहकास तेव्हां हृदयीं धरित ॥ आनंद न माय गगनांत ॥ गुहकाचा ते काळीं ॥५६॥

मग गुहक भरतासमवेंत ॥ विमानीं बैसला रघुनाथ ॥ विमानी मागुनी उंचावत ॥ चालिले अद्भुत वायुवेगें ॥५७॥

क्षीराब्धितटीं जाऊन ॥ बैसे जैसा विष्णुवहन ॥ नंदिग्रामासमीप विमान ॥ उतरले तैसे ते वेळीं ॥५८॥

सीता आणि श्रीरघुनाथ ॥ पुष्पकाखालीं उतरत ॥ वानर असुर समस्त ॥ क्षण न लागतां उतरले ॥५९॥

राघव म्हणे पुष्पकासी ॥ आतां तुवां जावें कुबेरापासीं ॥ चिंतिल्या समयासीं ॥ आम्हापासीं येइंजे ॥१६०॥

ऐसी आज्ञा होता तात्काळिक ॥ ऊर्ध्वपंथे गेलें पुष्पक ॥ धनपतीपासीं जाऊनि देख ॥ स्थिर जाहलें ते काळीं ॥६१॥

नंदिग्रामासमीप अरण्यांत ॥ उतरता जाहला रघुनाथ ॥ वानर असुरदळ समस्त ॥ सेना तेथें बैसली ॥६२॥

इकडे अयोध्येबाहेर ॥ निघालें जाण दळ परिकर ॥ रथ श़ृंगारिले सुंदर ॥ आनंदें बहुत चालिले ॥६३॥

चवदा सहस्र कुंजरभेरी ॥ दणाणिल्या ते अवसरीं ॥ सोळा पद्में दळेसी झडकरी ॥ शत्रुघ्न येत भेटावया ॥६४॥

भरत म्हणे जी रघुराया ॥ शत्रुघ्न सुमंत आले भेटावया ॥ आणि माताही येती लवलाह्या ॥ होऊनियां स्नेहभरित ॥६५॥

जो तपें ज्ञानें समर्थ ॥ जो शांतिक्षमेचा पर्वत ॥ तो वसिष्ठमुनि सद्गुरुनाथ ॥ भेटावया येत त्वरेनें ॥६६॥

आणि अयोध्येचे सकळ ब्रह्मण ॥ अष्टादश प्रजा सैन्य संपूर्ण असंभाव्यं प्रातीकरून ॥ भेटावया येतसे ॥६७॥

तों सुमंत आणि शत्रुघ्न ॥ रथाखालीं उतरून ॥ अवलोकिता सीताजीवन ॥ लोटांगण घालिती ॥६८॥

देखोनि शत्रुघ्न सुमंत ॥ भेटावया उठे रघुनाथ ॥ शत्रुघ्न चरणीं मिठीं घालीत ॥ नेत्रीं उदक स्रवतसे ॥६९॥

रावणारि सद्द होऊन ॥ शत्रुघ्नासी देत आलिंगन ॥ तो सुमंते धरिले चरण ॥ चिषकंठवंद्याचें ते काळी ॥१७०॥

बंधूचे परी आदरे ॥ तोही आलिंगिला रघुवीरें ॥ परी प्रीती सौमित्रे ॥ सुमंत शत्रुघ्न आलिंगिले ॥७१॥

यावरी सकळ जुत्पती ॥ सुग्रीव बिभीषण नृपती ॥ सुमंत शत्रुघ्ना परम प्रीतीं ॥ भेटते जाहले तेधवां ॥७२॥

अवश्य सौभाग्यसरिता ॥ दोघांहीं वंदिली जनक दुहिता ॥ यावरी सुमंत म्हणे रघुनाथा ॥ सदगुरु वसिष्ठ समीप आले ॥७३॥

ऐसें बोलतां सुमंत ॥ सामोरा धांवे रघुनाथ ॥ तों वहानाखाली ब्रह्मसुत ॥ राम देखोनि उतरला ॥७४॥

नेत्रीं देखोनि सद्गुरुनाथ ॥ सद्द झाला जनजजामात ॥ ॥ दंडन्यायें नमस्कार घालित ॥ धांवूनि वसिष्ठ उचली प्रेमें ॥७५॥

म्हणे जगद्वंद्या रघुनाथा ॥ तुझें दर्शन दुर्लभ समस्तां ॥ भूभार हरावया तत्वतां ॥ अवतरलासी सूर्यवंशी ॥७६॥

संसारभयश्रममोचना ॥ रावणांतका चिन्मयलोचना ॥ पुराणपुरुषा जगमोहना ॥ धन्य लीला दाविली ॥७७॥

मग बोले जगदात्मा ॥ सर्व तुमचे कृपेचा महिमा ॥ गुरुभक्तासी शिव ब्रह्मा ॥ सनकादिक वंदिती ॥७८॥

राग काळ भय मृत्य ॥ त्यांपासूनि रक्षी सद्गुरुनाथ ॥ देव केले बंधमुक्त ॥ हा प्रताप गुरुकृपेचा ॥७९॥

मग वसिष्ठ मुनीचे चरण ॥ वंदी प्रेमें सुमित्रानंदन ॥ त्यासी गुरुनें हृदयीं धरून ॥ म्हणे धन्य कीर्ति तुझी ॥१८०॥

त्यावरी वसिष्ठाचे चरण ॥ जानकी वंदी प्रमेंकरून ॥ गुरु म्हणे अनंत कल्याण । सौभाग्यवर्धन तुझें हो कां ॥८१॥

जनकात्मजे तूं पूर्ण सती ॥ वाढविली राघवाची कीर्ति ॥ तूं प्रणवरूपिणी चिच्छिक्ति ॥ ब्रह्मांड रचिती स्वइच्छे ॥८२॥

असो सुग्रीव बिभीषणादि वीर ॥ करिती सद्गुरुसी नमस्कार । तों माता आली सत्वर ॥ सुखासनीं बैसोनियां ॥८३॥

वहनापुढें वेत्रधार ॥ चालती सहस्रांचे सहस्र ॥ वहन आच्छादिलें समग्र ॥ हेमांबरेंकरूनियां ॥८४॥

सुमंत म्हणे रघुनाथा ॥ स्वामी जवळी आली माता ॥ तों धीर न धरवे सीताकांता ॥ सामोरा जात त्वरेनें ॥८५॥

वहन ठेलें भूमंडळी ॥ तों राघव धांवूनि आला जवळी ॥ जैसे तान्हे बाळ उडी घाली ॥ धेनु जवळी देखतां ॥८६॥

मातेचे चरणीं मस्तक ॥ ठेवी त्रिभुवननायक ॥ मायेनें उचलोन तात्कालिक ॥ हृदयीं धरिला ते काळीं ॥८७॥

नेत्रीं अश्रुधारा वाहात ॥ तेणें अभिषेकिला रघुनाथ ॥ स्नेहभरें माता स्फुंदत ॥ सद्द कंठ जाहला ॥८८॥

म्हणे चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ बाळें माझीं गेलीं वनांत । सुकुमार चरणीं चालत ॥ शीतोष्ण सोशित पैं ॥८९॥

श्रीराम माझा राजहंस ॥ सोडोनि अयोध्यामानस ॥ पाठविला कंटकवनास ॥ सांवळा डोळस सुकुमार ॥१९०॥

माझा रामचंद्र निर्मळ ॥ वियोगराहु मध्यें सबळ ॥ चतुर्दश वर्षे शुद्ध मंडळ ॥ वदन आजि देखिला ॥९१॥

चतुर्दश वर्षें क्रमिली रजनी ॥ आजि राम उगवला वासरमणी ॥ अयोध्याजनवदनकमळिणी ॥ टवटविल्या एकदांचि ॥९२॥

नवमेघरंग रघुवीर ॥ वियोगसमीरें नेला दूर ॥ देहक्षेत्र शोषिलें समग्र ॥ आजिवरी आमुचें ॥९३॥

असो यावरी रघुनंदन ॥ करी मातेचें समाधान ॥ म्हणे भाग्य आमुचें परिपूर्ण ॥ देखिले चरण डोळां तुझें ॥९४॥

तों येऊनि लक्ष्मण ॥ वंदी कौसल्येचे चरण ॥ कौसल्येनें हृदयी धरून ॥ बोले वचन सद्द ॥९५॥

दोघे माझे चिंतामणी ॥ गोफणिले होते दूर वनीं ॥ पूर्वभाग्येंकरूनी ॥ पुढती नयनीं देखिले ॥९६॥

सुमित्रेचे चरण सप्रेमें ॥ वंदिले तेव्हां आत्मारामें ॥ हृदयीं आलिंगिला सप्रेमें ॥ सुमित्रेनें तेधवां ॥९७॥

म्हणे चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ अयोध्या जाहली होती प्रेतवत ॥ आजि निजप्राण रघुनाथ ॥ आंत संचरला ॥९८॥

असो सुमित्रेसी वंदून ॥ रामें कैकयीस केले नमन ॥ कौसल्येऐसें आलिंगन ॥ प्रीतीनें तेणें दिधलें ॥९९॥

कैकयी म्हणे रघुनाथा ॥ कल्याणरूपें नादें आतां ॥ अपयश आलें माझे माथां ॥ तें आजि सर्व निरसलें ॥२००॥

शुष्क कासारींचें मीन ॥ तळमळत होते अयोध्याजन ॥ तो आजि राम जगज्जीवन ॥ येऊनि भरलें एकसरें ॥१॥

इकडे सुमित्रेचे चरण ॥ साष्टांग नमी लक्ष्मण ॥ पुत्रास प्रेमें उचलून ॥ हृदयी धरी तेधवां ॥२॥

म्हणे चवदा वर्षें निराहार ॥ वनी श्रमलासी तूं थोर ॥ सौमित्र देत प्रत्युत्तर ॥ रघुवीरकृपेनें सुखी होतो ॥३॥

मग कैकयीस नमस्कार ॥ करीत भूधरावतार ॥ आलिंगोनियां सौमित्र ॥ म्हणे बारे विजयी होईं ॥४॥

यावरी कौसल्येचे चरणीं ॥ लागे येऊन मंगलभगिनी ॥ हृदयीं दृढ आलिंगोनी ॥ रामजननी बोलत ॥५॥

चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ माये श्रमलीस बहुत ॥ स्नेहे मुख कुरवाळीत ॥ जानकीचे तेधवां ॥६॥

नवरत्नमुद्रिका परम प्रीतीं ॥ घाली जानकीचें हातीं ॥ तों सीतेनें सुमित्रा सती ॥ परम स्नेहें नभियेली ॥७॥

सुमित्रा म्हणे वो साजणी ॥ परम श्रमलीस काननीं ॥ आपुले कंठींची माळ काढूनी ॥ गळां घातली जानकीच्या ॥८॥

स्नेहेंकरूनि धरिली हृदयीं ॥ मग सीतेनें वंदिली कैकयी ॥ क्षेम जो दिधलें नाहीं ॥ तों वचन काय बोलत ॥९॥

वय तुझें लहान साचार ॥ परी कीर्ति केली बहुत थोर ॥ रावणाची संपदा समग्र ॥ भोगूनियां आलीसी ॥२१०॥

श्रोत्रियाचें पात्र पूर्ण ॥ न कळतां घेऊनि गेलें श्वान ॥ तें श्वान मारिलें क्रोधेंकरून ॥ तरी पात्र ते पवित्र नोहेचि ॥११॥

तैसा राम रावण मारून ॥ तुज आणिलें सोडवून ॥ कोणे एके प्रकारेंकरून ॥ कीर्ति त्रिभुवनीं प्रकटलीं ॥१२॥

राम कष्टला वनवासीं ॥ परी तूं सुखें होतीस लंकेसी ॥ तेथींचा सोहळा मानसीं ॥ आठवत असेल तुझिया ॥१३॥

ऐसें कैकयी बोलतां ॥ उगीच परतून गेली सीता ॥ अपवित्रासी उत्तर देतां ॥ येत हीनता श्रेष्ठासी ॥१४॥

म्हणोनियां जनकबाळी ॥ जाऊनियां बैसली कौसल्येजवळी ॥ शांतीपासीं जैसी शोभली ॥ क्षमा निरंतर राहावया ॥१५॥

कीं आवडी तेथें भक्ती ॥ राहे जैसी परम प्रीतीं ॥ कीं धारणा तेथें वृत्ती ॥ न सोडीच सर्वथा ॥१६॥

तैसी कौसल्येपासीं सीता ॥ शोभली ती जगन्माता ॥ भाविक दुर्जना त्यागूनि तत्वतां ॥ संतसंगें जेवीं वसे ॥१७॥

रामविजयग्रंथ सुरस ॥ उत्तरकांड हाचि कळस ॥ त्यावरी अयोध्याप्रवेश ॥ सावकाश परिसिजे ॥१८॥

मंगलस्नान करून ॥ रघुवीर करील भोजन ॥ मग सुमूर्तेेंसी संपूर्ण ॥ अयोध्येत प्रवेशती ॥१९॥

श्रीधरवरदा राघवेशा ॥ ब्रह्मानंदा पुराणपुरुषा ॥ अभंगपद निजदासा ॥ कृपा करून देईं तूं ॥२२०॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ पंचत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२२१॥

॥ अध्याय ३५ ॥ ओंव्या ॥२२१॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP